अजूनकाही
मुंबईच्या काँक्रीटच्या जंगलात मालाड पूर्वेला, अगदी हायवेच्या समोरच्या सोसायटीमध्ये अलीकडे नुकतंच मला एक सरप्राईज मिळालं नि तेही पक्ष्यांकडून! तर झालं असं की, दुपारची वेळ. जेवणं झाली होती. काही लिहायचं होतं. मी आपली कम्प्युटरवर बसले होते. दिवस होता ३१ मे चा. दुपारी १.२०- १.२५ च्या दरम्यान अचानक पक्ष्यांचा कलकलाट ऐकू आला. जरा वेगळाच वाटला.
लिहिणं राहिलं बाजूला नि मी एकदम अॅलर्टवर... घरातही मोबाईल हातात घेऊन फिरायची सवय नाही लागलीय खरी! पण मिळाला लगेच नि हॉलच्या खिडकीत मोबाईल ठेवताक्षणीच ते आवाज रेकॉर्ड झाले. पण बाकी हवेत विरून गेलेच होते.
यातली खरी गंमत तर पुढेच आहे.
होतं काय, तुम्ही जंगलात फिरत असता. अचानक अनेक पक्ष्यांचे बोल तुम्ही ऐकता. आवाजाचा वेध घेत तुमची नजर भिरभिरते नि इकडे-तिकडे कुठेही कुणा पक्ष्याचा ठावठिकाणाही लागत नाही. अनुभवी पक्षी निरीक्षकाला मात्र माहीत असतं की, एक ड्रोन्गो (कोतवाल) अख्खं रान बोलतं करतो नि जंगलात अनेक पक्षी असल्याचा भास निर्माण करतो.
निसर्गातल्या भटकंतीत असले अनेक अजुबे भेटत राहतात. नि आश्चर्यही कधी कमी होत नाही. तिथं जंगल तुम्हाला साद घालत राहतं! तेच माझं परवा सोसायटीमध्ये झालं. अचानक दुपारहून एका पाठोपाठ एक असे पक्षी-बोल ऐकायला येतायत… काय झालंय बरं? आवाज तर अगदी जवळच्याच जंगली बदामाच्या झाडावरून येत होता. मी ऑडिओ रेकॉर्डिंग ऑन केलं. अगदी दोन मिनिटांत पुन्हा सगळं चिडीचूप! आसमंत एकदम निरव. पण रेकॉर्डिंग तर झालं होतं - बास - आता गोष्टी सोप्या होत्या.
पक्षीमित्रांबरोबर बोलले नि निघालं ते असं की, हा ड्रोन्गोच आहे, पण हा बहुदा Raket-tailed Drongo (पल्लवपुच्छ कोतवाल) आहे, जो हे विविध पक्ष्यांचे बोल बोलत होता. हे कोतवाल पक्षी २०-२२ -२४ पक्ष्यांचे आवाज काढू शकतात. परंतु हे सगळं त्या त्या प्रदेशावर अवलंबून असतं. म्हणजे ज्या भागात त्याचा अधिवास आहे- तिथे कोणकोणते पक्षी आहेत त्यावर ते अवलंबून असतं. त्यांनी जर कधी त्या पक्ष्याचा आवाज ऐकला नसेल तर त्याची नक्कल तो करू शकत नाही. त्यात Raket-tailed Drongo अधिक पक्ष्यांच्या आवाजाची नक्कल करू शकतात.
या रेकॉर्डिंगमध्ये Peregrine Falcon- ज्या आवाजांनी माझं लक्ष वेधलं तो नि मग इतर काही पक्षी-बोल ऐकू येतात. त्यात बहुदा small Blue Kingishar, Common Myna, Tailor Bird, Bee Eater, Black-napped Monarch, White-breasted waterhen इत्यादी पक्ष्यांच्या आवाजाची सही सही नक्कल केलेली आहेसं वाटतं.
मी सोसायटीतल्या फुलपाखरांचा सर्व्हे केलाय नि आश्चर्य म्हणजे मुंबईत या पूर्वी कधीही न आढळलेलं ‘ब्लॅक प्रिन्स’ हे फुलपाखरू मला आमच्या सोसायटीतच मिळालंय. पण मी सोसायटीतल्या पक्ष्यांचा असा सर्व्हे नाही केलाय. हां, नाही म्हणायला फिरता फिरता क्लिक केलेले अनेक रेकॉर्ड्स आहेतच, पण त्यात Raket-tailed Drongo नाही.
करोना इफेक्ट की काय न कळे, पण जरा निवांतपणामुळे आलेही असतील महाशय इकडे.
Drongo म्हणजे पक्ष्यांमधला कोतवालच.
विजेच्या तारांवर सहज नजर टाका. एक चमकदार तुकतुकीत काळ्याशार रंगाचा, आकारानं बुलबुलपेक्षा थोडा मोठा पक्षी बसलेला दिसतो. तोच कोतवाल, म्हणजे Black Drongo. तसंच Bronzed Drongo (छोटा कोतवाल), Ashy Drongo (राखी कोतवाल) आणि Greater Racket-tailed Drongo (पल्लवपुच्छ कोतवाल) इत्यादी आपल्याकडे आढळतात. पण यातला आकाराने मोठा आहे- तो Raket-tailed Drongo.
पहिल्यांदा हा पक्षी मी पाहिला नि त्या दिवशीच्या जंगल-फेरीचं सार्थक झाल्यासारखं वाटलं होतं मला. पक्षी निरीक्षणाच्या सुरुवातीच्या काळातली गोष्टए ही! कैक वर्षं झाली आता त्याला.. पण बास! त्या दिवशी आणखी पक्षी नाही दिसले तरी मी खुश होते. फॉर मी इट वॉज अ लायफर!!
तर चमकदार तुकतुकीत काळ्या रंगाचा, मैनेच्या आकाराचा हा Raket-tailed Drongo रुबाबदार दिसतो. कपाळावर चोचीच्या वर तुर्रेदार केसांचा तुरा आणि देखण्या दुभंगलेल्या शेपटीच्या टोकाला, अंदाजे फुटभर लांबीची, शेवटी चमच्याच्या आकाराची दोन पिसं तर त्याला भलतच आकर्षक रूप बहाल करतात. दोन लांब पिसांमुळे उडतानाही तो सुंदर दिसतो.
हे कीटक-भक्षी पक्षी आहेत, पण अगदी दुर्मीळपणे दृष्टीला पडला तर Spangled drongo मात्र फुलांतला मध खातो. काटे सावर, पांगारा किंवा निलगिरी त्याची आवडती झाडं.
तर अशा या नक्कलबाज ड्रोन्गोचा हा मी रेकॉर्ड केलेला ऑडिओ -
Drongo पक्षी वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज काढतात. हा बहुधा Greater Racket-tailed Drongo असावा. त्याचा हा एक ऑडिओ कवयित्री व पर्यावरण अभ्यासक रेखा शहाणे यांनी मालाड, मुंबईतील त्यांच्या सोसायटीच्या आवारात रेकॉर्ड केला आहे.
..................................................................................................................................................................
लेखिका रेखा शहाणे या कवयित्री व पर्यावरण अभ्यासक आहेत.
rekhashahane@gmail.com
..................................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment