अजूनकाही
त्या दोघींमध्ये प्रचंड साम्यस्थळं आहेत. अगदी त्यांची नियती कुणीतरी खाली कार्बन कॉपी ठेवून लिहिलीय की काय असं वाटतं. त्या दोघी नावापुरत्या अभिनेत्री. अभिनेत्री असल्या तरी दोघींच्या चेहऱ्यावरची रेषही अभिनय करताना हलत नव्हती. त्या दोघींनी पडद्यावर अभिनय सोडून बाकी सगळं केलं. उदाहरणार्थ, नाचणं, प्रेमगीत म्हणणं, मेकअप करणं, नावापुरते कपडे घालणं इत्यादी. आणि सगळ्यात महत्त्वाचं साम्यस्थळं म्हणजे त्यांच्या आयुष्यात आलेले पुरुष. त्यांच्या आयुष्यातल्या पुरुषांनी त्यांना नाव मिळवून दिलं, सिनेमे मिळवून दिले, त्यांना मनसोक्त गैरफायदा घेतला आणि बदनामीच्या एका खोल न संपणाऱ्या गर्तेमध्ये फेकून दिलं. त्या 'दोघी' म्हणजे मंदाकिनी आणि मोनिका बेदी.
त्यांचा भलाबुरा इतिहास सगळ्यांनाच माहीत आहे. त्यांच्या आयुष्यात येऊन गेलेले पुरुषही सगळ्यांना माहीत आहेत. त्या दोघी एकेकाळी भरपूर लाइमलाईटमध्ये असल्या तरी त्यांना नव्यानं आयुष्य सुरू करण्यासाठी काय यातायात करावी लागली असेल, याची कल्पना करणं कठीण.
मंदाकिनी उर्फ यास्मिन जोसेफ म्हटलं की, लोकांना 'राम 'तेरी गंगा मैली' आठवतो आणि दाऊद इब्राहिम. त्यात काही चूकही नाही. तिला काही सिनेमांमधून क्रांती करायची नव्हती की, तिला काही सामाजिक जाणीव नव्हती. सिनेमात पैसे मिळतात म्हणून दिसायला सुंदर असणारी ही मुलगी या क्षेत्रात आली. राज कपूरसारख्या शोमॅनने तिला पहिली संधी दिली, पण मंदाकिनीच्या करिअरने कधी उड्डाण घेतलंच नाही.
त्यावेळेस बॉलिवुडभोवती अंडरवर्ल्डचा घट्ट विळखा होता. अंडरवर्ल्ड डॉन अनेक निर्मात्यांना पैसे पुरवत असत. सर्वसामान्य लोकांप्रमाणेच हे डॉन बॉलिवुडच्या ग्लॅमरकडे आकर्षित झाले होते. एखादी पडद्यावरची हजारो लोकांची दिलो की धडकन असणारी नायिका आपल्या आयुष्यात यावी अशी त्यांचीही 'फँटसी' होती. दाऊद इब्राहिम आणि मंदाकिनी एका पार्टीमध्ये भेटले आणि दाऊद तिच्याकडे आकर्षित झाला अशी वंदता आहे, नंतर शारजाहला क्रिकेट पाहतानाचे दोघांचे एकत्र फोटो झळकले. आणि लोकांमध्ये दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या. दोघांनी कधीही आपल्या प्रेमप्रकरणाची जाहीर कबुली दिली नाही हे विशेष. पण मंदाकिनीला या चर्चांचा फटका बसला. तिला मिळणार काम कमी होत गेलं. नंतर तर ती मुख्य प्रवाहाच्या बाहेरच फेकली गेली. तिने काही म्युझिक अल्बम केले, पण ते कधी येऊन गेले ते कळलंही नाही.
आयुष्यात मर्यादित पर्याय उरल्यावर बहुतेक नट्या जो पर्याय निवडतात तोच मंदाकिनीने निवडला. तिने लग्न केलं. तिचा नवरा एकेकाळी प्रचंड लोकप्रिय होता आणि घराघरांत त्याचा चेहरा पोहोचलेला होता, हे सांगितलं तर अनेकांना आश्चर्य वाटेल. ते म्हणजे डॉ. रिंपोचे ठाकूर. रिंपोचे ठाकूर म्हणजेचं सत्तरच्या दशकात गाजलेला मर्फी बॉय. त्यावेळेस रेडिओ कॅम्पेनमध्ये गाजलेला गोंडस मुलगा. रणबीर कपूरच्या 'बर्फी' चित्रपटात त्याचे संदर्भ येतात. माजी बौद्ध भिक्षु असलेले रिंपोचे ठाकूर सध्या मुंबईत हर्बल सेंटर चालवतात. आदर्श बायकोप्रमाणे मंदाकिनी त्यांची मदत करते. एकेकाळची ग्लॅमरस अभिनेत्री आता पूर्णपणे गृहिणी बनली आहे. काही दिवसांपूर्वी काही न्यूज चॅनलवाले तिच्या घरी कुठलीही वर्दी न देता धडकले, त्यावेळेस ती चक्क कपडे धूत होती. तिला तिच्या वादग्रस्त भूतकाळातून बाहेर यायचंय. त्यामुळे ती माध्यमांमध्ये फारशी दिसत नाही. आयुष्याच्या सेकंड इनिंग्जमध्ये ती समाधानी आहे!
मोनिका बेदी तितकी नशीबवान नाही. अबू सालेम सोबत पोर्तुगालमध्ये ती पकडली गेल्यावर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. मोनिकाने अनेक चित्रपटांत छोट्या-मोठ्या भूमिका केल्या, पण त्यातली एकही प्रेक्षकांना आठवत नाही, ही तिची शोकांतिका.
मोनिका नॉर्वेमध्ये राहणाऱ्या सुखवस्तू पालकांची मुलगी. तिने शिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठामधून पूर्ण केलं आहे. अशी उच्चशिक्षित तरुणी अबू सालेमसारख्या अर्धशिक्षित माणसाच्या प्रेमात कशी पडली असेल? प्रेमाचे नियम अनाकलनीय असतात हेच खरं. सालेम आणि मोनिकाला भारतात परत आल्यावर तिने भोपाळच्या कारागृहात काही काळ घालवला. नंतर तिची सुटका झाली. तारुण्य ओसरायला लागलं होतं. बदनामीमुळे नवीन भूमिका मिळण्याची शक्यता नव्हतीच. तरी 'बिग बॉस' या रिअॅलॅटी शोमध्ये तिने भाग घेतला. एका तमिळ सिनेमामध्ये काम केलं. एका मालिकेत काम केलं, पण तिचं आयुष्य थांबल्यासारखं झालंय. वयाच्या बेचाळिसाव्या वर्षी तिला आयुष्याची सेकंड इनिंग सुरू करायची आहे, पण अवघड जातंय.
मंदाकिनी आणि मोनिका बेदी यांना त्यांच्या स्त्री असण्याची किंमत चुकवावी लागली का असा प्रश्न कधी कधी पडतो. म्हणजे अनेक बॉलिवुड नटांचे डॉन लोकांशी घनिष्ट संबंध होते. अनेकांचे डॉनसोबतचे फोटो माध्यमांमध्ये झळकले आहेत, पण त्यांची फारशी चर्चा होताना दिसत नाही. किंबहुना त्यांना त्याची काहीच किंमत चुकवावी लागलेली नाही. ही किंमत मंदाकिनी आणि मोनिकालाच का द्यावी लागली? त्यांनी त्यांच्या आयुष्यात केलेल्या चुकीचं समर्थन नाही, पण न्याय समान लावला जात नाही ही खंत मात्र आहे!
लेखक फँटम फिल्म्ससोबत पटकथा लेखक म्हणून काम करतात.
amoludgirkar@gmail.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment