अजूनकाही
समोरचे ते लांबवर पसरलेले पाणी पाहून मी अगदी थक्क झालो होतो. काही ठिकाणी तर दुसरा किनाराही नजरेस पडत नव्हता. इतके पाणी मी केवळ हिंदी चित्रपटांत एखादे गाणे चालू असताना गंगामैया किंवा यमुना नदीचा प्रवाह दाखवतात तेव्हाच पाहिले होते. माझी उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती - ‘अरे बापरे, किती मोठी नदी आहे ही!’
‘नदी? ही नदी नाही, समुद्र आहे, अरबी समुद्र!’ आमच्या दौऱ्याचे प्रमुख असलेले फादर किस्स पटकन म्हणाले.
त्या उत्तराने माझ्या तोंडाचा ‘आ’ अधिकच वासला होता. आपण काय पाहत आहोत, यावर माझा विश्वासच बसत नव्हता.
ही घटना आहे १९७८ची. गोवा-पुणे-बेळगाव येशूसंघीय प्रांताने दहावी-अकरावीची परीक्षा दिलेल्या १५-१६ मुलांची आपल्या प्रांतातील मिशन केंद्रांची व्होकेशनल टूर किंवा दैवी पाचारण दौरा आयोजित केला होता. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरहून मी एकटा या दौऱ्यात सामील झालो होतो. दौऱ्याच्या शेवटी पणजीला आल्यावर मिरामार बीचवर हा प्रसंग घडला होता.
एका बाजूला म्हणजे आमच्यासमोरच पणजी आणि कंपालकडून येणारे मांडवी नदीचे विशाल पात्र त्या अथांग सागरात विलीन होत होते आणि दुसऱ्या टोकाला निळ्याभोर आकाशापर्यंत भिडणारे ते पाणी म्हणजेच अरबी समुद्र होता! माझी तर मती एकदम गुंग झाली होती. शालेय पुस्तकांत समुद्राविषयी वाचले होते, पण समुद्र प्रत्यक्ष पाहण्याचा हा पहिलाच प्रसंग होता.
मिरामार समुद्रकिनाऱ्यावर उभे राहण्याची, तेथून तो समुद्र पाहण्याची पहिलीच वेळ. इथेच आणि नंतर शेजारच्या ताळेगावात मी या पुढील तब्बल १४ वर्षे घालवणार आहे, याची तेव्हा साधी कल्पनाही नव्हती!
एक महिन्यानंतर येशूसंघीयांतर्फे नव्यानेच उघडलेल्या लोयोला प्री-नोव्हिशिएट किंवा पूर्वसेमिनरीत मी दाखल झालो. दयानंद बांदोडकर मार्गावर युथ हॉस्टेलच्या जवळ असलेल्या एका बंगल्यात हे प्री-नोव्हिशिएट होते. तेथे राहून मी मिरामार समुद्रासमोरच्या धेम्पे कॉलेजात बारावीसाठी प्रवेश घेतला. एक-दीड वर्षातच लोयोला प्री-नोव्हिशिएट मिरामार समुद्रकिनारी स्वतःच्या प्रशस्त जागेत स्थलांतर झाले. अशा प्रकारे बी.ए. होईपर्यंत म्हणजे चार वर्षे माझे समुद्रकिनारी वास्तव्य होते.
जून महिन्यात मी मिरामार बीचपाशी राहायला आलो. त्या पहिल्या पावसाळ्यात समोरच्या समुद्राने धारण केलेल्या रौद्र रूपाने खूप भीती वाटायची. खवळलेल्या समुद्राच्या पाण्याच्या लाटांची उंची खूप असायची आणि भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी तर अगदी रस्त्यापाशी आलेले असायचे. रात्री खवळलेल्या समुद्राच्या लाटांचा घो घो आवाज झोप उडवायचा. नंतर काही दिवसांतच या समुद्राची भीती गेली, समुद्राचे पाणी कोठे किती खोल, कुठे कमी खोल हे कळायला लागले आणि सुरक्षित ठिकाणी पोहण्याची सवय आणि आवड निर्माण झाली.
धेम्पे कॉलेजातच माझे हायर सेकंडरी, पदवीचे आणि पदव्युत्तर शिक्षण झाले. बॉम्बे युनिव्हर्सिटीची गोव्यातील आमची शेवटची बॅच. त्यानंतर गोवा युनिव्हर्सिटी स्थापन झाली. धेम्पे कॉलेजसमोरच आमचे हॉस्टेल होते. पावसाळ्याचे दिवस वगळता वर्षभर दर दिवशी संध्याकाळी साडेचार ते साडेपाच वाजेपर्यंत आम्ही मुले मिरामार बीचवर फुटबॉल खेळायचो. तेथील स्वच्छ आणि सफेद मऊ वाळूत हा खेळ खेळताना पायात बूट घालायची गरज भासली नाही. एका बाजूला माजी मुख्यमंत्री दयानंद बांदोडकरांची समाधी आणि दुसऱ्या बाजूला पाईन वृक्षांचे दाट जंगल यामध्ये असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर फुटबॉल खेळण्याची मजा काही औरच होती. त्या मऊ वाळूत पळणे, फुटबॉल खेळणे किंवा डॉज करणे, प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूला मार्क करणे आणि गोलकिपरने चेंडू अडवणे वगैरे सर्व काही त्या खेळातील नियमांप्रमाणे होई. खेळताना खाली पडले तरी वाळूमुळे अंग खरचटण्याचे, रक्त येण्याचे प्रमाण वा मोठी जखम होण्याचे प्रमाण खूप कमी असायचे. १९७०च्या दशकांत गोव्यात पर्यटकांची संख्या आजच्या इतकी नव्हती. त्यामुळे या समुद्रकिनाऱ्यावर कुठल्याही अडथळ्याविना किंवा इतरांना त्रास ना होता दररोज एका तासाचा खेळ होई. फुटबॉल समुद्रात गेला तर तो आणणारा येताना एक डुबकी घेऊन येई. मॅच चालू असताना पाऊस सुरू झाला तर मजा काही औरच असायची.
रात्री जेवण झाल्यानंतर साडेआठ ते साडेनऊपर्यंत आम्ही मुले बीचवर फिरायला जायचो. तेथील मऊ वाळूमध्ये सँडल्स काढून फिरायचो. तिथल्या बसस्टॅंडच्या मागे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध असलेले सिंगर रेमो फर्नांडीस यांचा बंगला होता. भारतात आणि गोव्यात घरी असले की, रेमो गिटारवर गाणी म्हणायचे, तेव्हा त्या शांत वातावरणात ते गाणे स्पष्ट ऐकू यायचे. रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्याशा क्रुसासमोर मेणबत्त्या लावून काही लोक प्रार्थना करत असायचे.
बी.ए. झाल्यानंतर प्रिनोव्हिशिएट सोडले आणि ‘नवहिंद टाइम्स’मध्ये बातमीदार म्हणून रुजू झालो. त्यानंतर जवळच्याच ताळेगाव येथे राहू लागलो. ताळेगावची बस करंझलेमार्गे मिरामारहून पणजीला जायची. बातमीदारी करताना क्वाड्रोस यांची ओळख झाली. पणजी आणि ओल्ड गोव्यात ते टुरिस्ट गाईड म्हणून काम करत असत. म्हणजे पर्यटकांच्या ग्रुपला ते विविध स्थळांची, शिल्पांची, किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती पुरवत असत. त्यांच्या मदतीने मी ‘नवहिंद टाइम्स’साठी दोन-तीन बातम्या केल्या.
एके दिवशी गोवा सचिवालयातील प्रेसरूममध्ये मी बसलेलो असताना क्वाड्रोस यांनी पणजी जेटीकडे नेले. या जेटीपाशी भर समुद्रातून मासे कपडून आणणारी शेकडो फिशिंग ट्रॉलर्स दररोज येत असतात. हेलकावणाऱ्या लाटांबरोबर सतत हलणाऱ्या या ट्रॉलर्सना जेटीपाशी जखडून ठेवण्यासाठी मजबूत दोरखंडांनी बांधले जाई. या जेटीपाशी फूटपाथपासून काही अंतरावर आत मांडवी नदीच्या पात्रापाशी जेटीच्या भरभक्कम काँक्रिटच्या बांधकामात गाडलेली एक दंडगोलाकार वस्तू क्वाड्रोस यांनी मला दाखवली. बोटी बांधून ठेवण्यासाठी या लोखंडी वस्तूचा वापर केला जातो, हा ऐतिहासिक काळाचा वारसा असलेली एक तोफ आहे, असे त्यांचे म्हणणे होते.
पणजी जेटीशेजारी त्या काळात असलेले गोवा सचिवालय हे काही शतकांपूर्वी आदिलशहाचा राजवाडा होता, हे लक्षात घेतले म्हणजे या कथित तोफेचे ऐतिहासिक मूल्य लक्षात येत होते. संदीप नाईक या आमच्या छायाचित्रकाराने सचिवालयाची पार्श्वभूमी ठेवून त्या लंबोळक्या तोफेचे छायाचित्र घेतले. २२ जून १९८३ रोजी ‘नवहिंद टाइम्स’मध्ये ही बातमी माझ्या बायलाईनसह प्रसिद्ध झाली.
नंतर नेहमीप्रमाणे मी या बातमीविषयी विसरून गेलो. आम्ही पत्रकार आठवड्यांतून अशा अनेक बातम्या देत असतो आणि त्याबाबत प्रशासन किंवा सरकार किती ढिम्म असते, याबद्दल बोलायला नको!
ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर चार-पाच दिवसांनंतर पणजी जेटीपाशी बुलडोझर आणून काही काम सुरू झाले. सचिवालयातील प्रेसरूमकडे मी आलो, तेव्हा हे माझ्या लक्षात आले. दुपारनंतर ती अवजड लोखंडी वस्तू काँक्रीटमधून काढून तेथून हलवण्यात आली.
त्या काळात गोवा, दमण आणि दिव केंद्रशासित प्रदेश होता. दमण आणि दिवसह विधानसभेचे ३० आमदार असलेल्या या प्रदेशाचे मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे होते. केंद्रशासित प्रदेशाच्या नायब राज्यपालांस मुख्यमंत्र्यांपेक्षा अधिक अधिकार असतात, हे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यांमधील दीर्घ संघर्षातून देशातील जनतेने अनुभवले आहे. त्या वेळी के. टी सातारावाला हे गोवा, दमण आणि दिवचे नायब राज्यपाल होते. त्यांनी आणि त्यांच्या पत्नी फ्रेनी यांनी गोव्यातील जनतेची सदिच्छा कमावली होती. तोफेची बातमी छापून आल्यानंतर सातारावाला यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला आदेश देऊन ती तोफ तेथून हलवायला सांगितली.
(गोव्याहून पुण्याला स्थलांतर केल्यावर योगायोगाने याच सातारावाला साहेबांचे जावई आणि दिल्लीतील बीबीसीचे वार्ताहर असलेल्या सॅम मिलर यांचे सहाय्यक म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर पंतप्रधानपदाचे दावेदार असणाऱ्या मुख्यमंत्री शरद पवार यांच्या गाडीतून सॅम मिलरबरोबर बारामती ते लोहगाव विमानतळ असा प्रवास करत आम्ही पवारांची मुलाखत घेतली होती.)
पणजी जेटीपाशी ते खोदकाम झाल्यानंतर एक-दोन दिवसांनी ताळेगावातून पणजीला बसने येताना एक सुखद धक्का बसला. मिरामार वाहतूक वर्तुळाच्या मध्यभागी असलेल्या स्मारकापाशी ती तोफ बसवण्याचे काम सुरू होते. घाईघाईने मी मिरामारच्या बसस्टॅंडला उतरलो. नक्की काय चालले आहे, याची खातरजमा करून पुन्हा दुसरी बस पकडून पणजी मार्केटपाशी असलेल्या ‘नवहिंद टाइम्स’च्या ऑफिसात जाऊन आमचे वृत्तसंपादक एम. एम. मुदलियार यांना ही बातमी सांगितली. ‘अरे वा, छान!’ असे म्हणून त्यांनी हा विषय बंद केला! त्या काळात ‘स्टोरी इम्पॅक्ट’ म्हणत स्वतःचीच पाठ थोपटण्याचा प्रकार रूढ झालेला नव्हता!
या घटनेला अजून तीन वर्षांनी चार दशके पूर्ण होतील. गोव्यातील माझा मुक्काम हलवून मी पुण्यात स्थायिक झालो, त्यालाही आता तीस वर्षे पूर्ण झाली. मात्र अजूनही गोव्यातील बहिणीकडे वर्षांतून किमान दोनदा जाणे होतेच. त्या निमित्ताने पणजी आणि मिरामार येथे प्रवास होतोच. मिरामार समुद्रकिनाऱ्याच्या मऊशार, स्वच्छ वाळूत आणि समुद्राच्या फेसाळत्या पाण्यात कुठलेही पायताण न घालता चालणेही होते. येथे आल्यानंतर कॉलेज आणि युवा जीवनातील अनेक घटना पुन्हा ताज्यातवाने होतात.
मिरामार वाहतूक वर्तुळापाशी समुद्राच्या दिशेने तोंड असलेली ती वजनदार तोफ पत्रकार म्हणून मला एक वेगळेच व्यावसायिक समाधान देते. मित्रांना वा इतर कुणा लोकांना घेऊन मी मिरामारला आलो की, आत्मप्रौढीचा दोष पत्करूनही ती तोफ तेथे असण्यामागे मी कसा होतो, हे सांगण्याचा मोह मला आवरत नाही.
ही आत्मप्रौढी मिरवताना कधीकधी इतक्या सामान्य गोष्टीचे श्रेय लाटल्याबद्दल आतल्या आत खजिलही होत असतो. पुलित्झरसारख्या आंतरराष्ट्रीय वा राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराचे मानकरी सर्वच पत्रकार होऊ शकत नाहीत. आपल्या बातमीमुळे वा पाठपुराव्यामुळे एखादे काम, प्रकल्प पूर्ण झाला आणि या तोफेसारखे त्याचे जतन झाले तर माझ्यासारख्या सामान्य पत्रकारासाठी ते एक पदक वा पुरस्कारच असतो. भले त्यावर आपले नाव कोरलेले नसो!
..................................................................................................................................................................
लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत.
camilparkhe@gmail.com
..................................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment