ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचं १६ जून २०२० रोजी मुंबईत वयाच्या ९५व्या वर्षी निधन झालं. दै. लोकमान्य, दै. लोकपत्र, संयुक्त महाराष्ट्र पत्रिका ते महाराष्ट्र टाइम्स अशी त्यांची कारकीर्द. बातमीदार म्हणून त्यांनी अनेक महत्त्वाच्या बातम्या दिल्या. अनेक विषयांवर लेख लिहिले. मात्र त्यांचे ‘आठवणी महाराष्ट्र जन्माच्या’ हे एकमेव पुस्तक प्रकाशित झालेले आहे. संयुक्त महाराष्ट्राविषयीचे रणदिवे यांच्या काही आठवणी या पुस्तकात आहेत. याशिवायचे त्यांचे कितीतरी लेख वर्तमानपत्रे, दिवाळी अंक यांच्या ढिगाऱ्यात पडलेले आहेत. ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळीची सुरुवात : मंतरलेले दिवस’ हा त्यांचा असाच एक लेख. हा लेख ‘पत्रकार प्रकाशना’च्या ‘पत्रकार’ या १९८४ सालच्या दिवाळी अंकात प्रकाशित झाला आहे.
‘मुंबईसह महाराष्ट्रा’च्या मागणीसाठी ‘संयुक्त महाराष्ट्र समिती’ची स्थापना झाली फेब्रुवारी १९५६मध्ये. पण त्याआधी तब्बल चार महिने, म्हणजे ऑक्टोबर १९५५ ते जानेवारी १९५६ या काळात ‘दादर युवक सभे’ने जोरदार प्रचार मोहीम सुरू केली होती. आंदोलनासाठी एक साप्ताहिकही चालवून दाखवले. त्यापायी कर्जाचा बोजाही उचलला. पण त्या काळात राजकारण्यांनी युवक सभेच्या कार्यकर्त्यांच्या सौजन्याचा कसा गैरफायदा घेतला, याची या सभेच्या एका प्रमुख कार्यकर्त्यानेच सांगितलेली ही कहाणी…
कालच्या १ मे २०२० रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीला ६० वर्षं पूर्ण झाली आहेत. त्या पार्श्वभूमीवरही हा लेख महत्त्वाचा आहे...
..................................................................................................................................................................
गेलो होतो गोवा आंदोलनासाठी, सत्याग्रहासाठी, परंतु परत येताना मनात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी आंदोलन करण्याची उर्मी, प्रेरणा घेऊन आलो…
१५ ऑगस्ट १९५५ रोजी तेथे झालेल्या सामूहिक सत्याग्रहाच्या वेळी पोर्तुगीज सैनिकांनी केलेल्या अत्याचारामुळे साऱ्या देशात खळबळ माजली. मुंबईत १६ ऑगस्ट रोजी अत्यंत उग्र स्वरूपाची निदर्शने झाली. सचिवालयावर तर भला मोठा मोर्चा गेला. जमावाने आपला राग व्यक्त करताना जबरदस्त दगडफेक, मोडतोड वगैरे केली.
लोक झाले होते क्रुद्ध पोर्तुगिजांच्या अत्याचारामुळे, सरकारच्या नाकर्तेपणामुळे. त्यामुळे त्यांच्या असंतोषाचा जोरदार स्फोट झाला होता, परंतु पंतप्रधान नेहरू या उद्रेकामुळे बरेच खवळले. त्यांचा राग लोकांना माहीत होता आणि या रागावरही लोकांचे प्रेम होते, परंतु यावेळी मात्र राग व्यक्त करताना त्यांनी एक आरोपही केला होता. ते म्हणाले होते- ‘ही निदर्शने म्हणजे राज्य पुनर्रचना मंडळाचा अहवाल जाहीर होताच होणाऱ्या प्रचारांची रंगीत तालीमच होय.’ गोवा सत्याग्रहाच्या वेळी तशी कोणतीही भावना मुंबईतल्या अथवा महाराष्ट्राच्या इतर भागातील सत्याग्रहींच्या मनातही नसताना नेहरूंनी हे विधान का करावे, मनात ती शंका बोचू-टोचू लागली.
सावंतवाडीत थांबलेले सत्याग्रही सायंकाळी तेथील एका खानावळीत रेडिओवरील बातम्या ऐकण्यासाठी जमत असत. १५ ऑगस्ट रोजी झालेल्या अत्याचारानंतर गोव्याबाबत केंद्र सरकार एखादा कडक निर्णय घेईल अशी लोकांची अपेक्षा होती. म्हणूनच या बातम्या ऐकण्याची उत्सूकता. परंतु नेहरूंचे ते बोल ऐकून फारच निराशा झाली, महाराष्ट्रातील सत्याग्रहींना तर वेदना झाल्या.
सत्याग्रह झालाच
१५ ऑगस्ट रोजी पोर्तुगीज सोजिरांनी अत्यंत निर्दयपणे गोळीबार केल्याने त्या दिवशी लगेच सत्याग्रह स्थगित झाला, परंतु मुंबईचे सत्याग्रही बेळगाव येथून सावंतवाडीस पायी येऊन १७ ऑगस्ट रोजी पोहोचले. या सत्याग्रहींना सत्याग्रह करण्यासाठी खास परवानगी मिळाली. पोर्तुगीज पोलिसांनी चकवण्यासाठी चोरवाटेने सायंकाळी अंधार पडत असताना आम्ही गोव्याच्या हद्दीत शिरलो. तरीही पोलिसांनी सत्याग्रहींना गाठलेच. मात्र ते बरेच मवाळ झालेले दिसले. सत्याग्रह झाला, आता परत जा, असे आवाहन प्रथम त्यांनी केले, परंतु या आवाहनाचा परिणाम झाला असता तर ते सत्याग्रही कसले! प्रा. दंडवते, श्री. विनायक भावे प्रभृती नेत्यांनी वाटचाल सुरू करताच त्यांच्यावर लाठीहल्ला झाला. इतरांनाही पिटाळले. काटेकुटे असलेल्या झुडपात… खोलगट भागात सत्याग्रहींना हकलून दिले. रात्रीची वेळ. सर्वत्र गडद अंधार. जोरदार सरी कोसळत होत्या. नेत्यांच्या सूचनेनुसार मागे फिरलो. बांद्याजवळच्या सरहद्दीवर पेट्रोमॅक्सचे दिवे घेऊन काही मंडळी उभी होती. त्या दिव्याच्या दिशेने अंधारात चाचपडत सर्वांची वाटचाल सुरू झाली. चढ-उतार करताना माझी चप्पल अंधारात कुठे तरी सरकून पडल्याने पायाला बरेच काटे लागले होते.
दुसऱ्या दिवशी मुंबईकडे परत निघालो, त्या वेळी काट्या-दगडामुळे पायास काहीशी वेदना होत होती… तर नेहरूंच्या त्या विधानामुळे मनास काटे बोचत होते…
सत्याग्रहात ‘दादर युवक सभे’च्या कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता, त्याचप्रमाणे पोर्तुगिजांच्या अत्याचारविरोधी मुंबईत झालेल्या निदर्शनांतही या कार्यकर्त्यांचा मोठाच भाग होता. गांधीजयंतीच्या निदर्शनांतही या कार्यकर्त्यांचा भाग होता. गांधी जयंतीच्या दिवशी – २ ऑक्टोबर रोजी आमच्या संघटनेची वार्षिक सभा झाली. त्या वेळी ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रा’च्या स्थापनेसाठी युवकांना बरेच कार्य करावे लागेल, अशा आशयाचा ठराव करण्यात आला. राज्य पुनर्रचना मंडळाचा अहवाल लवकरच प्रसिद्ध होणार अशा बातम्या त्या वेळी प्रसिद्ध होऊ लागल्या होत्या. काही पत्रांनी या मंडळाच्या शिफारशींचा अंदाजही दिला होता. भाषिक द्वेष निर्माण होऊ न देता आंदोलन चालवता यावे यासाठी सर्व भाषिक युवक परिषद भरवण्याचे त्या सभेत ठरवण्यात आले. १६ ऑक्टोबर रोजी भंडारी सभागृहात ही परिषद भरवण्याचे त्याच वेळी निश्चित केले.
परिषदेच्या तयारीसाठी पुढल्या रविवारी (९ ऑक्टोबर) मुंबईतील युवक संघटनांच्या कार्यकर्त्यांची बैठक योजली. या बैठकीस मोठ्या संख्येने कार्यकर्ते आल्याने फारच आश्चर्य वाटले. परिषदेस जेवढे प्रतिनिधी येतील असा अंदाज होता, तेवढे कार्यकर्ते या एका छोट्या म्हणून योजलेल्या बैठकीसच हजर झाले. परिषदेस सुमारे दोन-तीन हजार प्रतिनिधी उपस्थित राहतील असा अंदाज निश्चित करून तयारी करण्याचे ठरवण्यात आले. छोट्या सभागृहाऐवजी शिवाजी पार्कवर परिषद भरवण्याचे निश्चित केले. सकाळी परिषद व सायंकाळी सभा असा कार्यक्रम ठरला. ना कोणत्या पक्षाचा पाठिंबा, ना कुणा नेत्याचा आधार… मग एवढा मोठा खर्च करावयाचा कसा? परंतु कार्यकर्त्यांची जिद्द मोठीच होती.
परिषदेस उत्स्फूर्त पाठिंबा
१० ऑक्टोबरच्या वृत्तपत्रात या परिषदेचा कार्यक्रम जाहीर झाला. त्याच अंकात राज्य पुनर्रचना मंडळाच्या शिफारशींचेही वृत्त होते. विदर्भ वगळून महाराष्ट्र-गुजरात असे द्वैभाषिक राज्य करण्याची शिफारस पाहून तीव्र नापसंतीची भावना व्यक्त केली जाऊ लागली. त्याचा परिणाम असा झाला की, उत्स्फूर्तपणे या परिषदेस पाठिंबा मिळू लागला.
एका बाजूला हा वाढता पाठिंबा मिळत असताना काही नाउमेद करणाऱ्या घटनाही घडत होत्या. परिषदेचा निर्णय प्रथम घेतला त्या वेळी उदघाटक व अध्यक्ष म्हणून श्री. भाऊसाहेब हिरे व श्री. नानासाहेब कुंटे यांची नावे निश्चित केली होती. स्वागत समितीचे अध्यक्ष श्री. प्रभाकर कुंटे यांनी त्या दोघांच्याबरोबर अनौपचारिकरीत्या बोलणे केले होते. परिषदेचा तपशील सांगण्यासाठी दोन दिवसांनी स्वागत समितीचे सरचिटणीस या नात्याने मी श्री. प्रभाकर कुंटे यांच्यासह त्या वेळी महसूलमंत्री या पदावर असलेल्या श्री. हिरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी गेलो.
परिषदेची सारी माहिती त्यांनी शांतपणे ऐकून घेतली आणि शेवटी एकच प्रश्न विचारला – परिषद शांतपणे पार पाडता येईल का? पाटील यांची मंडळी (स. का. पाटील) ती उधळून तर टाकणार नाहीत ना? श्री. हिरे यांची ही शंका ऐकून मला आश्चर्य वाटले. कारण या परिषदेचे वृत्त जाहीर होताच तिला जोरदार पाठिंबा मिळू लागला होता. ती मर्यादेत कशी ठेवता येईल हाच आमच्यापुढे प्रश्न होता. तर भावी मराठी भाषिक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ज्या श्री. हिरे यांच्याकडे पाहिले जात होते, तेच निराशेची भावना व्यक्त करत होते. परिषद अगदी सुरळीतपणे पार पडेल, असे आश्वासन देऊन आम्ही परत निघालो.
अखेर दगा दिलाच
परंतु अखेरच्या क्षणी हिरे व नानासाहेब कुंटे या परिषदेस येऊ शकले नाहीत. काँग्रेस श्रेष्ठींच्या निमंत्रणावरून ते दिल्लीस रवाना झाले होते. त्यामुळे अगदी अखेरच्या क्षणी अॅड. नौशेर भरुचा व श्री. मुस्तफा फकी यांना अध्यक्ष व उदघाटक म्हणून निमंत्रित करावे लागले.
‘मुंबईसह महाराष्ट्र’ या प्रश्नावर अगदी सर्वसामान्य जनतेच्या भावना किती तीव्र होत्या, याची कल्पनाच ज्येष्ठ मंडळींना नव्हती, असे या परिषदेची तयारी करताना जाणवत होते. मी प्रजासमाजवादी पक्षाचा कार्यकर्ता होतो. या पक्षाचाही मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीस पाठिंबा होता. त्यामुळे काही गोष्टी गृहित धरून आम्ही युवक सभेतील श्री. कुंटे, श्री. अशोक पडबिद्री, श्री. दत्ता आयरे, श्री. उपेंद्र वैद्य प्रभृती समाजवादी या परिषदेच्या तयारीस लागलो होतो. शिवाजी पार्कवर भला मोठा मंडप उभारला जात होता. असे असताना पक्षाकडून सूचना आली की, परिषद काही दिवस पुढे ढकलावी. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा राज्य पुनर्रचना मंडळाच्या शिफारशीबाबतचा निर्णय झाल्यावर परिषद योजावी अशी ती सूचना होती. परंतु त्या मेळाव्यास पाठिंबा व एकूण झालेली तयारी लक्षात घेता परिषद पुढे ढकलणे अशक्य होते. अर्धा उभारलेला मंडप तोडून परिषद पुढे कशी काय ढकलता आली असती?
दोन-तीन हजार प्रतिनिधी उपस्थित राहतील असा प्रारंभीचा अंदाज होता. परंतु प्रत्यक्षात तेरा हजारांहून अधिक प्रतिनिधी या सर्वभाषिक युवक परिषदेस उपस्थित होते. भाषिक विद्वेष निर्माण न करता ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रा’ची स्थापना करता येईल, अशा आशयाची भाषणे थेट गुजरातीपासून तो बंगालीपर्यंत अशा निरनिराळ्या प्रतिनिधींनी केली. भाषावार राज्य रचनेसाठी सर्व भाषिक गटांचे एकोप्याने आंदोलन असे या परिषदेचे स्वरूप होते.
युवकांचा पुढाकार
राज्य पुनर्रचना मंडळाचा अहवाल जाहीर झाल्यावर त्या मंडळाने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची मागणी फेटाळून लावल्यावर त्या मागणीचा पुनरुच्चार करणारी ही पहिलीच परिषद होती. त्या मागणीबाबत लोकमत काय होते, ते या परिषदेने साऱ्या समाजास आणि राज्यकर्त्यांना स्पष्टपणे दर्शवले होते. एका ज्वलंत प्रश्नावर अत्यंत विधायक भूमिका घेऊन प्रथम परिषद भरवली ती युवकांनी, हेही या परिषदेचे वैशिष्ट्य. इतकेच नव्हे तर मराठी भाषिक राज्यासाठी आंदोलन करण्याचा संघटितपणे प्रथम इशारा दिला गेला तो या परिषदेतच.
मोठ्या प्रमाणावर भरवलेल्या या परिषदेचा खर्च कसा भागवावयाचा असा युवक सभेपुढे प्रश्न होता. मंडप कॉन्ट्रॅक्टर श्री. शिवतरकर यांना परिषद सुरू होण्याच्या आदल्या दिवशीच सर्व पैसे चुकते करण्याचा शब्द दिला होता. परंतु हाती आलेले पैसे फारच कमी होते. त्यांची भेट शक्य तो टाळावी लागली. त्यामुळे विषय नियामक समितीची बैठक आदल्या दिवशी त्या मंडपात असतानाही आणि त्या समितीचा चिटणीस मी असतानाही तेथे मी फिरकलो नाही. परिषद तर सुरू झाली. मोठा जमाव असल्याने साहजिकच सर्व संयोजकांना आनंद झाला, परंतु एकूण खर्च भरून कसा काढावा ही चिंता होती. शाहीर अमरशेख यांनी एकूण परिस्थिती ओळखली. ते डफ घेऊन प्रतिनिधींमध्ये गेले आणि बरेच पैसे आणून आमच्यापुढे टाकले. त्यामुळे परिषदेचा खर्च तर निघालाच, परंतु त्यानंतरही जाहीर सभांचा धडाका युवक सभा चालू ठेवू शकली. आंदोलन सुरू होण्यापूर्वीचे वातावरण या सभांनी निदान काही अंशी तरी निर्माण केले. त्या वेळी सर्वांत अधिक मदत झाली असेल तर ती आचार्य अत्रे यांची. अनेकदा त्यांची संमती घेण्यापूर्वीच त्यांची भाषणे आम्ही जाहीर करून टाकत होतो आणि त्यांनीही कधी आम्हाला निराश केले नाही.
ही प्रचारमोहीम चालू असताना एक बाब तीव्रतेने जाणवत होती. प्रारंभी दैनिक ‘लोकमान्य’ भरपूर प्रसिद्धी देत असे, परंतु काही आठवड्यांनी त्या दैनिकाचे संपादक श्री. पां. वा. गाडगीळ यांनाच बाहेर पडावे लागले. (चार महिन्यांनी ते तेथे परत रुजू झाले.) इंग्रजी वृत्तपत्रांनी विपर्यस्त बातम्या छापण्याचा धडाका सुरू केला होता. दैनिक ‘लोकसत्ता’ मराठी, परंतु मराठी भाषिकांच्या आंदोलनाबात आपला काही संबंध नाही असा बाणेदारपणा ते पत्र त्या वेळी दाखवत होते! या आंदोलनाचा पुरस्कार करणारे एखादे साप्ताहिक असावे, असे त्या वेळी आम्हा युवक सभेतील कार्यकर्त्यांना तीव्रतेने जाणवत होते.
गोव्याच्या सत्याग्रहात मी भाग घेतला होता, त्या वेळी मी मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र शाखेतर्फे या शहराच्या आर्थिक-सामाजिक पाहणीचे जे काम चालू होते, तेथे इकॉनामिक इन्व्हेस्टिगेटर म्हणून काम करत होतो. हे काम होते फिरतीचे, परंतु त्या सत्याग्रहाच्या वेळी पायास किरकोळ जखमा झाल्या होत्या. चालताना थोडा त्रास होत असे. काहीसा लंगडत मी कामावर रुजू झालो असता बेशिस्तीबद्दल (म्हणजे रजा न घेताच चक्क सत्याग्रहास निघून गेल्याबद्दल) प्रमुख अधिकारी श्रीमती एच. मोदी यांनी थोडी खरडपट्टीच काढली. तशा त्या थोड्या कडकच होत्या. पायाला जखम झाली असल्याचे पाहून (तशी ती किरकोळ होती, कारण सातआठ दिवसात बरी झाली) यापुढे काम कसे करणार, असा सवाल त्यांनी केला. मला वाटले, आता नोकरी टिकत नाही, आणि नोकरीही कायम स्वरूपाची नव्हती. त्यांचा राग पाहून (मात्र तो दाखवण्यापुरताच निघाला) अधिक बोलणे शक्यच नव्हते. परंतु नंतर त्यांनीच सुचवले की, मी कार्यालयातच काम करावे. या पाहणीच्या प्रकल्पासाठी निरनिराळ्या विषयांवर लेखन करावयाचे होते. त्या विषयांची यादीच त्यांनी माझ्या पुढे टाकून त्यापैकी एखादा विषय हाती घेता येईल का याबद्दल विचारणा केली. त्या यादीतील एका विषयावर माझे लक्ष केंद्रित झाले. चांगली संधी मिळत असल्याचे वाटले. तो विषय होता- ‘मुंबईतील वृत्तपत्रांचा विकास’. डॉ. मोदी यांना मी तो विषय सांगितला. त्यांनी लगेच मान्यता दिली.
या लिखाणाची तयारी करत असताना ‘इंडियन प्रेस’ हे श्रीमती मार्गारेट बार्न्स यांचे पुस्तक वाचावयास घेतले. ‘अमृतबझार पत्रिका’ या आजच्या तुफान खप असलेल्या बंगाली दैनिकाचा प्रारंभ कसा झाला तत्संबंधीचा तो उल्लेख होता. अमृतबझार या खेड्यातील घोष नामक तीन भावांनी साप्ताहिक म्हणून ते पत्र सुरू केले. मुद्रणयंत्र तर अगदीच गावठी होते. गावातल्या सुताराकडून त्यांनी ते फक्त ३२ रुपयास (त्या वेळेचे!) तयार करून घेतले. १८६८ सालची ही घटना.
शीळा प्रेसवर सुरू केलेल्या एका नियतकालिकाचे पुढे चांगल्या छपाईच्या दैनिकात रूपांतर… त्यानंतर त्या दैनिकाचा तुफान खप… साऱ्या देशात त्याने मिळवलेले उच्च स्थान ही हकिकत मनावर फारच परिणाम करून गेली. त्या प्रकरणावरून मी रोज नजर फिरवत असे. असा काही प्रयोग करणे शक्य होईल का, असा विचार मनात घोळत असे. घोष बंधूंनी नव्वद वर्षांपूर्वी ते नियतकालिक सुरू केले, त्या वेळेची आणि आजची परिस्थिती यात जमीन-अस्मानाचा फरक पडला आहे, असा विचारही मनात येत असे. लहान मुलापुढे एखादे मोठे स्वप्न ठेवल्यावर त्याला जशी भुरळ पडते, तशी माझी अवस्था झाली होती.
संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या प्रारंभीच्या काळात विपर्यस्त प्रचार सुरू झाला, त्या वेळी हे स्वप्न पुन्हा डोळ्यापुढे तरळू लागले. एका दिवशी निर्णय घेतला की, एक चार पानी इंग्रजी साप्ताहिक सुरू करावयाचे. श्री. प्रभाकर कुंटे यांना इंग्रजी लेखनाचा सराव होता. दोघांच्या नावे ‘संयुक्त महाराष्ट्र बुलेटिन’ हे साप्ताहिक काढण्याचे ठरले. तसे न्यायालयात डिक्लेरेशनही केले. परंतु श्री. कुंटे फारसा वेळ देऊ शकत नव्हते. त्यामुळे कोणत्याही कामाची सुरुवातच होईना. दोन-तीन आठवडे वाट पाहिल्यावर मराठी साप्ताहिकच काढण्याचे ठरवले. संपादक म्हणून श्री. अशोक पडबिद्री यांना बरोबर घेतले. वृत्तपत्राचा माझा फक्त दीड वर्षाचा अनुभव, तर पडबिद्री यांचा अनुभव शून्य. माझे भांडवल ५० रुपये, तर पडबिद्री यांचे ४० रुपये. परंतु या साधनसामग्रीपेक्षा अधिक महत्त्वाची एक बाब आमच्याकडे होती. ती म्हणजे युवक सभेचे सुमारे २०-२५ तडफदार कार्यकर्ते! सारे जण तरुण, त्यामुळे उत्साह भरपूर. ध्येयवाद त्या काळात थोडासा का होईना शिल्लक होता आणि भोवतालचे वातावरण तर असे भारलेले होते की, सुरू झालेल्या आंदोलनासाठी आपण काही ना काही केले पाहिजे, असे प्रत्येकाला वाटत होते.
१९५५ ते ६० या काळात अनेकांची झोप उडाली होती. काँग्रेस सरकार मराठी भाषिकावर अन्याय करत आहे, या भावनेमुळे सारे जण बेचैन झाले होते. त्या काळात दररोज कोठे ना कोठे सभा होत असत. सायंकाळी परळला, तर रात्री गिरगावात अथवा दादरला सभेस उपस्थित राहून मध्यरात्रीच्या सुमारास ही पेटलेली मंडळी घरी जात असत. अगदी सामान्य वक्त्याचे भाषण ऐकण्यासाठी त्या वेळी हजारो लोक जमत. असे ते भारलेले वातावरण होते!
‘विवेक’मध्ये छपाई
दादर येथील विवेक मुद्रणालयात आमचे हे साप्ताहिक प्रारंभी छापले जात होते. हे छपाईचे काम देण्याबाबत प्रथम श्री. बा. न. जोग यांच्याबरोबर बोलणे केले, त्या वेळी हजार प्रतीचा ९०, तर दोन हजार प्रतीचा ११० रुपये खर्च येईल असे त्यांनी सांगितले. हातात पैसे होते ९० रुपये. पाच-दहा मिनिटे विचार करून दोन हजार अंकांच्या छपाईची ऑर्डर दिली. मात्र बाकीचे वीस रुपये चार-पाच कार्यकर्त्यांकडून मिळवले. शनिवार सायंकाळी आम्ही सातआठ जण पहिला अंक घेण्यासाठी छापखान्यात गेलो. अंकाची छोटी बंडले हाती घेऊन तेथून जवळच असलेल्या कार्यालयाकडे निघालो. अंक कसे विकायचे याची काही योजना नव्हती. परंतु कुणी तरी कल्पना काढली की, नव्या साप्ताहिकाची घोषणा करतच कार्यालयाकडे जावयाचे. आणि काय आश्चर्य! आमच्या त्या घोषणांमुळे अवघ्या अर्ध्या तासात एक आणा किमतीचे सारे अंक विकले गेले. हाती आलेला सर्व खुर्दा त्या छापखान्यात नेऊन टाकला आणि आणखी काही अंक छापून देण्याची विनंती केली. मॅनेजर श्री. वि. वा. नेने यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी जादा अंक देऊ केले. ते अंकही लगेच संपले.
रविवारी सायंकाळी शिवाजी पार्कवर युवक सभेतर्फे सभा योजली होती. त्या वेळी आणखी बरेच अंक विकले जाण्याची शक्यता होती. म्हणून हाती आलेले पैसे छापखान्यात पुन्हा नेऊन भरले. एकूण तेरा हजार अंक छापून घेतले. अंकाची छपाई व त्यांची विक्री यात एक प्रकारे स्पर्धाच लागल्याचे दिसत होते. दुसऱ्या अंकाची ऑर्डर वीस हजारांपलीकडे गेली. त्या वेळी मात्र श्री. जोग यांनी पुढील अंकाचे (तिसरा अंक) काम दुसऱ्या मुद्रणालयाकडे देण्याचे सुचवले. कारण त्या मुद्रणालयास आपले नेहमीचे काम सांभाळून हे काम करून देणे अशक्य होते.
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेबाबतचा प्रश्न दोन-तीन महिन्यात सुटेल अशी अपेक्षा होती. त्यामुळे हे काम फार काळ करावे लागेल असे वाटत नव्हते. त्यामुळे पुढील खर्चाचा फारसा विचार नव्हता. श्री. शंकरराव देव लवकरच उपोषण सुरू करणार आणि आंध्रमधील श्री. श्रीरामुलु यांच्या उपोषणामुळे (त्यांचे निधन झाले - १९५२) निर्माण झाली, तशी परिस्थिती केंद्र सरकार महाराष्ट्रात निर्माण होऊ देणार नाही, असा तर्क होता. श्रीरामुलु यांच्या मृत्युनंतर झालेल्या विध्वंसामुळे चार कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. त्याची पुनरावृत्ती होऊ दिली जाणार नाही असे वाटत होते, परंतु देवांनी अपेक्षाभंग केला. (म्हणजे मृत्युपासून सुटका करून घेतली असे नव्हे) त्यांनी आंदोलनाचा मार्ग टाळण्याचा प्रयत्न केला.
परंतु त्या वेळी जनशक्ती एवढी जागृत झाली होती की, लोकांनी नेते व पक्ष यांच्यावर जोरदार दबाव आणला. त्याचा परिणाम काँग्रेस पक्षावर मात्र काहीही झाला नाही. परिणामत: काँग्रेस सरकारने जबरदस्त अत्याचार सुरू केला. त्या काळात पत्रिकेचा खप पन्नास हजारांपलीकडे गेला. त्याचबरोबर पत्रिकेची जबाबदारीही वाढली. खोटा प्रचार आणि अत्याचार यावर जबरदस्त प्रकाशझोत टाकणे आवश्यक होते. त्याचप्रमाणे आंदोलनात निर्माण होणाऱ्या अपप्रवृत्तीबद्दलही लोकांना सावध करावे लागत होते. लोक बेतालपणे जाळपोळ करत असल्याचे दाखवण्यासाठी नोव्हेंबर (१९५५) महिन्यात जाळलेल्या बेस्टच्या बसचा फोटो जानेवारी महिन्यात (१९५६) राज्य सरकारच्या प्रसिद्धी खात्याने ताजी घटना म्हणून वृत्तपत्रांना पुरवला होता आणि काहींनी तो बनावट फोटो मुद्दाम अथवा भोळेपणाने छापला. पत्रिकेने ही लबाडी अगदी चव्हाट्यावर मांडून राज्य सरकारचा खोटेपणा उघड्यावर आणला.
जानेवारी महिन्यात मोरारजी-चव्हाण सरकारने केलेल्या तुफान गोळीबारामुळे बरीच माणसे ठार झाली आणि सुमारे दोन-अडीचशे जखमी झाली होती. निरनिराळ्या रुग्णालयांत ठेवलेल्या या जखमींची भेट घेऊन त्यांच्यावर अकारण अथवा बेतालपणे पोलिसांनी गोळ्या कशा झाडल्या होत्या, याची माहिती गोळा करून ती जनतेपुढे अगदी तपशीलवारपणे ठेवली. त्या वेळी हे काम भरपूर कर्मचारी असलेल्या दैनिकांनाही करता आले नव्हते.
अनेक पत्रकारांचे सहकार्य
या साप्ताहिकाकडे फार मोठा अनुभव असलेले पत्रकार नव्हते. तरीही अत्याचार-अन्याय उघड करण्याबाबत कोणतीही उणीव पडू दिली नव्हती. स्व. बंडू बर्वे हे तर ‘लोकमान्य’ दैनिकातील आपल्या नोकरीची वेळ सोडता बाकीचा वेळ या साप्ताहिकासाठीच देत होते. आम्हा दोघा संपादकांना पत्रिकेचे आठ अंक प्रसिद्ध झाल्यावर सरकारने स्थानबद्धच करून टाकले असता श्री. बर्वे, अॅड. लक्ष्मण पाटील, श्री. ज. शं. आपटे, गोदावरी कानडे (आता वैद्य) प्रभृतींनी सारी जबाबदारी पार पाडली. श्री. पां. वा. गाडगीळ, श्री. र. ना. लाटे, श्री. दि. वि. गोखले प्रभृतींनीही मधूनमधून टोपणनावाने पत्रिकेसाठी लेखन केले होते. आणि व्यंगचित्रकार बाळ ठाकरे यांनी तर पहिल्या अंकापासून नियमितपणे कोणताही मोबदला न घेता प्रत्येक आठवड्यास व्यंगचित्र काढून दिले.
फेब्रुवारी १९५६ मध्ये हे आंदोलन चालवण्यासाठी ‘संयुक्त महाराष्ट्र समिती’ची स्थापना झाली. परंतु ऑक्टोबर ते जानेवारी या प्रारंभीच्या चार महिन्यात ‘दादर युवक सभे’ने जोरदार प्रचार मोहीम सुरू केली होती. आंदोलनासाठी एक साप्ताहिकही चालवून दाखवले. (पत्रिकेचा खप पन्नास हजारापर्यंत वाढला असताही सव्वा वर्षानंतर ती बंद पडली. ही शोकान्तिकाच ठरली आणि केवळ एकदोघांचे वर्तन सरळ असते तर ही शोकान्तिका टळली असती असे अगदी तीव्रतेने आजही वाटते.)
अत्यंत कसोटीच्या वेळी तरुणांनी सुमारे तीस वर्षांपूर्वी करून दाखवलेले असे हे कार्य. तरुणांना वाव दिला पाहिजे. नवीन जबाबदारी त्यांच्यावरच टाकली पाहिजे, अशा घोषणा ज्येष्ठ नेते नेहमीच करत असतात. परंतु आम्ही करून दाखवलेल्या या कार्याची ना कुणी दखल घेतली, ना कुणी स्मरण ठेवले. पत्रिका बंद पडली त्या वेळी दोन-अडीच हजारांचे कर्ज होते. त्या वेळी माझ्या ओळखीचे नेते किमान दोन-तीन डझन तरी होते. निवडणुकीसाठी १९५७ साली हजारो रुपये खर्च केले, परंतु एकाही नेत्याने एक दमडीही मिळवून दिली नाही. एकच देणगी मिळाली होती. पत्रिका बंद पडत असताना. श्री. शरद दिघे (सध्या विधानसभा अध्यक्ष) यांनी शंभर रुपये दिले, तर माझे बंधू नारायण रणदिवे (आता दिवंगत) यांनी दोनशे रुपये दिले. दुसऱ्या एका नेत्याने दीडशे रुपये कर्ज म्हणून दिले होते, परंतु पत्रिका बंद पडल्यावरही ती रक्कम त्याला दिली असता ती त्याने आनंदाने स्वीकारली. एकंदरीत काय बडी मंडळी पुढे आल्यावर छोट्या मंडळीच्या कामाकडे त्यांनी सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले. कंपूबाजी जिंदाबाद हेच खरे असते तर…
..................................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment