अजूनकाही
सुशांत सिंह राजपूत. हिंदी सिनेसृष्टीतला एक आघाडीचा अभिनेता. जन्म १९८६ सालचा, बिहारमधील पाटण्याचा, पण नंतर दिल्लीत स्थायिक झालेला. २००३ मध्ये एआयइइइ ऑल इंडिया रँक ७, दिल्ली कॉलेज ऑफ इंजीनिअरिंगमधून पदवीसाठी निवड, भौतिकशास्त्र या विषयातून राष्ट्रीय ऑलिम्पियाड विजेता, ‘काई पो चे’ या चित्रपटातून ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता पदार्पण’ म्हणून नामांकन, ‘एम.एस. धोनी’ चित्रपटासाठी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ म्हणून नामांकन आणि बरंच काही... आपण ज्याला यशाचा टप्पा किंवा शिखर असं म्हणतो, तिथंपर्यंत खरं तर सुशांत पोहचला होता. पण परवा त्याने अचानक एक्झिटच घेऊन टाकली. तीही वयाच्या ३४ व्या वर्षी. राहत्या घरी. गळफास घेऊन. मित्र घरी असताना.
काही दिवसांपूर्वी इरफान खान गेला. आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी ऋषी कपूर. त्यानंतर वाजिद खान. मात्र इतक्या कमी वयात सुशांतनं अशा प्रकारे जीवन संपवणं, ही गोष्ट अजूनसुद्धा खरी वाटत नाही. सुरुवातीला तर हा पब्लिसिटी स्टंटचाच प्रकार आहे की काय असंही वाटून गेलं. टीव्हीवर बातम्या पाहूनसुद्धा ही बातमी खरी आहे, हे मान्य करायला मन तयार होईना.
असं काय झालं असावं? सुशांतनं इतकं टोकाचं पाऊल का उचललं असावं?
काही दिवसांपूर्वीच त्याच्या मॅनेजरचाही मृत्यू झाल्याचं समोर आलं आणि लगेचच सुशांतच्या आत्महत्येची बातमी. या घटनेनं अनेक चित्रपटप्रेमी हादरून गेले. सोशल मीडियावर तर दुःखद संदेशांचा महापूर आला! देशातील महत्त्वाच्या, अति महत्त्वाच्या व्यक्तींनी हा एक न पचणारा धक्का असल्याचं सांगितलं. त्याच्यासोबत काम केलेल्या मंडळींनी तो किती चांगला होता, किती मोठा होता आणि त्याचं असं अकाली जाणं मनाला किती वेदना देणारं, हे सांगितलं. प्राथमिक तपासामध्ये तो नैराश्यात गेला होता आणि त्यासाठी तो मानसोपचार आणि नैराश्य दूर करण्याची औषधं घेत होता असं समोर आलं आहे. एक-दोन दिवसांमध्ये या आत्महत्येमागची खरी कारणं समोर येतील. पण तोपर्यंत त्याच्या तमाम चाहत्यांना त्याचं असं अचानक जाणं समजावून घेणं अतिशय अवघड जाणार आहे.
आत्महत्येसारखं अघोरी पाऊल उचलणारा सुशांत हा काही हिंदी सिनेसृष्टीतील पहिलाच अभिनेता नाही. त्याच्या आधी प्रत्युषा बॅनर्जी, जिया खान आणि आणखीही अनेकांनी असंच टोकाचं पाऊल उचललं आहे.
सुशांतच्या आत्महत्येनं आपल्या जवळचं कोणीतरी गेलंय आणि आपल्या रोजच्या जगण्याचे संदर्भ बदलून जाणार आहेत, असं वाटू लागलंय. लोभस चेहरा, कोणालाही आपलंसं करण्याची डोळ्यांमधली लकब, भाबडा, समंजस, गुणी, अगदी तुमच्या-आमच्यातलाच एक... ही सर्व वैशिष्ट्यं सुशांतला सहज लागू पडतात. हिंदी मालिकांमधून सुरुवात करून नंतर स्वतःच्या गुणवत्तेच्या जोरावर हिंदी चित्रपटांमध्ये आपलं स्थान निर्माण करणारा, आपली भुरळ पाडणारा, अगदी निरागस चेहऱ्याचा सुशांत असं टोकाचं पाऊल उचलू शकतो, यावर अजूनही विश्वास बसत नाही.
हिंदी सिनेसृष्टी म्हणजे यश, पैसा, प्रसिद्धी हे जितकं खरं आहे, तितकंच हिंदी सिनेसृष्टी म्हणजे नैराश्य, गुन्हेगारी, अपेक्षाभंग, एकाकीपण, उदासीनता. केवळ सिनेसृष्टीच नव्हे तर जिथं कुठे प्रचंड पैसा आणि मानसन्मान, प्रतिष्ठा मिळते, त्या प्रत्येक क्षेत्रात अशाच प्रकारची उदाहरणं कमी-जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. यात दोष या क्षेत्रांचा की, त्यात येण्यासाठी वाट्टेल ते करू पाहणाऱ्यांचा? मनोरंजन विश्वाचं जनमानसावर असणारं अधिराज्य पाहता इथं होणारी सर्वसामान्य गोष्ट काही सेकंदातच सर्वांपर्यंत पोहोचते, आणि तिची दाहकताही तितकीच प्रखर असते.
दर वर्षी मुंबईनगरीत लाखोंच्या संख्येनं तरुण-तरुणी आपली स्वप्नं घेऊन पोहोचतात. त्यातल्या काहींची स्वप्नं खरीही होतात. त्यासाठी तडजोड (आजच्या भाषेत ‘स्ट्रगल’) करण्याची बहुतेक सर्वांचीच तयारी असते. काहीही करून यशस्वी व्हायचं आणि त्यासाठी हवं ते करायचं, अशा मनोवृत्तीतून नवी पिढी आपलं ध्येय प्राप्त करायला निघते. त्यासाठी घरदार सोडणं, शिक्षण सोडणं, व्यवसाय सोडणं, आपली माणसं सोडणं, अशा वेगवेगळ्या तडजोडी ही मुलं करताना दिसतात. आपल्यामध्ये या क्षेत्रासाठी लागणारे गुण, कौशल्यं खरोखरच आहेत का? ती नसतील तर त्यासाठी काही मेहनत घेणं गरजेचं आहे का? ही कौशल्यं असली तरी नक्की यश मिळेल का? आणि यश म्हणजे नेमकं काय, या प्रश्नांची उत्तरं या मुलांपैकी किती जण स्वतःला विचारात असतील? यातील कितीतरी जण तर नाकारलं जाण्याच्या भीतीनं मिळेल ते काम करत राहतात.
नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणामध्ये २०२० सालानंतर बहुसंख्य भारतीय लोक मधुमेह, रक्तदाब यांसारख्या विकारांपेक्षा मनोविकारांनी त्रस्त असतील असं निरीक्षण नोंदवलं आहे. येणारा काळ अधिक कठीण असेल असं दाखवून देणाऱ्या घटना आजूबाजूला घडत आहेत. अगदी चांगल्या घरातील मुलांनी मोबाईल गेम्सना बळी पडून आयुष्य संपवल्याची उदाहरणंही ताजी आहेत. नैराश्याच्या गर्तेत जाऊन स्वतःला, नाहीतर इतरांना इजा करणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढतेच आहे.
सध्याच्या काळात यापूर्वी कधीही न ऐकलेले गुन्हे घडत आहेत. हा दोष नेमका कोणाचा आहे? जाणकार म्हणतात की, हा या पिढीचा दोष आहे. पण ही पिढी कोणामुळे घडते? आपल्यामुळेच ना? आधीच्या पिढीपेक्षा बऱ्यापैकी वेगळं जीवन ही नवी पिढी जगत असते. तिचा जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन, जगण्याची पद्धत आधीच्या पिढीपेक्षा निश्चितच वेगळी आहे. कारण बदल हा जगाचा नियम आहे. तो जीवनाच्या विविध क्षेत्रांत घडून येतो. तो आपणच घडवून आणलेला असतो आणि स्वीकारलेलाही!
सध्याची आपली जीवनपद्धतीदेखील याच बदलाचं द्योतक आहे. आपण निर्मिलेली, अंगिकारलेली व्यवस्था आपल्यालाच वाचवू शकत नसेल तर ती चूक कोणाची? दुसरीकडे आपण कितीही बदल घडवून आणले तरी काही चिरंतन आणि शाश्वत मूल्यं कोणत्याही काळात बदलत नाहीत. आजही माणसाचं मूल जन्माला आल्यानंतर रडतंच, आनंद झाला की, आपोआप आपल्याला हसू येतं, अति आनंदाच्या प्रसंगी डोळे आणि मन भरून येतं. या सगळ्या गोष्टी जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी कुणाच्याही बाबतीत याच प्रकारे घडतात. माणसाचं माणसाशी असणारं नातं चिरंतन असतं.
साधना आमटेंनी त्यांच्या ‘समिधा’ या आत्मचरित्रात लिहिलंय की, जेव्हा वेदनेचं वेदनेशी नातं जुळतं तेव्हा ते खरं नातं असतं. या बदलत्या काळात माणसाचं माणसाशी असणारं नातं मात्र आपण हरवून बसतो आहोत. पैसा, प्रसिद्धी याच्या पलीकडे जाऊन उद्याची भीती वाटणं, ती व्यक्त न करता येणं, व्यक्त होण्यासाठी आपलं असं जवळचं कोणी नसणं, ते असलं तरी वेळेला उपलब्ध न होणं, ही अवस्था केवळ सुशांतचीच नाही तर आपल्या सगळ्यांचीच आहे.
आजच्या आभासी (व्हर्च्युअल) दुनियेत आपण जरा जास्तच गुणी झालो आहोत. वरवर गोड बोलणं (कॉम्प्लिमेंट देणं), एकमेकांना लाईक करणं, कोणत्याही क्षुल्लक गोष्टीची वारेमाप स्तुती करणं, रोजच्या जगण्यातले बारीकसारीक तपशील सोशल मीडियावर टाकणं, ते किती जणांनी पाहिलं, त्याला किती जणांनी लाईक केलं, हे सतत तपासत राहणं, दुसऱ्याच्या सोशल मीडियावरील छायाचित्रं अथवा पोस्ट्स पाहून अस्वस्थ होणं, हा एक असाध्य आणि दुर्धर रोग आपल्याला जडलेला आहे. आणि हा संसर्गजन्य आजार आहे. करोनाच्या संसर्गगतीपेक्षाही कितीतरी प्रचंड गती असलेला. तुम्ही पहा, जेव्हा दोन व्यक्ती समोरासमोर येतात, तेव्हा त्यांच्याकडे प्रत्यक्ष बोलण्यासाठी विषयच नसतात अनेकदा!
सुशांतच्याही बाबतीत असंच झालं असेल का? आपलं दुःख, एकटेपण कोणासोबत तरी वाटून घ्यावं असं त्याला वाटलं असेल का? यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर त्याला गुदमरल्यासारखं झालं असेल का? नेमकी कसली भीती त्याला वाटत असेल? तो नैराश्याची औषधं घेत असेल? सगळं काही असूनही काहीच नाही असं त्याला वाटत असेल? कशामुळे? हा सिनेसृष्टी नावाच्या झगमगत्या दुनियेचा दोष म्हणायचा की, त्याला भुलणाऱ्यांचा?
कोणत्याही क्षेत्रात कमी-जास्त प्रमाणात निराशाजनक गोष्टी घडतच असतात. तिथं संघर्ष करणाऱ्या प्रत्येकानेच असा टोकाचा विचार करायचा का? या पिढीची यशाची नेमकी व्याख्या तरी काय आहे? कशासाठी एवढी जीवाची ओढाताण करायची? काय मिळवायचंय? काय गमवण्याची भीती वाटते? यासारखे अनेक प्रश्न मनात निर्माण होत आहेत, काहूर माजवत आहेत.
मुळात माझं जीवन हे माझं एकट्याचं कधीच नसतं. त्यावर माझे पालक, सहचर, मुलं, समाज आणि देशाचाही हक्क असतो. त्यांच्यासाठी, त्यांचं ऋण फेडण्यासाठी मी स्वतःच्या पलीकडे जाऊन काहीतरी करण्याची गरज असते. त्यामुळेच मला हवं तसं मी जगेन, नाही तर मरून जाईन, या भूमिकेचं फार समर्थन करता येत नाही. मी या समाजाचा, त्यातील लोकांचा ऋणी आहे आणि ते ऋण कोणत्या ना कोणत्या मार्गानं फेडणं हे माझं कर्तव्य आहे, असे संस्कार रुजवण्यात आपण कमी पडतो आहोत?
जगातील बहुतांश सर्वच महान व्यक्तींच्या वाट्याला उपेक्षा, अवहेलना आलेली आहे. मूलभूत गरजाही जिथं पूर्ण होणं अशक्यप्राय होतं, तिथं या व्यक्तींनी काळावर आपला ठसा उमटवला. त्यामध्ये स्वातंत्र्यसैनिकांपासून समाजसुधारक, शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, विचारवंत अशा अनेकांचा समावेश होतो. त्यांच्याविषयी पुष्कळ लिहिलं गेलं आहे. हे लोक त्या त्या काळानेच घडवलेले आहेत. त्या तुलनेत आजच्या लवचीक समाजव्यवस्थेत, आपापली स्वातंत्र्यं जपत, मूल्यं जोपासत आपण तसे सुखनैव जगत आहोत. म्हणूनच आत्ममग्न अवस्थेत रममाण होण्यास प्रवृत्त करणारी आणि आपल्या या अवस्थेचं भरणपोषण करणारी सध्याची ऑनलाईन व्हर्च्युअल व्यवस्था बदलणं अनिवार्य आहे.
काल सुशांतला आपल्यातून घेऊन गेलेली ही व्यवस्था उद्या आणखी कुणाला तरी घेऊन जाणार, परवा अजून आणखी कुणाला. तेव्हा वेळीच सावरणं महत्त्वाचं. आपली स्वप्नं, आपल्या इच्छा-आकांक्षा, आपली यशाची संकल्पना आपल्या माणसांसोबत राहून पूर्ण करता आली तर जास्त चांगलं. मी, मला, माझं या विळख्यातून बाहेर पडून आम्ही, आम्हाला, आमचं जाण्याची गरज आहे. तीच खरी मानवी उत्क्रांती आहे किंवा तसं मानण्याची नितांत निकडीची गरज आहे.
सुशांतचं अकाली जाणं मनाला चटका लावून जाण्याचं कारण म्हणजे एम. एस. धोनीसारख्या त्यानं साकारलेल्या व्यक्तिरेखा, प्रचंड संघर्षातूनही स्वतःविषयी निर्माण केलेला विश्वास, कष्ट करण्याची जिद्द, प्रामाणिकपणा, वाटेत अडसर ठरलेल्यांना आपल्या मेहनतीनं दिलेलं उत्तर आणि आईवरची त्याची नितांत श्रद्धा. त्याचा अभिनय बोलका होताच आणि मनस्पर्शीही. गेल्या वर्षीच्या ‘छिछोरे’ या चित्रपटातील त्याची भूमिका आणि त्याचे संवाद आठवताहेत. ‘यशाचं सूत्र, त्याच्या योजना सगळ्यांकडेच असतात; मात्र अपयश आल्यावर काय करायचं हे कोणीच का बोलत नाही?’ हा संवाद बोलणारा सुशांत तो स्वत:ही जगला असता तर? तसा त्याने प्रयत्नच केला नसेल का? अर्थात ‘जर-तर’ला आता काही अर्थ नाही.
या भीषण वास्तववादी जगातील स्पर्धेला सामोरं जाताना चित्रपटातील संवाद तिथेच सोडून तो गेला. अगदी कायमचा. आपल्या मनाला असंख्य वेदना देऊन...
त्याला माफ करावं की करू नये?
..................................................................................................................................................................
लेखिका प्रिया काळे एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे येथे सहाय्यक प्राध्यापक आहेत.
kaprish226@gmail.com
..................................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Krushna Anandrao
Tue , 16 June 2020
nice article....