अजूनकाही
करोनाविषयीच्या बातम्या वाचून, पाहून कंटाळला असाल तर तुम्ही पुस्तकं वाचा. त्याविषयीची इत्थंभूत माहिती देणारी पुस्तकं बाजारात आली आहेत. ती ई-बुकच्या स्वरूपातही उपलब्ध आहेत. कुरिअर सेवा सुरू झाल्यामुळे तुम्हाला त्यांच्या प्रती घरपोचही मिळू शकतात. वुहानपासून ते जगातल्या आजवरच्या अनेक साथींच्या आजारांची माहिती देणारी आणि भविष्यात अशी साथ पुन्हा उदभवू नये यासाठी काय करायला हवं, याचं दिग्दर्शन करणारी ही पुस्तकं आहेत.
..................................................................................................................................................................
Pandemic! : COVID–19 Shakes the World - Slavoj Zizek
करोना व्हायरसच्या बातम्या डिसेंबर २०१९मध्ये चीनच्या वुहान प्रांतातून यायला सुरुवात झाली. मार्चपर्यंत जगभरातल्या इतरही काही देशांत करोनाचे रुग्ण सापडायला लागले. काही देशांमध्ये लॉकडाउन सुरू झाला. थोडक्यात करोनाची चर्चा आणि त्याचे प्रताप सुरू झाले त्याच सुमारास म्हणजे मार्च २०२०मध्येच स्लावोज झिझेक (Slavoj Zizek) यांचे ‘PANDEMIC’ हे पुस्तक प्रकाशित झाले. झिझेक हे ७१ वर्षीय स्लोव्हियन तत्त्वज्ञ. त्यांनी या विषयावर इतक्या पटकन पुस्तक लिहावे याकडे काहींनी संशयाने तर काहींनी आनंदाने पाहिले. त्यामुळे सुरुवातीलाच हे स्पष्ट करायला हवे की, पुस्तक करोनाबद्दल नसून त्यामुळे सबंध जगावर जे संकट कोसळले आहे, त्याचा सामना कसा करावा, त्यातून बाहेर कसे पडावे, याविषयी आहे.
यासाठी झिझेक मार्ग सांगताहेत तो कम्युनिझमचा. हा कम्युनिझम झिझेक भांडवली व उजव्या शक्तींना पर्याय म्हणून मांडतात. करोनाने नवउदारमतवादाची अखेर झालीय, भांडवलशाही आणि तिचा पुरस्कार करणाऱ्या राज्यसंस्थांना जोर आलाय, उजवे राज्यकर्ते या संकटात पूर्णपणे निष्प्रभ झालेत, शिवाय जवळपास सर्वच एकाधिकारशाह्यांना या संकटाचा सामना करण्यात अपयश आलेय. त्यामुळे उद्याच्या जगाची बांधणी करण्यासाठी पर्याय काय? तर त्याचे उत्तर झिझेक यांनी या पुस्तकात दिलेय.
हे पुस्तक प्रकाशकाने पहिल्या दहा हजार वाचकांना मोफत दिलं गेलंय. आणि आताही त्याचं ई-बुक अगदी नाममात्र किमतीला उपलब्ध आहे.
..................................................................................................................................................................
मुंबईतल्या जसलोक हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या दोन आणि आरोग्यसेवेशी संबंधित स्टार्टअप कंपनी चालवणारे एक, अशा तीन डॉक्टरांनी मिळून हे पुस्तक लिहिले आहे. ते येत्या २२ जुलै रोजी प्रकाशित होणार आहे. म्हणजे जवळपास एक महिन्याने. या पुस्तकात १९१८चा स्पॅनिश फ्लू, १९५७चा एशियन फ्लू, १९६८चा हाँगकाँग फ्लू, सार्स इथपासून करोनापर्यंत जागतिक आजारांच्या साथींचा आढावा घेतला आहे. यात व्हायरसची कसं काम करतो, माणसाच्या श्वसनमार्गावर कसा परिणाम करतो आणि शांतपणे आपल्या प्रतिकारशक्तीवर कसा हल्ला करतो, याची सविस्तर माहिती दिली आहे. मधूमेह, धुम्रपान, हृदयरोग वा रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार असतील तर त्याचा काय परिणाम होतो, याचे विवेचन केले आहे. करोनाविषयीचे गैरसमज दूर करण्यासोबतच त्यामुळे झालेल्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक परिणामांचीही चर्चा केली आहे. थोडक्यात कोविड-१९चा इतिहास, त्याचा जन्म, तथ्य आणि मिथकं यांची सविस्तर माहिती देणारं हे पुस्तक आहे.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाच्या लेखिकेबद्दलच आधी सांगायला हवे. डेबोरो मॅकॅन्झी या ‘New Scientist’ या प्रख्यात विज्ञानविषयक मासिकासाठी गेली ३० वर्षे साथीच्या आजारांबाबतचं वार्तांकन करत आहेत. कोविड-१९विषयीही त्या सुरुवातीपासून वार्तांकन करत आहेत. कोविड-१९ ही जागतिक महामारीची साथ आहे, हे सांगणाऱ्या पहिल्या काही पत्रकारांपैकी त्या एक आहेत. सार्स ते रेबीज आणि इबोला ते एडस अशा अनेक जागतिक पातळीवरील आजारांविषयी आजवर त्यांनी वार्तांकन केलं आहे. या साथी आल्या कशा, पसरल्या कशा, याविषयीचे त्यांचे लेख जगभर वाखाणले गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या या पुस्तकाची दखल जगभरातल्या प्रमुख माध्यमांनी घेतली आहे. कोविड-१९ समजून घेण्यासाठी डेबोरा यांच्या या पुस्तकाला पर्याय नाही, असा अभिप्राय अनेक मान्यवर अभ्यासकांनी दिला आहे. आपण बदललो नाही तर, अशी जागतिक महामारी कशी पुन्हा उदभवू शकते, हे जाणून घेण्यासाठीही हे पुस्तक वाचायला हवे, अशी शिफारस अनेकांनी केली आहे. ‘द स्पॅनिश फ्लू ऑफ 1918 अँड हाऊ इट चेंज्ड द वर्ल्ड’ या पुस्तकाचे लेखक पेल रायडर यांनीही ‘वाचलंच पाहिजे’ असं म्हणून या पुस्तकाची शिफारस केली आहे.
..................................................................................................................................................................
Wuhan Diary : Dispatches from a Quarantined City - Fang Fang
फँग फँग हे चिनी साहित्यिका वँग फँग यांचं टोपणनाव. त्यांचं हे पुस्तक त्यांची ऑनलाईन दैनंदिनी व सोशल मीडियावरील पोस्टचं संकलन आहे. पण या पुस्तकाचं वैशिष्ट्य हे आहे की, हा वुहानमधला ‘आँखो देखा हाल’ आहे. करोनाकाळातल्या ६० दिवसांचा कालावधी या पुस्तकात टिपला आहे. त्यात दैनंदिन जीवनातली आव्हानं, विलगीकरणात असताना बदलणाऱ्या भावना व स्वभाव आणि विश्वासार्ह माहितीच्या अभावामुळे वाटणारी भीती यांचा आढावा घेतला आहे. २५ जानेवारी रोजी चीन सरकारने वुहानमध्ये लॉकडाउन जाहीर केला, तेव्हापासून फँग यांनी ऑनलाईन डायरी लिहायला सुरुवात केली. रोज रात्री फँग फँग आपली डायरी ऑनलाईन पोस्ट करून अनेकांच्या मनातल्या भीतीला, संतापाला आणि आशेला वाट मोकळी करून देत. सक्तीच्या विलगीकरणाचे मानसिक परिणाम, या काळातील समाजाची लाइफलाइन आणि चुकीच्या माहितीचा स्त्रोत अशा दोन्ही झालेले इंटरनेट व त्याचा परिणाम, या विषाणूने शेजारी व मित्रांचे घेतलेले बळी, या सगळ्यांविषयी हे पुस्तक सांगतं.
या पुस्तकाचा आतापर्यंत इंग्रजीसह १५ भाषांमध्ये अनुवाद झाला आहे.
..................................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment