करोनाकाळात ‘व्हायरस’सारखे पसरवले गेलेले काही नवे शब्द
संकीर्ण - व्यंगनामा
टीम अक्षरनामा
  • प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 23 June 2020
  • संकीर्ण व्यंगनामा विषाणू Corona virus करोना Corona करोना व्हायरस Coronavirus लॉकडाउन Lockdown कोविड-१९ Covid-19

करोना व्हायरस हे २१व्या शतकातले सर्वांत मोठे आव्हान ठरण्याची शक्यता आहे. गेले तीन-चार महिने जगभर या विषाणूने धुमाकूळ घातला आहे, अक्षरक्ष: हलकल्लोळ माजवला आहे. जगभरच्या वर्तमानपत्रांची रोजच्या रोज त्याविषयीच्या बातम्यांनी पानंच्या पानं भरताहेत. वृत्तवाहिन्यांचे अँकर त्याविषयीच्या बातम्या देऊन देऊन थकताहेत. ऑनलाईन पोर्टल्स करोनाचीच चर्चा करताहेत. आणि सोशल मीडियावर नेहमीप्रमाणे सर्जनशीलतेला उधाण आले आहे. या सगळ्यांतून शोधलेले हे काही नवे शब्द...

..................................................................................................................................................................

करोना विषाणू (Corona virus) – जगाला त्राहीमाम करून सोडलेला, पण डोळ्यांना न दिसणारा बदनाम जगसम्राट

कोविड-१९ (Covid-19) – करोना विषाणूमुळे होणाऱ्या आजाराचे नाव, पण त्याला प्रसारमाध्यमे ‘करोना व्हायरस’ असंच म्हणतात

करोना (Corona) – सर्दी, ताप यांसारखे आजार देणाऱ्या विषाणूंचा आद्यपुरुष

लॉकडाउन (Lockdown) – टाळेबंदी किंवा संचारबंदी. म्हणजे नेमके काय? तर सरकारने लोकांनी कुठे जावं, कुठे जाऊ नये; काय करावं, काय करू नये; काय खावं, काय प्यावं, याची नियमावली जाहीर करण्यासाठी लागू केलेली योजना

‘Social Distancing’ – दै. ‘लोकसत्ता’वाले याला ‘साथसोवळं’ असा मराठी पर्याय आग्रहाने रुजवू पाहताहेत, पण तो रुजत नाही. बाकी या शब्दाचा साधा अर्थ ‘गर्दीपासून लांब रहा’ असाच घ्यायला हवा. जगातील काही अभ्यासकांनी आक्षेप घेतल्यानंतर WHOने ‘Social Connectedness with Physical Distance’ असा ‘सोशल डिस्टन्सिंग’ला पर्याय सूचवला. तरीही ‘लोकसत्ता’वाले ‘साथसोवळं’वरच अडून बसलेत.

आर्थिक आणीबाणी – हा खरं तर शब्द नसून भारतीय राज्यकर्ते, काही अर्थतज्ज्ञ, काही अभ्यासक यांचा ‘हुकूमी एक्का’ आहे. ते संधी मिळेल तेव्हा या शब्दाचा वापर करत असतात. कारण ‘आर्थिक आणीबाणी’ हा भारताचा एकप्रकारे स्थायीभावच आहे. तो भारतात केव्हाही उच्चारता येतो, केव्हाही अमलात आणायच्या गोष्टी करता येतात.

स्थलांतरित मजूर – ज्यांचा कुणीही वाली नसतो, पण ज्यांच्यावरून राजकारण करायला राजकीय पक्ष, नेते यांना आवडते, असा भारतीय कामगारांचा निरुपद्रवी समूह.

Pandemic - सर्व देशभर किंवा खंडभर असलेला साथीचा रोग, जगभर पसरलेला संसर्गजन्य आजार. जो ऐकून ऐकून, वाचून वाचून बहुतेकांना वीट आला असावा.

Epidemic - साथीचा आजार. Pandemic इतकं ग्लॅमर न मिळालेला त्याचा चुलतभाऊ.

Infodemic – Pandemicच्या बातम्या देत, Epidemicची चर्चा करत काहींनी मनगंडत थापा बातम्या म्हणून पसरवल्या. त्यातून जो आजार जन्माला आला त्याचे नाव.

प्रतिकार शक्ती – जिला इंग्रजीत ‘Immunity’ असं म्हणतात. पाश्चात्यांच्या तुलनेत भारतीयांकडे असलेली एकमेव प्रभावी गोष्ट.

तबलीग जमात – करोना व्हायरसचं खापर कुणाच्या माथी फोडावं, हे ‘गोदी मीडिया’ला सुरुवातीला बरेच दिवस कळत नव्हतं. ते या जमातीमुळे कळालं. ही संघटना मुस्लिमांची असल्यानं तर या ‘गोदी मीडिया’ला नेहमीसारखाच हुरूप आला.

Corona Jihad – कुठल्याही गोष्टीचा मुस्लिमांशी संबंध जोडायचा असेल तर त्याच्यामागे ‘जिहाद’ हा शब्द जोडून दिला जातो. करोनाशीही हा शब्द जोडल्याने तो लगेच ‘लव-जिहाद’ वगैरे शब्दांच्या पंक्तीत जाऊन बसला.

पीएम केअर्स फंड - करोना व्हायरसच्या काळातील मोदी सरकारपुरस्कृत अभिनव योजना. ज्यात पैसा येतो कुठून याची माहिती जाहीर होते, पण जातो कुठे याची माहिती अजिबात जाहीर होत नाही.

विषाणू  - ज्याला मराठीत ‘virus’ असाही पर्यायी शब्द वापरला जातो.

स्टे अॅट होम – घराबाहेर न पडण्याची ताकीद देण्यासाठी वापरला जाणारा गोंडस शब्द

महामारी - Pandemic आणि Epidemic या दोन्हीसाठी बहुतेक मराठी प्रसारमाध्यमे वापरत असलेला शब्द

मध्यमवर्ग – स्थलांतरित मजुरांची अनेक दिवस चर्चा होत राहिल्यावर काहींनी चर्चेत आणण्यासाठी प्रयत्न केलेला शब्द. मजुरांच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची चर्चा जरा जास्तच लांबली की, आम्हीही गरीब, बापडे, पामर आहोत, असं  त्या मजुरांचा, शेतकऱ्यांचा उपहास करत सांगायला ज्यांना आवडतं, तोही हाच वर्ग असतो.

रोगपरिस्थिती विज्ञान (Epidemiology) – शब्द जुनाच आहे, पण करोनामुळे हाही थोडाफार चर्चेत आला इतकंच.

गो करोना गो – करोनाला पळवून लावण्यासाठी रामदास आठवले या केंद्रीय मंत्र्याने तयार केलेला जादूई मंत्र

महामृत्यूंजय मंत्र – माजी सभापती, माजी मंत्री आणि भाजपनेत्या सुमित्रा महाजन यांनी करोना नष्ट करण्यासाठी नव्याने लावलेला शोध

व्हेंटीलेटर्स – करोनाकाळात दुर्मीळ झालेली बहुधा एकमेव वैद्यकीय सुविधा

ICU – एरवी अत्यावश्यक सेवेसाठीची, श्रीमंतांना परवडणारी पण करोनाकाळातही तशीच राहिलेली, पण तरीही चर्चेची झालेली बहुधा एकमेव वैद्यकीय सुविधा

Hydroxychloroquine, Chloroquine – करोना बरा होतो, म्हणून ज्या दोन औषधांचा बराच गवगवा केला गेला, ती हीच दोन नावे.

जैविक शस्त्र – करोना विषाणूसाठी सुरुवाती सुरुवातीला वापरला गेलेला एक पर्यायी शब्द

वटवाघूळ – करोनाच्या विषाणूंचा संसर्ग माणसांना यांच्यामुळेच झाला, या संशयावरून बदनाम केले गेलेले पहिले वन्यजीव.

केस मृत्यूदर (case fatality rate) - फक्त रोगाची लक्षणं दाखवणाऱ्यांची तपासणी केल्यानंतर जे रुग्ण सापडले आणि त्यापैकी किती मरण पावले याची संख्या मोजण्याची एक पद्धत

संसर्ग मृत्यूदर (infection fatality rate) - रोगाची लक्षणं दाखवणारे आणि रोगाची लक्षणं न दाखवणारे, पण करोना विषाणूचा संसर्ग झालेले लोक, यांची एकूण संख्या आणि त्यापैकी किती मरण पावले याची संख्या मोजण्याची एक पद्धत

वेबिनार – करोनाकाळात होणाऱ्या ऑनलाईन सेमिनारसाठी वापरला जाणारा शब्द. खरं तर ऑनलाईन भाषण, कवितावाचन, चर्चा या सगळ्यांसाठी हा शब्द वापरला हवा. कारण सगळ्यांचे स्वरूप साधारणपणे सारखेच असते.

World after Corona – मराठीत याला ‘करोनानंतरचे जग’ असं म्हणतात. या जगाची कल्पना मराठीत फारशी कुणाला करता येत नाही, पण त्याविषयी बोलायला मात्र आवडतं.

विलगीकरण  - याला इंग्रजीत ‘quarantine’ असं म्हणतात. १८९७ साली भारतात जेव्हा प्लेग आला, तेव्हा मराठीतही ‘quarantine’ला ‘quarantine’ म्हणत असत. आताही तसंच म्हणतात. पण कधी कधी बदल म्हणून ‘विलगीकरण’ म्हणतात.

Work From Home – घरातून आठ तासापेक्षा जास्त काम करून घेऊनही पगार मात्र निम्माच दिला जातो, अशी करोनाकाळात उदयाला आलेली नवी कार्यसंस्कृती.

जनता कर्फ्यु (Janta curfew) – लॉकडाउन भारतीयांना झेपेल की नाही, यासाठी केली गेलेली लिटमस टेस्ट

isolation – गोड शब्दांतली नजरकैद

मास्क – करोनाकाळात उदयाला आलेली नवी फॅशन

सॅनिटायझर – करोनाकाळात दारूचा (अल्कोहोल)चा समावेश असलेली पण हात, वस्तू निर्जंतुक करण्यासाठीच वापरली जाणारी एकमेव गोष्ट

कँटोनमेंट झोन - चिन्हांच्या भाषेत ‘लाल’ रंगाने दाखवलेला भाग. ज्या भागात करोनारुग्णांची संख्या जास्त आहे असा भाग. 

Stay safe - करोनाकाळात ‘Hi, Hello’ या शब्दांची जागा घेतलेला नवा शब्द

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......