“हत्तिणीला मारणं आमच्या हिंदू संस्कृतीत बसत नाही…”
सदर - वास्तव-अवास्तव
संजय
  • केरळमधील फटाके भरलेले अननस खाल्लेली गर्भवती हत्तीण
  • Fri , 12 June 2020
  • सदर वास्तव-अवास्तव प्रकाश जावडेकर Prakash Javadekar गर्भवत्ती हत्तीण pregnant elephant केरळ keral

म्हटलं तर वास्तव, म्हटलं तर अवास्तव. म्हटलं तर शक्य, म्हटलं तर अशक्य. म्हटलं तर खरं, म्हटलं तर खोटं. म्हटलं तर कल्पना, म्हटलं तर सत्य. आजच्या कल्पना उद्याचं वास्तव असू शकतात किंवा उद्याचं वास्तव आजच्या कल्पना. अशा अनेक शक्य-अशक्य घटनांचा वेध घेणारं हे नवं-कोरं साप्ताहिक सदर...

..................................................................................................................................................................

मराठी वृत्तवाहिनीचं ऑफिस.

एडिटिंग रूम.

“जावडेकर शोची टाईमलाईन तयार कर. कंटेंट मी देतोय. २२ मिनिटांचा शो आहे” संपादक व्हिडिओ एडिटरला म्हणाले- “योग्य ठिकाणी मध्ये मध्ये व्हिडिओ इन्सर्ट करायचे आहेत. तेवढं तू पहा.”

एडिटर कामाला लागला.

२२ मिनिटांचा शो होता आणि मंत्री प्रकाश जावडेकर यांची पत्रकार परिषद हा कणा होता, हीच शोची टाईमलाईन होती.

एडिटरनं एडिटिंगला सुरुवात केली.

सुरुवातीला जावडेकर हत्ती मेल्याबद्दल अतीव दुःख व्यक्त करतात. म्हणतात, “एकदा माननीय नरेंद्र मोदीजींनाही त्यांच्या गाडीखाली कुत्रं आल्यानं अतीव दुःख झालं होतं. हे आहे आमच्या पक्षाचं नेतृत्व आणि ही आहे आमच्या पक्षाची परंपरा.”

जावडेकरांनी थोडक्यात घटना सांगितली. केरळमध्ये एका मादी हत्तीचा मृत्यू झाला होता. फटाके भरलेला अननस चुकून हत्तिणीनं खाल्ला, फटाक्याचा स्फोट झाला आणि जखमी होऊन तिचा मृत्यू झाला.

हे कथन चाललं असताना हत्तीण दोरखंडानं पाण्यातून ओढून नेली जात असतानाचा व्हिडिओ एडिटरनं इन्सर्ट केला.

नंतर जावडेकर म्हणाले की, संबंधित गुन्हेगाराला शोधून काढण्यात वुई विल लीव नो स्टोन अनटर्न्ड. हे वाक्य झाल्यावर एका पत्रकारानं काही तरी प्रश्न विचारला. 

एडिटरला वर्गातली शिकवण आठवली. एकच दृश्य एक मिनिटापेक्षा जास्त काळ दाखवता कामा नये, फास्ट एडिटिंग. पटापट दृश्यं बदलली पाहिजेत, बोलता माणूस फार दाखवायचा नाही, दृश्यं इन्सर्ट करायची.

स्टोन अनटर्न्ड म्हणजे दगड आला. त्यानं दगड आणि जावडेकर असे शब्द टाकून सर्च मारला. जावडेकर दगड वरखाली करत आहेत असा व्हिडिओ मिळेना. जावडेकर वृक्षारोपण करताहेत असे अनेक व्हिडिओ मिळाले, पण त्यात दगड कुठं दिसेनात. सर्व प्रयत्न करू असा होता हा जावडेकरांच्या म्हणण्याचा अर्थ, हे काही एडिटरला कळलं नव्हतं, कारण एडिटरला इंग्रजीचं ज्ञान नव्हतं.

दगडाचं व्हिज्युअल न सापडल्यानं निराश झालेला एडिटर पुढं सरकत असतानाच संपादक एडिटिंग रूममध्ये घुसले. त्या क्षणी जावडेकर या घटनेला केरळ सरकारला जबाबदार ठरवत होते. जणू त्या हत्तिणीनं केरळच्या मुख्यमंत्र्यांचं घोडं मारलं होतं आणि त्यासाठी अननसाचा वापर करून त्यांनी हत्तिणीला मारलं होतं.

स्क्रीनकडं पाहून संपादक म्हणाले, “या ठिकाणी केरळच्या मुख्यमंत्र्यांचा फोटो घाल, कारण या घटनेला तेच जबाबदार आहेत.”

व्हिडिओ एडिटरनं प्रश्नार्थक मुद्रेनं संपादकाकडं पाहिलं.

“घटना कोणाच्या राज्यात घडली? कम्युनिष्ट पक्षाचं राज्य आहे ना? मग ते जबाबदार नाहीत काय?” संपादक.

“मग आपण नरेंद्र मोदींचाही फोटो टाकूया का? तेही जबाबदार नाहीत काय, त्यांच्याच  देशात ती घटना घडलीय.” व्हिडिओ एडिटर.

संपादकांच्या डोक्यात तिडीक गेली. “गधड्या, तुला राजकारण कळतं की नाही?”

व्हिडिओ एडिटरनं मान हलवली. “सर, मी चार आठवड्याच्या कोर्समध्ये एडिटिंग शिकलो. तिथं आम्हाला राजकारण हा विषय नव्हता. क्लिप्स कशा तोडायच्या, कशा जोडायच्या तेवढंच आम्हाला शिकवलं.”

“मी सांगतो तेवढं कर, गाढव आहेस.” येवढं बोलून संपादक निघून गेले.

एडि़टरनं मुख्यमंत्र्यांचा फोटो टाकला आणि पुढं सरकला. आता पुढल्या इन्सर्टसाठी तो जागा शोधू लागला. एक वाक्य आलं, “हत्तिणीला मारणं आमच्या हिंदू संस्कृतीत बसत नाही…”

एडिटरनं यू-ट्यूबवर ‘संस्कृती’ असा सर्च मारला.

एक व्हिडिओ होता कुठल्याशा दंगलीचा. कपड्यांवरून मुसलमान वाटावी अशा माणसांना कपड्यावरून हिंदू वाटावेत अशी माणसं मारत होती. मारहाण करणारी माणसं ‘जय श्रीराम’ अशा घोषणा करत होती. क्लिपमध्ये गुजराती पाट्या असलेली दुकानं दिसत होती. क्लिपचं साल होतं २००२.

एडिटरनं ते बाजूला काढलं.

आणखी एक क्लिप मिळाली. आधीच्या क्लिपसारखीच, माणसं घरात घुसून हाणामारी करत होती, खाणाखुणांवरून दृश्य उत्तर प्रदेशातलं दिसत होतं. ‘जय बजरंग बली’ अशा घोषणा दिल्या जात होत्या.

आणखी एक दृश्य मिळालं. बारमधून मुली बाहेर पडत होत्या, भगवे रुमाल डोक्याला बांधलेले लोक त्या मुलींना झोडत होते. रुमालावर ‘श्रीराम सेना’ असे शब्द होते.

हे व्हिडिओ थरारक होते. मुसलमानांना आणि मुलींना ठोकून काढत आहेत, हे एडिटरला जाम आवडलं होतं. तीनही व्हिडिओ एडिटरनं ठिकठिकाणी पसरले.

झालं एकदाचं काम असं म्हणत एडिटरनं हात वर-खाली करून, मागं करून हाडं कडकडा वाजवली.

संपादक यायची वाट पाहत एडिटरनं टीव्हीवर बातम्या लावल्या.

मुझफ्फरपूर स्टेशनावर एक स्त्री मरून पडली होती. दिल्ली का कुठून तरी ती ट्रेननं आली होती. लॉकडाऊनमुळे तिच्यावर, तिच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली होती, निदान आपल्या घरी तरी जावं असं म्हणून ती दिल्ली सोडून निघाली होती. दोन दिवस ट्रेनमध्ये तिला अन्नपाणी न मिळाल्यानं तिचा मृत्यू झाला होता. तिच्या दोन-अडीच वर्षाच्या मुलीला आई निपचित का पडलीय ते कळत नव्हतं. ती आईच्या अंगावरची चादर काढत होती, पुन्हा पांघरत होती. ते दृश्य संपलं.

गाठोडी घेऊन रस्त्यावर अनवाणी चालणाऱ्या माणसांचं दृश्य दिसलं. मजूर, त्याच्या खांद्यावर एक मूल, एक स्त्री, तिच्या कंबरेवर एक मूल आणि हाताशी दुसरं मूल. मजूर कुटुंब महाराष्ट्रातून झाडखंडमध्ये निघालं होतं. चालत.

एडिटर ती दृश्य पाहून हळहळत होता.

 संपादक आले.

“कामं सोडून बातम्या काय पहात बसलास? जावडेकर शो तयार झाला का? अरे, तो लगेच टेलेकास्ट करायचाय. त्यांच्या ऑफिसमधून सारखे चौकशीचे फोन येताहेत.”

एडिटरनं तयार झालेला शो दाखवायला सुरुवात केली. केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या फोटोपर्यंतची दृश्य त्यानं पाहिली होती. तिथून पुढला भाग दाखव म्हणाला. एडिटर दाखवू लागला.

संपादकाचं खरं म्हणजे लक्षच नव्हतं, तो सेल फोनवर बोलत होता. दंगलीचं दृश्य पाहिल्यावर संपादक जोरात ओरडला, ‘मादरचोद’.

फोनवरच्या माणसाला संपादक म्हणाला, “सॉरी, सॉरी, मी इकडे कार्यक्रम पहात असताना ओरडलो, तुम्हाला नाही बोललो. जरा थांबा, होल्ड करा.”

फोनवर हात ठेवून त्यानं तिन्ही संस्कृती दृश्यं पाहिली.

पुन्हा शिवी हासडून म्हणाला, “माझी नोकरीच जाईल असं नव्हे तर माझं लिंचिंग करतील. तुला काही कळतं की नाही? चालता हो. तुला फायर केलंय. आताच्या आता चालता हो.”

संपादक एवढा का चिडला ते एडिटरला कळलं नाही.

संपादक तणतणत खोलीतून बाहेर पडला.

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Gamma Pailvan

Sat , 13 June 2020

पुढची कथा ऐकायचीये?

मी पोटुशी जनावर वर गूगल सर्च मारला तेव्हा सफूरा झरगरचं नाव आलं. त्यावरून केरळात गर्भवती हत्तींणीस अननसातनं स्फोटकं खायला घालून ठार मारलं होतं त्याची आठवण झाली. त्या गरीब बिचाऱ्या हत्तीणीऐवजी सफूरा झरगर तोंड फुटून मेली असती तर भारताचं अधिक भलं झालं असतं काय, असा विचार माझ्या मनी तरळून गेला. पण अशा सुसंस्कृत विचारापासून लगेच मी स्वत:स सावरलं. त्या अजात बालकाचा काय दोष?

सफूरा जिवंत राहिली पाहिजे व तिचं अपत्य घोर भारतप्रेमी निपजलं पाहिजे. मग जे सफूराचं थोबाड फुटेल त्यास अवघ्या त्रिखंडात तोड नसेल. बघा, पहिला पर्याय जास्त सुसंस्कृत आहे की दुसरा? होऊ द्या वादविवाद.

-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......