अजूनकाही
२१ जून हा ‘राष्ट्रीय सेल्फी दिन’ आणि २२ जून ‘जागतिक सेल्फी दिन’ हा म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने एकूणच सेल्फी-संस्कृती, स्मार्टफोनचा वापर आणि समाज-माध्यमे वापरत असताना आवश्यक पर्यावरणीय तारतम्य याचा ऊहापोह करण्याचा हा प्रयत्न.
स्मार्टफोन आणि त्यावर आरूढ होऊन आपल्या सर्वांच्या मनावर राज्य करणारी सहजी, विनामूल्य उपलब्ध समाजमाध्यमे यांचे एकमेकाशी अत्यंत जवळचे नाते आहे. आत्ताची पर्यावरण चळवळही या साधनांचा भरपूर वापर करते आहे. ही माध्यमे विनामूल्य (वरकरणी) सुरक्षित, वापरकर्त्याला मजकूर (कंटेंट) निर्मिती करू देणारी आणि परस्परसंवाद अत्यंत सुलभ बनवणारी असतात.
जानेवारी २०२०पर्यंत स्वतःचा स्मार्टफोन ५.१९ अब्ज लोकांकडे आलेला आहे. पैकी सोशल मीडिया नित्य वापरणारे आहेत ३.८० अब्ज लोक. आपल्या भ्रमणभाषाद्वारेच त्यांचा वापर करणारे आहेत ३.७५ अब्ज! म्हणजे एकूण वापरकर्त्यांच्या संख्येपैकी ९९ टक्के लोक.
हा सगळा झाला सहजी दिसणारा तपशील. पण बहुतांश व्यक्ती ज्या स्मार्टफोनवर सेल्फी काढतात, ही माध्यमे वापरतात, मेल्स पाठवतात, दृक-श्राव्य मजकुराची देवाणघेवाण करतात, तो स्मार्टफोन वीज आणि इंटरनेट नसेल तर गोळ्या नसणार्या पिस्तुलासारखा ठरतो. आणि म्हणूनच अशा फोनच्या इंटरनेट आणि वीज वापराचा पर्यावरणावर होणारा आघात तपासणे उचित.
स्मार्टफोनच्या उत्पादनापासून जरी हा आघात सुरू होत असला तरी आताच्या विवेचनात तो समाविष्ट केलेला नाही. सेल्फी, त्या समाज-माध्यमांवर ‘अपलोड’ करणे, ई-मेल पाठवणे यासाठी इंटरनेट ऊर्जा वापरते. त्यामुळे कर्ब उत्सर्जन होते. त्याचे तपशील आणि त्यातून उपजणारा स्वाभाविक तारतम्याचा विचार हा प्रस्तुत लेखनाचा हेतू आहे.
आपण कोणताही फोटो काढतो, त्यापेक्षा कित्येक पटींनी अधिक ऊर्जा तो ‘पुढे’ पाठवण्यासाठी लागते. कारण तो फोटो अनेक नेटवर्क्समधून आणि डाटा सेंटर्समधून जातो, ती वीज खातात. आणि विजेच्या निर्मितीत कर्ब उत्सर्जन होते. पुन्हा उत्पादित वीज ही आपल्या स्त्रोतानुसार कमी-अधिक उत्सर्जन करणारी असते. कोळसाधारित निर्मितीचे उत्सर्जन जास्त-आणि भारतात हीच शक्यता अधिक. कारण आपल्याकडे जवळपास ६८ टक्के वीजनिर्मिती केंद्रे कोळसाधारित आहेत.
युरोपात एका संशोधनाद्वारा एका सेल्फीचे कर्ब-उत्सर्जनाशी नाते मोजले गेले. त्याला त्यांनी ‘सेल्फी-इंडेक्स’ असे नाव ठेवले. त्यांनी इन्स्टाग्रॅमवरील एक अपलोड केलेली सेल्फी २ एमबी (०.००२ GB) असते, हा पायाभूत घटक म्हणून वापरला. विविध डाटा सेंटर्स आणि नेटवर्क्स द्वारा तिच्यावर प्रक्रिया करण्यासाठी लागणारी ऊर्जा kWh मध्ये किती आहे ते पाहिलं. एका सेल्फीचे रूपांतर kWh (kilowatt per hour)मध्ये करण्यासाठी कोस्टेनरो आणि ड्युएर यांनी २०१२मध्ये काढलेली प्रमाणित, सिद्ध पद्धत वापरली. त्यानुसार एक जीबी डाटा अपलोड करायला ५.१२ kWh इतकी ऊर्जा लागते.
याच्याच बरोबरीने इंटरनॅशनल डाटा एजन्सीचा २०१९ सालातील विविध डाटा वापरून एका सेल्फीमागे होणारे कर्ब उत्सर्जन ५.०६ ग्रॅम इतके निश्चित केले गेले. म्हणजे १० सेल्फींचे उत्सर्जन (सुमारे ५०ग्रॅम कर्ब) या संशोधकांनी EU प्रमाणानुसार धावणार्या चारचाकीच्या एक किलोमीटरमागे होणार्या उत्सर्जनाशी (१२० ग्रॅम कर्ब) आणि एका पूर्ण वाढ झालेल्या वृक्षाच्या प्रति-दिन कर्ब शोषण्याच्या क्षमतेशी (६० ग्रॅम कर्ब प्रतिदिन) ताडून पाहिले.
याचाच अर्थ, एक पूर्ण वाढ झालेला वृक्ष, जेमतेम १० सेल्फींचे उत्सर्जन प्रतिदिन शोषू शकतो. (त्याला शोषायला इतर अनेक उत्सर्जने आपण करतच असतो- ती वेगळी!). मग त्यांनी पुढे शोध घेतला. फेसबुक, इन्स्टाग्रॅम आणि व्हॉटसअॅप अनुक्रमे ८ कोटी, ३५ कोटी आणि आणि ४.५ अब्ज फोटो/चित्रे (फक्त सेल्फीज नव्हे, पण कल्पना येण्यासाठी एकक म्हणून सेल्फीचे उपरोल्लेखित आकडे पाहावेत. म्हणजे किती वीज आपण कशात घालवतो त्याचा अंदाज येईल) प्रतिदिनी अपलोड करतात. पण फेसबुक आणि व्हॉटसअॅप आकार १०० केबी इतका कमी करून ती टाकतात. (यासाठीही ऊर्जा लागतेच की! पण निदान त्यांनी तितकी ‘कलात्मकता’ आणली आहे!) पण इन्स्टाग्रॅमवरील प्रत्येक फोटोचा आकार २ एमबी असतो. व्हॉटसअॅपचे सरासरी वार्षिक कर्ब उत्सर्जन ११३९ टन इतके, तर तेच इन्स्टाग्रॅमचे ४०५ टन आणि फेसबुकचे ८८ टन (फेसबुक-व्हॉटसअॅपचे ६७ टक्के ऊर्जास्त्रोत पुनर्निर्माणक्षम असल्यानेच हे शक्य झाले आहे.) इतके आहे. सतत किरकोळ कारणावरून फोटो पाठवणे/प्रसारित करणे, सेल्फीची चैन आपल्याला परवडणारी आहे का? याचे उत्तर आपसूक मिळणारे हे संशोधन. त्यापासून योग्य तो धडा सर्वांनी घेणे आवश्यक.
फेसबुक इतके शहाण्यासारखे वागायलाही कारणीभूत ठरले, ते ग्रीनपीसने त्यांच्यविरुध्द्ध छेडलेले एक अभिनव आंदोलनच. फेसबुकचे अवाढव्य डाटा सर्व्हर्स कोळसा-आधारित विजेवर चालत होते. २०११ सालच्या वसुंधरा दिनाचा मुहूर्त साधत ग्रीनपीसने फेसबुकवर फेसबुकच्याच विरुद्ध ‘अन-फ्रेंड कोल’ नावाची मोहीम सुरू केली. हे ‘आंदोलन’ २० महिने चालले. फेसबुकने आपले ऊर्जास्त्रोत पुनर्निर्माणक्षम करावेत ही त्यातील प्रमुख मागणी होती. त्या पानाला ७०००,००० ‘लाईक्स’ मिळाल्याचे पाहून अखेर फेसबुकने त्यांचे ऊर्जास्त्रोत पुनर्निर्माणक्षम करण्याला मान्यता दिली.
एक नजर ई-मेल्सच्या ऊर्जावापराकडे टाकू. एक मेगाबाईट (1Mb) इतकी छोटी ई-मेल पाठवायला २५ वॉट प्रतितास ऊर्जा खर्च होते. म्हणजे २० ग्रॅम कर्ब उत्सर्जन आपण ती पाठवून करतो. (CNRS research Centre, France 2019). आणि २०१९ सालातील कोणत्याही एका दिवशी, किमान २९३ अब्ज ई-मेल्स पाठवल्या जात होत्या, असं संशोधन सांगतं. (Radiacati research group). या सर्व ई-मेल्स पाठवण्यासाठी लागणारी ऊर्जा मुख्यत्वेकरून जीवाश्म-आधारित इंधनांकडूनच मिळाली होती.
त्याचप्रमाणे मूळ ज्या साधनांनिशी आपण सामाजिक माध्यमे वापरतो, त्या साधनांना जोडणारी साधने म्हणजे डाटासेंटर्स, सर्व्हर्स, इंटरनेट राऊटर्स, बेस स्टेशन्स यांचा ऊर्जा-वापर लक्षात घ्यावा लागतो. विशेषतः डाटा सेंटर्स अत्यंत गरम होत असल्याने त्यांना थंडाव्यासाठी ऊर्जा लागते. सर्व्हर्स ते व्यक्तीगत वापरकर्ता या प्रवासात खर्च होणार्या एकूण ऊर्जेपैकी ६० टक्के व्हिडिओ स्ट्रीमिंगमध्ये खर्ची पडताना दिसते. आणि निव्वळ नेट् फ्लिक्स या ६० टक्क्यांमधील १५ टक्के ऊर्जा खाताना दिसते. २०१७ मध्ये एक पॉप शो २.७ दशलक्षांहून अधिक वेळा नेटवर पाहिला गेला, त्यासाठी वर्षभरात एका छोट्या अणू-ऊर्जा केंद्रातून उत्पादित होणारी पूर्ण वीज लागली होती. ग्रीनपीसनेच ही आकडेवारी जगाला सिद्ध करून दाखवली. २०१६ साली ऑनलाइन म्युझिक फाईल्सची फक्त अमेरिकेतील साठवणूक आणि शेयरिंग यांच्या उत्सर्जनाचे आकडे होते २० कोटी ते ३५ कोटी किलोग्रॅम!
हयाचाच अर्थ, ‘प्लेन टेक्स्ट’ संदेश कमी ऊर्जा खातात, कमी उत्सर्जन करतात. तर दृश्य-फिती (व्हिडिओज) अधिक उत्सर्जन करणारे आणि ऊर्जा-भक्ष्यक असतात. भले ते पर्यावरणविषयक का असेनात. समाज-माध्यमांपुरता विचार केला तर ग्रीनपीसने २०१७ साली ‘Who is clicking green?’ (http://www.clickclean.org/international/en/) नावाचं एक अप्रतिम सर्वेक्षण जगासमोर पेश केलं. त्यात अनेक समाज-माध्यमे, मेसेजिंग सर्व्हिसेस, म्युझिक कंपन्या यांची उत्सर्जने, ऊर्जा वापराच्या पद्धती हे सर्व सविस्तर दिलं आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅप, आय-ट्यून्स, गूगल, अॅपल या मोठ्या कंपन्या चांगल्याच जागरूक झालेल्या दिसतात.
डिजिटल दुनियेच्या पर्यावरणीय किमतीची ही सैर अंतर्मुख करणारी आहे. निदान तिच्यामुळे आपल्याला स्मार्टफोनचा अनावश्यक, उठसूट आणि बेजबाबदार वापर आणि तारतम्य यातला फरक कळला तरी ‘सेल्फी दिन’ कामी लागला असे म्हणता येईल. आम नागरिकांना बर्याच वेळी ‘मी/आम्ही निसर्ग-पर्यावरणासाठी काय करू शकतो?’ हा प्रश्न पडलेला असतो. स्मार्टफोन आणि समाज-माध्यमांचा तारतम्याने वापर करणे, हे सदर प्रश्नाचे सहजी कृतीत आणता येईल असे उत्तर आहे.
..................................................................................................................................................................
संतोष शिंत्रे
santosh@greycells-india.com
..................................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment