‘मेघदूत' या काव्याची सुरुवात 'आषाढस्य प्रथमदिवसे' या शब्दांनी होते. त्यामुळे महाकवी कालिदासाचा जन्म आषाढ शुद्ध प्रतिपदेला झाला असं मानलं जातं. आज आषाढ महिन्यातील पहिला दिवस. हा दिवस ‘कालिदास दिन’ साजरा केला जातो. त्यानिमित्तानं हा विशेष लेख...
..................................................................................................................................................................
महाकवी कालिदासाच्या श्रेष्ठत्वाबद्दल कोठेही दोन मतं नाहीत. प्राचीन पंडित आणि अर्वाचीन टीकाकार दोघांनाही जगाच्या महाकवीमंडळात कालिदासाचं स्थान फार उच्च आहे हे मान्य आहे. संस्कृत काव्यमर्मज्ञ आणि युरोपीय वाङ्मयप्रवीण या दोघांनीही कालिदासाची मुक्तकंठानं प्रशंसा केलेली आहे.
संस्कृत वाङ्मयात कालिदासाची मान्यता केवढी आहे, हे सांगण्यासाठी एक सुभाषित सर्वपरिचित आहे –
पुरा कवीनां गणनाप्रसंगे
कनिष्ठिकाधिष्ठितकालिदासा
अद्यापि तत्तुल्यकवेरभावादनामिका सार्थवती बभूव
म्हणजे कोणी एक रसिक मनुष्य उत्कृष्ट कवींची गणना करू लागला, तेव्हा कालिदासाचं नाव घेऊन त्यानं पहिले बोट (करांगुलि) मोजलं आणि दुसरं बोट मोजण्यासाठी जेव्हा कालिदासाच्या तोलाचं दुसरं नाव तो शोधू लागला, तेव्हा ते त्याला मिळेना. म्हणून ‘करांगुलि’ जवळच्या बोटाला ‘अनामिका’ हे यथार्थ नाव मिळालं, अशी कवीनं या सुभाषितात ‘अनामिका’ या नावावर कोटी केली आहे.
दुसऱ्या एका कवीनं कालिदासाला ‘कविकुलगुरू’ ही पदवी बहाल करून त्याला ‘कविताकामिनीचा विलास’ म्हटलं आहे. कालिदासाच्या शहाणपणाच्या शेकडो आख्यायिका प्रसिद्ध आहेत. त्यावरून त्याच्या भाषाप्रुभत्वाबद्दल व साहित्यनैपुण्याबद्दल लोकांमध्ये किती कौतुक होतं हे स्पष्ट दिसतं. त्याच्या घरच्या दास-दासीसुद्धा मोठमोठ्या पंडितांना वादात हरवत आणि विद्येत लाजवत असं म्हणतात. अशा प्रकारच्या कथांत अतिशयोक्ती जरी असली तरी त्यावरून सामान्य लोकांतसुद्धा या महाकवीबद्दल केवढा आदर होता हे दिसून येतं. या अशा दंतकथांमधून कालिदासाचं जे वर्णन आलेलं आहे, त्यावरून त्याची विलक्षण लोकप्रियता व्यक्त होते. त्याच्या वास्तविक गुणवैभवाची खरी कल्पना येण्यास अर्थात अशा दंतकथांवर विसंबून न राहता त्यानं निर्माण केलेल्या अदभुत काव्यसृष्टीतच संचार केला पाहिजे.
कवी हे शब्दसृष्टीचे ईश्वर आहेत हे सुप्रसिद्ध आहे आणि त्या सृष्टीच्या प्रत्यक्ष दर्शनाशिवाय आणि तिच्या अंतरंगाच्या निकट परिचयाशिवाय त्यांच्या निर्माणशक्तीचं यथार्थ आकलन होऊ शकत नाही.
कालिदासाच्या नावावर तीन नाटकं, दोन महाकाव्यं, एक खंडकाव्य आणि वर्षातील निरनिराळ्या ऋतुंच्या वर्णनपर कवितांचा एक संग्रह इतके ग्रंथ प्रसिद्ध आहेत.
‘ऋतुसंहार’ हे या निसर्गवेड्या कवीचं पहिलं अपत्य. त्यामुळे काव्यविलासाची हौस, उत्साह आणि आपले काव्यगुण दाखवण्याचा सोस या काव्यात भरपूर आहे. ऋतुंचे मानवी जीवनावरील, विशेषत: शृंगारलीलांवरील परिणाम त्यानं रसिकतेनं टिपले आहेत.
सुप्रसिद्ध ‘मेघदूत’ हे चित्रकलामर्मज्ञ कालिदासाचं खंडकाव्य. हे काव्य म्हणजे अलौकिक प्रतिभेची अत्यंत मनोहर प्रतिमा आहे. एकशेवीस श्लोकांच्या या खंडकाव्यात कालिदासानं आपलं शक्तिसर्वस्व वेचलं आहे. यामध्ये त्याची सौंदर्यान्वेषिणी दृष्टी व कलाभिज्ञता स्पष्टपणे दिसून येते. एखादा कुशल चित्रकार आपल्या कुंचल्याच्या चार-सहा फटकाऱ्यांनी एखादी रम्य आकृती निर्माण करतो, त्याप्रमाणे कालिदासानं यातील प्रत्येक श्लोकात मोजक्या शब्दांनी एक एक मनोहर चित्र काढलं आहे. कालिदासानं एवढंच काव्य रचलं असतं तरी त्याची जगातील अत्युउत्कृष्ट कवींमध्ये गणना झाली असती! विदर्भात वाकाटकांच्या दरबारी असताना कालिदासानं हे खंडकाव्य रचलं असं विद्वानांचं मत आहे.
‘रघुवंश’ व ‘कुमारसंभव’ ही रससिद्ध कालिदासाची महाकाव्यं. ‘रघुवंश’ हे कालिदासाच्या काव्यात सर्व प्रकारे पूर्णतेला पोहचलेलं काव्य आहे. यात दिसणारे त्याचे परिणतप्रज्ञत्व व प्रतिभाशालित्व लक्षात घेता ते त्यानं इतर काव्यांनंतर रचलं असावं असं वाटतं. यात एकोणीस सर्गात एकंदर अठ्ठावीस राजांचं वर्णन आलं आहे. त्यातील भाषासरणी आणि अर्थ ही दोन्ही फार उत्कृष्ट असून इतर काव्यांच्या मानानं साध्या भाषेत लिहिलं असल्यानं आबालवृद्धांस सारखंच प्रिय आहे. कालिदासानं इतरही उत्कृष्ट काव्यं व नाटकं लिहिली असली तरी संस्कृत ग्रंथकार व सुभाषितकार त्याचा ‘रघुकार’ म्हणूनच उल्लेख करतात, यावरूनही या महाकाव्याची उत्कृष्टता प्रत्ययास येते.
‘रघुवंश’च्या मानानं ‘कुमारसंभव’च्या भाषाशैलीत किंचित कृत्रिमता दिसून येते. तारकासुरानं ब्रह्मदेवाच्या वरानं प्रबळ होऊन देवांस त्रास दिल्यामुळे त्यांनी ब्रह्मदेवाच्या सूचनेवरून शिव-पार्वती यांचा विवाह घडवून आणला. आणि त्या संबंधांपासून उत्पन्न झालेल्या कार्तिकेयाला सेनापती करून त्याच्याकडून तारकासुराचा वध करवला, असं या महाकाव्याचं कथानक आहे. यात पहिला आठ सर्गातील सर्वच प्रसंग कालिदासानं मोठ्या कुशलतेनं रेखाटले आहेत. या काव्यात शिव-पार्वती व मदन याच तीन मुख्य व्यक्तिरेखा आहेत. त्यांचं स्वरूप, स्वभाव व कृती यांच्या वर्णनात कवीनं आपली काव्यप्रतिभा खर्चिली आहे. तथापि त्यातल्या त्यात प्रारंभीचं हिमालयाचं व तृतीय सर्गातील अकालिन वसंत ऋतुतील वनश्रीचं वर्णन, चौथ्यातील रतिविलाप, पाचव्या सर्गातील बहुवेषधारी शिव-पार्वती यांचं संभाषण ही उत्कृष्ट आहेत. या महाकाव्यात पार्वतीच्या तारुण्याचं वर्णन कालिदासानं ज्या प्रकारे केलं आहे, त्यावरून तो नुसता चित्रांचा शोकी नसून स्वत: चित्रकारही असावा असं वाटतं.
पार्वती तारुण्यात येत असता तिच्या शरीराच्या निरनिराळ्या अवयवांचा उठावदारपणा स्पष्टपणे दिसू लागला, याचं वर्णन करताना तो म्हणतो –
उन्मिलितं तुलिकयेव चित्रं सूर्यांशुभिर्भिन्नमिवारविन्दम
बभूव तस्याश्चतुरस्त्रशोभि वपुर्विभक्तं नवयौवनेन
चित्रकार प्रथम साऱ्या चित्राचा बारीक रेघांनी आराखडा करतो आणि त्यानंतर त्यात कुंचल्यानं रंग भरतो. नुसता आराखडा काढला असता त्यातही निरनिराळे सर्व भाग यथोचित समाविष्ट झालेले असतातच, पण त्यांचा स्पष्ट उठावदारपणा त्यात रंग भरल्यानंतरच दिसून येतो. याला कालिदासानं सूर्यकिरणांमुळे उमलणाऱ्या कळीचा दुसरा दृष्टान्त दिला आहे. सूर्य उगवून कमळांच्या कळ्या फुलल्या म्हणजे त्यांच्या साऱ्या पाकळ्या, आतील केसर, सर्व भाग स्पष्ट, उठावदार दिसतात. त्याप्रमाणे पार्वतीनं यौवनात प्रवेश केल्यावर तिच्या सुंदर शरीराचे निरनिराळे भाग पूर्णपणे विकसित होऊन त्यांच्या परस्पर प्रमाणबद्धतेमुळे ती फारच रमणीय दिसू लागली. ‘कळी फुलण्याची’ उपमा तारुण्यात प्रवेश करणाऱ्या कुमारींना अनेकांना दिली असून ती मार्मिक आहे यात शंका नाही. पण कुंचल्यानं चित्र कसं उमलतं अशी उपमा कवी स्वत: चित्रकार असल्याशिवाय त्याला सुचणं अशक्य वाटतं. कालिदासानं ‘सूर्यकिरणांनी कमळ जसं फुलतं’ असं म्हणण्यापूर्वी ‘तुलिकेनं चित्र जसं उमलत जातं’ अशी उपमाच प्रथम वापरली. त्यामुळे तो स्वत: कुशल चित्रकार असला पाहिजे असं वाटतं.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
कालिदासानं लिहिलेल्या नाट्यत्रयीतील ‘अभिज्ञानशाकुन्तल’ हे अत्युत्कृष्ट समजलं जातं. त्यामानानं ‘मालविकाग्निमित्र’ व ‘विक्रमोर्वशीय’ ही नाटकं एकंदरीत सामान्य वाटतात. ‘विक्रमोर्वशीय’मधील राजाच्या विरहावस्थेचं वर्णन वाचून पुष्कळांनी माना डोलावल्या आहेत. या नाटकाची कथावस्तू त्याला ऋग्वेदाच्या उर्वशी पुरुरव्याच्या संवादसुक्तावरून स्फुरली. स्वर्ग आणि पृत्वी यांच्या संगमाचं स्वप्न रेखाटणारं हे नाटक आहे. पार्थिव पराक्रमावर स्वर्गीय सौंदर्य भाळतं व त्यातून एक नितांत रमणीय नाट्यकृतीचा जन्म होतो. प्रेमव्यवहारातील शारीर अंशावर कालिदासीय चित्रणात नेहमी भर असतो. असं प्रेम तृप्तीनंतर व ओढ ओसरू लागल्यानंतर अपयशी होतं. प्रेमसंबंधांत शरीर संनिकर्षाचा भाग अनिवार्य असला तरी खरं प्रेम आंतरिक एकरूपतेमुळेच चिरस्थायी होऊ शकतं. शारीर आकर्षणाला ओहोटी लागली तरी प्रेमभावना कोमेजून जात नाही. तेवढ्यासाठी कालिदास आपल्या पात्रांना शापित वियोगाच्या अग्निदिव्यातून जायला लावतो. त्यातून त्यांचं प्रेम तावून सुलाखून परिशुद्ध होतं.
कालिदासाच्या सर्वच नाट्यकृतींमध्ये नियतीच्या प्रभावाचा भाग असतोच. ‘विक्रमोर्वशीय’मध्ये कार्तिकेयाच्या शापाचा प्रभाव, तर ‘शाकुन्तल’मध्ये दुर्वासाचा शाप आला आहे. ‘मालविकाग्निमित्र’मध्ये मालिवेकबाबत सिद्धादेश आहे. वस्तुत: हे नाटक ऐतिहासिक घटनेवर आधारलेलं आहे. त्यातील प्रमुख पात्रं ऐतिहासिक आहेत. प्रमुख घटनांचे संदर्भही प्रत्यक्ष इतिहासातीलच आहेत. विदर्भ व विदिशा या दोन प्रदेशांचे राजकीय संबंध प्रस्थापित करणारा, मालविका व अग्निमित्र यांच्या विवाहाचा प्रसंगही ऐतिहासिक होता. कालिदासानं त्यातच आपल्या नाटकाचं बीज शोधलं. कालिदासाची ही पहिलीच नाट्यकृती असून त्यानं प्रगट केलेलं कलात्मक भान भुरळ घालण्याजोगं आहे.
कालिदासाचा स्वभाव त्याच्या नायकांप्रमाणेच धीरललित स्वरूपाचा होता. म्हणूनच त्याच्या काव्य-नाटकांचे नायक देव वा मानव यापैकी कोणत्याही कोटीतील असले तरी त्यांच्या जीवनातील प्रेमविषयातच त्याला रूची होती. नाटककार म्हणून त्याची कीर्ती त्याच्या शेवटच्या सर्वांगसुंदर व निर्दोष अशा ‘अभिज्ञानशाकुन्तल’वरच अवलंबून राहील. यातील संविधानकचातुर्य, स्वभावरेखाटन, रसपरिपोष, भाषासौष्ठव, चित्रकलामर्मज्ञता इत्यादी गुणांवर लुब्ध होऊन प्राचीन रसिकांनी त्याला सर्व संस्कृत नाटकांत श्रेष्ठ गणलं आहे. सध्या जगातील अशी एकही प्रमुख भाषा नाही की, ज्यात ‘शाकुन्तल’चं एखादं तरी भाषांतर सापडणार नाही. ‘शाकुन्तल’मधील चौथ्या अंकात काव्यात्मकतेचा वाटा फार मोठा आहे. प्राचीन परंपरेनं आपली प्रीती या अंकाला बहाल केल्याचं कारण हे असावं की, या अंकातील मुख्य प्रसंगात अखिल मानव जातीच्या एका चिरंतन भावनेचं चित्र रंगवलं आहे. या अंकातील प्रमुख भावनेला सर्वस्पर्शी अनुभवाचं असं सार्वजनिक अधिष्ठान आहे. त्यामुळेच त्याची गोडी अवीट आहे.
या नाटकाच्या कथेला निसर्गाची पार्श्वभूमी आहे. आपल्या कल्पकतेचं जे वैभव कालिदासानं येथे प्रकट केलं आहे, ते निसर्गातील वस्तूंच्या वा दृश्यांच्या वर्णनानंच. निसर्गाच्या या वर्णनात मानवी जीवनाचा जिवंतपणा आहे. कालिदासाच्या तिन्ही नाटकांत प्रेम हे एकच मुख्य कथासूत्र आहे, पण ते त्यानं वेगवेगळ्या रीतींनी ‘दृश्य’ केलं आहे! भिन्न भिन्न पातळ्यांवर रंगवलं आहे, ते पाहण्याजोगं आहे. हे नाट्यतंत्राच्या दृष्टीनं जसं वेगवेगळ्या जातकुळ्यांचे समर्थ प्रयोग आहेत, तसेच प्रेमविषयक वृत्तीनेही वेगळे आहेत.
कवीला जीवनाचं संपूर्ण, सम्यक दर्शन घ्यावं लागतं. त्याला आढ्यतेनं कुणाला उपदेश करायचा नसतो की, काही स्वार्थ साधायचा नसतो. ‘न हि कविना परदासा एष्टव्या नापि चोपदेष्टव्या : किं तु तदीयं वृत्तं काव्याङतया स केवलं वक्ति’ असं रुदृटानं म्हटलं आहे, मात्र हे दर्शन घेताना कवीला सर्वत्र सारख्याच आस्थेनं, जिव्हाळ्यानं पाहावं लागतं. त्यात एक समधातता, तटस्थता त्याला आवश्यक असते. ती कालिदासाच्या वृत्तीत ओतप्रोत भरलेली आहे. माणसाच्या अंतर्मनाचं विलक्षण हृद्य व प्रत्ययकारी चित्रण त्याच्या कृतीत आपल्याला पाहायला मिळतं.
कालिदासाच्या वाङ्मयामागे संस्कृत भाषेची अनेकांगी समृद्धता व एका प्राचीन संस्कृतीची संपन्नता आहे हे खरंच, पण त्याचे स्वत:चे लोकोत्तर कलागुण त्याच्या वाङ्मयाला उंचावर पोहचवायला कारणीभूत आहेत. त्याचं शब्दप्रभुत्व हा त्यामागील आणखी एक घटक. तोलूनमापून पूर्ण शक्तिनिशी वापरलेला शब्द हे त्याचं मोठं आयुध आहे.
एवढं विलक्षण एकरूपत्व साध्य करायला कालिदासाला कष्ट पडले नसतील, हे असंभवनीय आहे. पण कालिदास मोठा कलावंत अशासाठी की, पडलेले कष्ट व भोगलेले त्रास यांचा कुठलाही चरा किंवा ओरखडा त्याच्या कृतींवर नाही. आपल्या साऱ्या कलाकृतींना फुलाच्या उमलण्याची नैसर्गिक सहजता, डौल व लालित्य त्यानं बहाल केलं आहे.
अजिंठ्याच्या चित्रांत, भारतीय शिल्पांत असतो, तसा देखणा गोडवा व सौष्ठव त्याच्या सर्व कलाकृतींमध्ये आहे. त्यामुळे त्याच्या सर्व कलाकृतींना फार देखणा रूपबंध प्राप्त होतो. त्याचं साहित्य जणू प्रतिमानबंध. एखाद्या शिल्पकृतीमधून मिळणारा आनंद संपूर्णपणे आपल्या वाट्यास यावा, असं वाटत असेल तर त्या आनंदाचा आस्वाद त्या शिल्पाभोवती चौफर फिरल्याशिवाय घेता येत नाही. तसंच कलाकृती, मग ती कोणत्याही माध्यमातून आविष्कृत झालेली असो, तिच्यातील सौंदर्याकडे प्रेक्षकांनी सर्व ज्ञानेद्रियांनी टवकारून पाहावं, असाच ऐवज कलाकारानं कलाकृतीत ठेवला पाहिजे. कालिदासीय साहित्य अशा ऐवजानं समृद्ध आहे.
सौंदर्य हे केवळ दृष्टिसुख नाही, ते अनुभवण्याचं आहे. आणि अनुभवलं म्हणजेच सत्य हाती लागतं. सत्याला सौंदर्याची गवसणी असते. ‘सत्य म्हणजेच सौंदर्य’ हेच तत्त्वज्ञान कालिदासानं स्वर्गातील मोहक मदिरेहून मादक अशा काव्याच्या अवगुंठनात साठवून ठेवलं असेल का?. पण तत्त्वज्ञान म्हणजे तरी जीवनाची कलाच ना? असं म्हणतात की, हे स्वाभाविक वास्तवसत्य, देखणेपणाचं वरदान घेऊन आलेल्या कालिदासाच्या डोळ्यांत प्रतीत होत असे, आणि त्या सौंदर्यात मधुर संगती हा गुण प्रामुख्यानं आढळे. अशाच जातीचं सौंदर्य अपूर्णत्वानं म्हणा वा कणाकणांनी म्हणा, प्रदोषकाळी रम्य सरोवरात पक्ष्यांच्या थव्यात, आकाशातील चांदण्यांत, पारिजातकाच्या फुलांत स्फुरत असतं. मौज अशी की, वास्तवसत्य एक प्रकारचं नाही. ते अनुभवात दडलेलं असतं. चर्मचक्षूंना जाणवतं व इंद्रियसंवेदनांनाही जाणवतं. ही वास्तवातील विविधता व त्या नानापरीच्या कुसरी, ही मौज नव्हे का?
या अलौकिक सौंदर्यसत्याचं, सौंदर्यसत्तेचं आकलन व्हावं, म्हणून आपण आपल्या सर्व ज्ञानेंद्रियांना डोळ्यांचं काम करण्यास शिकवलं पाहिजे. साहित्यकृती असो व चित्र-शिल्पाकृती त्या रचनेतून रूप, रंग, नाद व गंध हे सर्व कलाकाराच्या नजरेत गोचर झालं पाहिजे. कालिदासाच्या काव्य-नाटकातील वर्णनं ज्ञानेद्रियांना उद्दिपित करतात! मायकेलेन्जेलो स्वत:च्या डोळ्यांना अंधत्व आल्यावर दुसऱ्यांच्या मदतीनं आपला हात अपोलोच्या मूर्तीवर फिरवून तिच्यातील रूपसौंदर्य न्याहळत असे. आपल्या दृष्टीला स्पर्शज्ञानानं तो अधिक चाणाक्ष करत असे. आपण दोन डोळ्यांनी पाहतो, त्यावेळी आपणांस वस्तुजातानं व्यापलेल्या जागेची कल्पना येते. अंतराचा वेल्हाळपणा भासतो, त्याच्या पृष्ठभागाची कल्पना येते. परंतु त्याची जडणघडण आणि आकारमान यांची जाणीव होत नाही. कुठलीही कलाकृती सर्व इंद्रियांनी बघावी लागते. इंद्रासारखं सहस्त्राक्ष बनावं लागतं.
कालिदासीय इंद्रधुनसम साहित्याचा रसास्वाद घेताना आपलं अंत:करण, आजानवृक्षावर मोहर बहरावा, त्याप्रमाणे मोहरून जातं. अंत:करणात आनंदाच्या लहरी पसरून पुन:प्रत्ययाचा आनंद ओसंडून वाहत जातो. स्थळ-काळाचंही भान राहत नाही, इतकी एकरूपता अनुभवता येते. आपल्याला इतिहासाच्या दृष्टीनं कालिदासाची काही म्हणजे काहीही माहिती नाही, हे सुदैवच म्हटलं पाहिजे. कारण त्यामुळे त्याच्या वाङ्मयाची केवळ आणि अस्सल वाङ्मयीन विचारणा होत राहिली. चरित्रात्मक, मानसशास्त्रीय, सामाजिक असे समीक्षेचे अवांतर मुद्दे त्यात मिसळले नाहीत.
आपल्याला पुरावा मिळतो तो फक्त त्याच्या नावाचाच. ‘कालिदास’ या नावाची लखलखीत, बावनकशी सुवर्णमुद्रा लेवून आपला फक्त वाङ्मयसंभार, अलौकिक, कलासौंदर्य व दृष्टी स्तिमित करणारा प्रतिभाविलास यांच्या बळावर तो गेली दीड-दोन हजार वर्षं दिमाखात उभा आहे. या दीर्घ कालौघात बलशाली साम्राज्यं धुळीला मिळाली, पण कालिदासाच्या लेखनातलं एक म्हणजे एकही अक्षर धूसर झालेले नाही!
कालिदासाच्या नावानं घातलेल्या ‘करंगळी’च्या शेजारची ‘अनामिका’ ही आजतागायत ‘अनामिका’च राहिली आहे!!
(पूर्वप्रसिद्धी - अक्षरनामा, १३ जुलै २०१८)
..................................................................................................................................................................
लेखक पंकज भांबुरकर चित्रकार असून कालिदासीय साहित्यात संशोधन करत आहेत.
bhamburkar.pankaj@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment