अजूनकाही
शुभा मुदगल या शास्त्रीय संगीताच्या, सुफी संगीताच्या व सुगम संगीताच्या जाणकार. संगीतक्षेत्रातील त्यांच्या संशोधनपर लिखाणाची माहितीही होती. त्यामुळे त्यांच्या संगीतक्षेत्राशी संबंधित कथासंग्रहाची माहिती मिळाल्यावर वाचण्याची उत्सुकता वाटली. त्यांच्या ‘लुकिंग फॉर मिस सरगम’ या कथासंग्रहातील सातही कथा संगीतात करिअर करणाऱ्याने किंवा त्यात गम्य असणाऱ्या प्रत्येकाने वाचल्या पाहिजेत. आपल्याला वाटत असतं की, संगीतात करिअर करू इच्छिणाऱ्यानं खूप रियाज करून आपल्या सुरांना लखलखीत, धारदार बनवलं की, यश त्याच्या/तिच्या मागेमागे येईल. गाण्यातला रियाज करून जाणकारांमध्ये मान्यता मिळाल्यानंतरही या क्षेत्रात किती शोषण असू शकतं, याचं चित्रण या पुस्तकात लेखिकेनं केलं आहे.
या पुस्तकातील शोषणाचे प्रकार लेखिकेच्या अनुभवांवर व निरीक्षणांवर आधारित आहेत, यात काही शंका नाही. यात लेखिकेने जे सांगितले आहे, त्याचे पुरावे असणं शक्य नाही; पण वाचताना आपल्याला मनोमन पटतं की, हे सर्व सत्य आहे. कारण अत्यंत बारकाईनं निरीक्षणं आलेली आहेत. असं शोषण जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात होतं, हे आपल्याला माहीत असतं. संगीतक्षेत्रातल्याही थोड्याबहुत गोष्टी आपल्या कानावर आलेल्या असतात, पण तरीही या पुस्तकाचं महत्त्व अनेक कारणांमुळे वाटतं. कारण नव्या कलाकाराला यातून एक सावधगिरीचा संदेश मिळू शकतो.
या पुस्तकात एकंदर सात कथा आहेत. यातील प्रत्येक कथेतून शोषणाचा एक वेगळा पैलू आपल्या समोर येतो. पहिली कथा आहे- ‘अमन बोल’ नावाची. श्वेता बन्सल ही कथानायिका कॉर्पोरेट क्षेत्रातील नमुनेदार व्यक्ती आहे. गोडबोली, खमकी, पण छाप पडेल असं व्यक्तिमत्त्व नसलेली, मात्र बेधडकपणे स्वतःचं काम करवून घेऊ शकणारी. कॉर्पोरेटमध्ये अशा व्यक्ती आपल्याला दिसतात. भारत व पाकिस्तानातील काळाच्या ओघात मागे पडलेल्या दोन गायकांच्या इगोला कुरवाळत ती त्यांच्याकडून स्वस्तात गाऊन घेते, याचं वेधक वर्णन या कथेत आहे. ते दोघंही स्वत:च्या स्वार्थाचा हिशोब करत एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात.
दुसरी गोष्ट आहे – ‘फॉरेन रिटर्न’. यातील आसावरी आपटे यशस्वी शास्त्रीय संगीत गायिका आहे. सर्वसाधारणपणे लोकांना वाटत असतं की, परदेशी आमंत्रणं आली की, कलाकार भरपूर बिदागी कमावून येतात. शिवाय नाव पण होतं. उत्तम गाणाऱ्या आसावरीचीही तीव्र इच्छा असते की, आपणही कुठेतरी परदेशी जावं. सरकारी यंत्रणेतर्फे जाण्याचा ती प्रयत्न करते, पण त्यातील खाचखळगे काही काळानं तिच्या लक्षात येऊन ती आपली इच्छा खोलवर गाडून टाकते. काही काळानं तिच्याकडे रियाजासाठी येणारा तबलजी तिला आशा दाखवतो आणि ती अमेरिकेला जाते. तिथले तिचे अनुभव वाचत असताना अंगावर काटा उभा येतो.
‘तान कप्तान’ ही मीरतसारख्या छोट्या शहरातील एका छोट्या गायकाला एक लबाड, पण चतुर व्यावसायिक त्याच्या छोट्या आकांक्षांना फुलवत कसा गंडा घालतो, याची कथा आहे. लेखिकेने मिरतवासी गायकाचं छोटेपण, त्याची दडलेली महत्त्वाकांक्षा, पण त्याच वेळी त्याचा साधाभोळा स्वभाव, हे सर्व वेगवेगळ्या घटनांतून उत्तम प्रकारे उभं केलं आहे.
