मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पराभूत मानसिकतेतून सावरायचं असेल तर स्वतःला ओळखावं लागेल आणि नेमक्या शत्रूलाही!
पडघम - राज्यकारण
रामराजे शिंदे
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • Sat , 13 June 2020
  • पडघम राज्यकारण देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis उद्धव ठाकरे Uddhav Thackeray भाजप BJP शिवसेना Shivsena शरद पवार Sharad Pawar राष्ट्रवादी काँग्रेस NCP काँग्रेस Congress

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मागील सहा महिन्यांच्या कामकाजावर माध्यमांपासून इतर पक्षांच्या नेत्यांपर्यंत अनेकांनी टीका केलीय. परंतु आता शिवसेनेच्याच मुख्य फळीतील एका ज्येष्ठ नेत्याने ठाकरेंना ‘घरचा आहेर’ देत अतिशय परखड भाषेत एक पत्र लिहिलंय. या नेत्यानं पत्राच्या माध्यमातून आपल्या भावनेला वाट मोकळी करून दिलीय. हे पत्र जशास तसं....

मा. उद्धवजी ठाकरेसाहेब,

मुख्यमंत्री,

महाराष्ट्र राज्य.

महोदय,

रेल्वे दुर्घटनेतील छायाचित्रं पाहिली. हातात पोटाची भूक भागवण्यासाठी रोट्या घेऊन असह्य होऊन आपल्या मातृभूमीपर्यंत पोहोचण्यासाठी टाहो फोडणारे आत्मे चिरडले गेले, त्या क्षणी आपल्या अकार्यक्षमतेवरदेखील शिक्कामोर्तब झाले. साहेब, ज्या दिवशी आपण लॉकडाऊन जाहीर केलं, त्याच दिवशी तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो, मला या हातावर पोट असणाऱ्या श्रमिकांची चिंता वाटली. अनर्थ होईल असे जाणवले. मी बऱ्याच लोकांशी चर्चा करताना ही भीती व्यक्त केली. ते कोणत्याही प्रदेशातील असो, प्रथम ते या देशाचे नागरिक होते. लॉकडाऊन वेळेतच त्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपल्या सरकारची व मुख्यमंत्री म्हणून तुमची होती.

१५ दिवसांनंतर लोक हजारो संख्येनं निघत होते, हे चित्र आपण सर्वजण पाहत होतो. परंतु टीव्हीवर येऊन तुम्ही ‘धीर सोडू नका’ अशी भाषणे आपण करत बसलात. अधिकारी फक्त अमलबजावणी करतात. संवेदनशीलपणे धाडसी निर्णय घेणे, हे राज्याच्या प्रमुखाचे काम असते, ते झाले नाही. आज बाळासाहेबांची प्रचंड आठवण आली. तुम्ही त्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर नसता तर कोणत्याही सरकारवर तुटून पडला असता. या मुख्यमंत्रीपदाच्या लालसेने साहेब सर्वनाश झालाय.

ज्यांची तोंडे पाहायची इच्छा महाराष्ट्राच्या जनतेची नव्हती, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसून मोठा अधर्म आपण केलात. साहेब, पुस्तकात वाचून व स्टेजवर गरिबांचा कळवळा आणून संवेदनशीलता दाखवत लोकांना मूर्ख बनवणे सोपे आहे. जन्मापासून सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्या तुमच्यासारख्यांना गरिबांची, श्रमिकांची, त्यांच्या कच्च्याबच्च्यांची तळमळ पाहून पाझर फुटला नाही का?

रेल्वे बंद केल्या म्हणून तुम्ही केंद्रावर खापर फोडू शकता, पण राज्याचे प्रमुख आपण आहात, राज्याची परिवहन सेवा, हजारो एसटी बस जर वेळीच या श्रमिकांसाठी मोफत त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी वापरल्या असत्या, तर काय मोठा खर्च झाला असता? आणि हो साहेब, महाराष्ट्राच्या विकासात आपल्या घामाने त्यांनी मोठे योगदान दिले आहे. फक्त पोट भरण्यासाठी ते इथे आले होते.

६ लाख लोकांना रोज जेवण देताय, हे सांगताना त्याच बीएमसीकडे ६७ हजार कोटींच्या ठेवी असताना, १००-२०० कोटी रुपये त्या सर्वांना पोहोचवण्यासाठी खर्च केले असते तर आपल्याला समाधान मिळाले असते. असो. सर्वच चाटू लोक आपली तारीफ करत असतात. तुमच्यासारखा नेता स्वत: सर्वसामान्यांसाठी साधा निर्णय घेऊ शकत नाही. फक्त तोंडाची वाफ काढून लोकांना मूर्ख बनवणारा तुमच्यासारखा भंपक माणूस पाहून माझ्या मनात तिरस्कार निर्माण झाला. आजच्या जगातील धृतराष्ट्र म्हणून इतिहासात आपली नोंद होईल.

हजार-हजार किमी उपाशीपोटी चालणारी माणसं, रस्त्यातच बाळंत झालेल्या आमच्या भगिनी, मुलाबाळांसह महाराष्ट्रातीलच एका जिह्यातून दुसऱ्या जिल्हयात जाण्यासाठी १०-१५ दिवस एस.टी. स्थानकावर उपासमार भोगलेला तो कामगारवर्ग या साऱ्यांच्याच आत्म्याचे शाप निश्चित आपल्याला लागणार. आपण शरद पवारांसारखे देवाला न मानणारे व गंडवणारे लोक आहात. त्याची तुम्हाला फिकीरच नाही. परंतु वेळ व काळ हाच या गोष्टींवर उत्तर देईल.

आता तरी या सर्व नागरिकांना घरी पोहोचवण्यासाठी व त्यांच्या उदरनिर्वाहासाठी धाडसी निर्णय घ्या. लॉकडाऊन असताना गाव खेड्याकडे गेलेली माणसं रेशन घेण्यासाठी मुंबईत येऊ शकत नाहीत. त्यांना त्यांच्या गावाकडेच अन्नधान्य मिळेल, याची काळजी घ्या. हातावर पोट असलेल्या श्रमिकांकडे, शेतमजुरांकडे आज एक पैसा नाही. सरकारी बाबूंवर अवलंबून राहू नका. निर्णय घ्या आणि बाळासाहेबांची माफी मागा, साहेब!

(.......................)

शिवसेना नेता

...

या पत्राची मूळ कॉपी माझ्याकडे आहे. पण काही कारणास्तव या शिवसेना नेत्याचं नाव उघड करता येत नाही. पण हे पत्र वाचल्यावर कळतं की, आता ‘ठाकरे आणि शिवसेना’ यांतील अंतर वाढत चाललंय. हा बदल आहे, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासूनचा. शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याला उद्धव ठाकरेंमध्ये धृतराष्ट्र का दिसला असावा? शिवसेनेचा सीईओ अशी बिरूदं मिळालेला नेता आता भंपक का वाटतोय? ज्यांची तोंड पाहण्याची इच्छा नाही, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसून मोठा अधर्म केला? या शब्दांत थेट ठाकरेंना ठणकावण्याची वेळ का आलीय? या प्रश्नांची उत्तरं वरील पत्र वाचल्यावर मिळतात.

सरकारचा आंधळा कारभार अनेक संकट घेऊन येत असल्याचं खुद्द शिवसेना नेतेच आता कबूल करू लागलेत. यातून पक्षातील जुन्या जाणत्या नेत्यांबरोबरच कार्यकर्त्यांशी असलेली नाळही तुटत चालल्याचं दिसून येतंय. ही शिवसेनेसाठी धोक्याची घंटा आहे. अलीकडे उद्धवजींची वर्तणूक पाहता आता कार्यकर्ताही त्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहिल का, हा प्रश्न आहे.

दुसरीकडे मात्र सरकारमधीलच मित्रपक्ष असलेला राष्ट्रवादी मात्र आपल्या कार्यकर्त्यांची ‘काळजी’ घेताना दिसत आहेत. अजित पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रात धडाक्यात दौरे सुरू केलेत. मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलंय. दौरे करताना शिवसेनेच्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना विचारात घेतलं जात नाही. बोलावलंही जात नाही.

शिवसेना लोकांमधून गायब झालीय, असं चित्र दिसतंय. तिकडे मराठवाडा शिवसेनेच्या हातातून निसटत चालला आहे. या बिकट परिस्थितीत शिवसेनेचा ठाण्याचा गड एकनाथ शिंदे यांनी एकहाती राखून ठेवलाय. करोनाकाळात प्रत्येकाला मदत करण्याची भूमिका शिंदे बाप-लेकांनी घेतलीय. ठाणे वगळता महाराष्ट्रभरातून शिवसेना कार्यकर्त्यांकडून तक्रारींचा पाढा ऐकायला मिळतोय. शिवसेना नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भेटायला, बोलायला उद्धवजींकडे वेळ नाही. कामं होत नाहीत. शिवसेना नेत्यांमध्ये नाराजीचा सूर वाढू लागला आहे. नाराजीचा स्फोट विधानपरिषद सदस्यांच्या निवडणुकीनंतर होईल. ग्रामीण भागातील नेत्यांना विधानपरिषदेवर संधी दिली नाही तर, अनेक नेते बंड करत समोर येतील. त्यांनी तशी तयारीही केली आहे. वरील पत्र याच बंडाची चुणूक दाखवणारं आहे.

मुख्यमंत्र्यांनी ‘मैदान सोडलं...’

ठाकरेंचा संपर्क केवळ शिवसेनेच्या कार्यकर्त्यांपासून तुटला असं नाही तर महाविकास आघाडीच्या सरकारमधील मंत्र्यांशीही संपर्क उरला नसल्याचं दिसून आलंय. याचं एक ताजं उदाहरण आहे. करोनाचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे पुण्यातील ससून हॉस्पिटलला भेट द्यायला गेले असताना त्यांना तिथल्या कर्मचाऱ्यांच्या काही अडचणी कळाल्या. त्यांना आश्वासक करण्यासाठी टोपेंनी मुख्यमंत्रीशी आत्ताच बोलणे करतो असं म्हटलं. टोपेंनी लगेचच आपल्या मोबाइलवरून ठाकरेंना फोन लावला. त्यांनी फोन उचलला नाही. मग टोपेंनी त्यांच्या पीएला फोन लावला. सुरुवातीला दोन-तीन वेळेस पीएनेही फोन उचलला नाही. नंतर उचलला. तेव्हा टोपे म्हणाले, ‘मुख्यमंत्रीसाहेबांशी बोलायचंय.’ पीए म्हणाला, ‘जोडून देतो.’ टोपे वाट पाहत बसले. बराच वेळ झाला तरी फोन जोडला गेलाच नाही.

समोर बसलेले ससूनचे अधिकारी-कर्मचारी टोपेंच्या तोंडाकडे पाहत होते. आपली फसगत होऊ नये म्हणून टोपेंनी पुन्हा ठाकरेंच्या मोबाईलवर फोन केला. त्यांनी तोही कॉल उचलला नाही. पुन्हा पीएला फोन केला, पण रिस्पॉन्स मिळाला नाही. मुख्यमंत्र्यांशी बोलणं होणारच नाही, हे कळाल्यावर टोपे ससूनच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा निरोप घेऊन तिथून निघाले. बरं साहेब, त्या दिवशी बिझी होते म्हणून फोन करू शकले नसतील. पण त्यानंतर पुढच्या दोन दिवसांतही मुख्यमंत्र्यांना आरोग्यमंत्र्यांना फोन करण्याची गरज वाटली नाही.

मुख्यमंत्री आरोग्यमंत्र्यांचा फोन उचलत नाहीत, अशी दबक्या आवाजात अधिकाऱ्यांत चर्चा सुरू झाली. चौथ्या दिवशी राजेश टोपे आणि उद्धव ठाकरे यांची एका मीटिंगमध्ये भेट झाली. तेव्हा ठाकरेंनी, “राजेशजी त्या दिवशी तुम्ही फोन केला होता का?”, असा प्रश्न विचारून कहरच केला.

मंत्रिमंडळातील एका मंत्र्यानेच इतक्यांदा फोन केल्यानंतर त्याला प्रतिसाद न देता भेटल्यावर ‘फोन केला होता का?’, असा प्रश्न माननीय मुख्यमंत्र्यांनी विचारणं ही गोष्टच किती अवाक् करणारी आहे! मग राजेश टोपे यांनी कशासाठी फोन केला होता ते सांगितले. त्यानंतर ठाकरेंच्या पीएला टोपे इतकंच म्हणाले, “साहेबांनी किमान कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घ्यायला पाहिजे होत्या. एवढं रिलॅक्स काम कसं चालेल? पण यापुढे किमान आरोग्यमंत्र्यांचा फोन तरी उचला, असं सांगा साहेबांना...”

करोना रुग्णांची वाढती आकडेवारी पाहता, गेल्या तीन महिन्यांमध्ये राज्य सरकारने टेस्टिंग लॅब्स वाढवणं गरजेचं होतं, पण सरकारला ते शक्य झालं नाही. आत्ताच्या परिस्थितीत शहरी भागात करोनाचा रिपोर्ट येण्यासाठी तीन-चार दिवस लागतात. ग्रामीण भागात अजून परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे रुग्ण अडकून पडतो. रिपोर्ट्स न आल्यामुळे रुग्णाला अॅडमिटही करून घेता येत नाही. त्यात वेळ वाया जातो, तो वेगळा. राज्य सरकारनं खासगी टेस्टिंग लॅब ताब्यात घेण्याची सूचना एका अधिकाऱ्यानं केली होती, पण त्यावर निर्णय घेतला गेला नाही. राज्यातील वैद्यकीय परिस्थिती जाणून घेण्यासाठी एखादं भरारी पथक नेमणं गरजेचं होतं. ते पण झालं नाही. राज्याची सद्य परिस्थिती पाहता मुख्यमंत्र्यांनीच मैदान सोडल्याचं दिसतंय.

‘काय, बरं आहे ना…’

दुसरा किस्सा असाच आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक बैठक घेतली. त्यातलं त्यांचं पहिलं वाक्य काय तर - ‘काय कसे आहात तुम्ही? बरं आहे ना सगळं?’ त्यानंतर ‘माझ्या बळीराजाला जे काही पाहिजे, ते द्या...’ असा आदेश मुख्यमंत्री देतात आणि पुढे टिंगलटवाळी करत बैठक संपते.

मागच्या हंगामातला तूर, कापूस अजून शेतकऱ्याच्या घरातच पडून आहे. साठवण करायला गोडाऊन नाही. फक्त सात टक्के पीक कर्जाचं वाटप झालंय, बाकी पीककर्जाचा पत्ता नाही. सावकार पैसे द्यायला तयार नाही. हॉटस्पाट आणि कॅन्टोन्मेंट झोनमधील शेतकऱ्यांपर्यंत सरकारचे अधिकारी कसे पोहोचणार, याचं नियोजन नाही. शेतकऱ्याला बांधावर जाऊन खत देण्याची घोषणा सरकारनं केली. ती कुठे विरून गेली, कळालं नाही. त्यात महाबीजनं बियाण्यांचे दर वाढवले आहेत. ठिबक सिंचनासाठी केंद्रानं दिलेले १२० कोटी रुपये भलतीकडेच वळवले गेले.... एवढा सावळागोंधळ असताना ‘काय बरं आहे ना…’ म्हणून प्रश्न सुटणार आहेत का?

‘कृषीमंत्री दाखवा, हजार रूपये मिळवा’

सरकारमध्ये शिवसेनेचे मंत्री कुठे आहेत, हा प्रश्न पडतो. सुभाष देसाई यांची छाप पडत नाही. एकनाथ शिंदे यांना मर्यादेत ठेवलं जातं. अनिल परब अजून चाचपत आहेत. अब्दुल सत्तार गायब आहेत, तर राज्याचे कृषीमंत्री कोण, हेच समजत नाही. आता ‘कृषीमंत्री दाखवा, हजार रुपये मिळवा’, अशी जाहिरात लावण्याची वेळ आलीय. दादा भुसे कुठेच सक्रिय दिसले नाहीत. अधिकारी म्हणतात, ‘यापूर्वी मुख्यमंत्री किंवा कृषीमंत्र्यांसमोर जाताना तयारी करून जावं लागायचं. पण आता मुख्यमंत्र्यांसमोर अळमटळम केलेली चालते. फक्त अजितदादा किंवा जयंत पाटील बैठक घेत असतील तरच तयारी करावी लागते.’

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाही ते मॅसेज, फोनद्वारे सदैव उपलब्ध असायचे. त्यांना तर प्रत्येक जीआर तोंडपाठ असायचा. मागील सरकारमधीलच एक उदाहरण आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी शेततळ्यासंदर्भात प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याशी चर्चा करून सूचना मागवल्या होत्या. त्यावेळी गोंदियाचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी एक सूचना केली होती की, गोंदिया जिल्ह्याला किंबहुना विदर्भालाच शेततळ्याचा फारसा फायदा होणार नाही. कारण, तिथे बोडी पद्धत आहे. (शेताच्या बाजूलाच शेततळ्यापेक्षा छोट्या आकाराचा खड्डा असतो. विदर्भात पूर्वीपासून छोट्या छोट्या प्रमाणात बोडी बांधल्या आहेत.)

बोडी वाढवण्याची गरज आहे, या एका मॅसेजनंतर फडणवीसांनी ताबडतोब सूर्यवंशी यांच्याशी चर्चा करून लगेच विदर्भासाठी जीआर काढला. परिणामी, एकट्या गोंदियात १ हजार बोडी तयार झाल्या. त्याचा सिंचनासाठी फायदा झाला. मुद्दा असा की, मुख्यमंत्र्यांचा संपर्क थेट फिल्डवरील अधिकाऱ्याशी असेल तर विषय चटकन समजतात. पण त्यासाठी निर्णयक्षमता दांडगी असावी लागते.

आत्ताच्या परिस्थितीत उद्धव ठाकरेंनी फक्त एक-दोन अधिकाऱ्यांवर भरवसा ठेवला आहे. या अधिकाऱ्यांच्या भरवशावर महाराष्ट्र चालतोय. त्यामुळे जमिनीवरील कथा-व्यथा माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचतच नाहीत. आता तर अधिकारी मंत्र्यांनाही ऐकत नाहीत, अशी परिस्थिती आलीय. मंत्र्यांना डावलून परस्पर निर्णय घेतले जाताहेत.

राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याकडून मुख्यमंत्र्यांवर हल्ले सुरूच आहेत. आता सत्तेत निर्णयाचे अधिकार नसल्यानं काँग्रेस निर्वाणीच्या भाषेत बोलू लागलीय. परवा छगन भुजबळ यांच्या खात्याची फाईल एका अधिकाऱ्याने परस्पर कॅबिनेटमध्ये आणल्यावर ‘अधिकारीच प्रस्ताव मंजूर करत असतील तर मंत्र्यांची कॅबिनेट कशाला बोलवता?’ असा सवाल केलेल्या भुजबळांचा रुद्रावतार ठाकरेंना पाहायला मिळाला. त्यानंतर अशोक चव्हाण तुटून पडले आणि जयंत पाटील यांनीही आयती चालून आलेली संधी सोडली नाही. सदैव मातोश्रीवरून आदेश देण्याची सवय असलेल्या ठाकरेंना पहिल्यांदाच स्वभावाला मुरड घालत ऐकून घेऊन गप्प बसावं लागलं.

खरं तर राजकारणात फुकट कोणीच काही देत नाही आणि मुख्यमंत्रीपदाची खुर्ची तर अजिबात नाही. राज्याच्या प्रमुखाची खुर्ची देऊन कोणी उपकार केले असतील तर त्या उपकाराची परतफेड करताना होणारं नुकसान आपल्याला आणि पक्षाला पेलेल का, याचा अंदाज आधीच बांधायला हवा होता. आता उद्धव ठाकरे खिंडीत सापडले आहेत. त्यातून बाहेर पडण्यासाठी ‘एक्झिट प्लॅन’ शोधत असतीलही, पण तो इतका सोपा नाही.

प्रसिद्ध साहित्यिक सून त्झु ‘द आर्ट ऑफ वॉर’ या त्यांच्या पुस्तकात म्हणतात – ‘‘जर तुम्ही स्वतःला ओळखता आणि शत्रूला नाही तर तुमच्यासाठी प्रत्येक विजय हा पराभवासारखाच असेल. जर तुम्ही स्वतःला आणि शत्रूलाही ओळखत नसाल तर प्रत्येक युद्धात तुम्हाला पराभव पत्करावाच लागेल. आणि जर तुम्ही शत्रूला ओळखत असाल आणि स्वतःलाही ओळखत असाल तर तुम्हाला शंभर युद्धांच्याही परिणामांची भीती बाळगण्याची गरज नाही.”

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतल्यापासून संकटं आली, जुन्या मित्राला दूर केलं तर काही शत्रूही निर्माण झाले. या संकटांचा, शत्रूंचा बंदोबस्त करण्याऐवजी ते धृतराष्ट्राप्रमाणे डोळ्याला पट्टी बांधून बसले. यातून त्यांची पराभूत मानसिकताच दिसून आली. या मानसिकतेतून सावरायचं असेल तर त्यांना ओळखावं लागेल स्वतःलाही आणि नेमक्या शत्रूलाही!

..................................................................................................................................................................

लेखक रामराजे शिंदे झी मीडियाच्या दिल्ली ऑफिसमध्ये कार्यरत आहेत.

ramshinde007@gmail.com

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Gamma Pailvan

Sat , 13 June 2020

लेखक दिल्लीस्थित आहे. दिल्लीत बसूनही त्यांना मुंबईच्या बातम्या बऱ्या मिळतात. तसंच काहीसं उद्धव यांचंही असू शकेल ना? एक आपला अंदाज.
-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......