‘हिंदू’ : कादंबरीलेखन स्पर्धा’ दोनेक वर्षांपूर्वी ‘मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस’ने जाहीर केली होती. त्याचे निवेदन पुढीलप्रमाणे होते -
भालचंद्र नेमाडेलिखित ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ ही कादंबरी महाकाव्यात्म स्वरूपाची आहे. महाकाव्यात असावीत तशी अनेक कथाबीजे या कादंबरीत विखुरलेली आहेत. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन ‘मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस’च्या वतीने एक कादंबरीलेखन स्पर्धा जाहीर करत आहोत. ‘हिंदू’ या कादंबरीतील कथाबीजांवर\उपकथांवर आधारलेली, तीमधील नायक, पात्रे, प्रसंग, वातावरण इत्यादींचा आवश्यक तर संदर्भ घेऊन सर्वस्वी नवीन अशी कादंबरी लेखकांनी लिहावी असा प्रस्तुत स्पर्धेमागील हेतू आहे. कादंबरी पूर्णपणे स्वतंत्र असावी व तीमधून लेखकाची सर्जनशीलता व्यक्त व्हावी. तथापि तिला ‘हिंदू’मधील बीजाचा आधार असावा. ‘हिंदू’मधील बीजांच्या आधारे परंतु आपल्या स्वत:च्या कल्पनाशक्तीच्या\ प्रतिभेच्या बळावर लेखकांचे लेखन असावे अशी अपेक्षा आहे. स्पर्धेच्या आयोजकांना स्पर्धेत सहभागी होणाऱ्या लेखकांनी ‘हिंदू’ या कादंबरीची सिक्वेल लिहावी अशी अजिबात अपेक्षा नाही. कादंबरी वाचताना लेखकाच्या नवनिर्मितीक्षमतेचा प्रत्यय वाचकांना यावा.
या स्पर्धेत कोणीही भाग घेऊ शकेल. अगदी नव्या लेखकांपासून प्रथितयश लेखकांपर्यंत कोणालाही स्पर्धेत सहभागी होता येईल. कादंबरीला पृष्ठसंख्येचे कोणतेही बंधन नाही. लहान-मोठ्या आकाराचेही बंधन नाही. स्पर्धेसाठी कादंबरी सादर करण्याचा अखेरचा दिनांक ३१ डिसेंबर २०१८ हा आहे. स्पर्धेसंबंधी काहीही माहिती विचारावयाची असल्यास खाली दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर दुपारी ३ ते ५ या वेळेत संपर्क साधावयास हरकत नाही.
स्पर्धेत उत्कृष्ट ठरणाऱ्या कादंबऱ्यांना रु. पंचवीस हजार, रु. वीस हजार व रु. दहा हजार या रकमांची अनुक्रमे (प्रथम, द्वितीय व तृतीय अशी) तीन पारितोषिके दिली जातील. पारितोषिकासंबंधीचा अंतिम निर्णय परीक्षकांचा असेल. तो स्पर्धकांवर बंधनकारक असेल. निर्णयानंतर त्यासंबंधी कोणतीही चर्चा वा पत्रव्यवहार केला जाणार नाही. निर्णय ३१ मार्च २०१९ पर्यंत जाहीर केला जाईल. प्रथम क्रमांकाची कादंबरी ‘मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस’च्या वतीने प्रकाशित केली जाईल.
..................................................................................................................................................................
समीक्षक, कथाकार अविनाश कोल्हे यांच्या ‘पंगतीतलं पान’ या कादंबरीला या स्पर्धेत पहिलं पारितोषिक मिळालं आहे. लवकरच ही कादंबरी ‘मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस’तर्फे प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने या कादंबरीला कोल्हे यांनी लिहिलेली वैशिष्ट्यपूर्ण अर्पणपत्रिका आणि कादंबरीतील एका प्रकरणाचा संपादित अंश...
..................................................................................................................................................................
अर्पणपत्रिका
माझा मोठा भाऊ नाना ऊर्फ अशोक कोल्हे यांस प्रेमादरपूर्वक
------
मनोगत
अंक पहिला
स्थळ - खामगांव, जिल्हा बुलढाणा. काळ - मे १९७०.
मी शाळेत शिकत असताना माझा पुण्याला नोकरी करणारा मोठा भाऊ अशोक ऊर्फ नाना घरी, खामगावला दिवाळीच्या किंवा इतर सुट्टयांत यायचा. मला समजल्यापासून तो तसा बाहेरच होता. आधी महाविद्यालयाच्या वसतीगृहात आणि नंतर नोकरी निमित्ताने पुणे. नाना आला की घरी दिवाळीसारखं वातावरण असायचं. तो सर्वांचाच लाडका होता. एक तर तो दिसायला गोरागोमटा, अगदी हँडसम म्हणावा असा. दुसरं आणि जास्त महत्त्वाचे म्हणजे नाना अभ्यासात अतिशय हुशार. खामगावच्या जी.एस. कॉलेजात त्याचे नाव आजही मेरीटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांच्या यादीत झळकतेय.
नानाच्या तुलनेत मी काळा, वडिलांसारखा (आईच्या शब्दांत कृष्णासारखा सावळा. आईच ती. मुलांच्या दोषांकडे कानाडोळा करणाऱ्यापैकी). शिवाय अभ्यासात यथातथाच. असे दोन ‘नाही’, ‘नाही’ घेत मी तेव्हा जगत होतो आणि मे १९७०मध्ये आठवीतून नववीत जाण्याच्या तयारीत होतो.
नाना आला की सर्वांसाठी काही ना काही आणत असे. आईवडिलांना याचं कोण कौतुक! ऐपत असती तर ‘नाना आला’ म्हणून वडिलांनी गाव-जेवण घातले असते. ‘नानाचं वाचन बघ, नाना बघ कसं शुद्ध मराठी बोलतो, नाना बघ कसा सतत अभ्यास करत असतो, त्याला बघ कसा जुनी नाणी गोळा करण्याचा व पोस्टाची तिकिटं जमा करण्याचा छंद आहे’ वगैरे वगैरे. त्याने बी. कॉमला असताना वर्गातल्याच दोन मुलांची शिकवणी घेतली होती. त्याला त्याबद्दल शंभर रुपये महिना मिळत होते, हा किस्सा न ऐकलेला आमचा नातेवाईक शोधूनही सापडला नसता.
एवढेच नव्हे तर कॉलेजात शिकताना त्याने नासिकहून प्रसिद्ध होणाऱ्या ‘अमृत’ मासिकात १९६७ साली ‘जेव्हा भारताचे इंग्लंडवर कर्ज होते’ असे खळबळजनक शीर्षक असलेला अभ्यासपूर्ण लेख लिहिला होता. त्याबद्दल त्याला मानधन म्हणून मनीऑर्डरने दोन रुपये आले होते. वडिलांनी मनीऑर्डरची पावती कितीतरी दिवस हॉलमध्ये असलेल्या काचेच्या कपाटात लावून ठेवली होती, येणाऱ्या-जाणाऱ्याला दिसावी म्हणून.
यातलं महाआश्चर्य म्हणजे या ‘नानाकौतुक’ सोहळ्याचा मला कधीही त्रास झाला नाही. आईवडील व इतर नातेवाईक मात्र ‘नानाकडे बघ. नाही तर तू’ असे वाग्बाण सोडून मला हैराण करण्याची एकही संधी सोडत नसत. यात स्वतः मात्र नाना कधी नव्हता. उलट त्याला माझ्या उनाडक्यांचे कोण कौतुक! तो नेहमी माझ्याशी काही ना काही ना बोलत असे, मला सिनेमाला नेत असे. १९६९ साली आम्ही खामगावच्या ‘मोहन टॉकिज’मध्ये ‘धर्मवीर’ बघायला गेलो होतो. पण राष्ट्रपती झाकीर हुसेन वारल्याची बातमी आली आणि सिनेमाच रद्द करण्यात आला. ही आठवण आजही मनात ताजी आहे.
थोडक्यात म्हणजे कर्तृत्ववान मोठ्या भावाबहिणींचा धाकट्या भावंडांना जसा त्रास होतो, तसा मला नानाकडून कधीही झाला नाही. उलटपक्षी जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही त्याच्याकडे पुण्याला आकुर्डीला (तेव्हाची आकुर्डी पुणेकरांनाही माहीत नव्हती!) जात असू, तेव्हा तो मला पैसे देऊन एकट्याने पुणे भटकण्यासाठी पाठवत असे. त्याच्याच आग्रहाने मी वाकडेवाडीला ‘पंचवटी’ बंगल्यात राहणाऱ्या गदिमांना भेटायला गेलो होतो. मी अनेकदा अलका टॉकीजपासून सोन्या मारुती चौकापर्यंत लक्ष्मी रोड पायी भटकलो होतो. माझी वाचायची आवड बघून तो पुण्याला गेल्यावरसुद्धा त्याने वडिलांना ‘महाराष्ट्र टाईम्स’ व मराठीतून येणारे ‘इंद्रजाल कॉमिक्स’ बंद करू दिले नाही. मला तेव्हा ‘इंद्रजाल कामिक्स’ फार आवडायचे. वेताळ, त्याची कवटी गुहा, ती डेंकाली, त्याचा तुफान हा घोडा व वाघ्या कुत्रा. त्याचा गुरन मित्र आणि हो, कमनीय बांध्याची त्याची प्रेयसी डायना पामर. नंतर त्यांचे लग्न झाले. अलीकडेच मी वाचले की, डायना बाळंत झाली व तिला तीळं झालं.
अंक दुसरा
स्थळ - तेच, काळ - तोच.
मे १९७०. आठवीचा निकाल लागण्याचा दिवस उजाडला. मी शाळेत पोहोचलो. ज्येष्ठ शिक्षक पाचवीपासूनच्या निकालात पहिले, दुसरे व तिसरे कोण आले एवढे जाहीर करत होते. पाचवी संपली, सहावी संपली, सातवी संपली. मी मित्रांच्या घोळक्यात बसलो होतो. आता आठवीचे म्हणजे माझ्या इयत्तेचे निकाल येणार होते. वातावरणात तणावपूर्ण शांतता. पहिला नंबराचे नाव जाहीर झाले, जे अपेक्षित होते. दुसऱ्या नंबराचे नावही अपेक्षित होते. आणि अचानक माझ्या कानी आले ‘आणि तिसरा नंबरावर आहे- अविनाश राजाराम कोल्हे’. सालं, काही तरी गडबड झाली असणार. पहिलीपासून ते सातवीपर्यंत मी नापास झालो नाही एवढीच काय ती माझी शैक्षणिक कर्तबगारी. आता चक्क नंबरात. माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मला असं झालं की, कधी निकाल हाती येतो व कधी घरी जाऊन नानाला दाखवतो.
माझी गुणपत्रिका बघून माझ्यापेक्षा नानालाच आनंद झाला. त्याने चटकन तब्बल पाच रुपये काढून दिले. (१९७०चे पाच रुपये महाराजा. म्हणजे आजचे जवळजवळ पाच हजार रुपये!).
पण ही गोष्ट इथे संपत नाही. दुपारी वडील घरी जेवायला आले. तेव्हा नानाने माझा निकाल तर सांगितलाच शिवाय एक अभूतपूर्व घोषणा केली – ‘अवी जर मॅट्रिकला फर्स्ट क्लासमध्ये पास झाला तर मी त्याला पुण्याला शिकायला नेईन’.
वडिलांचा घास हातातच राहिला. पोळ्या लाटत असलेली आई गर्रकन मागे वळून बघायला लागली. नानाचा चेहरा मात्र निर्विकार होता. ही कृती दोन कारणांनी अभूतपूर्व होती. एक म्हणजे आमच्या घरात सात पिढ्यांत सर्व काही वडिलांची परवानगी घेऊनच होत असे. या नियमाला नानाने शांतपणे सुरूंग लावला होता. ‘मी अवीला नेऊ का?’ असं न विचारता त्याने थेटपणे जाहीरच केले की, ‘मी नेणार आहे’. यामुळे वडिलांनी माझ्या नोकरीच्या संदर्भात केलेले प्लॅनिंग बाद होणार होते. याची वडिलांना सवय नव्हती. ही घोषणा सर्वांसाठी एवढी धक्कादायक होती की, अगदी वडिलांनासुद्धा चटकन काय बोलावे, ते कळेना. आई तर आता भूकंप कधी होतो, याची वाट बघत उभी.
वडील ‘संध्याकाळी बोलू’ म्हणत हात धुवून तडक बाहेर पडले. वडिलांची रोजची सवय म्हणजे जेवण झाल्यावर अर्धा तास तरी वामकुक्षी करायची. आज उंट छाप सिन्नर विडीसुद्धा न पिता वडील बाहेर पडले. आईसारखीच माझ्याही पोटात संध्याकाळी काय होईल याबद्दल बाकबुक सुरू झाली. नाना मात्र शांतपणे जेवला व मला कॅरम काढायला लावला.
मला काही क्षणांनंतर आईच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. मुलगा मोठा झाल्यावर वडिलांना आव्हान देऊ लागला की, हयातभर नवऱ्याच्या धाकात राहिलेल्या बाईचा ‘आता दिवस बदललेत. माझा पोटचा गोळा आता हाताशी आला आहे. आता मला दबून राहण्याची गरज नाही’, हे सांगणारा तो चेहरा होता.
नानाने पुण्याला परत जाताना सांगितले, ‘हे बघ अवी, आता सर्व तुझ्या हाती आहे. तू फक्त फर्स्ट क्लास मिळव. नाही तर मी काही करू शकणार नाही’. हे मी लक्षात ठेवले व पुढे तिसरा नंबर कधी सोडला तर नाहीच, शिवाय तेव्हाच्या हायर मॅट्रिकमध्ये (म्हणजे आताची बारावी) फर्स्ट क्लास मिळवला.
अंक तिसरा
स्थळ - पुणे, वर्ष - १९७३
पुण्याला नानाकडे शिकायला असताना त्याचे दुसरे रूप समोर येत गेले. तीनशे रुपये महिना पगार असणारा हा माझा मोठा भाऊ खरंच किती मोठा आहे, ते तेव्हा कळत गेले. तीनशे रुपयांपैकी त्याचे पेपरचे महिन्याचे बिल असायचे दीडशे रुपये! नाना तेव्हा ‘ललित’, ‘सत्यकथा’ वगैरेचा वर्गणीदार होता. ‘द इलस्ट्रेटेड विकली’, ‘टाईम्स ऑफ इंडिया’, ‘इकॉनॉमिक टाईम्स’, ‘महाराष्ट्र टाईम्स’, ‘टाईम्स लिटररी सप्लीमेंट’ वगैरे घ्यायचा. एवढेच नव्हे तर वर्ष संपले की, तो ‘ललित’चे अंक बाइंड करून आणायचा. नाना त्या काळी पुण्यातल्या ब्रिटिश कौन्सिल लायब्ररीचा सभासद होता. त्याचे बघून मीसुद्धा नंतर सभासद झालो. नाना दररोज सकाळी साडेसात वाजता रेडिओवरचा शास्त्रीय संगीतावर आधारित ‘संगीत सरीता’ हा कार्यक्रम आवर्जून ऐकत असे, शास्त्रीय संगीताची समज वाढावी म्हणून.
यथावकाश माझ्यातले दुर्गुण वर आले. सिगरेट ओढणे, रात्रभर पत्ते खेळणे, दारू पिणे, मुख्य म्हणजे अभ्यास न करणे वगैरे उद्योगांमुळे मी सर्वत्र बदनाम झालो. मात्र या सर्वांबद्दलचे टोमणे मला नाही तर नानाला झेलावे लागले. ‘तू त्याला लाडावून ठेवले आहेस’ हा त्याच्यावर नेहमी होणारा आरोप. नाना मात्र आजपर्यंत मला एका शब्दानेही बोललेला नाही.
पुढची कहाणी सांगण्यात फार मजा नाही. मुद्दा एवढाच की, नाना जर मला मोठ्या भावाच्या रूपात लाभला नसता तर मी वडिलांच्या प्लॅनिंगनुसार रेल्वेत ‘असिस्टंट स्टेशन मास्तर’ म्हणून लागलो असतो आणि एव्हाना निवृत्त होऊन खामगांव/ शेगांवला टुमदार घर बांधून पेंशनरचे जीवन जगत असतो. नानामुळे मला लोकमान्य टिळक व आगरकरांनी स्थापन केलेल्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकायला मिळाले. त्याच्यामुळे व त्याच्या घरी येत असलेल्या माहिती/ ज्ञानाच्या खजिन्यामुळे माझे जीवन वेगळ्या दिशेने वाहत गेले. सत्यजित राय, एम. एफ. हुसेन, बेगम अख्तर वगैरे मंडळींची नावं मी एवढ्या आत्मविश्वासाने घेत असे की, जणू काही मी यांना अनेक वर्षांपासून ओळखतोय. हा आत्मविश्वास मला पुढे जीवनाच्या अनेक टप्प्यांवर आधार देत गेला, माझे भावविश्व समृद्ध करत गेला आणि माझ्यातला लेखक घडवत गेला.
या मनोगताचा शेवट करताना मला इरावती कर्वेंच्या ‘युगान्त’मधील एक प्रसंग आठवतो. त्यामध्ये द्रौपदीवर लिहिलेल्या लेखात त्यांनी लेखाच्या शेवटी तिच्या तोंडी एक वाक्य टाकले आहे. द्रौपदी भीमाला उद्देशून म्हणते, ‘भीमा, पुढच्या जन्मी मोठा भाऊ हो. तुझ्या पराक्रमाच्या सावलीत आम्ही सर्व सुखाने नांदू’.
आज मलाही हेच म्हणायचं आहे – ‘नाना, पुढल्या जन्मीसुद्धा माझा मोठा भाऊ हो. तुझ्या सावलीत मी या जन्मासारखाच आनंदाने जगेन’.
..................................................................................................................................................................
कादंबरी अंश
गुलाबला आपण कशी पाचर मारली याचा अंदाज होता. ही बोलणारी तोंडं फक्त बोलत राहतील व शेवटी जे मिळेल ते घेतील व आपापल्या मार्गाला लागतील.
निपुत्रिक काशाकाकाचा मानलेला मुलगा म्हणजे गुलाब धांडे-पाटील, फुलगाव, तालुका- मलकापुर, जिल्हा-बुलढाणा. काशाकाकाची फार इच्छा होती की, गुलाबला दत्तक घ्यावे. त्याचीपण तयारी होती. पण गुलाबच्या आईवडलांनी याला साफ नकार दिला. खरं तर दत्तक देण्याला काहीही हरकत नव्हती. गुलाबला मोठा भाऊ होता, साहेबराव. त्याचे लग्न झाले होते आणि आता त्याला एक मुलगी व मुलगा होता. म्हणजे धांडे पाटलांचा वंश चालवण्याची सोय झाली होती.
शिवाय दत्तक गेला असता तरी काहीही, म्हणजे अक्षरशः काहीही फरक पडला नसता. तो, काशाकाका, कौशीकाकू, त्याचे आईवडील, साहेबराव, त्याची पत्नी, दोन मुलं फुलगावच्या त्याच वाड्यात हयातभर राहिले असते. पण आईवडिलांनी परवानगी दिली नाही ती नाहीच. गुलाबचे त्याच्या आईवडिलांशी फारसे कधीच पटले नव्हते. या कारणाने तर त्याच्या मनात कायमची अढी निर्माण झाली होती.
गाडीने बडनेरा मागे टाकल्यावर त्याच्या मनात चलबिचल सुरू झाली होती. अकोल्याला उतरावे की सरळ नांदुऱ्याला जावे? तो नांदुऱ्याला उतरला व थोडा वेळ स्टेशनच्या एका बाकावर बसला. या स्टेशनच्या, नांदुऱ्याच्या करोडो आठवणी त्याच्या अस्तित्वाशी चिकटल्या होत्या. यातील जवळपास प्रत्येक आठवणीत काशाकाका होता.
गुलाब जेव्हा पुण्याहून व नंतर मुंबईहून दिवाळीसाठी गावी यायचा, तेव्हा तो एक सोहळाच असायचा. काका जीप घेऊन, सोबत गुलाबचे दोन-चार मित्र घेऊन, त्याला घ्यायला यायचा. मग सर्व कमल हॉटेलमध्ये जाऊन भरपेट नाश्ता करायचे. मग साहेबरावच्या मुलांना व घरच्यांना भरपूर खायला घ्यायचे. यात मायावहिनीसाठी दीडशे ग्रॅम कलाकंद असायचाच. मग जीप निघायची. फाटक हमखास बंद असायचे. मग काका दोन-चार ईरसाल शिव्या द्यायचा. जणू काही त्या ऐकूनच फाटक उघडायचे. अशी जीप फुलगावात शिरायची. नंतर मग आतला जल्लोष.
काका मग मोठ्याने ओरडायचा, ‘भाबी, लेक आला माया. चा टाक जो उलीसाक.’
मग साहेबरावची पोरं ‘काका’, ‘काका’ करत गुलाबला बिलगायची. मग गुलाब अंगणातच बॅग उघडून त्यांच्यासाठी पुण्याच्या तुळशी बॅगेतून किंवा मुंबईच्या फॅशन स्ट्रीटवरून आणलेले कपडे/ खेळणी काढून द्यायचा. ते घेऊन ती लेकरं नाचायला लागायची. तिकडे आत मायावहिनींनी डोळे पुसत चहा ठेवलेला असायचा आणि त्याची आई रूबाबात दरवाज्यात उभी राहून आपल्या उच्चशिक्षित मुलाकडे बघत असायची.
आज आणि यापुढे कदाचित यातले काहीही होणार नाही, या भावनेने गुलाबचे डोळे वाहू लागले.
त्याने स्वतःला सावरले व स्टेशनच्या बाहेर पडला आणि सवयीने कमल हॉटेलमध्ये गेला. त्याला आलेला बघून मालक धावतच बाहेर आला व म्हणाला, ‘गुलाबभौ, देर कर दी भाई आपने आने में.’
आतापर्यंत गुलाबच्या मनाची तशी तयारी झालेली होतीच, पण एवढ्या लवकर ही बातमी त्याच्यापर्यंत येईल अशी मात्र तयारी नव्हती. तो बाहेरच्या बाकड्यावर बसला. त्याची शून्यात नजर लागली. हॉटेलच्या नोकराने आणून दिलेला पाण्याचा ग्लास कसाबसा पिल्यानंतर त्याला जरा हुशारी वाटायला लागली. तेवढ्यात चहा आला. गुलाबने तोही पिऊन टाकला.
कमल हॉटेलचा मालक गुलाबचंदशेठ काशाकाकाला चांगला ओळखत होता. काका जवळजवळ दररोज त्याच्या हॉटेलमध्ये येत असे. मालकाने जळगाव जामोदला मोटारसायकलवर जात असलेल्या एका ओळखीच्या माणसाला गुलाबला फुलगाव फाट्याजवळ सोडण्याची विनंती केली. अर्ध्या तासात गुलाब फाट्यावर उतरला.
सकाळचे नऊ वाजत आले होते. हायवे तसा थोडा सुनसान होता. गावातल्या एक-दोघांनी गुलाब आलेला बघितला. त्यातला एक वाड्यावर वर्दी द्यायला गेला, तर दुसरा त्याची बॅग घेऊन चालू लागला.
हायवे ते धांडे पाटलांचा वाडा हे अंतर सुमारे पंधरा मिनिटं चालण्याचे होते. तेवढ्यात गुलाबला सर्व समजले. परवा रात्रीच काका गेला. मग त्याला फुलगावला आणण्यात आले व काल क्रियाकर्म उरकले. त्याची किती वाट पाहावी कळत नव्हते. दिल्लीला फोन केला तर तो हाँगकाँगला गेल्याचे समजले होते. म्हणून मग काल काकाला जाळण्यात आले.