सध्या सगळ्याच म्युझिक कंपन्यांवर कठीण वेळ आली आहे. टिकून रहायचं असेल तर नव्या पिढीला आवडेल असं संगीत दिलं पाहिजे, असं त्यांना सतत ऐकवलं जात असणार. नव्या तंत्रज्ञानामुळे सर्वच क्षेत्रांत हे बदल झपाट्यानं झाले आहेत. कंपनीतील वरिष्ठांनाही हे मनोमन जाणवतं. म्हणून ते दोन तरुण ‘संगीतकारां’ना आपल्या मिटिंगला आमंत्रित करतात. ते आपल्या कल्पना या वरिष्ठांसमोर मांडणार असतात. आणखी एक तरुण, ज्याला संगीतात आई-वडिलांनी करिअर करू दिलेलं नसतं, तो निदान संगीतक्षेत्रात नोकरी करण्याच्या उद्देशानं आमंत्रित असतो. त्या बैठकीत ते तरुण संगीतकार अशा काही भन्नाट कल्पना वरिष्ठांसमोर ठेवतात की, ते सर्व वरिष्ठांच्या आकलनापलीकडचं ठरतं. हे सर्वच जण एका परंपरेत, एका संस्कृतीत वाढलेले असतात, त्यांना ‘ना आगा ना पीछा’ पद्धतीचं संगीत उमजत नाही. लेखिकेलाही या नव्या संगीताबद्दल सहानुभूती नाही हे कळतं. संगीतक्षेत्रात नोकरी करण्यासाठी आलेला तो तरुण, त्याच्या समोर घडलेला सगळा ड्रामा बघून या क्षेत्रात नोकरी करायची नाही, हा निर्णय घेतो. म्हणून कथेचं नाव आहे – ‘फेअरवेल टू म्युझिक’.
याच्या पुढली कथा ‘पद्मश्री’ मिळवण्यासाठी एका तबलजीची धडपड चित्रित करते. उत्तर प्रदेशातील एका छोट्या गावातून दिल्लीला आलेला तबलजी मंझूर रहमानी बऱ्यापैकी संगत करणारा तबलजी झालेला असतो. आयुष्यात त्याची एकच इच्छा बाकी असते की, आपल्याला ‘पद्मश्री’ मिळावी. म्हणजे गावात एकमेव ‘पद्मश्री’वाला म्हणून मिरवता येईल. त्यासाठीची त्याची चाललेली धडपड आणि झालेली फसगत आपल्याला चटका लावून जाते.
सिनेमासृष्टीत स्वत:ला महान समजणारे निर्माते बरेच असतात. त्यापैकी एक निर्माता गायिकेसमोर मोठा आढ्यताखोर प्रस्ताव ठेवतो की, त्याच्या नव्या सिनेमासाठी नुकताच तिने - जो अल्बम उत्तर प्रदेशातील लग्नाच्या गाण्यांचा रेकॉर्ड केलेला असतो त्यापैकी - एक गाणं गावं. ही गाणी शोधण्यासाठी त्या गायिकेने खूप मेहनत घेतलेली असते. गाणी पारंपरिक असली तरी तिला ती कुणीतरी विश्वासानं दिलेली असतात. ती जेव्हा या बाबतीतील परवानग्या, तिची बिदागी वगैरे व्यावसायिक बोलण्याचा प्रयत्न करते, तेव्हा निर्मात्याचा अहंकार दुखावला जातो. ‘ ‘मी स्टार्स बनवतो’ मला असे प्रश्न कोण विचारू शकतं? कुणीही माझ्याशी पैशाच्या गोष्टी करत नाही,’ असं तो बोलतो. त्याला तिच्याकडून फुकटात गाऊन घ्यायचं असतं. ती नम्र नकार देते.
शेवटची गोष्ट ही अशीच नवोदित गायक शिवेन्द्रच्या वेगळ्या तऱ्हेच्या फसवणुकीबद्दल आहे.
सर्वच कथांबद्दल सांगणं या परिचयात्मक लेखात आवश्यक नाही, पण या सर्व कथा वेगवेगळ्या असल्यानं त्यांच्याबद्दल थोडक्यात सांगावंसं वाटलं. शिवाय विषय अतिशय वेगळा आहे. यातील फसवले गेलेले नायक-नायिका साधे आहेत. त्यांच्याविषयी सहानुभूती वाटते. लेखिकेचं निरीक्षण दांडगं आहेच, पण कथा फुलवण्याची हातोटी व इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व कथांना निराळी रंगत देतं.
या पुस्तकाचं शीर्षक ‘लुकिंग फॉर मिस सरगम’ असं आहे. ही ‘मिस सरगम’ अनेक कथांतून डोकावतं, पण तिची कुठलीच कथा नाही, पण खरं तर आहेही.
लुकिंग फॉर मिस सरगम : स्टोरीज ऑफ म्युझिक अँड मिसअॅडव्हेंचर - शुभा मुदगल
स्पिकिंग टायगर, नवी दिल्ली, २०१९.
पाने – २०५, मूल्य – ४९९ रुपये.
..................................................................................................................................................................
लेखिका वासंती दामले मुंबई विद्यापीठाच्या निवृत्त प्राध्यापिका आहेत.
vasdamle@gmail.com
..................................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment