'नटले तुमच्यासाठी' : शृंगारिक लावणीची दिलखेचक अदा
कला-संस्कृती - चलत्-चित्र
संदेश मुकुंद कुडतरकर
  • ‘नटले तुमच्यासाठी’ या कार्यक्रमातील एक अदा
  • Sat , 21 January 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti चलत-चित्र नटले तुमच्यासाठी Natale Tumchya sathi भूषण कोरगावकर Bhushan Korgaonkar

'काली बिल्ली' प्रॉडक्शन्स निर्मित, भूषण कोरगांवकर लिखित आणि सावित्री मेधातूल दिग्दर्शित 'नटले तुमच्यासाठी' हा लावणीचा छोटेखानी कार्यक्रम म्हणजे 'संगीत बारी'ची एक झलक आहे. प्रत्यक्ष ‘संगीत बारी’ पाहायचा योग येईल तेव्हा येईल, तोवर दुधाची तहान ताकावर भागवण्यासाठी गेलो होतो. 'संगीत बारी'च्या अभ्यासाच्या निमित्ताने आलेल्या अनुभवांचं कथन सावित्री आणि भूषण करत असताना त्याला मिळालेली लावणी सम्राज्ञी शकुंतलाबाई नगरकर आणि आकांक्षा कदम यांच्या नृत्याविष्काराची जोड हा अभूतपूर्व अनुभव होता. साजेशी प्रकाश योजना आणि संगीत यांच्या साथीने तर जणू इंद्राचा स्वर्गलोकच पृथ्वीवर अवतरल्याचा आभास निर्माण केला होता. या ट्रेलरमुळे तर 'संगीत बारी' पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

भूषण आणि सावित्रीने निवेदनातून मोहनाबाईंच्या सहवासातल्या अनुभवांचे जे मिश्किल किस्से सांगितले, त्यामुळे हसून हसून पुरेवाट झाली. फडातली लावणी आणि संगीत बारी यांतला फरक त्यांनी नेमकेपणे उलगडून दाखवला. केवळ एवढ्यावरच न थांबता, लावण्यांमधील विविध विषयांवरही त्यांनी भाष्य केलं. नटांचे, नर्तिकांचे, थिएटर मालकांचे, प्रेक्षकांचे उदगार तर अगदी अंतःकरणातलं सत्य उलगडून दाखवणारे. देशात धर्माचं राजकारण चालू असताना मस्तानीची वंशावळ पुढे चालवणाऱ्या या मुस्लीम स्त्रिया मंदिरात जातात, गौरी-गणपतीचा सण साजरा करतात, तेव्हा सर्वधर्मसमभाव यांनाच नीट कळल्याचं समजतं. सर्व सामाजिक स्तरांतले त्यांचे प्रेक्षक पाहिले की, हरिवंशराय बच्चनजींच्या मधुशालेची आठवण झाल्यावाचून राहत नाही… "रंक राव में भेद हुआ है कभी नहीं मदिरालय में, साम्यवाद की प्रथम प्रचारक है यह मेरी मधुशाला..." 'प्रेक्षकांतल्या प्रत्येक पुरुषाला जेव्हा असं वाटेल की, स्टेजवर नाचणारी बाई फक्त आपल्यासाठी नाचतेय, तेव्हा ती खरी लावणी', अशा शब्दांतून मोहनाबाई व्यक्त होतात, तेव्हा शकुंतलाबाईंच्या खल्लास करणाऱ्या अदांचं गूज कळतं.

बाईंच्या नृत्याचं वर्णन तरी काय करावं! डोळ्यांचे, भुवयांचे विभ्रम, ओठांना मध्येच घातलेली मुरड, हातांच्या हालचाली या एवढ्यावरच बाई एक अख्खं साम्राज्य उभं करतात! खरं तर खच्ची करतात असंच म्हणायला हवं. प्रेक्षकांमधल्या विश्वामित्रांची विकेट न पडली तरच नवल. बाई मध्येच कुणाकडे तरी घायाळ नजरेनं पाहत, क्षणात नजरेनं इशारा करत, 'तुम्ही नाही, तुमच्या मागे बसलेले' असं म्हणतात, तेव्हा प्रेक्षकांतून हास्याची एकच लाट फुटते. देहबोलीतून बाई एका ब्राह्मणाची सर्व दिनचर्या अगदी सगळ्या बारीकसारीक तपशीलांसकट ज्या विनोदी पद्धतीनं साकार करतात, त्याला तोड नाही. आकांक्षा कदमनेही बाईंना तितकीच दमदार साथ दिली आहे. शिट्ट्या आणि टाळ्यांच्या गजरात 'वन्स मोअर'ची दाद मिळत असतानाच या रंगलेल्या मैफिलीची सांगता होते, तेव्हा एक अनामिक चुटपूट लागून राहते. स्त्रीदेहात जागोजागी ईश्वरानं पेरलेलं शृंगारिक काव्य अनुभवण्यासाठी हा कार्यक्रम प्रत्येक रसिकानं एकदा तरी पाहायलाच हवा.

लेखक मुंबईस्थित 'अक्सेंचर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीत टीम लीड म्हणून कार्यरत आहेत.

msgsandesa@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......