साहेबरावसुद्धा चार धामची यात्रा करण्यासाठी गेलेला आहे. म्हणून मग गुलाबच्या चुलत-चुलत भावाने, संतोष पाटलाने काशाकाकाला अग्नी व केस दिले. अशा स्थितीत जसं प्रत्येक जण स्वतःच्या पोळीवर तूप ओढतो, तसंच संतोष पाटलाने, त्याच्या आईच्या सल्ल्याने केस दिल्याबद्दल गुलाबच्या वडिलांकडून तीन तोळे सोनं वसूल केलं. अग्नी देण्याअगोदर सोनं ताब्यात आल्याची खात्री करूनच.
गुलाबचा राग अनावर झाला. त्याला संतोष पाटलाचा चेहरासुद्धा आठवत नव्हता. कधीतरी दुसरी की तिसरीत असताना शेगावच्या गजानन महाराजांच्या मंदिरातील बाहेर असलेल्या महादेवाच्या मंदिरातल्या नंदीवर आळीपाळीने बसल्याबद्दल पुजाऱ्याने दोघांना चारचार थोबाडीत दिल्याची एकमेव आठवण होती. संतोषने दहावी नापास झाल्यानंतर रितसर शिक्षण सोडले व पूर्णा काठी असलेली वडिलोपार्जित शेती करायला लागला होता.
आता त्याच संतोषने केवळ अग्नी दिल्याबद्दल व डोक्यावरचे केस दिल्याबद्दल तब्बल तीन तोळे सोनं घ्यायचे म्हणजे शुद्ध नीचपणा आहे. बरं झालं, आपण वेळेतच या हरामखोर व कमालीच्या स्वार्थी लोकांतून तिकडे दूर, दिल्लीच्या ‘स्कूल ऑफ सोशिऑलॉजी’मध्ये शिकायला आणि रिसर्च करायला निघून गेलो. नाही तर सकाळ-संध्याकाळ या नीच लोकांची तोंडं बघण्याची वेळ आली असती. गुलाबचे मन बक्षीसरांबद्दलच्या कृतज्ञतेने मन भरून गेले. त्यांच्याच प्रेरणेने आज तो दिल्लीत एम.फील करत होता.
तो वाड्यात शिरला तेव्हा ‘गुलाब पाटील आले’, ‘गुलाब पाटील आले’ असा एकच गिल्ला सुरू झाला. तेवढ्यात त्याची नजर गुळगुळीत चकोट करून दात घासत बसलेल्या संतोषवर पडली. गुलाबने त्याच्याकडे अशा काही जळजळीत नजरेने बघितले की, संतोषची त्याच्याशी बोलण्याची हिंमत झाली नाही.
‘गुलाब, अवो गुलाब. आर्ता’.
वरच्या मजल्यावरून कोणी तरी मोठमोठ्याने हाका मारत होते. तिकडे बाजूला विहिरीवर पाणी काढणाऱ्या बायकांची व त्यांनी काढलेल्या पाण्याने आंघोळ करून घेण्यासाठी पाहुण्यांची झुंबड उडाली होती.
गुलाब आल्याचे समजल्यावर त्याच्या आईवडिलांना व मायावहिनींना एकदम बरं वाटले. आता गुलाब सर्व काही व्यवस्थित हाताळेल. काशाकाका होता तेव्हा वाड्याचा सर्व कारभार काका बघत असे. आता तोच नाही म्हटल्यावर गोंधळ सुरू होता. गुलाबचे वडील तसे कार्यक्षम नव्हते. जो जे काही सांगेल त्याप्रमाणे वागणारे होते. त्यांचा मोठा मुलगा गुलाबचा मोठा भाऊ साहेबरावसुद्धा घरी नव्हता. दोन कर्ती मुलं हाताशी नसल्यावर गोंधळ न माजता तरच नवल.
गुलाबचे दात घासून होत नाही तो त्याच्यासमोर चहा आला. तोपर्यंत घरातील अनेक ज्येष्ठ मंडळी गोळा झाली होती व तेराव्याची चर्चा करत होती. ती सर्व चर्चा गुलाबसमोर जाणीवपूर्वक सुरू होती, कारण आता तोच एका प्रकारे कुटुंब प्रमुख होता.
तेराव्याचे तपशील ठरत होते. खामगांवला फरशीवर असलेल्या ‘नवभारत प्रिंटिग प्रेस’मध्ये पत्रिका छापायला पाठवल्या. फुलगावात कुठलेही कार्य असो, मग ते मरणाचे असो की तोरणाचे, पत्रिका छापायला ‘नवभारत’मध्येच जात असे. गेल्या अनेक पिढ्यांची वहिवाट होती ती.
पंगतीसाठी ग्रामपंचायतीचा हॉल ठरला. लगोलग तसा निरोप गेला. शेवटी खर्चाचा मुद्दा आला. आतापर्यंत सर्व गोष्टी पुढाकाराने करत असलेल्या थोरल्या चुलत चुलत काकांचा आवाज जरा खाली आला व ते चाचरत चाचरत बोलायला लागले ‘काशीराम पाटील लयं फेमस मानुस’, ‘त्याहीनं लयं लोकाईले मदत केली’, ‘त्याहीचं शेवटचं कार्य आहे. त्यामुळे पैशाकडे लयं बगू नये’ वगैरे वाक्यं टाकून ते पेरणीसाठी जमीन नांगरत होते. गुलाब यांच्यातच लहानचा मोठा झाल्यामुळे तो खर्चाचा आकडा समोर येईपर्यंत शांत बसून होता.
त्यानंतर धाकट्या चुलत चुलत काकाने पुढाकार घेतला. त्याला असं भोवऱ्यासारखं गोल गोल फिरणं फारस आवडलं नाही.
‘अहो पाटील. आसं म्हेरी म्हेरीनं किती येळ चालायचं? आं? उतरा आता वावरात आणि सांगा येकदाचा आकडा. किती व्हतील ते.’
थोरला धीर गोळा करत म्हणाला, ‘कमीत कमी पन्नास तर कुटे गेलेच नाहीत’.
गुलाबला खोडी काढण्याची हुक्की आली. तो म्हणाला, ‘पन्नास म्हणजे नेमके किती?’
आधीच चिरडीला आलेला थोरला म्हणाला, ‘अहो गुलाब पाटील. पन्नास हजार. समजलं? कामुन आसं याड घेता, भौ?’
गुलाबला वाटले की खरा खर्च जास्तीतजात चाळीस असेल व वरचे दहा हे दोघे वाटून घेतील.
गुलाब म्हणाला ‘मी थोड्या वेळाने खामगांवला जाणार आहे. तेथे माझे भरपूर दोस्त आहेत. एकादोघांची तर किराणा मालाची दुकानंच आहेत. ते मला स्वस्तात माल देतील. सामानाची यादी मला द्या. मी घेऊन येतो सर्व म्हणजे तुमच्या चकरा वाचतील. खामगावच्या अकोला बाजारातलं ते मोठं दुकान आहे ना ‘अशोक स्टोर्स’, त्याचा मालक गुलाबचंद गोठी माझ्या वर्गात होता.’
दोन्ही चुलत चुलत्यांच्या तोंडचे पाणीच पळाले. गुलाबने हे जर हाती घेतले तर पाच हजार सोडा पाचशे पण सुटायचे नाहीत. मग कशाला एवढे हेलपाटे मारायचे?
गुलाब आणि साहेबरावचे या दोन्ही चुलत चुलत्यांबद्दल चांगले मत नव्हते. काशीराम पाटील होते तोपर्यंत दोघांची वाड्यावर थोडी तरी आवभगत होत असे. काशाकाकाचे दारू पिण्यातले हे दोघे सोबती. आता हे दोघे भाऊ, त्यातही हा गुलाब तर आपल्याला ग्लासभर पाणीसुद्धा विचारायचा नाही. हेच एक कार्य हाती होतं, जेथे थोडा हात मारता आला असता.
गुलाबला आपण कशी पाचर मारली याचा अंदाज होता. ही बोलणारी तोंडं फक्त बोलत राहतील व शेवटी जे मिळेल ते घेतील व आपापल्या मार्गाला लागतील. त्याने दोघांच्या बडबडीकडे दुर्लक्ष केले.
..................................................................................................................................................................
‘हिंदू’ या कादंबरीच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
..................................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment