अजूनकाही
विषाणूला धर्म असतो का? महामारीची विचारसरणी असते का? हायड्रोक्सिक्लोरोक्वीनसारख्या साधारण औषधाशी राजकारण जोडलेलं असू शकतं?
दुर्दैवानं या तिन्ही प्रश्नांचं उत्तर ‘हो’ असं आहे. त्यातून हे दिसतं की, आजच्या काळात विष किती भिनलंय. करोनाविरोधात जगभरात आणि भारतातही इतकी अराजकता का आहे, हेही यातून अधोरेखित होतं. जी लढाई एका कडक लॉकडाउनने सुरू झाली होती आणि तिच्यात प्रत्येक जण सहभागी होता, तिचं पर्यवसान सत्ताधारी आणि विरोधी पक्ष, केंद्र सरकार आणि गैरभाजपीय राज्य सरकार यांच्यातल्या ‘तू तू – मैं मैं’मध्ये झालं आहे.
प्रश्न जीवन-मरणाचा असो वा नसो आपल्या सार्वजनिक चर्चांची परिणती अशीच होते, हे खूप निराशाजनक आहे. आपल्या पक्षीय भावना, अंधभक्ती, टोकाचा द्वेष, शंका यांच्या जंजाळात न अडकता या संकटाचा सामना करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं.
आपल्या देशात विषाणूला सुरुवातीलाच एका धर्माशी जोडलं गेलं. त्याच्या प्रसारासाठी तबलिगी जमात या संघटनेला जबाबदार ठरवलं गेलं. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी दोन आठवड्यांपूर्वीच म्हटलं आहे की, त्यांच्या राज्यात करोनाचा प्रादुर्भाव तबलिगी जमातवाले परत आल्यावरच वाढला आहे. गुजरात हे राज्य करोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या तीन राज्यांपैकी एक आहे. तबलिगी जमातचा कार्यक्रम मार्चच्या मध्यात झाला होता. तीन महिने हा कुठल्याही विषाणूसाठी खूप मोठा काळ आहे. करोनामुळे झालेल्या मृत्युंची जी आकडेवारी आहे, ती मार्चच्या मध्यातल्या गुजरातच्या आकडेवारीपेक्षा २० पट अधिक आहे. पण आज कुणी जमातचं नावही घेत नाहीये.
या दरम्यान दुसऱ्या बातम्याही आल्या. महाराष्ट्रातल्या नांदेडमधून आलेल्या शीख प्रवाशांमुळेही करोना पसरला असंही बोललं गेलं. विषाणूला कुठलाही धर्म नसतो, पण त्याला धार्मिक परिषदा आवडतात. खरं म्हणजे दुष्टपणा करण्याच्या बाबतीत करोना विषाणू बराचसा धर्मनिरपेक्ष आहे, पण धादान्त खोटे तर्क मांडण्यासाठी त्याला कुठल्या तरी धर्माशी जोडणं फायद्याचं ठरतं.
करोना महामारीमुळे लॉकडाउनपासून उपचार, प्रादुर्भाव आणि मृत्युपर्यंत अनेक मुद्द्यांवरील चर्चा विचारधारांच्या आधारांवर विभागली गेलेली आहे. जर तुम्हाला नरेंद्र मोदी, डोनाल्ड ट्रम्प, बोरिस जॉन्सन आवडतात; तर तुम्ही असंच गृहित धरून चालता की, त्यांनी काहीही चुकीचं केलेलं नाही. जर ते तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही त्यांना लाखो लोकांच्या मृत्युसाठी जबाबदार धरता. जर ते तुम्हाला आवडत असतील तर तुम्हाला ते महामारीचे अभ्यासकही आवडतील, जे ही महामारी एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत संपेल असं चित्र निर्माण करत आहेत. हे लोक तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही त्या लोकांवर भरवसा कराल की, जे सांगत आहेत भारतासह जगभरात कोट्यवधी लोक मृत्युमुखी पडण्याची शक्यता आहे. पण त्यांचा मे हा डेडलाईनचा महिला तर उलटून गेला आहे.
जोवर या महामारीला या अक्षय वाटणाऱ्या विषाणूचा आधार मिळतोय, तोवर तो विचारधारा वगैरेची पर्वा करणार नाही. पण त्याने जो उत्पात केलाय त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. त्याने अभ्यासकांनाही विचारसरण्यामध्ये वाटून टाकलंय. माझं तर असंही म्हणणं आहे की, महामारीशास्त्र एक संपूर्ण विज्ञान आहे, त्याची परंपरा अनेक वर्षांची आहे. पण २०२०मध्ये तीही सापळ्यात अडकलीय.
जवळपास सात दशकांपासून मलेरियासाठी वापरल्या जाणाऱ्या हायड्रोक्लिक्लोरोक्वीन किंवा एचसीक्यूविषयी बरंच काही लिहिलं गेलंय. पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या औषधाची शिफारस ‘गेमचेंजर’ (कुठल्याही वैज्ञानिक प्रमाणाशिवाय) म्हणून काय केली आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते अमेरिकेला पाठवायला सुरुवात काय केली! त्यामुळे हे औषध एक राजकीय फुटबॉल झाला! एका पक्षानं या औषधाला देवानं आधीच पाठवलेलं वरदान म्हणून जाहीर केलं, तर दुसऱ्यानं करोनासाठी या औषधाचा उपयोग नाही उलट ते उंदिर मारण्याच्या विषासारखं खतरनाक असल्याचं सांगितलं.
गंमत म्हणजे या दाव्यांना कुठलाही वैज्ञानिक आधार नाही. त्याचा परिणाम असा झाला की, ‘ब्लूमबर्ग’च्या बातमीनुसार या औषधावर सर्वाधिक संशोधन सुरू झालं. पण हे संशोधन खूपच घाईघाईत होतंय. दोन्ही पक्ष आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी या औषधाच्या निष्कर्षांची वाट पाहत आहेत.
यावरून इतकं राजकारण केलं गेलं की, ‘द लॅन्सेट’सारखं गंभीर वैद्यकीय नियतकालिकही त्याच्या सापळ्यात फसलं. त्यानं घाईगडबडीत या औषधांबाबतचे दावे खोडून काढणारा एक लेख प्रकाशित केला, ज्याचा प्रतिवाद एखादा उपसंपादकही करू शकला असता की, हा लेख संदिग्ध आकडेवारीवर आधारित आहे. आकडेवारी गोळा करणाऱ्या ‘सर्जिस्फेअर’ या कंपनीविषयी गूगल सर्चसारख्या प्रारंभिक साधनाचा वापर केला असता तरी समजलं असतं की, त्यांच्यावर भरवसा ठेवणं धोक्याचं आहे. ‘द गार्डीयन’च्या बातमीदार मेलिस डेव्ही यांनी आपल्या शोधपत्रकारितेतून हे दाखवून दिलंच आहे.
याविषयीचं दै. हिंदूचं एक संपादकीय मला विशेष आवडलं. मलाही इतकं चांगलं लिहिता आलं असतं तर! त्यात म्हटलंय – “Post-Covid world is a panic-driven one that has left no institution or appraisal process untouched”. पुढे म्हटलंय – “The key lesson is that it is a mistake to assume the scientific process as one divorced from the influence of power, privilege, finance and politics”. या लेखाचं श्रेय या प्रखर संपादकीयालाच जातं.
या सर्वांचं महत्त्व काय? सध्याच्या दिवसांत प्रत्येक गोष्टीचं राजकीयीकरण, ध्रुवीकरण झालेलं नाही? प्रत्येक गोष्टीवरून कटुता निर्माण केली गेली नाहीये? मग करोना महामारी तरी त्याला अपवाद कशी राहणार?
या प्रश्नांचं एक उत्तर आहे. याबाबतीत तुमचा देश जर शत्रूची परिभाषा काय आहे, याच दुविधेत असेल तर मग असा प्रश्न पडतो की, तुम्ही कुणाशी लढताय आणि कुठल्या हत्यारानिशी लढताय?
राजकारण कधीही थांबणार नाही, पण तुम्ही काही काळासाठी पक्षपात करणं नक्कीच थांबवू शकता. समस्येला तज्ज्ञ आणि लढवय्यांच्या भरवशावर सोडू शकता. नवी दिल्लीत माध्यमांना माहिती देणाऱ्या ‘कोविड टास्क फोर्स’च्या मोठ्या अधिकाऱ्यांची खिल्ली उडवली जाते, त्यातून काहीच साध्य होणार नाही. ते पूर्ण माहिती देत नाहीत हे खरंच आहे, त्याविषयीची तक्रार मीही केलेली आहे. पण त्यांची सोशल मीडियावर खिल्ली उडवून काहीच साध्य होणार नाही.
पुढच्या वेळी त्यांना टीव्हीवर पाहताना, खासकरून आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांच्या डोळ्याखालच्या काळ्या वर्तुळांकडेही पहा. इतरांचेही असेच हाल आहेत. हे लोक गेल्या तीन महिन्यांपासून जबाबदारीनं काम करत आहेत. हे काम तणावाचं काम आहे. त्यासाठी त्यांना कुणीही ‘थँक यू’ म्हणणार नाही.
आपल्याला माहीत आहे की, विषाणूमुळे आजारी पडणारे आणि गंभीर आजार पडणारे यांचंही बरं होण्याचं प्रमाण जास्तच राहणार आहे. ही टक्केवारी अजून वाढू शकते. त्यासाठी आपलं लक्ष तपासण्यांची गती वाढवणं, गरजूंना वेळेत ऑक्सिजनचा पुरवठा करणं आणि ज्यांना आवश्यकता आहे त्यांना रुग्णालयात बेड उपलब्ध करून देणं, यावर केंद्रित व्हायला हवं.
मुंबईतली आकडेवारी (दुर्दैवानं अशी आकडेवारी दिल्लीत मिळत नाही) सांगते की, संसर्ग झाल्यानंतर बहुतेक मृत्यु चार दिवसांच्या आतच होतात. याचा अर्थ संसर्गजन्य रुग्णांपर्यंत पोहचण्यात आणि त्यांच्यावर उपचार करण्यात उशीर होतोय. फक्त ऑक्सिजन (व्हेंटीलेटर नाही) उपलब्ध करून देण्यानं काहींचा जीव वाचू शकतो. त्यामुळे संसर्गवाढ आणि मृत्युदर यावरून राजकारण करण्यापेक्षा अशा गोष्टींची मागणी करणं आणि त्या उपलब्ध करून देणं यांची जास्त गरज आहे.
आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की, सूक्ष्म, गूढ बोलणं हे आत्महत्याकरण्यासारखं आहे. (तर्क करणाऱ्यांसाठी, सदर लिहिणाऱ्यांसाठी नाही) हा धडा मला मागच्या आठवड्यात या सदरात लिहिलेल्या लेखांवर आलेल्या प्रतिक्रियांवरून मिळाला. त्यात मी हे सांगायचा प्रयत्न केला होता की, मोदी सरकार आर्थिक सुधारणा लागू करण्याच्या बाबतीत मागे का पडतेय.
त्यामुळे मी या वेळी आधीच ही खबरदारी घेतोय की, नंतर यावरून वाद निर्माण होऊ नये. मी मोदी सरकारवर कुठलाही प्रश्न उपस्थित करण्याला विरोध करत नाहीये हे लक्षात घ्या. मोदींचे नंबर दोन, अमित शहा यांच्यासह तमाम भाजपनेते करोना महामारीवरून गैरभाजपीय सरकारांवर निशाणा साधत आहेत किंवा ते त्यांना पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, हे सर्व आपला दुष्ट राजकीय स्वार्थ साधण्यासाठी एका गंभीर महामारीचा फायदा उठवत केलं जातं आहे. या एकमेकांना शह-काटशह देण्याचा किंवा एकमेकांना शिव्याशाप देण्याचा परिणाम समोर येतो आहे. आणि सध्यातरी असं वाटतंय की, करोना महामारी कुणाच्याही नियंत्रणात येताना दिसत नाहीये.
..................................................................................................................................................................
हा मूळ हिंदी लेख ‘द प्रिंट’वर १३ जून रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा -
..................................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment