अजूनकाही
१४ जुलै १८५६ ते १७ जून १८९५ असे जेमतेम ३९ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या गोपाळ गणेश आगरकर यांचा आज १२५ वा स्मृतिदिन आहे. सध्या करोना कालखंडामुळे उत्सव-समारंभ होत नाहीत, पण सर्वसाधारण परिस्थिती असती तरी क्वचित काही लहान अपवाद वगळता आगरकरांचा सव्वाशेवा स्मृतिदिन विशेष कोणी साजरा केला नसता. त्याचे मुख्य कारण, बहुतांश महनीय व्यक्तींचे स्मरण त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानंतर कमीकमी होऊ लागते. आणि आगरकरांची जन्मशताब्दी झाली त्याला आता ६५ वर्षे होऊन गेलीत आणि त्यांची स्मृतिशताब्दी झाली, त्यालाही २५ वर्षे होऊन गेलीत. (इतक्या दीर्घ काळानंतर त्यांना पाहिलेली माणसे राहिलेली नसतात, त्यांनी मांडलेले विचार व कार्य काही प्रमाणात कालबाह्य झालेले असते, काही प्रमाणात स्वीकारले गेलेले असते म्हणून; आणि त्यांचे असे काही संघटन नसेल, त्यांच्या विचार कार्याचा वारसा सांगणारा पक्ष वा पंथ नसेल तर ते स्मरण आणखी कमीकमी होऊ लागते.) मात्र आगरकर माहीतच नाहीत, अशी शाळा-कॉलेजात थोडा काळ तरी गेलेली मराठी व्यक्ती सापडत नाही. कारण प्राथमिक व माध्यमिक स्तरावर आगरकरांची भेट विद्यार्थ्यांना होतेच होते. भले ती ओळख पाच-दहा वाक्यांचीच असते, पण प्रत्येकाच्या मनात चांगलीच रुतून बसलेली असते.
आज असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो की, सव्वाशे वर्षांनंतरही आगरकर उरतात ते कोणते? त्यासाठी प्रथम हे लक्षात घ्यायला हवे की, आगरकरांचे अन्य समकालीन महनीय व्यक्तींपेक्षा वेगळेपण काय होते, त्यांचे नेमके योगदान काय आणि आज त्यांचे म्हणावे असे काय प्रस्तुत आहे?
आगरकरांच्या आधीचे बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, न्या. महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, न्या. काशिनाथ त्र्यंबक तेलंग आणि महात्मा ज्योतिराव फुले; समकालीन म्हणावेत असे विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, धोंडो केशव कर्वे; थोड्या नंतरच्या काळातील म्हणावेत असे गोपाळ कृष्ण गोखले, विठ्ठल रामजी शिंदे, पंडिता रमाबाई अशी खूप मोठी मांदियाळी सांगता येईल. त्या प्रत्येकाचा रस्ता वेगळा होता, प्रत्येकाचे कार्यक्षेत्र वेगळे होते, प्रत्येकाच्या भूमिकाही कमी-अधिक फरकाने वेगळ्या होत्या. आणि प्रत्येकाने लहान मोठ्या पर्वताएवढे काम केले हेही उघड आहे. या सर्वांमध्ये आगरकरांचे म्हणावे असे स्वतंत्र व मानाचे स्थान आहेच.
सर्वप्रथम हे लक्षात घ्यावे लागते की, एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र समजून घेता आला तरच विसाव्या शतकातील महाराष्ट्र चांगला कळतो आणि त्या दोन्ही शतकांचा परिप्रेक्ष्य पाहता आला तरच एकविसाव्या शतकातील प्रश्न व समस्या यांच्याकडे सम्यक व सकारात्मक दृष्टिकोनातून पाहता येते. कारण आधुनिक महाराष्ट्र ही संज्ञा वापरून त्यावर चर्चा करायची ठरली तर १८१८ नंतरचा कालखंड समोर ठेवावा लागतो. त्या वर्षी पेशवाईची अखेर झाली, शनिवारवाड्यावर युनियन जॅक फडकला आणि ब्रिटिश राजवट सुरू झाली. पुढील सव्वाशे वर्षे ती टिकून राहिली. पण पूर्वीच्या अन्य परकी राजवटींच्या तुलनेत ब्रिटिश राजवट अनेक अर्थांनी वेगळी होती. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, उद्योग, व्यापार, साहित्य, संस्कृती, शिक्षण, आरोग्य, कला, क्रीडा, भाषा, वेशभूषा, विज्ञान, तंत्रज्ञान, दळणवळणाची साधने इत्यादी अनेक क्षेत्रांवर त्या राजवटीने मूलगामी परिणाम केले. किंबहुना जीवनाचे असे एकही क्षेत्र राहिले नाही, ज्यावर त्या राजवटीचा प्रभाव राहिला नाही. याचे मुख्य कारण विचार करण्याच्या पद्धतीलाच त्या राजवटीमुळे कलाटणी मिळाली, विचारप्रक्रियेला अनेक नवे आयाम प्राप्त होऊ लागले, प्रत्येक क्षेत्राची व्याप्ती व खोली प्रचंड वाढली. प्राचीन व अर्वाचीन आणि पौर्वात्य व पाश्चिमात्त्य या प्रकारच्या जाणीवांमध्ये संघर्ष सुरू झाला आणि त्यातूनच ‘सनातनी’ व ‘सुधारक’ असे दोन प्रवाह दिसायला लागले. त्या संघर्षाच्या सुरुवातीच्या कालखंडात ‘सनातनी’ हे बिरूद अभिमानाने मिरवले जाणे आणि ‘सुधारक’ या बिरुदाला तुच्छतादर्शक अर्थ असणे तत्कालीन समाजाने पसंत केले होते. तेव्हा आगरकरांनी स्वत:च्या वृत्तपत्राचे नाव ‘सुधारक’ असे ठेवले होते.
‘सुधारणा’ हा शब्दप्रयोग सुरुवातीच्या काळात राजकीय व सामाजिक या दोन्ही क्षेत्रांना लागू होता. मात्र राजकीय आघाड्यांवर आधी फार संथगतीने वाटचाल होत होती म्हणून आणि नंतरच्या काळात त्या आघाडीवर खूपच मोठी हलचल माजू लागली म्हणून हा शब्दप्रयोग राजकीय क्षेत्रासाठी फार वापरला गेला नाही.
सामाजिक क्षेत्रांत मात्र ‘सुधारणा’ हा शब्दप्रयोग चांगलाच रूढ झाला आणि मग समाजसुधारक हे बिरूद प्रतिष्ठेचे बनत गेले. (राजकीय क्रांती होऊ शकते, सामाजिक क्रांती होऊ शकत नाही म्हणून हे झाले, असेही म्हणता येईल.) पण समाजसुधारकांमध्ये किती प्रवाह व उपप्रवाह आणि किती गट-तट निर्माण झाले याची गणती नाही. त्या सर्व समाजसुधारकांमधील मतभिन्नतेला आणि अनेक उपप्रवाह निर्माण होण्याला मुख्यतः कारणीभूत ठरला तो धर्म!
एकोणिसाव्या शतकात ज्या काही छोट्या सुधारणा सुचवल्या गेल्या, त्या प्रत्येक ठिकाणी धर्म आडवा आला. कधी व काय खावे-प्यावे याचे नियमन असो, वेशभूषा व त्यांचे रंग ठरवणे असो, देशी वा विदेशी प्रवासासाठीचे निर्बंध असोत, जातीत व परजातीत रोटी-बेटी व्यवहार असोत, कोणत्याही कामासाठीचे शुभ-अशुभ मुहूर्त असोत, कोणते व्यवसाय कोणी करावेत आणि कोणते शिक्षण कोणी घ्यावे याबाबतचे नियंत्रण असो, जन्मापासून मृत्यूपर्यंतचे व्रतवैकल्ये असोत या सर्व ठिकाणी धर्माचे गारूड होते. त्यातून स्त्रियांचे व तळाच्या समजल्या जाणाऱ्या जातींतील लोकसमूहांचे सर्वांत जास्त शोषण केले जात होते. तेव्हा त्या सर्वांना कडवा विरोध करणाऱ्यांमध्ये आगरकर प्रमुख होते.
तर मुद्दा असा की, तोपर्यंत जीवनाचे असे एकही क्षेत्र नव्हते, ज्यांवर धर्माचा प्रभाव नाही, धर्माचा काच नाही! साहजिकच, कोणत्याही सामाजिक सुधारणेला भिडायचे ठरले तर आधी संघर्ष करावा लागायचा धर्म संकल्पनेशी. अमुक सुधारणा धर्माच्या कशी आड येत नाही किंवा त्या सुधारणेसाठी धर्म कसा अनुकूल आहे, याच्याभोवती घमासान चर्चा-वाद करणारा एक उपप्रवाह होता. मूळचा धर्म असे सांगत नाही, नंतर हे चुकीचे त्यात घुसवले गेले, असे म्हणणारा एक उपप्रवाह होता. धर्माने सांगितलेल्या काही गोष्टी त्या काळात बरोबर होत्या, आता त्यांची गरज नाही असे म्हणणाराही एक उपप्रवाह होता. धर्मात त्या वेळी आणि आजही काही गोष्टी चुकीच्या आहेत असे म्हणणारा एक उपप्रवाह होता. उच्चवर्णीय लोकांनी धर्मावर कब्जा केला आहे, त्यांच्या कचाट्यातून धर्म सोडवला पाहिजे, असे म्हणणारा एक उपप्रवाह होता. आज धर्माला अवकळा आलेली आहे, म्हणून नव्या रूपातील धर्म अंगिकारला पाहिजे, असे म्हणणाराही उपप्रवाह होता. आणि ग्लानी आलेला आपला धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारला पाहिजे, असे म्हणणाराही एक उपप्रवाह होता. पण आजचे आपले जीवन योग्य-अयोग्य ठरवण्यासाठी धर्माची गरजच नाही, असे म्हणणारा उपप्रवाह नव्हता. तो उपप्रवाह भविष्यात आकाराला येणार होता, त्यालाच सर्वाधिक प्रतिष्ठा मिळणार होती; त्याचे आद्य प्रणेते किंवा प्रवर्तक होते गोपाळ गणेश आगरकर.
अर्थात, आगरकरांचे जीवनचरित्र पाहिले तर फार आकर्षक नाही. सातारा, अकोला, रत्नागिरी व पुणे या चार ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतले. त्या कालखंडावर नजर टाकली तर मनावर ठसते ते हेच की, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीचा सामना करत माधुकरी मागून, शिष्यवृत्ती व बक्षिसे मिळवून, छोटी-छोटी कामे करत त्यांनी आपले एम.ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. या काळातील वैशिष्ट्यपूर्ण नोंद हीच राहते की, अशा परिस्थितीतून आलेले असूनही त्यांचा स्वाभिमान बुलंद राहिला, सद्वर्तनात काही खोट निर्माण झाली नाही. मात्र या कालखंडातील त्यांच्या चरित्रविषयक तपशिलातून पुढे न आलेला मुद्दा हा राहतो की, वय वर्षे २४ ते ३९ या १५ वर्षांच्या काळात त्यांनी जी झुंज दिली, त्याची जबरदस्त व कमालीची पक्की पायाभरणी त्या आधीच्या काळात झाली असणार. त्याबाबत त्यांनी स्वतः काही लिहून ठेवलेले नाही आणि त्यांच्या चरित्रकारांना तसे फार तपशील मिळालेले नाहीत. ‘आई, उभा जन्म देशसेवेला वाहीन’ आणि ‘गुरुजी, तुमच्यासारखाच एम.ए. होईन तरच नावाचा आगरकर’, असे काही तेजस्वी उद्गार त्यांनी विद्यार्थिदशेतच काढले होते हे पुढे आले आहे. पण ‘इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार’ हा त्यांचा बाणा (मागील सव्वाशे वर्षे त्याला ‘आगरकरी बाणा’ असे संबोधले जाते) कसा आकाराला आला, हे समजून घेण्यासाठी पुरेसे तपशील मिळत नाहीत.
पण असा निष्कर्ष सहज काढता येतो की- अज्ञान, अंधश्रद्धा, रुढी-परंपरा, जाचक चालीरीती अशी त्रस्त परिस्थिती पाहून आगरकरांचे मन आपला सभोवताल जलद गतीने टिपत होते, अस्वस्थ होत होते, अशांत बनत होते आणि मग डेक्कन कॉलेजात गेल्यावर पश्चिमेकडून आलेल्या विचारांच्या वाऱ्यांमुळे त्यावर वेगवान प्रक्रिया घडत गेली. व्यक्तिस्वातंत्र्य हे मूल्य विचारप्रक्रियेच्या मध्यवर्ती आल्यावर, धर्माची मांडणी विज्ञानाच्या कसोटीवर तपासता आल्यावर आणि जगाच्या इतिहासातून मानवी संस्कृतीची वाटचाल लक्षात आल्यावर त्यांना आपला ‘पॉइंट ऑफ व्ह्यू’ सापडला असावा.
त्यानंतर लोकशिक्षण हेच त्यांनी आपले जीवितकार्य मानले आणि त्यासाठी शाळा कॉलेजातील अध्यापन (औपचारिक शिक्षण) आणि वर्तमानपत्रांद्वारे जागरण (अनौपचारिक शिक्षण) या दोन माध्यमांतून ते कार्यरत झाले. अर्थातच शाळा-कॉलेजातील कार्य लगेच परिणाम देणारे व क्षोभ निर्माण करणारे नसल्याने त्याची चर्चा फारशी झाली नाही. पण त्यांनी दोन वृत्तपत्रांच्या माध्यमातून केलेले काम प्रचंड हलकल्लोळ माजवणारे ठरले. जानेवारी १८८१ ते ऑक्टोबर १८८७ या काळात ‘केसरी’ तर ऑक्टोबर १८८८ ते जून १८९५ या काळात ‘सुधारक’, या साप्ताहिक वृत्तपत्रांचे ते संपादक होते. दोन्ही साप्ताहिक वृत्तपत्रांचे ते पहिले संपादक होते आणि दोन्हींकडे त्यांना प्रत्येकी पावणेसात वर्षे मिळाली. दोन्ही वृत्तपत्रांचा त्यांच्या काळातील खप तीन हजारांच्या आसपास राहिला. पण त्या काळातील देशी (नेटीव) वृत्तपत्रांमध्ये ती आघाडीवरची मानली जात होती. म्हणजे जमतेम १४ वर्षांची ती पत्रकारिता पुढील म्हणजे विसाव्या शतकातील महाराष्ट्रावर ठसा उमटवून गेली. पत्रकारितेच्या मूल्यांचा गाभा काय असावा, हे सांगण्यासाठी मागील शतकभर, ‘सुधारक’मधून आगरकरांनी लिहिलेले ‘महाराष्ट्रीयांस अनावृत पत्र’ दाखवले जात होते. त्या १५ वर्षांच्या काळात आगरकरांनी तत्कालिन घटना-घडामोडींच्या निमित्ताने स्पष्ट भूमिका घेतल्या, वेळप्रसंगी मोठे वाद घातले. बळवंतराव टिळक या मित्र-सहकाऱ्यांशी मोठे मतभेद झाले. आयुष्यभर दम्याच्या विकाराने साथ केल्याने आलेल्या मर्यादा, स्वतःहून आर्थिक दारिद्रय पत्करले असल्याने आलेल्या मर्यादा, प्रवाहासाठीच प्रवाहाविरुद्ध भूमिका घेत राहिल्याने व जनमताचा रोष सतत झेलण्यामुळे आलेल्या मर्यादा, आणि एकूण आयुष्यच कमी मिळाल्याने आलेल्या मर्यादा असे त्यांचे जीवन होते. त्यामुळे त्यांचे जीवनचरित्र आजच्या पिढीला फारसे आकर्षक वाटणार नाही, किंबहुना त्रासदायकच वाटेल. पण त्यांचे ‘केसरी’ व ‘सुधारक’मधील निबंध मात्र आजच्या काळातील तरुण पिढीसाठीही ‘मस्ट रीड’ प्रकारातील मानावे लागतील.
त्या निबंधांमधून हाताळलेल्या विषयांची विविधता, त्यातील तर्कशुद्ध विवेचन, धारदार युक्तिवाद आणि पल्लेदार भाषा हे सर्व नीट अभ्यासता आले आणि त्यावर त्या-त्या काळाचे व घटनांचे संदर्भ जोडून विचार करता आला, तर सर्व पूर्वग्रहांपासून मुक्त मन, परंपरेचे ओझे उतरवून ठेवलेला मेंदू, आणि व्यक्ती-समाज व राष्ट्र यांच्या पुनरुत्थानासाठी आसुसलेला जीव यांचे दर्शन घडते. आजचे समाजजीवन त्या आरशात पाहिले तर किती बदलले आणि किती बदलायचे राहिले आहे याचे प्रतिबिंब दिसते. फार कशाला त्यातील बालविवाह या कुप्रथेमुळे केवळ त्या मुला-मुलींचा नाही, तर त्या समाजाचा व अंतिमतः राष्ट्राचा किती ऱ्हास होत आहे, हे सांगताना आगरकरांचा जीव अक्षरशः तुटत होता. आता तो प्रश्न जवळपास निकालात निघाला आहे असे समजले जाते. पण २००१ च्या जनगणनेनुसार या देशातील ४४ टक्के मुलींचे विवाह वय वर्षे १४ ते १७ या काळात झाले.
तीच आकडेवारी २०११ च्या जनगणनेनुसार ३० टक्क्यांवर आली आणि २०२१च्या जनगणनेनुसार आणखी खाली आलेली दिसेल. पण आगरकरांना जाऊन सव्वाशे वर्षे झाल्यानंतर, सव्वाशे कोटींपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या देशाची आजची ही स्थिती आहे. याच मुद्याचे खूप विश्लेषण करता येईल आणि त्याचे किती दुष्परिणाम आपल्या देशाला भोगावे लागले आहेत हे लक्षात येईल.
आणखी असे बरेच काही सांगता येईल. पण एक मुद्दा विशेष अधोरेखित केला पाहिजे. तो असा की, या देशातील मुस्लीम समाजाच्या सुधारणांसाठी आजही हमीद दलवाई यांच्या भूमिका पचनी पडत नाहीत; कारण दलवाईंचा कृतिशील वारसा महात्मा फुले यांच्याशी नाते सांगणारा आहे, तर वैचारिक भूमिका आगरकरांशी नाते सांगणारी आहे. सारांश, व्यक्ती, समाज आणि राष्ट्र या तिन्हींच्या उद्धारासाठी विवेकवादाची कास धरायला हवी असा गोपाळ गणेश आगरकरांचा सांगावा आहे!
‘साधना’ साप्ताहिकाच्या २० जून २०२० अंकातून साभार
..................................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment