करोना महामारीत स्वतःला सावरण्यासाठी तुकाराममहाराजांचं मनोविज्ञान प्रत्येक पावलावर उपयुक्त ठरतं!
पडघम - सांस्कृतिक
रवींद्र बेम्बरे
  • तुकाराममहाराजांच्या अभंगांची गाथा
  • Thu , 11 June 2020
  • पडघम सांस्कृतिक संत तुकाराम Sant Tukaram अभंग गाथा Abhang Gatha करोना विषाणू Corona virus कोविड-१९ Covid-19 करोना Corona करोना व्हायरस Coronavirus लॉकडाउन Lockdown

करोना महामारीनं संपूर्ण जग हादरून गेलं आहे. जगातला प्रत्येक माणूस धास्तावला आहे. विविध देशांचं शासन\प्रशासन हतबल होऊन या महामारीसमोर हात टेकत आहे. या महामारीचा मुक्काम प्रदीर्घ काळ राहणार असल्याचे संकेत जागतिक आरोग्य संघटनेकडून मिळत आहेत. यामुळे तिची धास्ती घेण्यापेक्षा तिच्यासोबत जगायला शिकलं पाहिजे, असं जगातील अनेक विचारवंतांचं सांगणं आहे.

महामारीपेक्षा तिच्या अवास्तव धास्तीनंच अधिक लोक दगावल्याचा आजपर्यंतचा इतिहास आहे. यादृष्टीनं एक सुफी दंतकथा उदबोधक ठरते. बगदाद शहराच्या प्रवेशद्वारासमोरील एका झोपडीत जुन्नेर नावाचा एक फकीर राहत होता. एका रात्री प्रवेशद्वारातून शहरात जाणाऱ्या काळ्याकुट्ट सावलीला त्याने रोखलं आणि शहरात जाण्याचं प्रयोजन विचारलं. तेव्हा त्या सावलीनं ‘आपण महामारी असून बगदादमधील केवळ ५०० लोकांना मारून परत जाणार असल्याचं’ सांगितलं. त्या महामारीने १५ दिवस बगदाद शहरामध्ये जो धुमाकूळ घातला, त्यात तब्बल ५००० लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर ती महामारी आपला कार्यभाग साधून परत जाऊ लागली, तेव्हा जुन्नेरने तिला पुन्हा रोखून ५००ऐवजी ५००० लोकांच्या मृत्यूबद्दल जाब विचारला. त्यावेळी ती म्हणाली, ‘मी ठरल्याप्रमाणे केवळ ५०० लोकांनाच निवडून मारलं. बाकीचे ४५०० लोक मरणाच्या धास्तीनं आपोआपच मेले.’

यातून महामारीच्या काळातील भयग्रस्त मानसिकतेचंच दर्शन घडतं.

‘कुछ हैजा (कॉलरा) से तो कुछ हैबत (भीती) से मरे’ या लोकोक्तीप्रमाणे आजारापेक्षा त्याची धास्तीच अनेकांना मरण्यासाठी पुरेशी असते. म्हणून महामारीत औषधांएवढंच मनोबल महत्त्वाचं ठरतं. मनोबल वाढवण्यासाठी जगाच्या बाजारात कोणतंही औषध उपलब्ध नाही. त्यासाठी आपला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलावा लागतो. ज्या गोष्टी आपल्या हाताबाहेरच्या आहेत, त्याबद्दल उद्वेग करण्यापेक्षा शांत मनानं त्याचा स्वीकार करणं अधिक हिताचं ठरतं. उद्वेगातून दुःखच पदरी येतं आणि स्वीकारातून मनाची सकारात्मक ऊर्जा वाढते.

‘ठेविले अनंते तैसेची राहावे । चित्ती असू द्यावे समाधान ।

वाहिल्या उद्वेग दुःखचि केवळ । भोगणे ते फळ संचिताचे ।।’

असं तुकाराममहाराज सांगतात. वरवर पाहणाऱ्यांना या अभंगात दैववाद दिसत असला, तरी यात जे मनोविज्ञान दडलं आहे, त्यातून महामारीसोबत जगण्यासाठी एक सम्यक दिशा मिळते. मानवी जीवनातील पर्वताएवढ्या अटळ दुःखाची जाणीव तुकाराममहाराजांनी वेळोवेळी करून दिली आहे. जन्मलेल्या प्रत्येकाला मरण अटळ असेल तर त्याला घाबरण्याची गरज काय, असा प्रश्न ते उपस्थित करतात.

अनेक वेळा दुःखाच्या वा संकटाच्या काल्पनिक भीतीनेच गर्भगळीत होऊन लोक मानसिक संतुलन हरवून बसतात. घाबरल्यानं छोटंसं संकट पर्वतापेक्षा मोठं बनतं आणि धैर्य बाळगल्यास पर्वतापेक्षा मोठं संकटदेखील अगदी छोटं होतं. संकटसमयी श्रद्धेचं एखादं अधिष्ठान जे आत्मिक बळ देतं, त्यातून आपलं मनोबल उंचावतं.

‘आलिया भोगासी असावे सादर । देवावरी भार घालुनिया ।।’

देवावर श्रद्धा ठेवून संकटाला सामोरं जाण्याचा मार्ग तुकाराममहाराज दाखवतात. संकट कितीही मोठं असलं तरी परमेश्वर नावाची अलौकिक दिव्यशक्ती आपल्या पाठीशी असल्यानं काहीही वाईट होणार नाही, या निर्धारानं त्यातून आपण बाहेर पडू शकतो, असा विश्वास तुकाराममहाराज देतात.

‘भयाचियापोटी दुःखाचीया रासी। शरण देवासी जाता भले ।।’

संकटाची अवास्तव धास्ती घेतल्यास दुःखच पदरी येतं. अशा कसोटीच्या प्रसंगी आपलं आत्मबल जागवण्यासाठी परमेश्वराला शरण गेलं पाहिजे, असं तुकाराममहाराज सांगतात.

करोना महामारीची झळ जगातील प्रत्येकाला कमी-अधिक बसणारच आहे. या पार्श्वभूमीवर अनेक प्रकारचा फटका सहन करण्याची मानसिक तयारी ठेवली पाहिजे.

‘होणार होऊनी गेले । मिठा आता खंती रे ।।’

जे व्हायचं ते होऊन गेलं असेल, तर त्याबद्दल खेद करत बसल्यास त्यातून मनस्ताप पदरी येतो. दुःखाला कवटाळून बसल्यास त्याचं पर्यवसान नैराश्यात व्हायला वेळ लागत नाही.

‘शोके शोक वाढे । हिमतीचे धीर गाढे ।। येथें केले नव्हे काई । लंडीपण खोटें भाई ।।’ 

तळमळीनं तळमळ आणखी वाढते आणि धीर धरला तर धीरानं धैर्य बळकट होत असतं, असं तुकाराममहाराज सांगतात.

‘भित्यापाठी ब्रह्मराक्षस’ या उक्तीप्रमाणे संकटाच्या भीतीनं लांब पळणाऱ्यांच्या जीवनात संकटे सतत पाठलाग करतात.

‘डगमगी तो वायां जाय। धीर नाही गोता खाय ।। ढळों नये जरी। लाब घरिचिया घरीं।।’

जो डगमगला घाबरला तो वाया जातो. ज्याच्यात धीर नाही, तो संकटात पुन्हा पुन्हा गटांगळ्या खातो. कोणत्याही परिस्थितीत घाबरत नाही आणि कोणत्याही आजारास डगमगत नाही, त्याचा आजार घरच्या घरीसुद्धा बरा होतो, असंही तुकाराम महाराज सांगतात.

मागील दोन महिन्यांपासून लागू झालेल्या टाळेबंदीमुळे प्रत्येकाला एक मोकळा अवकाश लाभला आहे. या अवकाशात मोकळं मन भरकटण्याचीच शक्यता अधिक असते. याबाबत तुकाराममहाराजांचा पुढील अभंग उद्बोधक आहे-

‘मोकळे हे मन कष्ट । करी नष्ट दुर्जन।।’

आज जगातील सर्व माध्यमं करोना महामारीने व्यापली आहेत. मिळालेल्या रिकाम्या वेळेत आपण सतत करोनाच्या बातम्या पाहत मनात सदैव त्याचाच जप चालू ठेवला, तर हा करोना आपल्या अंतर्मनात घर करून बसतो. अंतर्मनाची शक्ती अफाट असल्यामुळे हळूहळू काल्पनिक आजार बळावतो. त्याचे दूरगामी परिणाम आरोग्यावर होतात.

‘ज्याचें जया ध्यान । ते चि होय त्याचें मन ।।’

असं तुकारामांचं मनोविज्ञान सांगतं. यास्तव मिळालेल्या अवकाशात सतत टीव्ही आणि मोबाईल यांवरील बातम्या पाहून काळजीत पडून उपयोगाचं नाही. आपल्या ध्येयाला अनुसरून रचनात्मक विचारात मनाला गुंतवत आपणच आपल्या स्तरावर मानसिक स्वास्थ्याचा नवा मार्ग शोधणं आज नितांत गरजेचं आहे.

‘आपुले आपण जाणावे स्वहित । जेणें राहे चित्त समाधान।।’

आपल्या प्राचीन उपचार पद्धतीत शरीर आणि मनाचं अद्वैत सांगितलं आहे. मनच रोगट असेल तर शरीर स्वस्थ राहूच शकत नाही. म्हणून तुकाराममहाराज म्हणतात,

‘म्हणोनि आयुक्तपण मनाचे। तें चि सर्वस्व दुःखाचें ।।’

मनाची अस्थिरता हेच दुःखाचं कारण होय. मनच दुःखी असेल तर बाहेरच्या सर्व गोष्टी जीवनात अर्थहीन ठरतात.

‘मनाच्या तळमळे । चंदनही अंग पोळे।।’

भावनिक नियोजन जर उत्तम असेल तर त्याचा सकारात्मक प्रभाव आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर होतो, असा तुकाराममहाराजांचा दृष्टिकोन आहे.

मन:स्थितीचा परिणाम रोगप्रतिकारक पांढऱ्या पेशीवर होतो. म्हणून मन प्रसन्न ठेवणं हे नितांत गरजेचं ठरतं. या दृष्टीनं ‘मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारण।।’ या अभंगात खूप मोठं मनोविज्ञान तुकाराममहाराजांनी मांडलं आहे.

सर्व शक्तीचे आणि ऊर्जेचे मूलस्त्रोत म्हणून तुकाराममहाराज मानवी मनाकडे पाहतात. रोगप्रतिकारक शक्तीचं आणि मनाचं अंगभूत नातं आहे. मन अस्थिर बनलं तर Noradrenaline, dopamine, Serotonin अशा शरीरातील जीव रसायनांमध्ये असंतुलन होऊन त्याचा परिणाम रोगप्रतिकारक शक्तीवर होतो. अशा काळात कोणताही संसर्ग झाला, तर त्याचा प्रभाव होण्याची शक्यता जास्त असते. आजार रोगजंतूमुळे होणारा असो की, विषाणूद्वारे होणारा असो, आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं हेच महत्त्वाचं ठरतं.

‘संताचिया संगती । मनोमार्ग गती।।’ या अभंगातून ज्ञानेश्वरांनी संतसंगतीतून मनास सदगती लाभत असल्याचं सांगितलं आहे. मानसिक स्थैर्यासाठी तुकाराममहाराजांनाही संतसंगती नितांत महत्त्वाची वाटते. ‘करिशील तो करीं संतांची संगत । आणीक तो मात नको मना।।’ असं ते म्हणतात. ऑक्सफर्ड विद्यापीठात सलग १० वर्षं प्रयोग करून निष्कर्ष मांडण्यात आला की – ‘सकारात्मक वृत्तीच्या मंगलदायक विचार करणाऱ्या व्यक्तीच्या जवळ गेल्यानंतर लगेच पंधराशे पांढऱ्या पेशी शरीरात वाढतात. नकारात्मक अमंगल विचार करणाऱ्या माणसाजवळ गेल्यानंतर लागलीच रक्तातील सोळाशे पांढऱ्या पेशी कमी होतात.’ या निष्कर्षातून तुकारामहाराजांचं मनोविज्ञानच प्रतिध्वनित होतं.

मानसिक हानी लवकर भरून न निघणारी असते. ‘भंगलिया चित्ता । ना ये काशाने सांधिता।।’ असं तुकाराममहाराज सांगतात. आर्थिक मंदीतून बाहेर पडणं जेवढं अवघड, त्यापेक्षाही मानसिक धक्क्यातून सावरणं अधिक अवघड. आपल्या मनावर विजय मिळवलेला माणूस जीवनातील प्रत्येक संकटावर विजय मिळवू शकतो. ‘तुका म्हणे मना पाहिजे अंकुश। नित्य नवा दिस जागृतीचा।।’ मनावर नियंत्रण असेल तर संकट काळातही येणारा प्रत्येक दिवस नवजागृतीचा ठरतो.

महामारीच्या धास्तीनं हवालदील होण्यापेक्षा त्यावर मात करण्याचा दृढनिश्चय आज आवश्यक आहे. ‘निश्चयाचे बळ । तुका म्हणे तेचि फळ।।’ पराभव डोळ्यासमोर दिसत असला तरी आपल्या सामर्थ्यावर दृढ विश्वास असेल, तर पराभव कधीच होणार नाही. विजय दिसत असूनही आपल्या मनात त्याबद्दल विश्वास नसेल, तर आपण कदापि जिंकू शकणार नाही.

महामारीत संपूर्ण जगच हादरलं आहे, म्हणून स्वतःच्या मनाची ताकद ओळखून आपला तोल आपणच सावरण्याचा हा काळ आहे. या वैश्विक महामारीत स्वतःला सावरण्यासाठी तुकाराममहाराजांचं मनोविज्ञान प्रत्येक पावलावर उपयुक्त ठरतं.

..................................................................................................................................................................

लेखक डॉ. रवींद्र बेम्बरे वै. धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालय (देगलूर) इथं प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

rvbembare@gmail.com

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.      

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Dattahari Honrao

Thu , 11 June 2020

लेख अतिशय आवडला.अत्यंत मुलगामी चिंतन मांडलात ती फकीर जून्नराची दंतकथा फारचं समर्पक आहे.आज रोगाने कमी पण त्याच्या धास्तीनेच अधिक लोक मरत आहेत हे वास्तव मांडलात.हे सत्य आहे की.संताचे वचन हे अनुभवातून आलेले असतात.आपल्यासारखे कागदी ज्ञान नसते म्हणून ते शाश्वत असते.आजारापेक्षा त्याची धास्तीच अनेकांना मरण्यासाठी पुरेशी असते. म्हणून महामारीत औषधांएवढंच मनोबल महत्त्वाचं ठरतं. मनोबल वाढवण्यासाठी जगाच्या बाजारात कोणतंही औषध उपलब्ध नाही. त्यासाठी आपला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलावा लागतो. संत दर्शन हेच या रोगांवर रामबाण इलाज आहे. सरकार फक्त आत्मनिर्भरतेची घोषणा करु शकत. संत दर्शन मानवाला आत्मनिर्भरता देऊ शकतं. अप्रतिम मांडणी केल्याबद्दल विशेष अभिनंदन सर!


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......