१.
यशवंत रांजणकर यांची पहिली ओळख त्यांच्या भयकथा, गूढकथा, विज्ञान-काल्पनिका, गूढ कादंबरी, फँटसी अशा विविध विषयांवरील कथा-कादंबऱ्यांपासून व्हायला हवी होती किंवा मग त्यांच्या ‘आई पाहिजे’, ‘अर्धांगी’, ‘कशासाठी प्रेमासाठी’, ‘खरा वारसदार’, ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’, ‘धाकटी सून’, ‘शापित’, ‘सर्जा’ यांसारख्या चित्रपटांपासून व्हायला हवी होती. पण तसं काही झालं नाही. त्यांच्या कादंबऱ्यांचे विषय कधीच आवडीचे विषय नव्हते. पण त्यांनी कथा, पटकथा, संवाद लिहिलेले अनेक सिनेमे पाहिले. मात्र त्यातील बहुतांश सिनेमे टीव्हीवर पाहिले. त्यामुळे सुरुवातीची किंवा शेवटची श्रेयनामावली कधीच बारकाईने पाहिली नाही. शिवाय यशवंत रांजणकर पूर्वीश्रमीचे ग्रंथपाल, पत्रकार. विद्याधर गोखले, र. ना. लाटे, माधव गडकरी यांच्या काळात ते दै. ‘लोकसत्ता’मध्ये होते. तेव्हा ते चित्रपटविषयक लेखन करायचे. विशेषत: इंग्रजी चित्रपटांविषयी. त्यानंतर रांजणकर चित्रपटक्षेत्रात गेले. तिथे त्यांनी जवळपास दीड-दोन दशकं कथा, पटकथा, संवादलेखन ही कामं केली. ‘आई पाहिजे’, ‘सर्जा’, ‘शापित’, ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ हे त्यातले काही गाजलेले सिनेमे. ९०नंतर रांजणकरांनी काही कारणांनी चित्रपटांसाठी काम करणं थांबवलं. त्यांचं कथा-कादंबरीलेखन मात्र चालूच होतं.
१९९६ साली त्यांना भानू काळे यांनी ‘अंतर्नाद’ या त्यांच्या मासिकासाठी इंग्रजी चित्रपटांवर सदर लिहिणार का म्हणून विचारलं. रांजणकरांनी त्याला होकार दिला आणि १९९६-९७ या काळात ‘अ-पूर्व चित्रगाथा’ या नावानं त्यांनी हे सदर लिहिलं. तेव्हा काही आजच्या इतक्या इंग्रजी चित्रपटांचा आणि त्या विषयीच्या माहितीचा सुळसुळाट झालेला नव्हता. गुगल आजच्या इतकं सर्वशक्तीमान झालेलं नव्हतं आणि त्यावरून कमावलेल्या प्रतिभेच्या जोरावर महाराष्ट्रभर ‘वाहव्वा’ करून घेणाऱ्या ‘कॉपी-पेस्ट संप्रदाया’लाही सुरुवात झालेली नव्हती. त्यामुळे रांजणकरांनी मेहनत घेऊन लिहिलेल्या आठही लेखांना ‘अंतर्नाद’च्या वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. हे सदर राजहंस प्रकाशनाच्या दिलीप माजगावकर यांच्या वाचनात आल्यावर त्यांनी त्याचं पुस्तक प्रकाशित करायचं ठरवलं. त्यानुसार १९९९ साली ‘अ-पूर्व चित्रलेणी’ या नावानं अतिशय देखणं पुस्तक राजहंसने प्रकाशित केलं. या पुस्तकात रांजणकरांनी लिहिलेल्या आठपैकी ‘गॉन विथ द विंड’, ‘द गॉडफादर’, ‘कॅसाब्लांका’, ‘सायको’, ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ आणि ‘२००१ : अ स्पेस ओडिसी’ या सहा चित्रपटविषयक लेखांचा समावेश आहे.
या पुस्तकाचं सदरासारखंच मराठीत चांगलं स्वागत झालं. चित्रपटरसिकांनी त्याची विशेष दखल घेतली. इंग्रजी चित्रपट जाणकर व पत्रकार अशोक जैन यांनी या पुस्तकाविषयी महाराष्ट्रमध्ये ‘आस्वादाचा आनंद द्विगुणित करणारी अ-पूर्व चित्रलेणी’ (८ ऑक्टोबर २०००) या नावानं परीक्षण लिहिलं. त्यात त्यांनी या पुस्तकाचं कौतुक करताना म्हटलं आहे – “ ‘गॉन विथ द विंड’, ‘द गॉडफादर’, ‘कॅसाब्लांका’, ‘सायको’, ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’, ‘२००१ : अ स्पेस ओडिसी’, या हॉलिवुडच्या सुवर्णयुगातील सहा अभिजात दर्जाच्या चित्रपटांच्या निर्मितीच्या कथा रांजणकर यांनी अत्यंत रोचक शैलीत लिहिल्या आहेत. त्या वाचताना चित्रपटांच्या आस्वादात भरच पडते. किंबहुना, या चित्रपटांनी जो आनंद दिला, तो अधिक संपन्न व समृद्ध होतो… रांजणकर यांनी माहिती जमवण्याचे खूप परिश्रम घेतले आहेत, हे जाणवते. अर्थात हे पुस्तक म्हणजे केवळ भाराभर माहितीचे गोदाम नसून ती माहिती रोचक शैलीत त्यांनी सजवून सादर केली आहे. गाजलेल्या चित्रपटांच्या निर्मितीविषयी सखोल माहिती ते तपशीलवारपणे देतात. त्यात केवळ किस्से वा गॉसिप नसून संबंधित चित्रपट अधिक चांगला समजण्यात त्याची मदतच होते.”
या पुस्तकातल्या प्रत्येक लेखाची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचताना मजा येते.
२.
या पुस्तकाचं गारुड ओसरतं न ओसरतं तोच २००३ साली दिवाळीच्या सुमारास रांजणकरांच्या ‘हिचकॉक : द मॅन हू न्यू टू मच’ या नव्या चरित्राची जाहिरात प्रकाशित व्हायला सुरुवात झाली. ऑक्टोबर महिन्यात सव्वातीनशे पानांचं हिचकॉक चरित्र ‘अ-पूर्व चित्रलेणी’सारखंच देखण्या रूपात प्रकाशित झालं. किंबहुना जास्तच देखण्या रूपात. हिचकॉकचे सगळे चित्रपट ब्लॅक अँड व्हाइट. त्यामुळे हे त्याचं मराठी चरित्रही संपूर्ण ब्लॅक आणि व्हाईट आहे. मुखपृष्ठापासून मलपृष्ठापर्यंत या पुस्तकात काळा आणि पांढरा हेच दोन रंग वापरले आहेत. काळ्याभोर मुखपृष्ठावर पांढऱ्या ठसठशीत अक्षरात ‘हिचकॉक : द मॅन हू न्यू टू मच’ हे भारदस्त शीर्षक आणि त्याच्या खाली डाव्या बाजूला अलाईन केलेली हातात सिगरेट धरून एकाग्रपणे समोर पाहत असलेली किंवा कुठल्या तरी विचारात हरवून गेलेली हिचकॉकची एक मुद्रा. ती इम्बॉसिंग करून ठसठशीत केलेली. त्यावरून हात फिरवला तर जणू आपण हिचकॉकला स्पर्श करतोय असं वाटतं.
मुखपृष्ठ उलटलं की उजवीकडच्या आसपासवर नजरे पडते आणि तेथील डाव्या बाजूला बघणारा हिचकॉकचा चेहरा तुम्हाला क्षणभर दचकून टाकतो. त्यातून सावरत तुम्ही पुढच्या पानावर जाता, तर डावीकडचं पान पूर्ण कोरं, उजवीकडे फक्त छोट्या टायपात पुस्तकाचं शीर्षक. आपल्याला दिलासा मिळतो. चला, सुटलो! आपण पान उलटतो, तर उजवीकडे पुस्तकाचं शीर्षक, लेखकाचं नाव ठसठशीत टायपात. आता ‘हिचकॉक : द मॅन हू न्यू टू मच’ हे शीर्षक तुमच्या डोक्यात घणघणायला लागतं. तोच तुमची नजर डावीकडे जाते आणि तुम्ही परत दचकता, कारण तिथे दोन्ही हात मागे घेऊन काहीशा मिश्किलपणे तुमच्याकडे पाहत असल्यासारखा हिचकॉक दिसतो! तुम्हाला आता घाई होते, तुम्ही पटकन पुढच्या पानावर जाता, तिथून परत पुढच्या. उजवीकडील प्रस्तावनेवर तुम्ही नजर फिरवायला लागता, तर डावीकडे क्षितिजाच्या टोकावर उभा असल्यासारखा हिटकॉक तुमच्याकडेच पाहत असतो. तुम्ही घाईघाईनं पुढच्या पानावर जाता, तर तिथेही तो डावीकडच्या बाजूने पुढच्या पानावर पानाचा निर्देश करत असल्यासारखा. पुढच्या पानावरही तसंच. त्याच्या पुढच्या पानावरही तेच. शेवटी तो तुम्हाला अनुक्रमणिकेच्या पानावर आणून सोडतो...
मग तुम्ही पुढची ३१० पानं झपाटल्यासारखी वाचून काढता. ती वाचताना, मध्ये मध्ये तो वेगवेगळ्या रूपात भेटतो, त्याच्या चित्रपटातील काही दृश्यांची छायाचित्रं भेटतात. तुम्ही नेटानं पुस्तकं संपवत आणता, तेव्हा तो पुन्हा दिसतो आणि दमलेल्या तुम्हाला चकित करतो. कारण तो त्याच्या एका नव्या चित्रपटाचं स्क्रिप्ट टाचा उंचावून आधीच त्याच्या उंचीपेक्षा जास्त झालेल्या स्क्रिप्टच्या गठ्ठ्यावर ठेवताना दिसतो. एव्हाना आपल्याला खात्री पटते की, हा माणूस खरोखरच ‘द मॅन हू न्यू टू मच’ आहे!
३.
या दोन पुस्तकानंतर रांजणकरांचं पुढचं पुस्तक कशावर असणार याची प्रचंड उत्सूकता वाढली होती. काही वर्षांनी ‘वॉल्ट डिस्ने – द अल्टिमेट फॅण्टसी’ हे पुस्तक आलं. तसंच देखणं, बहारदार. हे चरित्र डिस्नेची जी रंजक सफर घडवून आणतं, ती जादूई, मती गुंग करणारी आहे.
त्यानंतर अजून काही वर्षांनी आलं ब्रिटिश साहसी टी. ई. लॉरेन्सचं चरित्र ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’. असंघटित अरबांच्या हक्कासाठी लढणाऱ्या लॉरेन्सची कहाणी मोठी विलक्षण आहे, ती तितक्याच विलक्षण पद्धतीनं रांजणकरांनी सांगितलीय. एखादा माणूस जिवंतपणीच दंतकथा होतो, म्हणजे नेमकं काय होतं, हे जाणून घेण्यासाठी हे लॉरेन्स चरित्र वाचायलाच हवं.
४.
त्यामुळे अशी ‘एक से बढकर’ पुस्तकं लिहिणारे रांजणकर मनात रुतून बसले होते. दै. ‘प्रहार’मध्ये रविवार पुरवणी विभागात काम करत असताना यशवंत रांजणकरांना लिहितं करण्याची कल्पना सुचली. संपादकांनी होकार देताच रांजणकरांना फोन करून सहकारीमित्र चिंतामणी भिडेसह भेटण्याची इच्छा व्यक्त केली. चिंतामणीने दै. ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये असताना ‘हिचकॉक’वर परीक्षण लिहिलं होतं. त्यामुळे त्याचं नाव त्यांच्या चांगलंच लक्षात होतं. म्हणून त्यांनी आनंदान घरी यायचं निमंत्रण दिलं. २३ जुलै २०१२ रोजी संध्याकाळी सात वाजता आम्ही दोघं त्यांच्या कांदिवलीच्या घरी गेलो. आम्ही चाळिशी उलटलेली माणसं असू असा त्यांचा अंदाज होता, पण आम्ही जेमतेम तिशी उलटलेलो आहोत हे पाहून तर ते अजूनच खूश झाले. अतिशय आनंदानं आणि आदबीनं त्यांनी आमचं स्वागत केलं. डायनिंग टेबलवर बसून व्हिस्कीचे घोट घेत आमच्या गप्पा सुरू झाल्या. आम्हाला रांजणकरांबद्दल जाणून घ्यायचं होतं, त्यामुळे त्यांची आमची प्राथमिक चौकशी करून झाली की, आम्ही त्यांना त्यांच्याबद्दल बोलायला सांगितलं. त्यांनी दै. ‘लोकसत्ता’मधल्या त्यांच्या दिवसांपासून सुरुवात केली. विद्याधर गोखले, माधव गडकरी, विजय तेंडुलकर, र. ना. लाटे यांच्या आठवणी, रविवार पुरवणीचे काम करतानाचे अनुभव, अशा अनेक गोष्टी सांगितल्या. संगीत सौभद्र या नाटकाविषयी ज्येष्ठ समीक्षक वा. ल. कुलकर्णी यांनी साहित्य संघात बोलताना बरीच टीका केली होती. ती रांजणकरांना मुळीच पटली नाही. त्यामुळे त्यांनी त्याचा प्रतिवाद करणारी लेखमालिका लोकसत्तामध्ये लिहिली. लोकसत्तामध्ये असतानाच त्यांनी ग. रा. कामत यांच्याबरोबर चित्रपटकथा—पटकथा-संवाद लिहायला सुरुवात केली. कामतांसोबत काम करण्याचा अनुभव आणि एकंदर मराठी चित्रपटांचा अनुभव याविषयीही तेही दिलखुलासपणे बोलले. तीन-चार तास कसे गेले ते आम्हाला कळले नाही.
तासा-दीड तासात आपण निघू असा आमचा जाताना होरा होता. तो रांजणकरांच्या गप्पांनी मागे पडून रात्रीचे साडेअकरा वाजले. तेव्हा आम्ही नाईलाजाने निघालो. निघताना रांजणकर म्हणाले, माझी रहस्य-गूढकथा यांविषयांवरची २०-२२ पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. पण ती वेगवेगळ्या प्रकाशकांनी काढली आहेत आणि त्यांनी ती वेगवेगळ्या मार्गांनी खपवलीही आहेत. आम्ही दोघांनीही त्यांचं त्याविषयावरचं एकही पुस्तक वाचलं नव्हतं. त्यामुळे आम्ही शांतपणे ऐकून घेतलं. त्यांनीही तो विषय फार लांबवला नाही.
पुढच्या आठवड्यापासून त्यांचं पाक्षिक सदर दै. ‘प्रहार’च्या शनिवारच्या चित्रपटविषयक पुरवणीत सुरू झाले. परवा त्यांचं निधन झालं तेव्हा चिंतामणीने त्यांच्याविषयी फेसबुक पोस्ट लिहिलीय. त्यात त्याने लिहिलंय – “ ‘प्रहार’मध्ये आम्ही लेखांना भरपूर जागा द्यायचो. त्यामुळे आमचे लेखक खुश असायचे. शिवाय रांजणकरांच्या लेखांचा विषय हॉलिवुडचे जुने गाजलेले, पण नेहमीच्या क्लासिक्सपेक्षा वेगळे असे सिनेमे. त्या लेखांना साजेसे फोटो मी कुठून कुठून शोधून (अर्थात नेटवर) वापरायचो. त्यात सहसा त्यांनी लेखात उल्लेख केलेल्या एखाद्या प्रसंगाचा फोटो पण शक्यतो वापरायचोच. याचं त्यांना खूप कौतुक होतं. त्यामुळे त्यांनी घरी यायचं आग्रहाचं आमंत्रण दिलं. प्रत्यक्ष भेटीत सिनेमावर खूप गप्पा झाल्या. बोलता बोलता ते म्हणाले, ‘मी आपल्या कॉलमसाठी ‘द थर्ड मॅन’ हा ऑर्सन वेल्सचा सिनेमा शोधतोय, पण बरेच प्रयत्न करूनही मला सापडत नाहीये. मी म्हटलं माझ्याकडे आहे. ते ऐकताच त्यांचा चेहरा विलक्षण उजळला. म्हणाले, मला द्या. त्यांनी आणखीही काही नावं सांगितली. त्यातले काही माझ्याकडे होते. ते सर्व सिनेमे आणि आणखीही माझ्या कलेक्शनमधले सिनेमे पुढच्या वेळी मी त्यांना दिले. त्या वेळी लहान मुलाला आवडीचं खेळणं मिळाल्यावर होतो, तसा आनंद त्यांना झाला. त्यानंतर आम्ही फोनवर संपर्कात होतो. वर्षभरानंतर कॉलम बंद झाल्यावरही कधी त्यांचा फोन यायचा, कधी मी करायचो. गेल्या दोन-तीन वर्षांत मात्र संपर्क नव्हता. मराठी सिनेमा आणि मराठीतलं सिनेमाविषयक लिखाण या दोन्हीत त्यांचं योगदान मोठं आहे.”
चिंतामणीने या सदराला ‘सोनाटा’ असं नाव दिलं होतं. रांजणकर हेही सदर चांगलंच लिहायचे.
५.
रांजणकरांशी असलेला संपर्क हळूहळू कमी होत गेला. चिंतामणी त्यानंतरही काही काळ त्यांच्या संपर्कात होता, पण मला या ना त्या कारणानं त्यांच्या संपर्कात राहता आलं नाही. त्यानंतर एकदम गेल्या वर्षी रांजणकर आणि त्यांचं सदर आठवलं. नेहमीप्रमाणे पुस्तकाच्या दुकानात गेलो असतो, दर्शनी भागातच ‘BEST OF हॉलीवूड’ हे रांजणकरांचं पुस्तक दिसलं. पाहू काय आहे म्हणून चाळू लागलो तर ते ‘प्रहार’मधल्या सदराचंच पुस्तक होतं. फक्त एक-दोन लेख सदराबाहेरचे होते. या पुस्तकाच्या मनोगतात चिंतामणी आणि माझा रांजणकरांनी खास उल्लेख केलाय. तेव्हा त्यांच्या सदराच्या मागे आपल्या खारीचा वाटा आहे, याचं समाधान वाटलं. सगळेच पत्रकार काही पुलित्झर पारितोषिक मिळवू शकत नाहीत आणि पद्मश्रीही. बहुतेकांचं समाधान हे असंच छोट्या छोट्या गोष्टींमध्येच असतं. अनेक खास क्षणांचा साक्षीदार होण्याची संधी, हेच बहुतेक पत्रकारांच्या आयुष्यात प्रामुख्यानं घडतं. त्यामुळे आपल्या आवडत्या लेखकाच्या एका चांगल्या पुस्तकात आपल्या नावाचा समावेश आहे, ही गोष्टही उमेद वाढवते. असो.
आता हे पुस्तक विकत घेऊन सविस्तर वाचू असं ठरवलं होतं, पण ते या ना त्या कारणानं राहून गेलं. त्यात दोन-तीन महिने चालढकल झाली आणि लॉकडाउन सुरू झालं. त्यानंतर तर काहीच शक्य नव्हतं. तरीही रांजणकरांचं ‘BEST OF हॉलीवूड’ हे विकत घ्यायच्या पुस्तकांच्या यादीत अगदी सुरुवातीलाच लिहून ठेवलं होतं.
लॉकडाउन संपायची वाट पाहत असतानाच परवा अचानक त्यांच्या निधनाचीच बातमी आली. खरं तर त्यांना पुस्तक वाचून फोन करायची इच्छा होती, पण ती राहून गेली.
दुसऱ्या दिवशी दै. ‘लोकसत्ता’मध्ये अतिशय त्रोटक बातमी आली.
तर दै. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने थोडी सविस्तर बातमी दिली, मात्र त्यांचा ‘पटकथाकार’ म्हणूनच ठळक उल्लेख केला.
लॉकडाउनच्या काळात एकंदर राष्ट्रीय व प्रादेशिक पत्रकारितेचं जे मातेरं झालंय, त्याचे भोग निधनानंतर रांजणकरांच्याही वाट्याला आले, यात नवल नाही. पण ते असो.
६.
रांजणकरांचं नेमकं योगदान काय?
भयकथा, गूढकथा, विज्ञान-काल्पनिका, गूढ कादंबरी, फँटसी अशा विविध विषयांवरील कथा-कादंबऱ्या लिहिणारी बाबुराव अर्नाळकर, रत्नाकर मतकरी, नारायण धारप, चंद्रकांत काकोडकर, गजानन क्षीरसागर, अशी जी लोकप्रिय लेखकांची परंपरा आहे, त्यात रांजणकरांचा समावेश ‘टॉप टेन’मध्ये नक्की होईल. ‘धनंजय’, ‘हंस’, ‘नवल’ या दिवाळी अंकांमध्ये रांजणकरांच्या कथा-कादंबऱ्या गेली अनेक वर्षं असायच्या. त्यामुळे त्यांचं नाव तितकंसं अपरिचित असण्याचं कारण नव्हतं. पण तेही असो.
हिचकॉक, वॉल्ट डिस्ने आणि लॉरेन्स यांची चरित्रं आणि इंग्रजी क्लासिक सिनेमांविषयीची ‘अ-पूर्व चित्रलेणी’ आणि ‘BEST OF हॉलीवूड’ ही पुस्तकं रांजणकरांच्या एकंदर लेखकीय कारकिर्दीतला सर्वोच्च आविष्कार आहे, असं म्हणता येईल. या पुस्तकांची निर्मिती, त्यांचा लेखनदर्जा सगळंच उजवं आहे. त्या तुलनेत त्यांची सिनेक्षेत्रातली कारकीर्द तशी लहान आहे. त्यांनी १२-१५च सिनेमे केले. त्यातील ‘सर्जा’, ‘शापित’, ‘आई पाहिजे’ असे मोजकेच गाजले. दै. ‘लोकसत्ता’मध्ये असताना, विशेषत: रविवार पुरवणी पाहत असताना त्यांनी अनेक कल्पक प्रयोग केले, पण तो खूप जुना काळ आहे. आणि आता तर वर्तमानपत्रांनी कल्पकता, नावीन्य, सर्जनशीलता यांच्याशी उभा दावा मांडलेला असल्याने त्या संदर्भातलं रांजणकरांचं काम सांगण्याची तसदी कोण घेणार?
.............................................................................................................................................
यशवंत रांजणकर यांच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/search/?s
.............................................................................................................................................
लेखक राम जगताप ‘अक्षरनामा’चे संपादक आहेत.
editor@aksharnama.com
..................................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment