अजूनकाही
म्हटलं तर वास्तव, म्हटलं तर अवास्तव. म्हटलं तर शक्य, म्हटलं तर अशक्य. म्हटलं तर खरं, म्हटलं तर खोटं. म्हटलं तर कल्पना, म्हटलं तर सत्य. आजच्या कल्पना उद्याचं वास्तव असू शकतात किंवा उद्याचं वास्तव आजच्या कल्पना. अशा अनेक शक्य-अशक्य घटनांचा वेध घेणारं हे नवं-कोरं साप्ताहिक सदर...
..................................................................................................................................................................
अयोध्या.
औरसचौरस मैदान.
मैदानाच्या कडेकडेला दगडी खांब, तुळया, शिल्पं रचून ठेवलेली.
यंत्रं जमीन खोदत होती. यंत्रं जमीन सारखी करत होती. जिथं काम चालत होतं, तिथं धूळ उडत होती.
मैदानभर पिवळी हेल्मेटं फिरताना दिसत होती.
दुरून सायरनचा आवाज येतो. सुरुवातीला क्षीण. सायरन वाजवणारी गाडी जसजशी जवळ येऊ लागते, तसतसा आवाज कर्कश होत जातो.
निळे, लाल दिवे आलटूनपालटून प्रकाशमान होत असणाऱ्या पोलिसांच्या गाड्या येतात.
पाच-पन्नास माणसं कोण आलंय ते पाहण्यासाठी गर्दी करतात. पोलिसांची गाडी त्या गर्दी घुसते. पोलीस लाठ्या फिरवत गर्दी पांगवतात. “धुत साले, तमाशा पहायला आलात काय? चला चालते व्हा.”
पोलिसांच्या साताठ गाड्या संपल्यानंतर पाठून एक भगव्या रंगाची मर्सिडीझ येते. मर्सिडीझवरही लाल दिवा. आता लोकांना कळतं की, कोणत्या गाडीकडून अपेक्षा करायची.
मर्सिडीझ थांबल्यावर पाठीमागच्या वीस-पंचवीस गाड्या कच्चकन ब्रेक मारून थांबतात.
मर्सिडीझच्या मागल्या पुढल्या गाड्यांतून दहा-बारा मंडळी लगबगीनं उतरतात, सगळीच माणसं मर्सिडीजचा दरवाजा उघडण्यासाठी झुंबड करतात. शेवटी एक माणूस दरवाजा उघडण्यात यशस्वी होतो.
ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर महंत नृत्यगोपाल दास बसलेले असतात. लांब दाढी, गळ्यात माळा. कपाळावर मोठ्ठं गंध. उघड्या अंगावर अव्यवस्थितपणे पसरलेलं जानवं.
मागल्या गाडीतून एक व्हीलचेअर बाहेर काढली जाते, नृत्यगोपाल दास यांच्यासाठी दरवाजासमोर उभी केली जाते.
नृत्यगोपाल दास मोठ्या कष्टानं गाडीतून व्हीलचेअरमध्ये बसतात. ही हालचाल करताना जानवं घसरतं. ते वर सरकवायला आसपासचे लोक पुढं सरसावतात. महंत त्याना हातानं खूण करून दूर रहायला सांगतात, जानवं खांद्यावर ठीक करतात.
महंत, आगेमागे वीस-पंचवीस माणसं, जागेची पाहणी करायला निघतात.
थांबत थांबत पाहणी चालते. हेल्मेट घातलेले लोक येतात, महंतांना काम कुठवर आलाय याची कल्पना देतात. महंत पुढं सरकतात.
पँट, हाफ शर्ट, डोक्यावर क्रिकेटर वापरतात, तशी टोपी अशा जर्मन माणसाला महंतांच्या समोर उभं केलं जातं. नमस्कार झडतात.
एक माणूस वाकून महंतजींची त्या जर्मन माणसाशी ओळख करून देतात. “हे आहेत मिस्टर श्मिट. बीटाकेम जर्मन कंपनीचे डायरेक्टर.”
नमस्कार करून उन्हाची तिरीप टाळत महंत विचारतात, “यांचं इथं काय काम आहे? नरेंद्र मोदी काय म्हणाले लक्षात आहे ना. आत्मनिर्भरता. या माणसाला इथं कशाला आणलंय?”
वाकलेला माणूस महंतांच्या कानात कुजबुजतो, “महंतजी, त्याचं असं आहे की, शहांनी त्यांचं नाव सुचवलंय?”
महंत विचारतात, “कोण शहा?”
वाकलेला माणूस बुचकळ्यात पडतो. “महंतजी, शहा म्हणजे अमितजी. महंतजी, या गोऱ्यासाहेबाची आणि शहांच्या भाच्याची पार्टनरशिप आहे.”
“बरं, ठीकाय.” महंतजी हसतात. श्मिटला नमस्कार करतात.
“महंतजी, गेले किती तरी महिने दगड पडूनच होते. त्यांच्यावर एक रासायनिक थर घट्ट झाला होता. श्मिट साहेबांनी एक खास इंपोर्टेड केमिकल वापरून ते शेवाळ काढून दगड पूर्ववत केलेत.” वाकलेला माणूस
“बरं मग?” महंत.
“खूपच खांब आणि शिल्पं ठीक करावी लागणार आहेत. टेंडरं काढलीत. श्मिटसाहेबांचं टेंडर पक्कं झालं की, ते कामाला सुरुवात करतील.” वाकलेला माणूस.
“मग लवकर टेंडर काढा, लवकरच उभारणीला सुरुवात करायचीय. पण एक करा. काम आटोपल्यावर शिल्पं गोमुत्रानं स्वच्छ धुवून काढा. परदेशी केमिकल आणि परदेशी हात असे दोन्ही स्पर्श नाहिसे झाले पाहिजेत. कळलं?” महंत.
“होय महंतजी” वाकलेला माणूस सरळ झाला आणि दूर सरकला.
फेरफटका पूर्ण करून महंत गाडीकडं परतले.
टायसुटातला माणूस पुढं झाला. आयएएस अधिकारी असावा असं त्याच्या हालचालीवरून वाटत होतं.
“सर कामाचं इनॉग्युरेशन करायचंय.” अधिकारी.
“ठिकाय” महंत.
“पीएमसर अॅवेलबल नाहीयेत. गुजरात आणि बिहारच्या निवडणुकीत गुंतलेत. पक्की तारीख देत नाहीयेत.” अधिकारी.
महंतांच्या कपाळावर एक मोठ्ठी आठी पडली. डोळे बारीक करून त्यानी अधिकाऱ्याकडं पाहिलं.
“सर तुम्ही फोन केलात तर कदाचित पीएमसर तारीख देतील.” अधिकारी.
“ठिकाय.” महंत.
महंतांनी उजवीकडं वळून भगव्या कफनीतल्या सेक्रेटरीकडं पाहिलं. सेक्रेटरीनं फाईल उघडली, कागदं पुढं मागं केली.
“महंतजी, २५ जून. शुभ दिवस आहे, आणीबाणीचा वाढदिवस आहे.” सेक्रेटरी.
अधिकाऱ्यानं लगोलग दिल्लीला फोन लावला. दिल्लीचं काय म्हणणं येतंय, त्याची वाट पाहू लागले.
“सर पीएमसरांचा सेक्रेटरी म्हणतो की, ती तारीख जमणार नाही. कारण लॉकडाऊन उठेल आणि पीएमसर परदेश दौऱ्यावर जातील. जवळपास दीडेक महिन्याचा दौरा असेल. फक्त काही तासांपुरते भारतात आणि पुन्हा परदेशात असं दौऱ्याचं स्वरूप असेल. त्यामुळं अयोध्येत येणं शक्य होणार नाही.” अधिकारी.
“हं… मग दुसरं कोणी तरी शोधा. हं... रामलल्लाचं सासर नेपाळात आहे. असं करा, नेपाळच्या पंतप्रधानाला बोलवा. तो हिंदू आहे.” महंत.
बाजूला उभे असलेली माणसं गोंधळात पडली. नरेंद्र मोदींशिवाय उदघाटन होऊच कसं शकतं असं त्यांच्या मनात होतं.
माणसं आपसात कुजबुजली.
“काय खुसुरखुसुर चाललंय. मी काय बोललो कळलं नाही कां.” महंत.
एक जण वाकला. म्हणाला, “महंतजी, सध्या भारत आणि नेपाळचे संबंध दुरावले आहेत. भारताचा काही भाग नेपाळनं त्यांचा म्हणून दाखवलाय. मोदीजी खवळले आहेत.”
“भारताचा भाग नेपाळनं स्वतःचा दाखवलाय यात खवळण्यासारखं काय आहे? शेवटी ते हिंदू राष्ट्रच आहे. दाखवू देत की त्यांच्या नकाशात. नेपाळ नरेश नको असतील तर दुसऱ्या कोणाला तरी शोधा, पण त्याच तारखेला उदघाटन झालं पाहिजे.” महंत.
अधिकाऱ्याची झाली पंचाईत. इकडे महंत तिकडे पीएम. मधल्या मध्ये त्याचे प्राण जाणार.
“देखो आयएसबाबू. तुला हिंदू धर्म माहीत नाही, धर्मातल्या परंपरा माहीत नाहीत.” महंत बोलू लागले, “११ जुलैच्या आता उदघाटन करायलाच हवं.”
सेक्रेटरी गोंधळला.
“अरे १२ जुलै म्हणजे देवशयनी एकादशी. आषाढ शुक्ल एकादशी. त्या दिवशी भगवान विष्णू शेषावर पहुडतात आणि झोपी जातात. नंतर चार महिने ते झोपतात आणि देवउठावनी एकादशीला म्हणजे ८ नोव्हेंबरला जागे होतात. भगवान विष्णू झोपलेले असल्यानं त्या काळात कोणतंही शुभ कार्य करायचं नसतं. कारण त्यात समजा विघ्न बिघ्न आलं तर ते निस्तरायला भगवान जागे नसतात. राम लल्लाचं मंदिर उभं करण्याचं शुभ कार्य म्हणूनच १२ जुलैच्या आत व्हायला हवं.”
“पण सर…” अधिकारी.
“पण नाही नि बिण नाही. आम्ही धर्म पाळतो. पोलिटिकल लोकांना धर्माशी देणंघेणं नसतं, त्यांना फक्त मतं हवी असतात. आमचं तसं नाही. आम्ही ११ जुलैच्या आसपास उदघाटन करून मोकळे होणार. आमच्या आखाड्याचा तसा निर्णय आहे.” महंतजी जरासे जरबेनंच बोलले.
त्यांना खोकला आला. शेजारी उभा असलेल्या एका सेवकानं फ्लास्कमधलं पाणी त्यांना दिलं. घोटभर पाणी प्यायल्यावर महंतजी स्थिरावले.
“चला रे” असं म्हणत महंतजीनी आपली व्हीलचेअर हलवायला सांगितलं.
..................................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment