प्रसिद्धीचा सोस न बाळगता, निराश न होता आणि महत्त्वाकांक्षी न राहता निरलसपणे काम करता येतं, ते कसं, हे जाणून घेण्यासाठी हा लघुपट पाहायला हवा
कला-संस्कृती - चलत्-चित्र
टीम अक्षरनामा
  • कॉ. शांता मधुकर रानडे यांची ग्रंथसंपदा आणि त्यांच्यावरील लघुपटाचं एक पोस्टर
  • Mon , 15 June 2020
  • कला-संस्कृती चलत्-चित्र कॉ. शांता रानडे Shanta Ranade भारतीय कम्युनिस्ट पक्ष भाकप CPI

दोन वर्षांपूर्वी, अगदी अचूक सांगायचं तर ५ डिसेंबर २०१८ रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (भाकप) पुण्यातील ज्येष्ठ कार्यकर्त्या कॉ. शांता मधुकर रानडे यांचं वयाच्या ९३व्या वर्षी निधन झालं. त्या वेळी त्यांच्याविषयी साधारणपणे २००-२५० शब्दांच्या बातम्या पुण्यातील काही वर्तमानपत्रांत आल्या. साहजिक आहे, कारण कॉ. रानडे या दुसऱ्या फळीतल्या कार्यकर्त्या. मात्र नुकताच त्यांच्याविषयी ‘कॉम्रेड शांता रानडे’ हा एक तास दहा मिनिटांचा लघुपट प्रकाशित झालाय. हा लघुपट अमृता महाडिक यांनी तयार केला आहे. त्यांनी जवळपास सगळी कामं एकहाती करून या लघुपटाची निर्मिती केली आहे. अतिशय ममत्वानं, फायद्या-तोट्याचा विचार न करता त्यांनी हा लघुपट बनवला आहे. कॉ. रानडे ९० वर्षांच्या असताना या लघुपटाचं सगळं शुटिंग त्यांनी केलं होतं. कालच्या ‘मातृदिना’ (१० मे २०२०)चं निमित्त साधून हा लघुपट त्यांनी सर्वांसाठी उपलब्ध करून दिला आहे.

हा लघुपट पुढील कारणांसाठी पाहायला हवा-

१) १९३०-४०च्या दशकात मुलींनी शिक्षण घ्यायचं ते शिक्षिका किंवा नर्स होण्यासाठी इतपतच महाराष्ट्रीय समाजाची दृष्टी विस्तारली होती. तीही पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरांत. त्यामुळे पुण्यातल्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या कॉ. रानडे यांचा पिंड काही राजकारणात पडण्याचा नक्कीच नव्हता, पण त्या पडल्या. त्याही त्या काळी ‘देशद्रोही’ समजल्या जाणाऱ्या कम्युनिस्ट पक्षाच्या राजकारणात पडल्या. आणि शेवटपर्यंत निरलसपणे, नि:स्वार्थीपणे, प्रामाणिकपणे पक्षाचं पडेल ते काम करत राहिल्या. त्यांनी कधीही कुठल्याही पदाची महत्त्वाकांक्षा बाळगली नाही. पक्ष सांगेल ते काम करायचं एवढीच खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली होती. ती त्यांनी शेवटपर्यंत जपली. हा त्यांचा प्रवास कसा झाला, हे या लघुपटातून प्रत्यक्ष त्यांच्याकडूनच ऐकायला मिळतं.

२) म. गांधी यांनी तत्त्वहीन राजकारण, नीतिमत्तारहित व्यापार, कष्टाविना संपत्ती, चारित्र्याविना शिक्षण, मानवतेविना विज्ञान, विवेकहीन सुखोपभोग आणि त्यागरहित भक्ती, अशी सात ‘सामाजिक पापकर्मे’ सांगितली आहेत. या पापकर्मांच्या विरोधात लढण्याचं काम कम्युनिस्ट पक्षातील सगळ्या संस्था-संघटना आणि नेते-कार्यकर्ते करतात. या मूल्यांचा साधा उच्चारही न करता ही मूल्यं कशी जपली, हे या लघुपटात कॉ. रानडे यांनी कुठलाही अभिनिवेश न बाळगता अतिशय सहजपणे सांगितलं आहे. ते निव्वळ श्रवणीय आहे. वयाच्या ९०व्या वर्षीही त्यांचं स्मरण, बोलणं, वाणी, लयबद्धता, शांतपणा आणि सहजपणा वाखाणण्याजोगा आहे.

३) अनेक सच्चे कम्युनिस्ट आयुष्यभर पक्षासाठी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून काम करतात. पण उतारवयात ते बाजूला पडतात. तेव्हा त्यांच्यापैकी अनेक जण कडवट होतात, निराश होतात. आपला उपयोग संपल्याने पक्षानं आपल्याला अडगळीत टाकून दिलंय, याची खंत त्यांना नैराश्यग्रस्त करते. कॉ. रानडे यांचं तसं अजिबात झालेलं नाही. उलट त्यांचा आशावाद शेवटपर्यंत किती बुलंद होता, हे या लघुपटातून आपल्याला समजतं.

४) आयुष्यातली उमेदीची वर्षं स्त्रियांना समान हक्क, न्याय मिळवून देण्यासाठी कॉ. रानडे यांनी रचनात्मक संघर्ष करण्यात घालवली, पण आजही स्त्री-समानतेच्या लढाईला बराच पल्ला गाठायचाय, याचं भान त्या निराश न होता, ज्या साधेपणानं सांगतात, ते त्यांच्या तोंडून ऐकण्यासारखं आहे.

५) कॉ. रानडे या सच्च्या कम्युनिस्ट होत्या, पक्षावर त्यांची शेवटपर्यंत निष्ठा होती. पण म्हणून विरोधकांविषयी त्या द्वेष बाळगून होत्या, असं अजिबात नाही. उलट सर्वपक्षीय सौहार्दाविषयीच्या अनेक आठवणी त्या सहजपणे सांगतात. तेही श्रवणीय आहे. सध्याच्या काळात तर अनुकरणीयसुद्धा.

६) भारतीय राजकारणात आजघडीला सामाजिक नीतीमत्ता, सार्वजनिक चारित्र्य, साधी राहणी, व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा, महत्त्वाकांक्षा न बाळगता निरसलसपणे आपलं काम करणं आणि तळागाळातल्या शोषितांचा कळवळा, हे फक्त कम्युनिस्ट पक्षातील नेत्या-कार्यकर्त्यांमध्येच दिसतं. त्यापैकीच एक शिलेदार कॉ. रानडे होत्या! हेही त्यांच्या या लघुपटातून चांगल्या प्रकारे उलगडलं आहे.

कॉ. रानडे यांचं बालपण, शिक्षण, नोकरी, लग्न, पक्षकार्य, स्वातंत्र्यचळवळ, सोव्हिएत रशिया, ऑल इंडिया स्टुडन्ट फेडरेशन, फ्रेंडस ऑफ द सोव्हिएत युनियन, ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्स या संस्थांशी त्यांचा असलेला संबंध, रशियन भाषेच्या शिक्षिका अशा विविध गोष्टीही या लघुपटातून जाणून घेता येतात.

कॉ. रानडे यांनी ‘प्रागतिक पुस्तक प्रकाशन’ या संस्थेचं १९७०-८८ या १८ वर्षांच्या काळात प्रकाशक म्हणून काम केलं. २५-३० पुस्तकं प्रकाशित केली. या प्रकाशनसंस्थेतर्फे कार्ल मार्क्स यांच्या ‘दास कॅपिटल’ या जगविख्यात ग्रंथाचा पहिला मराठी अनुवाद तीन भागांत प्रकाशित झाला. तोही अत्यंत देखण्या स्वरूपात. या शिवाय त्यांनी थेट रशियन भाषेतून मराठीत अनुवादित केलेल्या ‘सागराचा जन्म’ या कादंबरीला सोव्हिएत लँड नेहरू पारितोषिक मिळालं होतं. याशिवाय त्यांनी इतरही काही पुस्तकांचे अनुवाद केले आहेत. सावित्रीबाई फुल्यांचं छोटंसं चरित्रही त्यांनी लिहिलं आहे.

कॉ. रानडे यांचा भारतीय महिला फेडरेशन, श्रमिक महिला समिती अशा विविध महिला संघटनांच्या कामात सक्रीय सहभाग होता. भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय महिला फेडरेशन, स्त्री मुक्ती आंदोलन संपर्क समिती, लोकशाही उत्सव समिती अशा अनेक गटांबरोबर त्या अखेरपर्यंत सक्रीय होत्या.

पक्षकार्यात, विविध संघटनांमध्ये सक्रिय राहूनही प्रसिद्धीचा सोस न बाळगता, निराश न होता, अहंकाराच्या वाऱ्याला उभं न राहता आणि महत्त्वाकांक्षी न राहता निरलसपणे काम करता येतं, याचं एक उत्तम उदाहरण जाणून घेण्यासाठीही हा लघुपट पाहायला हवा.

..................................................................................................................................................................

कॉ. शांता रानडे यांच्यावरील लघुपट पाहण्यासाठी क्लिक करा -

https://www.cultureunplugged.com/documentary/watch-online/play/55326/Comrade-Shanta

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.      

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Gaurav Dhane

Mon , 15 June 2020

documentary kutha bagayla milel....


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......