अजूनकाही
१. चलनात असलेल्या ५०० आणि एक हजाराच्या नोटा रद्द केल्यास देशात अभूतपूर्व गोंधळ निर्माण होईल. शिवाय लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागेल. बाद चलनाच्या जागी नवीन चलन तातडीने आणणे शक्य होणार नाही, असं रिझर्व्ह बँकेने सांगितल्यानंतरही निश्चलनीकरणाचा निर्णय केंद्र सरकारने रेटला. ८ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर या काळात एकही बनावट नोट सापडली नाही. निश्चलनीकरण मोहिमेच्या नऊ नोव्हेंबर ते चार जानेवारी या काळात प्राप्तीकर विभागाकडून ४७४.३७ कोटी रु. मूल्याच्या नव्या-जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या. यातला किती पैसा दहशतवादी किंवा गुन्हेगारी टोळ्यांकडून जप्त करण्यात आला, हे सांगण्यास अर्थ खाते असमर्थ आहे. : बातमी
पण, मुळात देशाला कॅशलेस बनवण्याचंच उद्दिष्ट होतं पंतप्रधानांच्या डोळ्यांसमोर. ते आधी जाहीर करून शत्रुराष्ट्रांना सावध करण्याची त्यांची इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी अतिरेक्यांचा बीमोड, बनावट नोटांना चाप वगैरे उद्दिष्टं सांगून सगळयांचा पोपट केला आणि कॅशलेस क्रांती घडवून आणली. तिची गोड फळं तीन हजार त्र्याहत्तर साली नक्कीच मिळतील, यात शंका नाही… त्यांना आणि त्यांच्या ढोलकांना.
..............................................................
२. भाजप एखादी चुकीची गोष्ट करते त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याचे समर्थन करतो. एक प्रकारे संघ भाजपला शरण गेल्याची स्थिती आहे. मी संघात राहीन मात्र आम्हाला असहाय्य आणि कमकुवत नेतृत्व नको आहे. : संघाचे बंडखोर नेते आणि गोवा सुरक्षा मंचाचे प्रमुख कार्यकर्ते सुभाष वेलिंगकर
अहो वेलिंगकर काका, आपल्या देशात कधी नव्हे ते ५६ इंची छातीचं कणखर नेतृत्त्व लाभलेलं आहे युगानुयुगांत. त्यांनी देशाकडे पाहायचं की संघाकडे? मिशीवाल्या काकांची गच्छंति करून पंतप्रधानांनाच सरसंघचालकही बनवण्याचा विचार आहे का तुमचा? ते एकटे किती जबाबदाऱ्या सांभाळतील, विचार करा.
..............................................................
३. भविष्यात अमेरिकेत सर्वांना समान संधी मिळतील. वंश, रंग आणि धर्म यांच्या भिंती संपुष्टात येऊन अमेरिका हे एक शक्तिशाली राष्ट्र होईल. भविष्यात अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हिंदू, ज्यू किंवा लॅटिन वंशाचा झालेला पाहायला आवडेल. : अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा
ते ज्यू, लॅटिन वगैरे सोडून सोडा हो. आमच्या एनाराय बांधवांनी निर्धार केला, तर अमेरिकेचा पुढचा अध्यक्ष खंबीर हिंदूच होईल, ही काळ्या दगडावरची रेघ समजा. तुम्हाला अध्यक्ष तुमच्याच देशात जन्मलेला असावा वगैरे काही फुटकळ नियम मात्र बदलायला लागतील, खंबीर आणि कणखर नेतृत्वासाठी. नोटा सध्या कोणत्या आहेत चलनात, त्याचीही माहिती पाठवून द्या.
..............................................................
४. राहुल गांधी यांनी ४० दिवसांपूर्वी बँकेतून ४००० रुपये काढले होते. त्यानंतर ते पुन्हा बँकेत फिरकले नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे नवा कुर्ता विकत घेण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे आम्ही त्यांना युवा मोर्चाच्या वतीने नवा कुर्ता पाठवत आहोत. : भाजप युवा मोर्चाचे नेते श्रीनिवास
राहुलने किंवा भक्तभाषेत पप्पूने आपल्या कुर्त्याचा फाटका खिसा दाखवून 'मोदींजींना अशा फाटक्या कपड्यांमध्ये केव्हाच पाहिले नसेल तरीही मोदीजी नेहमीच गरिबांचंच प्रतिनिधीत्व करतात' अशी नौटंकी करून दाखवली, ते फारच जिव्हारी लागलेलं दिसतंय भक्तांच्या. पण, त्यांना कुर्ता पाठवायला काँग्रेसचे कार्यकर्ते आहेतच की. तुम्ही पाठवायचा तर तो स्पेशल असायला हवा. म्हणजे उदाहरणार्थ मोदींनी चरख्यावर स्वहस्ते विणलेल्या कापडाचा वगैरे. अर्रर्रर्र, पण, त्यासाठी मोदींना पोझ देण्यापलीकडे चरखा शिकावा लागेल, नाही का?
..............................................................
५. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी जनतेला स्वदेशीचा मंत्र दिला. अगदी आज, आतापासून अमेरिकेची विपन्नावस्था संपणार आहे. अमेरिकी हातांनी आणि अमेरिकी श्रमांनीच आता आपण अमेरिकेची पुनर्बांधणी करणार आहेत. अमेरिकी हातांनाच काम देणार आहोत आणि अमेरिकी उत्पादनेच विकत घेणार आहोत. अशी भावनिक साद ट्रम्प यांनी घातली.
ट्रम्पतात्या, आता एकदाचं कोणत्या शाखेत कधी स्वयंसेवक होतात ते जाहीर करून टाका. बरं ते अमेरिकीच उत्पादनं घेणार म्हणताय, तर उदयापास्नं कम्प्यूटर, मोबाइल, कपडे, चपलाबुटांची दुकानं बंद होणार का अमेरिकेतली? हा सगळा माल भायेरनंच येतोय म्हणून विचारलं तात्या. आन् तुम्हाला सस्त्यात कच्चा माल, सुट्टे भाग पुरवणाऱ्या फॅक्ट्र्या लागल्यात देशादेशांत त्याही बंद काय? रेड इंडियनच्या ड्रेसात फिरावं लागनार दिसतंय तात्याला लौकरच.
editor@aksharnama.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment