‘हां, ये मुमकिन है’ : एका डॉक्टरचा बिहारमधला स्तिमित करणारा संघर्ष
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
डॉ. प्रताप विमल केशव
  • डॉ. तरु जिंदल आणि त्यांच्या इंग्रजी व मराठी पुस्तकांची मुखपृष्ठं
  • Wed , 10 June 2020
  • ग्रंथनामा शिफारस तरु जिंदल Taru Jindal हां ये मुमकिन है A Doctor's Experiments in Bihar

सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत तळमळीनं काम करणार्‍या डॉ. तरु जिंदल या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरने ‘हां, ये मुमकिन है : एका डॉक्टरचा बिहारमधला स्तिमित करणारा संघर्ष’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकात जे चित्र उभे केले आहे ते विस्मित करणारे आहे. डॉ. जिंदल यांनी दोन वर्षं बिहारमध्ये मागास भागात काम करताना जे अनुभवले, परिस्थितीत बदल घडवण्यासाठी जे प्रयत्न केले, ज्या आव्हांनाचा सामना केला आणि जे बदल घडवून आणले, याचा प्रवास म्हणजे हे पुस्तक.

या पुस्तकाचे दोन भाग आहेत. पहिल्या भागात दुष्काळासाठी कुख्यात असलेल्या मोतीहारी जिल्हा रुग्णालयात केलेले काम व अनुभव आणि दुसर्‍या भागात मसाढी (पटना जिल्ह्यातील एका गाव) येथील काम व अनुभव. या दोन्ही भागात डॉ. जिंदल यांनी बिहारमधील अनुभवांबरोबरच स्वत:ची जडणघडण, कुटुंब, पती-घर-संसार, वैद्यकीय शिक्षण घेतानाचे अनुभव यांचाही आढावा घेतला आहे. या दोन्ही भागांना जोडणारा मधला दुवा म्हणजे नेपाळ भूकंपाच्या वेळी त्यांनी केलेल्या कामाचा अनुभव.

भाग एक - मुक्काम मोतीहारी

भारतात आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्याच्या दृस्तीने मागासलेल्या राज्यांचं वर्गीकरण करताना ‘बिमारू’ हा शब्दप्रयोग केला जातो. हा शब्द बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान व उत्तर प्रदेश या राज्यांसाठी वापरला जातो. डॉ. रवीकान्त सिंह यांची ‘डॉक्टर फॉर यू’ ही स्वयंसेवी संस्था अनेक वर्षांपासून आरोग्य क्षेत्रात काम करत आहे. ही संस्था बिहार सरकारबरोबर विविध आरोग्य प्रकल्पांच्या माध्यमातून जोडली गेली आहे. डॉ. जिंदल यांनी या ‘बीमारू’ राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या बिहार राज्यातल्या अत्यंत मागासलेल्या मोतीहारी जिल्ह्याची निवड एक आव्हान म्हणून केली. त्यांनी ‘डॉक्टर फॉर यू’ या एनजीओच्या ‘गायनाकोलॉजिस्ट कन्सल्टंट’ म्हणून तिथल्या शासकीय रुग्णालयात काम २०१४ साली काम सुरुवात केली. त्या अगोदरची त्यांची दहा वर्षं मुंबईत वैद्यकीय शिक्षण घेण्यात (पदव्युत्तर शिक्षण सायन हॉस्पिटलमधून झाले) गेली. त्यांच्यावर वैद्यकीय शिक्षण घेत असल्यापासून ‘सेवांकुर’ या संस्थेचा प्रभाव होता.

दवाखान्याची परिस्थिती अतिशय वाईट असते आणि त्याचा परिणाम रुग्णासेवेवर होत असतो. वॉर्डबॉय, परिचारिका व डॉक्टर्स काम करण्यास इच्छुक नाहीत, हे समजल्यावर काही काळ डॉ. जिंदल नैराश्यग्रस्तही होतात. पण काही चांगले काम करता येते का, याचे पर्यायही शोधतात.

शंभर वर्षांपूर्वी मोतीहारी जिल्ह्यातील चंपारण भागात तेव्हा पन्नाशीत असलेल्या महात्मा गांधींनी नीळ उत्पादक शेतकर्‍यांसाठी इंग्रजांविरुद्ध सत्याग्रह केला होता. गांधींच्या याच पावलावर पाऊल टाकत ही ३० वर्षांची तरुण डॉक्टर पडझड झालेल्या आरोग्यव्यवस्थेत ‘लहानसा बदल’ करण्यासाठी कामाला लागते. जाड कातडीच्या व्यवस्थेविरुद्ध लढ्याची सुरुवात स्वतःपासून करते आणि तीही सत्याग्रहाच्या मार्गाने. डॉ. जिंदल स्वच्छतेसाठी स्वतःच्या हातात झाड़ू घेतात, तेव्हा लाजून दवाखान्यातील स्वच्छता कर्मचारी मदतीला येतात.

डॉ. जिंदल एका बाळंतीणीचा जीव अतिशय मेहनतीनं वाचवतात, तेव्हा रुग्णालयातील सर्व स्टाफ आश्चर्यचकित होऊन पाहत राहतो. डॉ. जिंदल रुग्णालयात छोटे-छोटे बदल करायला सुरू करतात, त्यातून कर्मचारी वर्गात आत्मविश्वास निर्माण होत जातो. त्यांचे प्रत्यक्ष काम बघून नर्स व दवाखान्याचे प्रशासक सोबतीला येतात आणि रुग्णालयाचे रूप पालटून लागते.

मोतीहारी जिल्हा रुग्णालयाचा कायापालट करण्यात जिल्हाधिकारी व त्यांच्या सोबत असलेला शिकाऊ आयएएस अधिकारी यांनीही महत्त्वाची भूमिका निभावली. पण हॉस्पिटलमधील स्वच्छताकर्मी, वॉर्डबॉय, मावशी, परिचारिका, डॉक्टर व इतर कार्यालयीन कर्मचारी वर्ग यांची एकत्र मोट बांधण्याचं सर्वांत अवघड काम डॉ. जिंदल यांनी यशस्वीपणे केलं. त्यांना सुरुवातीला दवाखान्यातल्या डॉक्टरांचा अल्प प्रतिसाद मिळतो. तेव्हा त्या सामान्य प्रसूती करण्याचं प्रशिक्षण नर्सला देतात. त्यामुळे प्रसुतीकक्षाच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन रुग्णालयाबद्द्ल लोकांमध्ये विश्वासाचं वातावरण तयार होतं. नॉर्मल डिलिवरीचं प्रमाण वाढतं. डॉ. जिंदल यांनी फक्त सहा महिने मोतीहारी जिल्हा रुग्णालयात काम केलं. पण त्यातून जो पायंडा पाडला गेला, त्याचं फळ म्हणून त्या रुग्णालयाला तीन वर्षांनी बिहारमधील सर्वांत चांगले सरकारी रुग्णालय म्हणून केंद्र सरकारचा ‘कायाकल्प’ पुरस्कार मिळाला.

मोतीहारीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी डॉ. जिंदल यांची सार्वजनिक आरोग्यक्षेत्रात काम करण्याची तळमळ बघून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व त्याअंतर्गत येणार्‍या ‘आशा’ कर्मचार्‍यांना प्रशिक्षित करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. त्याचंही सविस्तर रोचक वर्णन या पुस्तकात आहे. त्यांच्या या कामामुळे गरोदर मातांना दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळण्यास मदत झाली. बिहारच्या सांस्कृतिक रूढी-परंपरांचा जनतेच्या आरोग्यशी कसा संबंध आहे, हेही त्यांनी नमूद केलं आहे.

भाग दोन - मुक्काम पोस्ट मसाढ़ी

डॉ. जिंदल मोतीहारीमधील प्रकल्प संपल्यावर महाराष्ट्रात परत येतात आणि तीन-चार महिने महात्मा गांधी मेडिकल कॉलेज सेवाग्राम, वर्धा येथे अध्यापनाचे काम करतात. पण या काळात बिहारमधील आरोग्य समस्या त्यांना अस्वस्थ करत राहतात. परिणामी त्या पुन्हा बिहारला जाण्याचा निर्णय घेतात. या वेळी त्या काम करण्यासाठी मसाढ़ी हे गाव निवडतात. हे गाव बिहारची राजधानी असलेल्या पटनापासून फक्त २५ किलोमीटरच्या अंतरावर असलं तरी विकासापासून शेकडो किलोमीटर दूर असल्याचा अनुभव डॉ. जिंदल यांना येतो. गांधीजीनी सांगितलं होतं- ‘गावाकडे चला’ व डॉ. आंबेडकरांनी सांगितलं होतं- ‘शहराकडे चला’. या दोन्ही महापुरुषांच्या विचारांमधील विरोधाभासासोबत डॉ. जिंदल काम करताना ‘स्व’चा अर्थ शोधतात आणि तो ‘स्व’ अजून मोठा करण्याचा प्रयत्न करतात.

डॉ. जिंदल मुंबईतून बिहारमधील मसाढ़ी या गावात गेल्या, पण या गावातील शेकडो लोक कामासाठी मुंबईसारख्या महानगरांमध्ये गेले होते. त्यांना गावात आरोग्य केंद्र उभारत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ‘डॉक्टर फॉर यू’चे डॉ. रवीकान्त सिंह काही दानशूर लोकांकडून आर्थिक मदत मिळवतात आणि आपलं तीन मजली घर आरोग्यकेंद्र चालवण्यासाठी देतात.

ग्रामीण भागातील प्रत्यक्ष काम करताना मिळालेल्या अनुभावातून डॉ. जिंदल यांना हे समजतं की, आरोग्य समस्या या पुरुषप्रधान कुटुंबव्यवस्था, सरंजामी व आर्थिक परिस्थितीच्या उपज असतात. गावातील गरोदर मातांचा प्रश्न, बाळंतपण व मुलांचं कुपोषण याबाबतचे अनुभव त्यांनी लिहिले आहेत. या व्यतिरिक्त त्या गावातील इतर साधारण रुग्णही (वैद्यकीय भाषेत याला ‘जनरल प्रॅक्टिस’ असं म्हणतात) पाहत असतात. हातात झाड़ू घेऊन गाव स्वच्छ करतात, सामूहिक शेतीतून भाजीपाला पिकवतात. या सर्व कामांतून त्या गावातील लोकांचा विश्वास जिंकतात.

डॉ. जिंदल यांना ग्रामीण भागातील अमानवी व विषमतावादी जातीभेदाचा वाईट अनुभव येतो. त्यांची एक जमेची बाजू ही होती की, त्या सवर्ण होत्या. अन्यथा त्यांना आधीच वेगळ्याच प्रश्नांना भिडावं लागलं असतं. गावातील अनेक सांस्कृतिक बारकावे समजून घेऊन, त्या संस्कृतीविषयीचे आपले मतभेद कायम ठेवून त्या गावाशी एकरूप होतात. येणार्‍या रुग्णाच्या घरी जाऊन त्याची शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक परिस्थिती समजून घेतात आणि त्यानुसार गावातील जनतेसमोर प्रश्न हाताळण्यासाठी पर्याय उभा करतात. यालाच वैद्यकशास्त्रात ‘कम्युनिटी फिजीशियन’ असं म्हणतात.

मसाढ़ीतील आरोग्यकेंद्रात काम करताना ‘जनस्वास्थ्य सहयोग’ (बिलासपुर), ‘स्वस्थ स्वराज’ (कालाहांडी-ओड़ीशा), ‘सर्च’ (गडचिरोली) किंवा ‘जामखेड़’ (अहमदनगर)चे आरोग्याचे मॉडेल उपयोगी पडत होते. पण प्रत्येक ठिकाणी सामाजिक व आर्थिक परिस्थिती वेगळी असते, तशीच तिथेही होती. त्यामुळे सध्याच्या बदललेल्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक परिस्थितीत डॉ. जिंदल अतिशय कष्टाने ‘मसाढ़ी’ मॉडेल उभं करतात.

नेपाळमध्ये भूकंप झाला तेव्हा डॉ. जिंदल आरोग्यपथकाच्या माध्यमातून तिथंही मदतकार्य करण्यासाठी जातात. नेपाळने अतिशय प्रभावी शासकीय आरोग्य यंत्रणा व काम करणार्‍या आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करून जनतेला आरोग्यसेवा पुरवल्याचं वर्णन या पुस्तकात डॉ. जिंदल यांनी केलं आहे. वैद्यकीय शिक्षणात ‘प्रिवेंटिव्ह सोशल मेडिसिन’ (पीएसएम) नावाचा विषय असतो. त्याच्या पहिल्याच धड्यात डॉ. विर्चोचं वाक्य आहे - ‘Medicine is social science and politics is medicine on large scale.’ (वैद्यकीयशास्त्र हे समाजशास्त्र आहे. राजकारण हा मोठ्या पातळीवरील उपचार आहे). नेपाळमध्ये सत्तांतर होऊन कम्युनिस्ट सरकार सत्तेत आलं आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत चांगले बदल झाले, याची प्रचिती डॉ. जिंदल यांना आली.

‘मसाढ़ी’ मॉडल विकसित होत असताना नियतीच्या मनात वेगळंच काहीतरी मंजूर होतं. डॉ. जिंदल यांना पिट्यूटरी ट्यूमर या कष्टसाध्य आजारानं ग्रासलं. त्यामुळे अत्यंत मेहनतीनं उभं केलेलं काम अर्धवट सोडून उपचारासाठी त्यांना उपचारासाठी मुंबईला परत यावं लागलं. या आजारातून त्या लवकर बऱ्या होवोत ही सदिच्छा.

ग्रामीण भागात काम करू इच्छिणार्‍या सेवाभावी डॉक्टरांना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना खासकरून महिलांना या पुस्तकातील अनुभव समृद्ध करतो आणि प्रेरणाही देतो. रमा हर्डीकर – सखदेव यांनी या पुस्तकाचा सुबोध मराठी अनुवाद केला आहे.

..................................................................................................................................................................

एका डॉक्टरचा बिहारमधला स्तिमित करणारा संघर्ष : ‘हां, ये मुमकिन है’ – डॉ. तरु डॉ. जिंदल

अनुवाद : रमा हर्डीकर – सखदेव

रोहन प्रकाशन, पुणे

पाने – २८६, मूल्य – ३२५ रुपये.

..................................................................................................................................................................

एका डॉक्टरचा बिहारमधला स्तिमित करणारा संघर्ष : ‘हां, ये मुमकिन है’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5203/Haan-Ye-mumkin-Hain

..................................................................................................................................................................

लेखक डॉ. प्रताप विमल केशव डॉक्टर आहेत.

pratap20s@yahoo.com

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......