अजूनकाही
म्हटलं तर वास्तव, म्हटलं तर अवास्तव. म्हटलं तर शक्य, म्हटलं तर अशक्य. म्हटलं तर खरं, म्हटलं तर खोटं. म्हटलं तर कल्पना, म्हटलं तर सत्य. आजच्या कल्पना उद्याचं वास्तव असू शकतात किंवा उद्याचं वास्तव आजच्या कल्पना. अशा अनेक शक्य-अशक्य घटनांचा वेध घेणारं हे नवं-कोरं साप्ताहिक सदर...
..................................................................................................................................................................
दृश्य एक
मुंबई विमानतळ.
दिल्लीहून विमान आलं. माणसं विमानातून उतरून बसमध्ये बसत होती. बस विमानतळाच्या इमारतीच्या दारापाशी येऊन थांबत होती.
बसमधून बाहेर पडल्यावर दरवाजापाशी पहिली तपासणी. दरवाजातून आत आल्यावर आणखी एक तपासणी.
गेटातून माणसं बाहेर येऊ लागली. व्हीलचेअरवरून आलेली माणसं बरीच. त्यांना उतरवून घ्यायला आलेली माणसं जवळ जवळ रडतच मिठ्या घालत होती. लॉकडाऊनमुळे तीनेक महिने माणसं कुठं कुठं अडकून पडली होती आणि आपल्या कुटुंबियांत परतत होती. सामान घेण्याच्या पट्ट्याकडं माणसं भराभरा जात होती.
दरवाजापाशी सूट-टाय अधिकाऱ्यांचा गट उभा होता. इतक्या आतपर्यंत पोचण्यासाठी खास परवानगी त्यांच्याकडं होती.
बसमधून एक मध्यमवयीन माणूस उतरला. ढगळ बर्म्युडा पँट, टीशर्ट, गळ्यापाशी एक गॉगल लटकावलेला, एका हातात पाण्याची बाटली. पोट जरासं सुटलेलं. डोक्यावर विरळ केस.
वाट पाहणाऱ्यांचा गट पुढं सरसावला. ‘सर, सर’ असं म्हणत या पाहुण्याभोवती घोंघावला.
स्पेस सुटासारखे कपडे घातलेले एअरपोर्टवाले हातातली उपकरणं घेऊन या प्रवाशापर्यंत पोचले. उपकरण प्रवाशाच्या डोक्याला लावलं. त्याच्यावरचं रीडिंग पाहून कर्मचारी आपसात कुजबुजले. उपकरण पुन्हा लावलं. त्या कर्मचाऱ्यानं खूण केली आणि सर्व कर्मचारी प्रवाशापासून दूर झाले, त्यांनी प्रवाशाभोवती कडं केलं.
स्वागताला आलेल्या सूट-टायवाल्यांना कर्मचाऱ्यांनी हाकललं. “प्रवाशाला टेंपरेचर आहे. कोविडची शक्यता आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागणार आहे. तुम्ही जवळ येऊ नका, जा.”
सूट-टायवाल्यांनी कोंडाळं करून आपसात कुजबूजचर्चा केली. मिनिट दोन मिनिटातच ते स्पेस सुटातल्या कर्मचाऱ्याला म्हणाले, “आम्हाला माहीत आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल, हे आम्हाला आधीपासूनच माहीत आहे. तीच व्यवस्था करण्यासाठी आम्ही आलोय.”
प्रवासी मधोमध, त्याच्या भोवती सूट-टाय वर्तुळ, त्या वर्तुळाच्या भोवती स्पेस सूट वर्तुळ अशी रचना आणि त्या वर्तुळांच्या कुजबुजी.
“सर, टंपानी हॉस्पिटलमध्ये चौकशी केलीय.”
“ठीक. किती पैसे होतील?”
“सर. १२ लाख होतील असं म्हणतात.”
“बारा लाख? इतके कशासाठी? कोविडला तर ट्रीटमेंटच नाहीये. नुसतं रहायचं आणि वेळ पडल्यास ऑक्सिजन आणि नंतर वेंटिलेटर. त्यासाठी इतके पैसे?”
“सर, ते पैसे ट्रीटमेंटसाठी नसतात. वीस-पंचवीस डॉक्टर पाहून जातात. त्यांचे पैसे, खोलीचं भाडं, पीपीई किट्सचे पैसे, नाना टेस्ट करतात त्याचे पैसे.”
“अरे, कशाला इतक्या टेस्टस्. ही तर लूट आहे.”
“सर, हॉस्पिटल हाही धंदा आहे. जी गोष्ट पाच रुपयांत होऊ शकते, तिला हजार रुपये लावायचे आणि त्या पैशावर अनेक लोकं जगतात.”
प्रवाशानं कॉलरमधला गॉगल काढून डोळ्यावर लावला. चहूकडं पाहिलं. दोन्ही वर्तुळातल्या लोकांना ऐकू जाईल अशा बेतानं म्हणाला, “पैशाचा प्रश्न नाही हो. माझ्याकडं भरपूर पैसे आहेत. मी अशी हॉस्पिटलं विकत घेऊ शकतो. प्रश्न तत्त्वाचा आहे.”
सूट-टाय वर्तुळातला एक माणूस स्पेस सूट वर्तुळातल्या माणसाच्या कानात कुजबुजला. “सर अमेरिकेतून दिल्लीला आले आणि दिल्लीहून मुंबईला. अमेरिकेत त्यांची एक कंपनी आहे. गेली तीसेक वर्षं ते अमेरिकेत सेटल झालेले आहेत. मराठी माणसांचं भलं करण्यासाठी ते अधेमधे मुंबईत येत असतात.”
“टंपानी नको, दुसरं एखादं बरं हॉस्पिटल मिळेल? पुन्हा सांगतो की प्रश्न पैशाचा नाही, तत्त्वाचा आहे.” सर.
“सर, तुम्हाला पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये जायचंय? तिथं जरा अस्वच्छता असेल, पण तिथले डॉक्टर चांगले असतात, ट्रीटमेंट योग्य असते. वीसेक हजारात काम भागेल.”
वीस हजार रुपयांची ट्रीटमेंट म्हणजे अगदीच बेकार असणार असं सरांच्या मनात आलं हे सूट-टाय लोकांना कळलं. त्यातला एक लगेच म्हणाला. “सर. एक वाट आहे. टंपानी हॉस्पिटलमध्येच काही रूम्स पालिकेनं ताब्यात घेतल्या आहेत. तिथे सरकारी रेट्स आहेत.”
सर थोडेसे सुखावले.
“पण, सर, तिथंही सुमारे ८ लाख लागतीलच”
सर चक्रावले.
“सर. पालिका आणि सरकारी अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतात. स्थानिक पुढाऱ्यानं फोन केल्यानंतरच रूम मिळते. पुढाऱ्याला पैसे द्यावे लागतात. पण १२ लाखापेक्षा ८ लाख बरे की नाही?”
सगळे प्रवासी रवाना झाले होते. विमानतळ रिकामाच झाला होता. सर आणि त्यांच्या भोवतीची दोन वर्तुळं शिल्लक राहिली होती. बाहेरच्या वर्तुळातल्या लोकांच्या वॉकीटॉकीवर तगादा येत होता “प्रवाशाला ताबडतोब हलवा, बाहेर अँब्युलन्स वाट पहातेय.”
“काय चाललंय काय या देशात? आमच्या अमेरिकेत असं नाही. आमच्या अमेरिकेत पोलिटिकल लोकांना कोणी विचारत नाही, त्यांचा हस्तक्षेप कुठंही खपवून घेतला जात नाही. तिथं ट्रंपनी फोन करून हॉस्पिटलला सांगितलं की, याला अॅडमिट करून घ्या तर तिथला दारावरचा माणूसच म्हणेल- ‘फक ट्रंप, फक प्रेसिडेंट, लायनीत उभे रहा, फॉर्म भरा, प्रोसीजर पूर्ण करा.’
सूट-टाय वर्तुळातली माणसं सरांकडं कौतुकानं पाहत होती. एक जण उद्गारला, “सर, खरंच तुम्ही आणि तुमचा अमेरिका हा देश ग्रेट आहे. आमच्याकडं काय आहे की, पोलिटिकल सोशल वर्क हा व्यवसाय आहे, तोच एक धंदा आहे. त्यांचाही इलाज नाही. कारण तो धंदा केला नाही तर निवडून येत येत नाही आणि निवडून येता आलं नाही तर देशाची सेवा कशी करणार. खरंच तुमचा अमेरिका ग्रेट आहे.”
सरांची छाती भरून आली, फुगली. टीशर्ट फाटतोय की काय अशी स्थिती झाली.
“ठीकाय. टंपानी हॉस्पिटलकडं चला. तो कोण तुमचा पुढारीबिढारी आहे त्याच्याशी फोनवर बोला. काही कमी होतं का पहा.” सर म्हणाले.
सूट-टाय वर्तूळ बाजूला झालं. सर स्पेस सूट वर्तुळाच्या ताब्यात गेले. रिकाम्या एअरपोर्टमधून ही मिरवणूक बाहेर आली. प्रवासी माणसाला ताप असल्यानं तो संभाव्य कोविड पेशंट आहे, हे एव्हाना एअरपोर्टवर सर्वाना माहीत झालं होतं. या मिरवणुकीला सर्व लोक धडाधड वाट करून देत होते.
अँब्युलन्स मागचा दरवाजा उघडून तयार होती. कर्मचारी स्ट्रेचर घेऊन प्रवाशाकडं पोचले.
सरांनी हात वर करून सांगितलं, “मी ठीक आहे. मी माझ्याच पायानं चालत हॉस्पिटलमध्ये जाणार आहे.”
सर अँब्युलन्समधे बसले.
अँब्युलन्स हॉस्पिटलच्या दिशेनं निघाली.
..................................................................................................................................................................
दृश्य दोन
स्पेशल रूम. बेडच्या भोवती नाना उपकरणं. भिंतीला उपकरणं टांगलेली. तीन-चार मॉनिटरवर हिरव्या लाइनी नाच करत होत्या. भिंतीवर छताला लागून एक टीव्हीचा स्क्रीन.
नर्सेस वाट पहात होत्या. पोचल्या पोचल्या प्रवासीसरांना हॉस्पिटलचे निळे कपडे घालायला लावण्यात आलं.
सरांनी रिमोट घेऊन भिंतीवरचा टीव्ही सुरू केला.
गलवानची बातमी सुरू होती. भारताचे वीस सैनिक मारले गेले होते. मेलेल्या सैनिकांचे फोटो दाखवले जात होते, शोकाकूल नातेवाईक दाखवले जात होते.
सरांनी चॅनेल बदलला.
अरुण दाते गात होते.
सरांनी चॅनेल बदलला.
परदेशी चॅनेल. सांगत होते की, भारताचे तीसपेक्षा जास्त सैनिक मारले गेले होते.
सरांनी चॅनेल बदलला.
‘होणार सून मी या घरची’ चाललं होतं.
सरांनी चॅनेल बदलला.
बाळूमामा एका प्रेतासमोर बसले होते. आसपास बसलेली भाविक माणसं ते प्रेत जिवंत होणार याची वाट पहात होते.
सरांनी चॅनेल बदलला.
गलवानचा नकाशा, गलवानमधली टेकडी, रस्ता, नदी दाखवली जात होती.
डॉक्टर आले. बीपीचं उपकरण उजव्या दंडाला लावलं.
सरांच्या डाव्या हातात रिमोट. सर दर मिनिटाला चॅनेल बदलत होते आणि तिकडं डॉक्टर बीपी घेत होते.
डॉक्टरांच्या चेहऱ्यावर चिंता. बीपी फार वाढलं होतं.
सरांनी चॅनेल बदलला.
चर्चा चालली होती. भाजप आणि काँग्रेसचे प्रवक्ते दणादण एकमेकाला हाणत होते. भाजपचा माणूस सांगत होता की परिस्थिती आटोक्यात आहे, आपल्या शूर सैनिकांनी चिन्यांचा खातमा करत करत हौतात्म्य पत्करलंय. काँग्रेसचा माणूस म्हणत होता की नेमकं काय झालं ते सांगा. अँकर विचारत होती की, चीनच्या सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसून आपल्या भारतातल्या जमिनीचा ताबा घेतला होता की नाही. भाजपचा माणूस म्हणत होता ते आपल्याला माहीत नाही, त्याचा खुलासा पंतप्रधान मोदी किंवा संरक्षणमंत्री राजनाथ सिंग करतील.
सरांनी चॅनेल बदलला.
कुठलंसं परदेशी चॅनेल.
कुठल्याशा सिनेमातलं क्लिप दिसलं. त्यात एक स्त्री-पुरुष अंधाऱ्या प्रकाशात संभोग करत होते. सरांनी दहा सेकंद वाट पाहिली, दृश्य प्रकाशमान होण्याची. लक्षणं दिसेनात.
सरांनी चॅनेल बदलला.
नरेंद्र मोदींच्या भाषणाचा अंश दाखवत होते. मोदी सांगत होते की, शत्रूंना मार मार मारून आपले जवान हुतात्मे झाले आहेत. परंतू चिंता करण्यासारखं काही नाही. ना चिनी सैनिकांनी भारतावर आक्रमण करून प्रदेश बळकावलाय, ना भारतीय सैनिक चीनच्या हद्दीत घुसलेत.
सरांनी डॉक्टरांकडं पाहिलं. डॉक्टरांचं लक्ष बीपीकडं होतं.
“सर, तुम्हाला डायबेटीस आहे?”
“नाही.”
“इतर काही इशू आहे? हार्ट प्रॉब्लेम आहे? किडनी प्रॉब्लेम आहे?”
“नाही.”
“मग तुमचं बीपी एवढं हाय कां आहे? अहो. असंच चालत राहिलं तर तुमचं हृदय फुटेल, इथून तिथून वाहिन्या फुटून रक्त बाहेर येईल”
सरांचं अर्ध लक्ष टीव्हीकडं होतं. तरीही सर चिडले. “फक यू, मला काहीही झालेलं नाहीये. यू माइंड युवर ओन बिझनेस.” सर जोरात ओरडले.
“सर. तुम्ही माझ्यावर का रागावताय? बीपी तुमचं वाढतंय. ते कसं आटोक्यात येईल याचा प्रयत्न मी करतोय, बीपी मी वाढवत नाहीये.” डॉक्टर.
सरांनी चॅनेल बदलला.
राहुल गांधी घोगऱ्या आवाजात बोलत होता.
“साsssला.” सर.
एव्हाना टीव्हीवर उपलब्ध असणारे सर्व चॅनेल संपले होते. तरीही सरांनी चॅनेल बदलला.
डॉक्टरांनी पॅडवर काहीतरी खरडलं. कागद फाडला आणि नर्सला दिला.
सीनियर डॉक्टरला फोन केला. “सर. पेशंटची प्रकृती चिंताजनक आहे. काहीही इशू नाही, पेशंटला कसलीही हिस्टरी नाही. तरीही बीपी अतिशय वाढलंय. काय करता येईल?”
पलीकडून सीनियर डॉक्टर काहीतरी बोलले. डॉक्टरनं फोन ठेवला. सरांचं मनगट हातात घेतलं आणि नाडीवर बोट ठेवलं.
चॅनेलवर संबीत पात्रा आले. सांगत होते - आताच स्टुडिओत राजनाथ सिंग यांचा फोन मला आला होता. ते सांगत होते की, भारताच्या सर्वच्या सर्व सैनिकांची रजा कॅन्सल केलीय. भारताच्या सर्व सीमांवरचे सैनिक विमानं भरून लदाखमध्ये रवाना केले आहेत. सर्व रिटायर्ड अधिकारी गोळा झाले असून ते काश्मीरमध्ये तैनात केले आहेत, त्यांचा सल्ला घेतला जाईल. संघस्वयंसेवकांना सीमेवर जाण्याचा आदेश देण्यात आला आहे. ते बकलं ब्रासो लावून घासत आहेत, टोप्यांना इस्त्री करत आहेत आणि पावसाळ्यात आलेली बुरशी काढून काठ्या तयार करत आहेत. अयोध्येहून संतांच्या दहा तुकड्या लदाखला रवाना झाल्या आहेत. त्यांच्या सोबत पुरेशी लाकडं देण्यात आली आहेत. मृत सैनिकांना स्वर्गात पटकन प्रवेश मिळावा, कोणताही अडथळा येऊ नये यासाठी आवश्यक यज्ञ आणि मंत्रयोजना हे संत करणार आहेत.
डॉक्टरांचे डोळे चमकले. हातातलं सरांचं मनगट बाजूला ठेवून त्यांनी बीपीचं उपकरण काढलं, सरांच्या दंडाला बांधलं.
संबीत पात्रांनतर भाऊ तोरसेकर आले.
सरांची नाडी सुरळीत होऊ लागली होती.
तोरसेकर सांगत होते - देश हजारो वर्ष ठीक होता. मोगल आले तिथून देशाची लूट सुरू झाली. नंतर ब्रिटिश आले. त्यांनी लूट चालू ठेवली. त्यानंतर नेहरू आले. त्यांनी डाव्यांच्या मदतीनं देशाची वाट लावण्याची परंपरा चालू ठेवली. नेहरूंनंतर देशाची वाट लावण्यात शरद पवारांनी हातभार लावला. आज लदाखमध्ये निर्माण झालेल्या संकटाची ही सारी कारणं आहेत. देशातली माध्यमं, विद्यापीठं, संशोधन करणारे, परदेशातली माध्यमं, सर्व अभ्यासक इत्यादी सर्व लोकं तुम्हाला खोटं सांगत असतात. पण आता परिस्थिती बदलली आहे. आता सर्वांचं पितळ उघडं पडलं आहे. नरेंद्र मोदी आणि शहांनी चीनला कोंडीत पकडलं आहे. त्यांच्याच सांगण्यावरून डोनल्ड ट्रंप यांनी चीनची कोंडी केली आहे. चीनची स्थिती खालावत आहे. चीनचा व्यापार ठप्प झाला आहे. चिनी माल कमी प्रतीचा असतो, हे आता जगाला कळलं असल्यानं चिनी मालाचा खप जगभर घसरला आहे. उलट २०१४ पासून भारत जगातली महासत्ता होतो आहे. म्हणूनच चीन चिडला आहे. लदाखमध्ये त्यांनी भारताची माणसं मारली आहेत. पण लक्षात घ्या की, अब्जावधी डॉलर खर्च करून, हज्जारो विमानं वापरून, लक्षावधी सैनिक पेरूनही त्यांना फक्त २० सैनिकच मारता आले. यावरून भारताची ताकद लक्षात येते. वीस माणसं मेली असा टाहो शरद पवार, डावे, कम्युनिष्ट, राहुल गांधी, ममता बॅनर्जी फोडत आहेत. पण फक्त वीसच माणसं मेली हे सत्य ते सांगत नाहीत. ते मी तुम्हाला सांगत आहे. हा आपला फार मोठा विजय आहे. भारताची देदीप्यमान विजय वाटचाल सुरू झाली आहे. आज मी इथेच थांबतो. उद्या आपण आणखी तपशील पाहू, देशद्रोह्यांचे बुरखे टराटरा फाडू. जय हिंद…
सरांनी हा चॅनेल चालू ठेवला.
डॉक्टरांनी बीपी उपकरण बंद करून बाजूला ठेवलं.
“सर. मिरॅकल. तुमचं बीपी एकदम नॉर्मल झालं आहे.”
औषधं घेऊन आलेल्या नर्सला डॉक्टरनी सांगितलं की, औषधाची आवश्यकता नाही.
सर कुठलंसं गाणं गुणगुणू लागले.
..................................................................................................................................................................
या सदरातील आधीचे लेख वाचण्यासाठी क्लिक करा -
https://www.aksharnama.com/client/author_articles/
..................................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment