कांचनने शेवटी स्वत:लाच ‘फू sssss’ केले!
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • रेखाचित्र - संजय पवार
  • Tue , 16 June 2020
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar कांचन नायक Kanchan Nayak जब्बार पटेल Jabbar Patel कळत-नकळत Kalat-Nakalat

दिग्दर्शक कांचन नायकचे १५ जून रोजी सकाळी १० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्याच्या नावाआधी प्रसिद्ध वा सुप्रसिद्ध असे विशेषण मुद्दामच लावले नाही. कारण सध्याच्या काळात ज्या प्रमाणे सेलिब्रेटी अथवा लिजेंड ठरवले जातात, त्या कुठल्याही चौकटीत कांचन बसत नव्हता, बसणार नाही. आदल्याच दिवशी आत्महत्या केलेल्या सुशांत सिंह राजपूतच्या प्रसिद्धी वलयापुढे, त्याच्या वयाहून दुप्पट एवढ्या वर्षांची कांचनची चित्रपटसृष्टीतली कारकीर्द होती. ती मराठीपुरतीच मर्यादित होती. पण २०००नंतर मराठी चित्रपटात आलेल्यांना कांचन नायक हे नावही माहीत असण्याची शक्यता कमी. त्यामुळे दिग्दर्शक म्हणून माहितीही असणे शक्य नाही.

चुकून माहीत असेल तर राष्ट्रीय, राज्य पुरस्कार समितीतील किंवा विविध सन्मान, गौरव यासाठीचा कुणी एक परीक्षक एवढेच माहीत असेल फार तर!

कांचन नायक हे एक अजब रसायन होतं. औपचारिक शिक्षण फारसं न घेतलेला कांचन, शालेय वयातच सिनेमाच्या जगात आला. कारण वडील प्रभाकर नायक (‘थापाड्या’ हा त्यांचा एक गाजलेला चित्रपट) हे दिग्दर्शक होते. कांचन हे मुलीचं वाटणारं नाव कसं काय ठेवलं, याबाबत कांचन फारसे बोलत नसे. (निदान आमच्या नव्या मुलांसमोर. म्हणजे हेमंत देवधर, महेन्द्र तेरेदेसाई, समीरण वाळवेकर इत्यादी.) तसा तो आपल्या कुटुंबाबद्दलच फार बोलत नसे. वडील यशस्वी दिग्दर्शक होते तरी!

तो काळ ६०-७०च्या दशकाचा काळ व मराठी चित्रपटसृष्टीची तेव्हाची पंढरी होती कोल्हापूर! कांचनवर या ‘कोल्हापूर स्कूल’चा प्रचंड पगडा होता. कोल्हापुरातच तो हाफ पॅन्टीत सिनेमा शिकला. भालजी, अनंत माने, व्ही. शांताराम, राजदत्त, अशा थोर दिग्दर्शकांचा, सिनेमांचा तो काळ. त्यात वडील प्रभाकर नायकही होते.

पण कांचनचा ज्ञात प्रवास सुरू होतो, तो राजदत्त म्हणजेच दत्ताजींचा सहाय्यक म्हणून. दत्ताजींबद्दल प्रचंड आदर आणि त्यांच्या शिस्तीचे खाल्लेले फटकेही तो हसतखेळत सांगत असे. दत्ताजींनंतर तो डॉ. जब्बार पटेलांचा सहाय्यक होता ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर’ सिनेमापर्यंत! म्हणजे जवळपास २५-३० वर्षे किंवा जास्तच. दरम्यान त्याने दिग्दर्शक म्हणून स्वतंत्रपणे सिनेमेही केले. त्यांची संख्या तशी फार नाही. पण दिग्दर्शक म्हणून पहिला केलेला त्याचा सिनेमा ‘कळत नकळत’ हा मराठी सिनेमातला व त्याच्या दिग्दर्शकीय कारकिर्दीतला माईलस्टोन ठरला. त्या पहिल्याच सिनेमाने त्याला राज्य व राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिले. त्या काळात (१९८८-८९) मराठी सिनेमाला बेस्ट फिल्म, डिरेक्टर, निर्मिती, प्लेब्लॅक सिंगर, चाईल्ड आर्टिस्ट असे पाच पुरस्कार मिळणे हा विक्रमच होता. स्मिता तळवलकरांचे अस्मिता चित्रच्या माध्यमातून चित्रपट निर्मितीतले हे पहिले पाऊल होते. स्मितांना हा सिनेमा डॉ. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित करावा असे वाटत होते. भेटही झाली होती. पण डॉक्टरांनी इतर कामामुळे शक्य नाही म्हटलं आणि कांचनचं नाव सुचवलं. स्मितांनी डॉक्टरांवर व कांचनवर विश्वास ठेवत निर्मिती केली आणि पहिल्याच चेंडूवर षटकार मारला या टीमने. विक्रम गोखलेंचं पुनरागमन या चित्रपटानं झालं, तर अश्विनी भावे व सविता प्रभूणेंच्या लक्षवेधी भूमिका, तसंच अभिनयासह आयुष्यातलं एकमेव पार्श्वगायन अशोक सराफ यांनी याच चित्रपटात केलंय. आनंद मोडक, सुधीर मोघे ही नवी गीतकार-संगीतकाराची जोडीही या सिनेमानं दिली.

एवढ्या मोठ्या यशानंतर कांचन नायक हे नाव एकदम प्रकाशझोतात आलं. तो काळ आजच्यासारखा वर्षाला १०० सिनेमा निर्मितीचा नव्हता. १५-२० चित्रपट बनत वर्षाला. एका वर्षी तर आठच तयार झाले होते! त्यातून मग अनुदानाचे वेगळे पर्व सुरू झाले. कांचनला त्याही १५-२०त विचारलं जात होतं. पण काही घडत नव्हतं. या दरम्यान कांचन सिनेमे माजात नाकारतोय असा प्रचार झाला, तशाच त्याच्या मद्यपानाच्या दंतकथाही पसरवल्या गेल्या. असं करता करता १० वर्षे उलटली! हा काळ फारच मोठा होता. पण हा काळ ना माजात गेला, ना मद्यात. कांचन सिनेमाला चांगली गोष्ट असली पाहिजे यावर ठाम असे. गोष्टीवर काम करायला तो स्वत: वेळ घेई, लेखकालाही (कधी कधी प्रमाणाबाहेर) वेळ देई. अर्धे निर्माते तिथेच गळपटत. आलेला निर्माता हातचा जाऊ नये यासाठी भलेभले वाट्टेल ते करत असताना कांचन गोष्टीचा हट्ट सोडायला तयार नसे. साहजिकच कांचनबद्दल नवनव्या दंतकथा पसरतच राहिल्या.

राष्ट्रीय सन्मान मिळवूनही डॉ.पटेलांचा सहाय्यक ही भूमिका त्याने सोडली नाही. डॉक्टरांसोबत अनेक माहितीपट त्याने केले. ‘एक होता विदूषक’ त्याने सहदिग्दर्शक म्हणून केला, तसेच पुढे आंबेडकर. मधल्या ‘मुक्ता’च्या वेळी डॉक्टरांनी कांचनला बाजूला ठेवला. ‘विदूषक’च्या वेळी कांचनच्या कामावरून डॉक्टर थोडे नाराज होते, त्याचा हा परिणाम होता. पण ती नाराजी एका चित्रपटापुरतीच राहिली. पुन्हा ‘आंबेडकर’साठी कांचनला बोलवावंच लागलं. कांचनही काही मनात न ठेवता आला व जवळपास आणखी दहा वर्षे डॉक्टरांसाठी दिली!

दरम्यान त्याने ‘राजू’, ‘माझी आई’, ‘दणक्यावर दणका’ असे काही चित्रपट केले. एक भोजपुरीही केला. हे सिनेमे आले व गेले. कांचन नायकची ‘कळत-नकळत’ची जादू नंतर पहायला मिळाली ती ‘विश्वनाथ : एक शिंपी’ या लघुपटात! निळूभाऊंनी तो लघुपट मोठ्या पडद्यापेक्षा मोठा केला. या लघुपटाने विविध पुरस्कारही पटकावले. यात कांचनला त्याची साईन लाईन असलेली गोष्ट सापडली होती.

ही झाली कांचनची एक धावती फिल्मोग्राफी. पण कांचन नायक या फिल्मोग्राफीच्या बाहेर प्रचंड विस्तारलेलं व्यक्तिमत्त्व होतं. त्याच्या दंतकथा गावगप्पात खूप होत्या, पण मोजून सांगतो, एक म्हणजे एकही माणूस मराठी इंडस्ट्रीतला त्याच्याबद्दल वाईट अथवा वावगं बोलणारा सापडणार नाही. उलट कांचन नायक म्हणताच समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावर स्मितरेषाच उमटे. अत्यंत उमदा, जिंदादिल आणि प्रामाणिक माणूस म्हणजे कांचन नायक.

कांचन नायकला एक व्यक्तित्व होतं. त्याचं बोलणं, हसणं, क्वचित चिडणं, रेअरली संतापणं यातही एक डौल होता. अलीकडच्या भाषेत सांगायचं तर काशिनाथ घाणेकर!

बोलतानाचे त्याचे आरोह, अवरोह, निग्रह लव्हेबल असत आणि पोटात मद्य असेल तर कांचन नायकचे विभ्रम कधी खुमारीत, तर कधी जबरदस्तीत बदलायचे.

यात मग आवडलेली गोष्ट म्हणजे ‘त्या माणसाने तुम्हा सर्वांच्या कानाखाली आवाज काढलाय बरं का!’ अशी एखाद्याची तारिफ. याउलट कुणाची उगीचच तारीफ होऊ लागली की, हळू आवाजात ‘माफ करा, पण ते तेवढ्या योग्यतेचे नाही. म्हणजे खरं तर योग्यतेचेच नाही! उगाच तेवढ्या तरी का म्हणा!’ (या नंतर ‘तेवढ्या’ या शब्दाचे वेगवेगळे व्हॅाईस मोड्यूलेशन!)

कुणी वावगं वागलं तर लगेच ‘मी काय म्हणतो, आपण त्याला माफ करून टाकू. त्याच्याबाबतीत तेवढं पुरेसे आहे.’ ‘इथे’ पुन्हा पुरेसेचे व्हॉईस मोड्यूलोशन!

‘आपल्याला चढली नाहीए’ असं म्हणून चढत्या क्रमाने वरच्या पट्टीत ‘रविन्द्रनाथ टागोर’ असं चार-पाच वेळा म्हणायचा. पोलीस अलिकडे जी लिकर टेस्ट करतात यंत्राने, त्या ऐवजी ही कांचन पद्धत सोपी व चांगली आहे!

चित्रपट माध्यमाचं शिक्षण अनौपचारिक पद्धतीने व शालेय वयापासून प्रत्यक्ष काम करत घेतल्याने कांचनचे काही ग्रह, पूर्वग्रह होते. एकत्र काम करताना या ग्रह, पूर्वग्रहाने काही वेळा तणावाचे वातावरण निर्माण होई. एक पूर्वग्रह असा होता, नोकरी अथवा इतर व्यवसाय करून या क्षेत्रात काम करणारे, वा ज्यांची कौटुंबिक परिस्थिती सुस्थित आहे असे लोक, या क्षेत्रात जास्त असता कामा नयेत. कारण त्यांना काही सिद्ध करायचं नसल्याने वा खूप क्रूड भाषेत सांगायचं तर ज्यांची चूल यावर अवलंबून नाही, त्यांची या क्षेत्रात श्रम करण्याची तयारी तेवढी तळमळीची नसते!

आता या तर्काला पूर्वग्रहच म्हणावे लागेल. कदाचित सुस्थिर लोक येऊन आपल्याला अस्थिर करतील असा न्यूनगंड त्याच्या मनात तयार होत असेल. अशा वेळी कांचन अनोळखी वाटावा इतक्या सूडबुद्धीने सहाय्यकांशी वागायचा. हटवादीपणा करायचा. पण पुढे काळाच्या ओघात ही त्याची अढी व्यक्तिसापेक्ष वा प्रसंगसापेक्ष बदलून मैत्रीत बदलत असे. पण मधला काळ तणावाचा असे.

दत्ताजी यावर काय करत माहीत नाही, पण डॉक्टर पटेल फारच पेशन्सने हे तणाव हाताळत. त्यावेळी डॉक्टर आणि कांचन मधले संवाद म्हणजे एक अभूतपूर्व पर्वणी असे. कांचन आवाजाच्या सर्व पट्ट्या वापरताना, डॉक्टर मध्यम पटीत एकसुरी पद्धतीने सवाल-जबाब हाताळत. आणि मग एका क्षणी कांचन त्यांना कोपऱ्यात सापडे आणि ते निर्णायक घाव घालत. कांचन एकदम गप्प होऊन मग चोरी पकडल्यासारखा गालात हसून सुरुवात करत, नंतर खास कांचन स्टाईलने मोठ्याने हसायचा. विनम्र वाकून हात जोडायचा व मृदू आवाजात विचारायचा ‘काम सुरू करूया?’

आम्ही इतर सहाय्यक, सहकारी या दोघांच्या जुगलबंदीतून सिनेमा शिकत गेलो! डॉक्टर पटेलांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी ना मठ केला, ना कुणी शिष्य. त्यांच्याकडे कसलीच श्रेणी पद्धती नव्हती, अगदी डॉक्टरांनाही कुणीही चौथा सहायककही ‘तुम्ही चुकीचं बोलताय’ असं सांगू शकत असे. पण कांचन स्वत: दिग्दर्शन करताना पटेलांचा हा गुण बाजूला ठेवून ‘कोल्हापूर पॅटर्न’प्रमाणे सहाय्यकांचा प्रसंगी छळवाद आरंभे. ही मास्तरकी, पंतोजीगिरी करायला त्याला आवडे. नंतर तो ते फार मनात ठेवत नसला तरी ग्रह-पूर्वग्रहांचे चक्र त्याच्या डोक्यात चालू राही.

कांचन कोपिष्ट नव्हता, पण संतापी होता. भिडस्त नव्हता, पण (नको तिथे) संकोची होता. तो उधळ्या तर बिल्कुल नव्हता, उलट वैताग यावा इतका काटकसरी होता. त्यातूनही निर्मात्याचे पैसे वाचावेत म्हणून एक रुपयाची झेरॉक्स न काढता एक-दीड किलोमीटर चालत जाऊन पन्नास पैशात ती काढण्याचा हट्टीपणा स्वत: करे किंवा सहाय्यकाला करायला लावे. अशा वेळी जर सहाय्यक म्हणाला, ‘वरचे पन्नास पैसे मी भरतो!’ की मग सगळं संपलंच.

हे जसे त्याचे काही हट्ट, दूराग्रह होते, तसेच काही आवडीनिवडी, या मागच्या गोल्डन पिरिअड मधल्या होत्या. अमिया चक्रवर्ती, असित सेन, के. असिफ, राजकपूर वगैरे सायंकालीन मैफिलीत सक्तीने व वारंवार ऐकावे लागत. नव्याचे त्याला वावडे नव्हते, पण असोशी नव्हती. कुठल्याही नव्या प्रयोगावर तो सावध अथवा प्रतिक्रियाच देत नसे. चित्रपटात गाणी असावीत या मताचा तो होता आणि म्हणूनच राजकपूर वा डॉक्टर पटेल यांच्या संगीताच्या कानाचा परिणाम त्यांच्या सिनेमात कसा दिसतो, हे तो हिरिरीने सांगे. तो मनाने ‘गोल्डन इरा’त जगत असल्याने मेलडी त्याला अधिक भावे. त्यामुळे मोडकांचे प्रयोग स्वीकारत असला तरी मनाच्या कोपऱ्यात श्रीनिवास खळे, श्रीधर फडके, वसंत पवार असत. तिथे तो कम्फर्टेबल असे.

अशोक राणे यांच्यासारखा मित्र जगभरचे सिनेमे बघत असे. प्रभातचा चित्र मंडळात असताना अनेकांना त्याचे सभासदस्यत्व घ्यायला लावे. कांचनही त्याचा पूर्वापार सभासद. देशी, विदेशी प्रादेशिक सर्व प्रकारचे सिनेमे कांचन बघे. पण तो कुणाचा भक्त नाही झाला. त्याला कथा, पटकथेतील नावीन्याचा शोध असे. तंत्राबद्दलही तो फार बोलत नसे. म्हणजे कुणाचं तरी नाव घेऊन कानाची पाळी पकडणारा कांचन नव्हता. तर ‘‘पथेर पांचाली’त तो सीन म्हणजे रे नावाचा मनुष्य तुमच्या कानाखाली आवाज काढतो!’ अशी त्याची दाद असे. मग ते नाव कधी रे, कधी घटक, कधी बर्गमन, कधी कुरोसावा तर कधी अनंत माने, दत्ताजी व डॉक्टर पटेल. त्यामुळे अशोक राणेलाही कधी तरी “वो! तुमचा असेल तारकोफारकोव्हास्की पण आमचा अमिया चक्रवर्ती पण कमी नाही.” असं दमदाटीनं ऐकून घ्यावं लागे.

कांचन तर आता गेला, पण त्याच्या जिवंतपणीपण प्रश्न पडे की, या माणसानं सहाय्यक पदातच अर्धे आयुष्य का घालवलं असेल? याने झडझडून सिनेमे का नाही केले? हा न सापडलेल्या गोष्टीत इतका का अडकला? लहान मुलांची प्रचंड आवड असलेल्या कांचनने लग्न केलं तेही खूप उशिरा, पण मित्र-मैत्रिणींच्या मुलांवर माया करणाऱ्या कांचनने संसारातही दुर्लक्ष का केलं? चित्रपटाचं असं एकही अंग नव्हतं, ज्यात त्याला गती नव्हती. तरीही आपली चित्रपटीय कारकीर्द त्याने इतकी सस्ती का केली? नंतरच्या काळात त्याला मालिका करताना पाहून वाटायचं, याला यात काय आनंद मिळत असेल? आपले हक्काचे चित्रपटांचे घर सोडून हा या मालिकांच्या भाड्याच्या घरात काय करतोय?

अशा गंभीर प्रश्नावर क्षणभरच अंतर्मुख झाल्यासारखा तो तोंडावर आडवी तर्जनी ठेवून दोन्ही पाय जोरजोरात हलवत बसे. कदाचित त्याच्या अस्वस्थ मनाचे तेच नि:शब्द उत्तर असावे.

स्वच्छ पांढऱ्या कागदासारखा कुठलीही रेघ, टिंब, समास नसलेल्या खुल्या अवकाशासारखा कांचन प्रत्यक्ष व सिनेमाच्या जगात मोकाट जगला. आपल्या मर्जीने जगला व मर्जीनेच क्षणात सटकला.

एखाद्याला महत्त्व द्यायचं नसेल तर मद्यभारित अवस्थेत कांचन, त्या माणसाचे नाव घेऊन आपला तळहात तोंडाजवळ आणून तळहातावर फुंकर मारून ‘फूssss’ असा मुलायम आवाज करी. जणू धूळच उडवतोय! स्वत:चं आयुष्यही त्याने असंच स्वत:च ‘फूssss’ केलंय!

ती अदृश्य सप्तरंगी धूळ निरखत राहणं एवढंच आपण करू शकतो!

..................................................................................................................................................................

कळफलक’ सदरातील हा शेवटचा लेख.

‘अक्षरनामा’चे प्रकाशक, संपादक व वाचक यांचे मन:पूर्वक आभार.

..................................................................................................................................................................

लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Ashutosh Potdar

Thu , 18 June 2020

सुंदर लिहिलेय, सर!


Shriniwas Hemade

Wed , 17 June 2020

सुंदर ..! संजयच्या कळफलकची शेवटची कळ अतिशय योग्य ठिकाणी वापरली गेली...फारच छान लिहिलंय ..


Shriniwas Hemade

Wed , 17 June 2020

सुंदर ..! संजयच्या कळफलकची शेवटची कळ अतिशय योग्य ठिकाणी वापरली गेली...फारच छान लिहिलंय ..


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......