अजूनकाही
प्रसिद्ध डावखुरे गोलंदाज राजिंदर गोयल यांचं नुकतंच वयाच्या ७८व्या वर्षी निधन झालं. प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी त्यांच्या ‘आयडॉल्स’ (अनुवाद बाळ ज. पंडित, उत्कर्ष प्रकाशन, पुणे, १९८४) या पुस्तकात गोयल यांच्याविषयी लिहिलेला हा लेख...
..................................................................................................................................................................
दोन खेळाडूंना भारतीय संघाकडून खेळण्याइतकं नशीब लाभलं नाही… ते खेळाडू म्हणजे राजिंदर गोयल आणि पद्माकर शिवलकर. दोघेही उच्च दर्जाचे डावखोरे मंदगती गोलंदाज आहेत. भारतीय संघात बिशनसिंग बेदी खेळत होता, म्हणूनच हे दोघं टेस्टमध्ये खेळू शकले नाहीत. बिशनपूर्वी त्यांना बापू नाडकर्णी व रुसी सुर्ती यांच्याशी स्पर्धा करावी लागली. पण बापू व रुसी हे नुसतेच डावरे गोलंदाज नव्हते, तर थोर अष्टपैलू खेळाडू होते. त्याच सुमारास सलीम दुराणीही भारतीय संघात आला. आणि तोही पडला अष्टपैलू खेळाडू! त्यामुळे गोयल काय किंवा शिवलकर काय, यांना कधीच टेस्टचा टिळा लागला नाही.
बिशननं टेस्ट संघात एकदा प्रवेश केल्यावर त्याला संघातून काढण्याचा प्रश्नच आला नाही. कारण नुसत्या गोलंदाजीचा विचार केला तरी बिशन गोयल व शिवलकरपेक्षा कितीतरी सरस होता. त्याच्या गोलंदाजीत अतुलनीय वैचित्र्य होतं. बेदी किंवा गोयल यांपैकी कोणाची गोलंदाजी खेळणं तुम्ही पसंत कराल असं जर मला विचारलं, तर मी नक्की सांगेन बेदीची. याचं कारण एवढंच आहे की, बेदी चेंडूला जी उंची देतो त्यामुळे पुढं येऊन ड्राईव्ह मारण्याची संधी तरी मिळते. परंतु गोयलच्या गोलंदाजीवर तशी संधीही मिळत नाही. तो चेंडूला उंची देत नाही. त्यामुळे पुढं येऊन त्याचे चेंडू मारता येत नाहीत. म्हणूनच त्याची गोलंदाजी खेळणं मी पसंत करणार नाही. गोयलला चेंडूस उंची देता येत नसे असं नाही, पण तो चेंडूला केवळ नाममात्र उंची द्यायचा. कारण कुठल्याही खेळपट्टीवर त्याची फिरकच एवढी मोठी असायची की, त्याला उंचीची आवश्यकताच भासायची नाही.
राजिंदर गोयलनं नुसत्या रणजी ट्रॉफी सामन्यात ६०० विकेटस घेतल्यात. दुलीप व इराणी ट्रॉफीत त्यानं घेतलेल्या विकेटस वेगळ्याच! ६०० विकेटस हा त्याचा भारतीय क्रिकेटमधला विक्रम आहे. मला नाही वाटत हा विक्रम लौकर मोडला जाईल! रणजी ट्रॉफीमध्ये ४०० पेक्षा जास्त विकेटस घेणारे फार थोडेच गोलंदाज आहेत. त्यापैकी फक्त वेंकटराघवनंच आज खेळतोय. पण राजिंदर गोयलला गाठायचं म्हटलं तरी वेंकटलाही खूप वेळ लागेल. गोयलनं ६०० विकेटस पुऱ्या केल्यात आणि आता तो पहिल्या दर्जाच्या क्रिकेटमधून निवृत्त होऊ पाहतोय. तब्बल २५ वर्षं तो रणजी ट्रॉफी सामन्यात भाग घेत होता. हेही त्याच्या बाबतीतलं एक रेकॉर्डच आहे.
अजून कोणी २५ वर्षेपर्यंत रणजी ट्रॉफी क्रिकेट खेळला की नाही हे मला ठाऊक नाही. काही बरीच वर्षं खेळताहेत हे मला माहीत आहे. त्यापैकी एक म्हणजे अशोक मंकड. १९७२ पासून सुरू झालेली त्याची क्रिकेट कारकीर्द १९८२ साल संपलं तरी चालूच होती. गेल्या वर्षीच तो रणजी ट्रॉफीत खेळला नाही. म्हणजे २० वर्षेपर्यंत तो रणजी ट्रॉफीत टिकला. अर्थात त्यातलं एक वर्ष वजा केलं पाहिजे. त्या वर्षी त्याचे व मुंबई क्रिकेट असोसिएशनचे मतभेद झाले होते. त्यामुळे ते वर्ष वाया गेलं होतं.
राजिंदर गोयलची ताकद मोठी वाखाणण्यासारखी आहे. आजचं वय ४० वर्षांपेक्षा जास्त असूनही तो तासनतास गोलंदाजी टाकू शकतो. एकदा त्याच्या हातात चेंडू दिला की, तो दिवस अखेरपर्यंत षटकामागून षटकं टाकत राहतो आणि ती टाकताना त्याचा चेंडूवरील ताबा कधीही शिथिल होत नाही! अर्थात त्याची फिरक आता पूर्वीपेक्षा बरीच कमी झालीय. तसंच पूर्वी एकदम तो एखादा गतिमान चेंडू टाकायचा, त्याचाही वेग हल्ली हल्ली कमी झालाय. त्या गतिमान चेंडूवर त्यानं कितीतरी विकेटस उडवल्यात. काही जणांना त्रिफळाबाद केलंय, तर काहींना पायचित! पण त्याची अचूकता विचाराल… तर ती शेवटपर्यंत जशीच्या तशी होती. तसंच बराच वेळ न दमता, हुरूप न गमावता गोलंदाजी करण्याची त्याची क्षमताही कमी झाली नाही.
राजिंदर गोयल हा हरियानाचा खेळाडू. पूर्वी गोलंदाजीची सर्वस्वी मदार त्याच्यावरच असे. हल्ली कपिल देवचा उदय झाल्यापासून गोयलच्या खांद्यावरचा भार कितीतरी हलका झालाय. त्यामुळे अलीकडे त्याला पूर्वीइतके श्रम घ्यावे लागत नाहीत. गोयल हा एकदम सीधासाधा, निगर्वी माणूस आहे. आपण कोणीतरी मोठे गोलंदाज आहोत असा त्याला अहंभाव नाही. तो मैदानावर व मैदानाबाहेर ज्या पद्धतीनं वागतो, ती पद्धत आदर्शवत असून इतरांनी याबाबतीत गोयलचं अनुकरण करण्यासारखं आहे.
तो एका अर्थानं खराखुरा धंदेवाईक खेळाडू आहे. आपल्या हातात जे कसब आहे, त्याचा त्याला सार्थ अभिमान आहे. तो नेहमी विचार करून, फलंदाजीचे दोष हेरून व त्याला जाळ्यात पकडून बाद करतो. त्याची फलंदाजी मात्र चक्क ११व्या गड्याला शोभण्यासारखीच आहे! तरीपण काही वेळा पट्टे फिरवून त्यानं बऱ्यापैकी धावा जमवल्या आहेत. त्याचा आवडता फटका होता स्विप. वेगवान गोलंदाजाच्या चेंडूवरही तो स्विप मारण्याचा प्रयत्न करी!
त्याच्यासारखी लायकी असलेल्या गोलंदाजाला देशाच्या प्रातिनिधिक संघात खेळायला मिळू नये, ही खरोखरच अत्यंत खेदाची गोष्ट आहे. याबाबतीत एक गोष्ट समजत नाही. दोन-दोन ऑफब्रेक गोलंदाज संघात घेणं चालतं! मग दोन-दोन डावरे गोलंदाज संघात घेणं का चालत नाही? बेदी व गोयल हे टेस्टमध्ये एकत्र आले असते तर मला वाटतं त्यांनी धमाल उडवून दिली असती! काही विजय आमच्या हातावर तुरी देऊन निसटलेत – एक-दोन विकेटसने किंवा थोड्या धावांनी! अशा वेळी गोयल संघात असता तर?
१९७४ साली बिशन बेदीला शिस्तभंगाचा इलाज म्हणून जेव्हा निवडलं नव्हतं, तेव्हा टेस्टच्या १४ खेळाडूंत राजिंदर गोयलचं नाव झळकलं होतं. त्याचं त्यालाच तेव्हा आश्चर्य वाटलं होतं. बातमी कळताच त्याला बुट, बॅट आणि क्रिकेटचं सगळं साहित्यच विकत घ्यावं लागलं! इतकं करूनही शेवटी अकरा खेळाडूत गोयलची निवड झाली नाही ती नाहीच. संघात त्या वेळी दोन ऑफब्रेक गोलंदाज खेळवण्यात आले. परंतु वेस्ट इंडिजसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध एखाद्या खेळाडूला प्रथमच टेस्टमध्ये घ्यायचं हे बरं नव्हेच. त्या सामन्यात निवड समिती गोयलला खेळवण्यास तयार नव्हती असं मला आठवतं. याचं कारण बहुधा असं असावं की, त्याला घेतलं आणि त्यानं काही विकेटस काढल्या तर मग बेदीचा मार्ग काही काळ खुंटला असता. टेस्टमध्ये पुनरागमन करण्यासाठी त्याला थांबावं लागलं असतं आणि तसं झालं असतं तर निवड समिती सदस्यांची परिस्थिती विचित्र झाली असती.
गोयल हा किती तरी वर्षं टेस्टच्या उंबरठ्यावरच उभा होता. मात्र तो एका अनधिकृत कसोटी सामन्यात तेवढा खेळला. त्यात त्यानं गोलंदाजीही चांगली केली. तरीपण दौऱ्यावर नेण्याच्या लायकीचाही तो कोणाला वाटला नाही. दौऱ्यावर नेलं असतं तर त्याला भारतीय क्रिकेटरचा अधिकृत पेहराव तरी अंगावर चढवता आला असता. पण तसं होऊ शकलं नाही. अर्थात नुसत्या परदेश दौऱ्यावर जाण्यानं ज्याला ‘इंडिया कॅप’ म्हणतात, ती त्याला मिळाली नसतीच. याबाबतीत नियम असा आहे की, जो खेळाडू प्रत्यक्ष कसोटी सामना खेळतो, त्याला ‘इंडिया कॅप’ मिळते.
एवढी निराशा पदरी येऊनही गोयल रणजी ट्रॉफीच्या पातळीवर सतत खेळत राहिला. त्यातच त्याला आनंद वाटायचा, अभिमान वाटायचा! आपल्याला कसोटी सामन्यात खेळण्याची अजिबात आशा नाही, हे माहीत असूनही तो अत्यंत मन लावून प्रामाणिकपणे सगळे सामने खेळला. आणि प्रत्येक वेळी आपलं काम त्यानं चोखपणे बजावलं हे विशेष आहे. रणजी ट्रॉफी सामन्यात जीव ओतून खेळणं हे त्याला कधीच कमीपणाचं वाटलं नाही. उलट रणजी क्रिकेट खेळणं हाही एक मान आहे, या समजुतीनं तो त्यात खेळला. आपल्या देशात राजिंदर गोयलच्या वृत्तीचे खेळाडू निर्माण होणं जरूर आहे. तरुण खेळाडूंनी तर राजिंदर गोयलचं उदाहरण गिरवण्यासारखं आहे. नशिबानं म्हणा किंवा अन्य काही कारणानं म्हणा, देशाकडून खेळता येणार नाही, हे माहीत असतानाही प्रत्येकानं आपापल्या संघाकडून गोयलप्रमाणेच जितके जमेल तितकी वर्षं खेळत राहिलं पाहिजे.
आम्ही जेव्हा दुलीप ट्रॉफी सामन्यात उत्तर विभागाशी भिडायचो, त्या वेळी बिशन बेदीपेक्षा आम्हाला गोयलचीच जास्त भीती वाटायची. कारण कशीही खेळपट्टी मिळाली तरी तो आम्हास एका जागी खिळवून ठेवणार हे नक्की होतं. आणि खेळपट्टी जर फिरकीला पोषक मिळाली तर मग काय… विचारूच नका… आमच्या विकेटस खडाखडा वाजवणार! संबंध संघ गिळंकृत करण्याची त्याच्याजवळ कुवत होती. तशी कामगिरी त्यानं बऱ्याच वेळा केलीय… फलंदाजांना त्यानं अनेक वेळा भंडावून सोडलंय. महत्त्वाच्या – म्हणजे चांगल्या फलंदाजाच्या – विकेटस उडवल्यात. एका बाजूने खूप वेळ गोलंदाजी टाकल्यावर त्याच्याऐवजी दुसरा गोलंदाज वापरला जायचा… पण पुन्हा चेंडू हातात सुपूर्त केला की, राजिंदर विकेटस उडवण्याचं आपलं हातखंडा काम सुरू करायचाच!
माझ्या आयुष्यात कोणाची गोलंदाजी खेळण्याची मी धास्ती बाळगली असेल तर ती फक्त राजिंदर गोयलचीच. अगोदरच डावखोऱ्या मंदगतीवाल्यांची गोलंदाजी खेळणं मला जड जातं. ती मी आरामात खेळू शकत नाही. तशात चेंडूला मुळीच उंची न देणारा गोलंदाज समोर असला की, पुढे जाता येत नाही व ड्राईव्हही मारता येत नाही. राजिंदर तशी कधी संधीच देत नाही. जे गोलंदाज चेंडूला उंची देत नाहीत, ते नेहमी एक चूक करतात. एकतर ते चेंडू खूप आखूड टप्प्याचे तरी टाकतात किंवा खोलवर टप्प्याचे (म्हणजे फलंदाजाच्या जवळपास) तरी टाकतात. त्यामुळे त्यांच्या चेंडूवर ड्राईव्ह, कट, पुल यांपैकी कुठलाही टोला मारता येतो. पण गोयलनं अशी चूक कधीच केली नाही. केली असली तर क्वचित – किंचित … तीही २५-२६ षटकं टाकून झाल्यावर! पण त्यापूर्वीची सगळी षटकं एकदम अचूक असणार याबद्दल शंकाच नको! तुम्ही नशीबवान असाल तरच तुम्हाला कधीतरी एकेरी किंवा दुहेरी धाव मिळेल आणि भाग्यशाली असाल तरच तुम्ही खेळत राहाल!
त्याचं क्षेत्ररक्षण मात्र सर्वसाधारण होतं. मात्र त्याच्या हातात येणारे सर्व झेल तो टिपत असे. तसंच त्याची फेकही सफाईदार होती. अर्थात ती फेक सुरुवातीच्या काळाइतकी पुढं पुढं जोरदार राहिली नाही. मात्र त्याच्या गोलंदाजीइतकीच ती अचूक असायची…
तो एक शालीन, साधा, भिडस्त माणूस आहे. रणजी ट्रॉफी सामन्यात त्यानं जे पराक्रम गाजवलेत त्याबद्दल त्याच्या मनात गर्व वा ताठा नाही. कोणालाही त्याच्याशी बोलायला आनंदच वाटेल. वर सांगितल्याप्रमाणे तरुण खेळाडूंच्या दृष्टीनं तो एक आदर्श खेळाडू आहे. तो जरी कसोटी खेळाडू नसला तरी माझ्या खाती त्याची किंमत मोठी आहे… कारण मी ज्यांची गोलंदाजी खेळलो, त्यातला तो एक अत्यंत उत्कृष्ट गोलंदाज आहे. त्याची गोलंदाजी खेळायला मिळाली हे माझं मी भाग्यच समजतो.
..................................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment