उपोद्घात
‘शिक्षण, तंत्रज्ञान, बदल आणि आपण’ असा विषय घेऊन लिहायचं म्हटलं तर प्रथम हे चारही संबोध स्पष्ट करणे आवश्यक आहे.
‘शिक्षणा’चा इथे घेतलेला अर्थ शाळांमध्ये दिले जाणारे, त्यातही उच्च-माध्यमिक (आठवी, नववी आणि दहावी) औपचारिक शिक्षण असा आहे.
‘तंत्रज्ञाना’चा अर्थ हा या शिक्षणासाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञान असा आहे. यात संगणक, स्मार्टफोन, त्याच्यावर असलेल्या कॅमेरा, ध्वनिमुद्रण इत्यादी सोयी, इंटरनेट, इंटरनेटवर उपलब्ध असलेली माहिती, सोशल-मीडिया प्लॅटफॉर्म्स (व्हॉट्सअॅप, फेसबुक इत्यादी), लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम्स; गूगलसारख्या विविध प्रकारांनी उपयोगी पडणाऱ्या सेवा (माहिती शोध, ई-मेल्स, गूगल डॉक्स, क्लासरूम इत्यादी) या गोष्टींचा समावेश होतो. यातल्या बहुतांश प्रणाली / सेवा विनामूल्य उपलब्ध आहेत. ज्या सेवा सामान्य लोकांसाठी विनामूल्य नाहीत, त्यातल्याही अनेक शाळांसाठी विनामूल्य उपलब्ध आहेत. मात्र यासाठी विद्यार्थ्यांकडे किमान स्मार्टफोन, शक्य असल्यास संगणक आणि विश्वासार्ह व चांगला वेग असलेलं इंटरनेट कनेक्शन असणं आवश्यक ठरणार आहे.
शेवटचा मुद्दा ‘बदला’चा. आज पारंपरिक अर्थाने जे शिक्षण दिले जाते ते मुलांनी शाळेत जायचे; वर्गात ५०-६० मुलांनी एकत्र जमायचे; एक शिक्षक दर तासाला येऊन, पुस्तक उघडून, मुलांना काही विशिष्ट मजकूर शिकवणार; शिकवताना तो वाचून दाखवणार; त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी अधोरेखित करणार; फळ्यावर काही लिहिणार किंवा आकृती काढणार; अशा पद्धतीने होते. थोडक्यात ‘नवीन’ तंत्रज्ञान या प्रक्रियेत फारसे वापरले जात नाही. आता मात्र करोनाच्या साथीमुळे एकत्र जमणे शक्य नसल्यामुळे, हे शिक्षण ऑनलाइन पद्धतीने द्यावे लागणार आहे. ते देत असताना वर उल्लेख केलेले सर्व तंत्रज्ञान वापरून त्यात पारंपरिक पद्धतीमध्ये शक्य नव्हत्या अशा अनेक गोष्टींचा उपयोग करणे शक्य होणार आहे. मात्र त्यासाठी हे सर्व तंत्रज्ञान शिकून त्याचा वापर करावा लागणार आहे. हा जुन्या पद्धतीकडून नव्या पद्धतीकडे होणारा प्रवास या ‘बदला’त अभिप्रेत आहे.
नवे ऑनलाइन वर्ष
तर असं हे नवीन शैक्षणिक वर्ष येऊ घातलं आहे. ते चालू तर होणार पण करोनाच्या साथीमुळे पारंपरिक पद्धतीने, अर्थात्, सुट्ट्या संपून मुले शाळेत जायला लागून ते चालू होणार नाही, तर ते ऑनलाइन स्वरूपात चालू होणार अशी चिन्हं आहेत. या ऑनलाइन स्वरूपातल्या शाळा व शिक्षणाबद्दल सध्या पुष्कळ चर्चा चालू आहे. हे ऑनलाइन वर्ग कसे घ्यायचे; मुलांना ऑनलाइन शिकवायचे म्हणजे काय करायचे? त्यासाठी कोणती साधने वापरायची? ती कशी वापरायची? ती सगळ्यांकडे असणार का? या व अशा अनेक प्रश्नांबद्दल पुष्कळ उलटसुलट मतं ऐकायला मिळत आहेत.
यात एक धागा प्रामुख्याने दिसतो. हा धागा ऑनलाइन शिक्षण देण्याच्या संकल्पनेलाच आव्हान देणारा आहे. ऑनलाइन माध्यमातून शिक्षण व्यवस्थित देता येऊ शकते का? अशा पद्धतीने शिक्षण घेणे/देणे योग्य आहे का? वर्गामध्ये प्रत्यक्ष उपस्थित असताना मिळू शकते त्या दर्जाचे शिक्षण आपण ऑनलाइन देऊ शकणार नाही. म्हणूनच ऑनलाइन शिक्षण देण्याचा अट्टहास हा मुख्यत: शाळांच्या आणि पालकांच्या मनात असलेल्या, अभ्यासक्रम पूर्ण करण्याबद्दलच्या घाईचा आणि त्या अनुषंगाने असलेल्या असुरक्षिततेचा द्योतक आहे, असा हा साधारण विचार आहे.
या विचाराचे समर्थन दोन प्रकारांनी केलेले आपल्याला दिसते.
वर्षभराचा विराम?
काही थोडे जण या विचाराचे समर्थन वैचारिक / तात्त्विक भूमिकेतून, काहीशा टोकाच्या भूमिकेतून करतात की ‘सहा महिने शाळा बंद राहिल्या, किंबहुना एक शैक्षणिक वर्ष त्या बंद राहिल्यात तरी काय बिघडलं? या वेळाचा, या फुरसतीचा उपयोग करून घेऊन एकूणच शिक्षणाबद्दल, आयुष्याबद्दल, आपल्याला काय करायचे आहे याबद्दलचा विचार मुलांना करू द्यावा, या सुट्टीचा आनंद उपभोगू द्यावा, आणि या काळात त्यांना त्यांच्या पद्धतीने, जे हवे ते आणि जेवढे हवे तितके शिकू द्यावे.’
मात्र बहुतांश ठिकाणी या विचाराचे समर्थन हे नवीन तंत्रज्ञानाबद्दल असलेल्या संशयाच्या व अविश्वासाच्या भावनेतून केलेले दिसते. या मत-प्रवाहाचा मुख्य धागा हा ‘आधुनिक तंत्रज्ञान आणि त्याच्याबद्दल असलेली नापसंती’ अशा स्वरूपाचा असतो.
या दोन्ही मत-प्रवाहांसंबधी, तसेच तंत्रज्ञान आणि त्याचे शिक्षणाशी, व पर्यायाने आपल्या आयुष्याशी असलेले नाते, या मुद्यांवर, विशेषतः थोडी दुसऱ्या बाजूची मते मांडणे आवश्यक आहे.
यातल्या पहिल्या मुद्द्यासंबंधीची चर्चा ही अधिक तात्त्विक होण्याची शक्यता आहे, आणि तो प्रस्तुत लेखाचा उद्देश नाही. मात्र हे सांगणे इथे आवश्यक आहे की, काही थोड्या जणांना जरी सहा महिने किंवा वर्षभर विराम घेण्याची गरज वाटली तरी प्रत्यक्षात ते शक्य होणे दुरापास्त आहे. बहुसंख्य पालक आपल्या पाल्याचे एक संपूर्ण वर्ष ‘वाया’ जाऊ द्यायला तयार होणार नाहीत. तसेच, शाळेत नवीन प्रवेश घेण्यास उत्सुक असलेल्या बालकांना एक वर्ष घरीच राहा असं सांगणेही शक्य होणार नाही. शाळांचीही या नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची उत्सुकता, आर्थिक कारणांसाठी, असणार. थोड्याशा तात्त्विक भूमिकेतून बोलायचे म्हटले तर, अशा पद्धतीने जग थांबून राहावे, अशी अपेक्षा करणेच अव्यवहार्य आहे.
य इच्छति हरिं स्मर्तुं व्यापारान्तगतैरपि ।
समुद्रे शान्तकल्लोले स्नातुमिच्छति दुर्मतिः ॥
या उक्तीत कवी म्हणतो की, व्यापार वगैरे संपल्यानंतर निवांतपणे परमेश्वर-चिंतन करू म्हणणारा मनुष्य हा समुद्राच्या काठावर उभा राहून ‘या लाटा एकदा थांबू देत, मग मी निवांत आंघोळ करीन’ असं म्हणणारा दुर्मती असतो. इथे मुद्दा परमेश्वर-चिंतनाचा नसला तरीही जगाच्या प्रवाहाची अप्रतिहतता तितकीच खरी आहे आणि ती थांबावी अशी अपेक्षाही तितकीच वृथा आहे.
तसेच तंत्रज्ञानाच्या संदर्भात आणखी एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे नवीन तंत्रज्ञानाची उभारणी उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाच्या साहाय्यानेच होत असते. अश्मयुगातला माणूस, आजच्या माणसाइतकाच बुद्धिमान असला तरी, संगणक निर्माण करू शकत नाही तो याच कारणाने. मात्र आज आपलं तंत्रज्ञान बर्यापैकी प्रगत असल्याने, तंत्रज्ञानाचा इथून पुढे होणारा प्रवास अधिकाधिक वेगानेच होत जाणार आहे. त्यामुळेच वर्षभराचा विराम घेतला तर जगाच्या प्रवाहात परत आल्यानंतर जे तंत्रज्ञान आपल्याला दिसेल ते फार वेगाने पुढे गेलेले असेल व ती दरी भरून काढणे जवळजवळ अशक्य होऊन बसेल. यासाठीही, वर्षभराचा विराम ही परवडण्यासारखी गोष्ट नाही.
दुसर्या, नवीन तंत्रज्ञानाला असणार्या विरोधासंबंधी मात्र विस्ताराने बोलणे आवश्यक आहे.
नव्या तंत्रज्ञानाला विरोध
नवीन तंत्रज्ञानाबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करणार्या अनेकांना हे ध्यानात येत नाही की, ज्या जुन्या गोष्टी नवीन तंत्रज्ञानामुळे आता होणार नाहीत अशी खंत ते व्यक्त करत असतात, त्या पारंपरिक गोष्टीही बहुतेक वेळा तंत्रज्ञानाच्या सहाय्यानेच शक्य झालेल्या असतात. उदाहरणार्थ, टीव्हीमुळे मुलांचे वाचन आता होत नाही अशी तक्रार करून टीव्हीच्या तंत्रज्ञानाला नावे ठेवणार्यांना हे लक्षात येत नाही की, वाचनासाठी आवश्यक अशी पुस्तकांची सार्वत्रिक उपलब्धता ज्यामुळे शक्य झाली ते छपाईचे तंत्रज्ञान हे मानवाच्या इतिहासातील सर्वाधिक क्रांतिकारी तंत्रज्ञानापैकी एक आहे! आपल्याला अशी कल्पना करणे सहज शक्य आहे की, जेव्हा या तंत्रज्ञानाचा उदय झाला त्या वेळच्या काही शिक्षक आणि पालकांनीही ‘मुलांचं पाठांतर आता होणार नाही, आता काय पाठांतर करण्याची गरजच नाही! पुस्तक उघडलं की मजकूर समोर हजर!’ अशा पद्धतीची तक्रार केली असणार. यातून आपल्याला एक तत्त्व लक्षात येतं की, तंत्रज्ञानाला असलेला विरोध हा प्रत्यक्षात ‘नव्या’ तंत्रज्ञानाला असतो. त्याच्या मुळाशी जाऊन बघितलं तर दिसतं की, या ‘नव्या’ तंत्रज्ञानाला असलेल्या विरोधही प्रत्यक्षात ते नवं तंत्रज्ञान आपल्याला येत नसल्यामुळे, त्यावर आपलं प्रभुत्व नसल्यामुळे, होणार्या अडचणीला, ते तंत्रज्ञान शिकून घ्यावं लागणार असल्यामुळे होणार्या त्रासाला असतो; आणि त्याच्याही मुळाशी जाऊन बघितलं तर दिसतं की, तो त्या त्रासाला असलेला विरोधही त्या बदलातून निर्माण होणार्या असुरक्षिततेला, आपल्या कंफर्ट झोनमधून बाहेर पडावे लागण्याला असतो.
तेव्हा आपण ऑनलाइन शिक्षणाला करत असलेला विरोध आपल्याला आपल्या कंफर्ट झोनमधून बाहेर पडावे लागत असल्यामुळे तर नाही ना याचा विचार प्रत्येकानं करणं आवश्यक आहे. ‘शिक्षण म्हणजे काय’, ‘शिक्षणामध्ये नक्की काय व्हायला पाहिजे’, आपण मुलांना शिकवतो की, ती स्वतःच शिकतात वगैरे तात्त्विक मुद्द्यांच्या या चर्चेत होणार्या समावेशाच्या मुळाशी ही असुरक्षिततेची जाणीव नाही ना, याचा विचार करणे आवश्यक आहे.
या प्रश्नांचे एकमेकांशी असलेले नाते समजावून घेण्यासाठी आपल्याला पुढील वैचारिक प्रारूपाचा उपयोग करता येईल.
का, काय व कसे?
अशी कल्पना करा की तीन समकेंद्री वर्तुळे आहेत. बाहेरच वर्तुळ ‘कसे?’; मधलं ‘काय?’ आणि आतले ‘का?’ बहुतेकांना आपापलं काम ‘कसं’ करायचं हे ठाऊक असतं. मात्र सध्याच्या आपल्या आयुष्यातली, व्यवसायांमधली गुंतागुंत (कॉम्प्लेक्सिटी) लक्षात घेता, प्रत्येक व्यक्तीला तिच्या क्षेत्रातला एखादा छोटासाच भाग करता येत असतो. त्यात तिचं विशेष प्रावीण्य (स्पेशलायझेशन) असतं. आपण ज्या गोष्टीसाठी काम करतो ती साकल्याने बहुतेकांना माहिती नसते.
उदाहरणार्थ – अश्मयुगातील दगडी हत्यार व आजचा संगणकाचा माउस या दोन्ही गोष्टी माणसाच्या पंज्यात सहज बसाव्यात याच कारणासाठी त्या-त्या विशिष्ट आकाराच्या बनवल्या गेल्या आहेत. पण अश्मयुगातल्या जवळजवळ प्रत्येक माणसाला हे हत्यार ‘संपूर्णपणे’ बनवता येत होतं. मात्र आज संगणकाचा माउस ज्याला ‘संपूर्णपणे’ बनवता येतो, असा एकही माणूस मिळणे कठीण आहे. ज्याला त्यातले प्लॅस्टिकचे भाग बनवता येतात, त्याला त्यातली संगणक प्रणाली माहिती नसते, ज्याला ती माहिती असते त्याला तयार माऊस बाजारात कसा पोहोचतो, ते माहिती नसते, इत्यादी इत्यादी.
ज्यांना ‘कसे?’च्या बरोबर ‘काय?’ ही माहिती असते, अशा काही थोड्या लोकांपैकीही बहुतेकांना हे सगळं ‘का?’ केलं जातं याची स्पष्टता नसते. मात्र आपल्याला असं दिसतं की, ही जाणीव असणे हे खरं म्हणजे खूप महत्त्वाचं असतं. या तीनही समकेंद्री वर्तुळांचा एकमेकांशी असलेला संबंध पाहिला तर आपल्याला दिसते की आपल्याला जेवढी ‘आतल्या’ वर्तुळाबद्दल स्पष्टता असेल, तितकी बाहेरच्या वर्तुळात ऐनवेळेला बदल करण्याची, परिस्थिती किंवा संदर्भानुसार आलेल्या बंधनांना तोंड देण्याची आपली क्षमता अधिक असते.
थोडक्यात, ज्याला आपलं काम साकल्याने माहिती असतं, त्याला त्याच्यातील एखादी प्रक्रिया बदलायची वेळ आली तरी संपूर्ण कामावर दुष्परिणाम न होता, किंबहुना ते अधिक कार्यक्षमतेने करण्यासाठी, ती कशी बदलायची हे त्याला सहज ठरवता येतं. ज्यांना ‘का?’ची स्पष्टता असते त्यांना केवळ ‘कसे?’च नव्हे तर ‘काय?’मध्येही प्रसंगानुसार किंवा परिस्थितीनुसार आवश्यक तो बदल करता येऊ शकतो.
हे सगळं इथे सांगण्याचा हेतू हा, की शिक्षणाच्या संदर्भांतसुद्धा ही तत्त्वे लागू होतात. नवीन तंत्रज्ञानातील होऊ घातलेल्या बदलांचा परिणाम हा मुख्यत: आपण ‘कसे?’ शिकवतो याच्यावर होणार आहे. (अर्थातच ‘काय?’ व ‘का?’ यावरही या सगळ्या बदलाचा परिणाम होईल, पण मर्यादित आणि तो लक्षात येण्यासाठीही आधी नवीन तंत्रावर प्रभुत्व मिळवणे आवश्यकच ठरणार आहे.) या ‘कसे?’मधल्या बदलाला तोंड देताना ‘काय?’ व ‘का?’ची स्पष्टता असेल तर तो बदल घडवून आणणे पुष्कळच सोपे होणार आहे.
शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाची चर्चा करत न बसता जर या ‘का?’ आणि ‘काय?’चा विचार करायचा म्हटले तरी सुद्धा हे स्पष्ट आहे की, शिक्षणाचा मुख्य उद्देश हा मुलांमध्ये त्या विषयाबद्दल प्रेम निर्माण करणे; तो विषय आपण आत्मसात करू शकतो याबद्दल आत्मविश्वास निर्माण करणे, आणि या सगळ्यातून शिकण्याची प्रक्रिया आनंददायी करणे हा होय.
‘का’ व ‘काय’ची चतुःसूत्री
हे होण्यासाठी मुलांना ‘शिकायचे कसे’ हे शिकवणे अत्यंत आवश्यक आहे. नुसता अभ्यासक्रम शिकवून भागण्यासारखे नाही. एकदा मुलांना स्वत:च्या स्वतः शिकता येऊ लागले आणि त्या शिकण्यातला आनंद त्यांना कळला की जगातला कोणताही विषय शिकणे त्यांच्यासाठी आनंददायी ठरते. चांगले शिक्षक मिळण्याचे भाग्य लाभलेल्या बहुतेक विद्यार्थ्यांचा हा अनुभव आहे. पण शिकवण्यामधे याशिवाय आणखीही काही गोष्टींचा समावेश होतो.
१. विषयाबद्दल प्रेम निर्माण करणे
२. तो विषय आपण शिकू शकतो हा आत्मविश्वास निर्माण करणे
३. प्रत्यक्ष अभ्यासक्रमातील विषय-वस्तू समजावून देणे
४. ते ज्ञान / माहिती स्वतःची स्वतः मिळवण्याची आणि ती समजून घेण्याची तंत्रे (techniques) शिकविणे.
आपण ‘का?’ आणि ‘काय?’ शिकवायचं याची ही वरील चतुःसूत्री जर मानली, तर पुढचा प्रश्न येतो की सद्यपरिस्थितीत, ऑनलाइनच्या माध्यमातून हे सगळं ‘कसं’ साधायचं?
वरील पैकी पहिली दोन सूत्रे ही शिक्षकाच्या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित आहेत. विषयाबद्दल मनापासून प्रेम असणे ही गोष्ट आव आणून, किंवा तात्पुरती तयारी करून करता येण्यासारखी नाही. ते प्रेम शिक्षकांमध्ये मुळात असावे लागते आणि जर ते असेल तर ते मुलांना निश्चितपणे दिसते आणि ते मुलांमध्ये संक्रमित होते. ऑनलाइनच्या संदर्भात लक्षात घेण्याजोगी गोष्ट ही की, हे प्रेम मुलांना दिसेल याची खात्री शिक्षकाने करून घेणे आवश्यक आहे. यासाठी शिकवताना शिक्षकाचा चेहरा मुलांसमोर असणे आवश्यक आहे. अर्थातच यासाठी आवश्यक ती व्हिडिओ क्षमता – चांगला कॅमेरा व पुरेशी बँडविड्थ – असणे आवश्यक आहे.
मुलांना एखाद्या विषयाचा आत्मविश्वास देण्यासाठी शिक्षकाकडे सह-अनुभूती असणे आवश्यक आहे. ही सह-अनुभूती म्हणजे आपण विद्यार्थी असताना आपल्याला ज्या अडचणी येत होत्या त्यांची स्मृती असणे आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी आवश्यक असलेली चिकाटी असणे. शिक्षकाने मुलांना त्या गोष्टी समजेपर्यंत वाट पाहणे, त्याची पुन्हा-पुन्हा ते समजून देण्याची तयारी असणे आवश्यक आहे. हे करत असताना मुलांबद्दल व्यक्तिगत स्वरूपाची शेरेबाजी न करणं (उदाहरणार्थ – ‘तुला गणित जमतच नाही’, ‘विज्ञान हा तुझा विषयच नाही’ इत्यादी) आणि मुलांचा तेजोभंग, अपमान न करणं, हेही आवश्यक आहे. याही गोष्टी आव आणून किंवा तात्पुरती तयारी करून करता येण्याजोग्या नाहीत. या मुळातच शिक्षकांमध्ये असाव्या लागतात. पण सुदैवाने बहुतेक चांगल्या शिक्षकांमध्ये या असतात. ऑनलाइनच्या संदर्भात निर्माण होऊ शकणार्या - कनेक्शन, बँडविड्थ इत्यादी संबंधीच्या अडचणींबाबत मात्र ही सहनशीलता जाणीवपूर्वक बाणवणे शक्य आहे आणि आवश्यकही आहे.
तिसरा मुद्दा विषयवस्तूचा. मुलांना काय माहिती द्यायची याबाबत पुरेशी स्पष्टता अभ्यासक्रमाच्या व पाठ्यपुस्तकांच्या मार्फत, आणि इतर माध्यमांतून शिक्षकांना मिळालेली असते. मात्र ऑनलाइन शिकवण्याच्या संदर्भात यामध्ये पुढील गोष्टींचा उपयोग होऊ शकतो-
- शिकवण्यामध्ये अधिक नेमकेपणा असणे आवश्यक आहे. संपूर्ण सत्रामध्ये कुठल्या ऑनलाइन वर्गामध्ये कोणते मुद्दे आपल्याला शिकवायचे आहेत, त्यातल्या प्रत्येक वर्गाची तर्कशुद्ध सुरुवात व शेवट कुठे असणार आहे, याची पूर्व-कल्पना शिक्षकाला असणे आवश्यक आहे.
- या प्रत्येक वर्गासाठी कुठली संसाधने आपण वापरणार आहोत ती आधी तयार करून ठेवणे आवश्यक आहे. ही तयारी करत असताना, ऑनलाइन माध्यमांच्या बलस्थानांचा (अॅनिमेशन, व्हिडिओ, ध्वनिमुद्रणे, चित्रे व छायाचित्रे) या सर्वांचा जाणीवपूर्वक वापर करता येतो.
- हे करत असताना मुलांना केवळ ‘माहिती’ न देता ती समजण्यासाठी आवश्यक अशी अंतर्दृष्टी (insights) देणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी मुलांना तो विषय समजून घेताना नेमक्या कुठे अडचणी येतात आणि कोणत्या अडचणी येतात याची जाणीव शिक्षकांना असणे हे अत्यंत आवश्यक आहे. या अडचणींचा शक्य तितका आगाऊ विचार करून त्याची यादी शिक्षकाकडे तयार असायला हवी. पूर्वानुभवामुळे शिक्षकांना हे अडचणीचे मुद्दे माहिती असतातच. पण त्याची जाणीवपूर्वक यादी करून त्यावरील उत्तरांसाठी आवश्यक संसाधने तयार करणे आणि त्यांची व्यवस्थित मांडणी करणे या गोष्टी अत्यावश्यक आहेत.
- यासाठी यातला नेमकेपणा अत्यंत महत्त्वाचा आहे. उदाहरणार्थ, मुलांना जर एखाद्या मुद्द्याच्या स्पष्टीकरणासाठी एखादा व्हिडिओ दाखवायचा असेल, तर त्यामधला नेमका कुठला भाग आपल्याला दाखवायचा आहे, हे शिक्षकाला आधी पक्के माहिती असणे आवश्यक आहे. इतकेच नव्हे तर त्यानुसार तो व्हिडिओ तास चालू होण्यापूर्वीच त्या विवक्षित जागी आणून ठेवलेला असणे आवश्यक आहे. वर्गापेक्षा ऑनलाइन माध्यमात समोर गुंतवून ठेवणारं काही घडत नसेल तर मुलांचे लक्ष उडण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे शिक्षक मोठ्या व्हिडिओमधला नेमका कोणता भाग दाखवायचा ते शोधत बसले आहेत अशा स्वरूपाचे प्रसंग टाळणे आवश्यक आहे. अशा प्रकारची तयारी प्रत्यक्ष वर्गांमध्ये शिकवताना कदाचित करावी लागत नसेल, तर हा बदल अधिक जाणीवपूर्वक अंगी बाणवणे आवश्यक आहे.
- ऑनलाइन माध्यमातून शिकवत असताना मुलं शंकाही अर्थातच ऑनलाइन माध्यमातूनच विचारणार. बहुतेक प्लॅटफॉर्म्सवर (तंत्रपीठांवर) ही सोय चॅटच्या मार्फत उपलब्ध असते. या चॅट विंडोजकडे सतत लक्ष ठेवण्यासाठी जर शिक्षकाकडे एखादा सहाय्यक उपलब्ध असेल तर अधिक प्रभावी ठरू शकते. यासाठी जर दोन शिक्षकांना मिळून जोडीने शिकवण्याचा प्रयत्न करता आला तर त्याचा अधिक उपयोग होऊ शकेल. मात्र यात मुलांचा गोंधळ होऊ नये म्हणून एका शिक्षकाचे काम विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचे आणि दुसर्या शिक्षकाचे त्याला सहाय्य करण्याचे अशी स्पष्टता त्यात असावी.
- शिक्षकांचा चेहरा मुलांना दिसणे त्यावरील हावभाव, हातवारे यांचा योग्य तो उपयोग शिक्षकाने करून घेणे आवश्यक आहे. खालच्या वर्गातल्या मुलांना तर अनेक वेळेला अशा पद्धतीने ऑनलाइन शिकवणे जास्त सोपे जाऊ शकते, कारण शिक्षकांना स्क्रीनवर बघणे ही त्यांच्यासाठी फार मोठी उत्सुकतेची व आश्चर्याची बाब असते आणि त्यामुळे वर्गातल्या शिक्षकांपेक्षा स्क्रीनवरील शिक्षकाकडे ते अधिक लक्ष देतात.
थोडक्यात म्हणजे ऑनलाइन वर्ग हा पूर्ण सराव करून, किंबहुना शक्य असल्यास त्याची आगाऊ तालीम करून, एखाद्या अभिनेत्याच्या सादरीकरणाप्रमाणे करता आला तर तो अधिक प्रभावी होऊ शकतो. यासाठी अभिनेता जसा आपल्या सर्व साधनांचा, रंगमंचावरील वस्तूंचा, कुठे काय बोलायचे, कशावर भर द्यायचा, या सर्वांचा विचार आधी करतो, त्याची तयारी व सराव करतो, तसाच सराव शिक्षकांनी करणे प्रभावी ठरेल.
कला ही ‘शिकावी लागते’ असं म्हणतात. याचा अर्थ कलाकार शिकवून तयार करता येतात असा नाही, तर कलाकाराची कला अभिव्यक्त करण्याची क्षमता त्याच्या त्या-त्या कलेशी संबंधित असलेल्या साधनांवरील व तंत्रांवरील (क्राफ्ट) प्रभुत्वाशी थेट संबंधित असते- हा आहे. या साधनांवर व तंत्रावर कलाकाराचे प्रभुत्व जितके अधिक, तितक्या अधिक सूक्ष्मपणे आणि प्रभावीपणे त्या कलाकाराला ती कला अभिव्यक्त करता येते. मनातली सांगीतिक जाणीव अत्यंत प्रगल्भ असली तरी प्रत्यक्षात हातांची वाद्य वाजवण्याची क्षमता किंवा गळ्याची गाण्याची क्षमता जेवढी असेल तितक्याच योग्यतेची अभिव्यक्ती कलाकाराला करता येते. अन्यथा ती जाणीव तो कलाकार कलेच्या माध्यमातून व्यक्त करू शकत नाही. शिक्षकाची भूमिका ही कलाकाराच्या भूमिकेसारखीच असल्यामुळे शिक्षकांच्या बाबतीतही साधनांवरचे प्रभुत्व तितकेच आवश्यक आहे. विशेषतः प्रत्यक्ष वर्गातून ऑनलाइन वर्गात जात असताना ही बाब अधिकच महत्त्वाची ठरणार आहे.
शेवटचं सूत्र हे ‘शिकायला शिकविण्याचं’. नवीन माहिती शोधण्यासाठीची तंत्रे शिक्षक, स्वतः पुरेशी तयारी करून, मुलांना उपलब्ध करून देऊ शकतात. ती मुलांना उपलब्ध कशी करून घ्यायची याबद्दल शिक्षकांना मार्गदर्शन करणे शाळांच्या व्यवस्थापनाला किंवा या विषयातील तज्ज्ञांना शक्य असते. ऑनलाइन शिकवण्याच्या संदर्भात ही तंत्रे स्वतः समजून घेणे, आत्मसात करणे आणि मुलांना ती समजून देणे हा महत्त्वाचा भाग आहे. अनेक प्रकारची माहिती इंटरनेटवर सहज उपलब्ध असते. मात्र या स्त्रोतांचा प्रभावी वापर कसा करायचा, त्यांचा खरे-खोटेपणा ठरवण्यासाठी काय निकष लावायचे, त्यांच्याशी संबंधित असलेले प्रायव्हसी, सायबर- सिक्युरिटी याविषयीचे धोके, यांची माहिती मुलांना करून देणे आवश्यक आहे. हे करत असताना, ‘शिकण्यातला आनंद’ आणि एखादी गोष्ट ‘समजणे’ हेच ती गोष्ट समजून घेण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे व कष्टांचे पारितोषिक आहे, ही जाणीव मुलांना करून देणे आवश्यक आहे. एकदा ती झाली, की तो ‘शिकण्यातला आनंदच’ मुलांना पुढे शिकायला, व सतत शिकत राहायला प्रोत्साहित करतो.
तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर
अर्थातच तंत्रज्ञानाचा हा वापर जबाबदारीने करणे महत्त्वाचे आहे. मुलांना फार वेळ स्क्रीनकडे पाहत बसावे लागणार नाही किंवा त्यांच्या दृष्टी-क्षमतेवर दुष्परिणाम होणार नाहीत याची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी अनेक मार्गदर्शक तत्त्वे नेत्रविशारदांनी व तज्ज्ञांनी उपलब्ध करून दिलेली आहेत. त्यांचा वापर शिक्षकांनी करणे महत्त्वाचे आहे. सामान्यत: आठवी-नववी-दहावीच्या वर्गासाठी ४५ मिनिटांचा एक वर्ग योग्य ठरू शकतो. अशा प्रत्येक वर्गातही मध्ये एकदा, वीस-बावीस मिनिटानंतर, अर्ध्या मिनिटासाठी का होईना, पण डोळ्यांना दूरच्या कुठल्या तरी ठिकाणावर दृष्टी स्थिर करता येईल असा व्यायाम करण्याची संधी द्यायला हवी. शिक्षकांनी आपल्या तासिकेची रचना त्यानुसार करायला हवी.
तसेच शाळेत येण्यामधला मुलांना सर्वाधिक आकर्षण असलेला भाग म्हणजे एकमेकांबरोबर घालवता येणारा वेळ. याही दृष्टीने ऑनलाइन माध्यमांमध्ये मुलांना एकमेकांबरोबर गप्पा मारता येतील या दृष्टीने काही वेळ देणे आवश्यक आहे. हे केल्यास ऑनलाइन वर्गाला येणारा अति-गंभीरपणाचा भाव दूर होण्यास मदत होऊ शकेल. शिक्षकांनीसुद्धा, मुलांना ऑनलाइन माध्यमाची सवय होईपर्यंतच्या काळात, सुरुवातीच्या काही तासांमध्ये अधिक आणि त्यानंतरही काही प्रमाणात, वातावरण हलकंफुलकं करणाऱ्या कृती करण्याचा विचार करावा.
तंत्रज्ञानाबद्दलच्या या सर्व चर्चेत हाही विचार करणे आवश्यक आहे की, हे तंत्रज्ञान मुलांना उपलब्ध करून देण्यासाठी काही प्रमाणात खर्च करण्याची आवश्यकता निर्माण होणार. हा खर्च कदाचित सर्व विद्यार्थ्यांना शक्य होईलच असं नाही. त्यासाठी शाळा व मदत करू शकणारे पालक यांना एकत्र येऊन काम करता येऊ शकेल. तंत्रज्ञानाचा हा वापर साधने असलेल्या आणि नसलेल्या अशा दोन गटांमध्ये दरी निर्माण करू शकतो. भारतातील फोन व डेटा यांचे दर जगातल्या सर्वांत स्वस्त दरांपैकी असले तरी तेही न परवडणारी फार मोठी लोकसंख्या भारतात आहे, हे विसरून चालणार नाही. या उलट हेही लक्षात घेण्यासारखे आहे की, पारंपरिक शिक्षणाच्या दर्जात असलेला ‘शहरी’ आणि ‘ग्रामीण’ असा फरक दूर करण्यासही या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग होण्यासारखा आहे. इंटरनेट सेवा ग्रामीण भागातही उपलब्ध होत आहेत. ती उपलब्ध असलेल्या ग्रामीण विद्यार्थ्यांनाही शहरातल्या विद्यार्थ्यांप्रमाणे या बहुतेक सर्व साधनांचा व सुविधांचा वापर करता येणे शक्य आहे. पारंपरिक शिक्षणात शहरी सुविधा वापरणे ग्रामीण विद्यार्थ्यांना इतके सोपे नव्हते.
या सगळ्याबरोबर, मुलांना नव्या वातावरणाशी जुळवून घेताना येणार्या अडचणी सोडवण्यासाठी लागणार्या तयारीचा विचारही शाळा व शिक्षकांनी करणे आवश्यक आहे. यासाठी ते तज्ज्ञांची व व्यावसायिकांची मदत घेऊ शकतात. त्याचबरोबर, पालकांचीही तयारी होणे आवश्यक आहे. अनेक पालकांना स्मार्ट-फोन्स आणि संगणक परिचयाचे असले तरी त्याचा शिक्षणासाठी उपयोग करणे ही गोष्ट अजून त्यांच्या फारशी परिचयाची नाही. त्यासाठी लागणार्या विशिष्ट वेबसाईट किंवा संगणक प्रणाली यांचा त्यांना फारसा अनुभव नाही. त्यामुळे त्यांनीही त्याचा अनुभव मिळवण्याचा व त्यावर प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. हे करत असताना पालक, शिक्षक, शाळा व विद्यार्थी या सगळ्यांनीच आपल्याला एकत्र यशस्वी व्हायचे आहे, हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून, एकमेकांवर पूर्ण विश्वास ठेवून; आणि जे चालू आहे ते आपल्यासाठी चालू आहे ह जाणीव ठेवून जर काम केले तर हा बदल निश्चित यशस्वी होऊ शकतो.
भविष्यातली शाळा?
शाळेबद्दलची ही सगळी चर्चा आपण शिक्षक, पालक, आणि शाळांच्या दृष्टिकोनातून करत होतो. मात्र मुलांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर त्यांच्यासाठी शाळेमध्ये होणार्या मित्र-मैत्रिणींच्या भेटी, त्यांच्याबरोबर एकत्र जमणे, दंगा करणे, एकत्र वेळ घालवणे आणि त्यातून मिळणारा आनंद आणि अनुभव – हे इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा अधिक महत्त्वाचे असतात. आत्ता शाळा बंद असण्याच्या काळातही जर विद्यार्थ्यांना विचारलं तर ते, ‘आमचा अभ्यास होत नाही’, ‘आमची प्रगती होत नाही’, ‘आम्हाला अभ्यासक्रम शिकता येत नाही’ अशी कुठलीही तक्रार न करता ‘आम्हाला मित्र-मैत्रिणींना भेटता येत नाही’ हीच तक्रार करतात!
पारंपरिक पद्धतीमध्ये शाळेची भूमिका ही या प्रकारच्या सामाजिक भेटीगाठी आणि मैत्री होण्याचे ठिकाण आणि त्याच बरोबर जिथे अभ्यासक्रम शिकवला जातो ती जागा; अशा दुहेरी पद्धतीचे आहे. शिक्षण ऑनलाइन द्यायला सुरुवात केल्यानंतर भविष्यामध्ये कदाचित या दोन गोष्टींची एकमेकांपासून फारकत होऊ शकेल. उच्च शिक्षणाच्या संदर्भात हे व्हायला सुरुवात एव्हाना झालेली आहे. भविष्यातली शाळा कशी असेल याचा विचार आत्तापासूनच करायला सुरुवात करायला हवी. किंबहुना, तो विचार करणे सध्याच्या परिस्थितीने आपल्याला भाग पाडले, हेही आपल्या लक्षात घ्यायला हवे.
केवळ अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर मुलांना ऑनलाइन शिक्षण मिळत असेल तर मुलांनी शाळेमध्ये एकत्र जमणे आवश्यक आहे का - हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर ऑनलाइनच्या माध्यमातून ‘अभ्यासक्रम’ मुलांपर्यंत पोहोचवलात, पण त्यांच्या सामाजिक विकासाचं, त्यांच्या भावनिक गरजांचे काय - हाही प्रश्नही दुसर्या बाजूने विचारला जाऊ शकतो. भविष्यातील शाळांना या दोन्ही प्रश्नाची उत्तरे देता येतील असे बदल स्वत:च्या स्वरूपात करून घ्यावे लागणार आहेत. या शाळांमध्ये मुले कदाचित अभ्यासक्रम शिकण्यासाठी एकत्र येणार नाहीत, पण काही प्रकल्प करण्यासाठी, भेटण्यासाठी, खेळण्यासाठी, म्हणून भेटतील आणि अभ्यासक्रम शिकण्याचे काम मात्र ऑनलाइन माध्यमातून, स्वत:च्या वेळामध्ये, स्वत:च्या वेगाने करतील, ही शक्यताही नाकारता येत नाही. असं झालं तर कदाचित प्रत्येक मुलाला एकच अभ्यासक्रम शिकावा लागणार नाही, प्रत्येकाला आपापल्या आवडीप्रमाणे, गरजेनुसार आणि उद्दिष्टानुसार, हवे ते विषय, हव्या त्या काठिण्य-पातळीपर्यंत शिकता येऊ शकतील. त्यातून ‘शालेय शिक्षण पूर्ण करणे म्हणजे काय?’, ‘त्यासाठी आपण जे प्रमाणपत्र देतो त्याचे मूल्यमापन कसे करायचे?’, ‘मुलांचे एकमेकांच्या तुलनेत मूल्यमापन करायचं का नाही?’, ‘करायचे असल्यास कसे करायचे?’ असे अनेक प्रश्न यातून निर्माण होणार आहेत.
प्रस्तुत लेखाचा विचार जरी तत्कालीन स्वरूपाचा - शाळा पूर्वीच्या स्वरूपात लगेच सुरू होणे शक्य नसल्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करून मुलांचे औपचारिक शिक्षण कसे चालू ठेवता येईल - असला तरी भविष्यातील या प्रश्नांचे सूतोवाच इथे करून ठेवणे मला आवश्यक वाटते.
समारोप
या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी होताना, आणि या बदलाला आपण सकारात्मक दृष्टीकोनाने सामोरे गेलो तर ते सगळ्यांसाठीच चांगले ठरेल. प्रस्तुत लेखामध्ये ‘शिक्षण’ या मूलभूत संकल्पनेमध्ये मोठ्या प्रमाणावर गुणात्मक बदल कसे करता येतील हा प्रश्न समोर धरलेला नाही तर शिक्षण देण्याच्या पद्धतीमध्ये होऊ घातलेले बदल पाहता, तंत्रज्ञानाच्या वापरामुळे त्याला यशस्वीपणे सामोरे कसे जाता येईल हा प्रश्न प्रामुख्याने चर्चिलेला आहे. एकदा हे करायला लागल्यानंतर आणि यातील साधनांवर प्रभुत्व निर्माण झाल्यानंतर या सर्वच घटकांचा विचार स्वाभाविकपणे करता येईल. नवीन तंत्रज्ञानाने अशा कुठल्या गोष्टी करता येतात की, ज्या यापूर्वी करता येत नव्हत्या; तसेच पूर्वी करता येत असलेल्या अशा कुठल्या गोष्टी आता करता येत नाहीत, याची जाणीव सर्वांनाच होत जाईल आणि या जाणिवेतून मग हळूहळू गुणात्मक फरक आणि सुधारणा करता येऊ शकतील.
एखादे वाद्य नव्याने शिकणाऱ्या विद्यार्थ्याला ‘सरगम’चे पलटे पुन्हा-पुन्हा वाजवायला लावले जातात. ते करत असताना त्या विद्यार्थ्याला ही कल्पना करणे शक्य नसते की, या वाद्याच्या सहाय्याने आपण काय-काय वाजवू शकतो. मात्र जसे-जसे त्याचे त्या वाद्यावरचे प्रभुत्व वाढत जाते, तसे-तसे त्या वाद्याची बलस्थाने आणि त्याच्या मर्यादा त्या वादकाला स्पष्ट होत जातात, आणि त्याची संगीताची अभिव्यक्ती गुणात्मक रीतीने अधिकाधिक समृद्ध होत जाते. त्याच पद्धतीने आपल्याला आता नव्या तंत्रज्ञानाचा वापर सुरू करताना, ते तंत्रज्ञान प्रथम अंगवळणी पाडून घ्यायला हवे. त्यानंतर त्या तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवायला हवे. जसे-जसे हे प्रभुत्व येत जाईल, तसे-तसे त्या तंत्रज्ञानाची बलस्थाने व मर्यादा आपल्या लक्षात येऊन, शिक्षणामध्ये कोणत्या गुणात्मक सुधारणा व कशा करता येतील हे स्पष्ट होत जाईल. पण ही थोडी पुढची गोष्ट आहे. सुरुवातीला या तंत्रज्ञानाबरोबर सुखाने राहायचे कसे, ते अंगवळणी पाडून घ्यायचे कसे हा विचार करणे जास्त महत्त्वाचे आहे.
समारोपादाखल इतकेच म्हणतो की, ऑनलाइन माध्यमातून शिकवण्यामुळे शिक्षणाच्या ‘कसे?’मध्ये जरी बदल होणार असला, तरी शिकवण्यांबद्दलच्या ‘काय?’ची साकल्याने जाणीव असल्यास, आणि ते तसे ‘का?’ शिकवायचे याबद्दलची वैचारिक स्पष्टता असल्यास, ती स्पष्टता अबाधित ठेवून, ‘कसे?’मध्ये करायचे बदल, वरकरणी वाटतात तितके भीतिदायक किंवा अवघड वाटणार नाहीत. तंत्रज्ञानाला घाबरून जाण्याने किंवा ते नाकारण्याने काहीच साध्य होण्यासारखे नाही. हा न थांबवता येण्याजोगा प्रवाह आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘अद्ययावत व्हा!’ या सूचनेप्रमाणे स्वत:ला अद्ययावत बनवत राहणे आणि गांधीजींच्या ‘कर के देखो’ या सूचनेप्रमाणे नवनवीन गोष्टींना घाबरून न जाता, आणि मुख्य म्हणजे अपयशाला न घाबरता, सतत प्रयोग आणि प्रयत्न करत राहणे, ते करता-करताच शिकणे, व शेवटी त्या नवीन गोष्टींवर प्रभुत्व संपादित करणे - हाच बदलाला तोंड देण्याचा योग्य मार्ग आहे असे शिक्षक बंधु-भगिनींना नम्रपणे सुचवावेसे वाटते.
..................................................................................................................................................................
हेही पाहा, वाचा
१) ऑनलाईन शिक्षण तर अटळ आहे. त्यामुळे जो नवी कौशल्ये आत्मसात करेल, तोच टिकेल. - प्रिया काळे
https://www.aksharnama.com/client/article_detail/4287
https://www.aksharnama.com/client/article_detail/4288
..................................................................................................................................................................
लेखक सुश्रुत वैद्य संगणक-तज्ज्ञ असून त्या क्षेत्रातील एका मोठ्या कंपनीत कार्यरत आहेत. ‘नव्या तंत्रज्ञानांचा व्यावसायिक व सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी कसा उपयोग करता येईल’ या विषयाचे अभ्यासक आहेत. तसेच ते प्राचीन भारतीय संस्कृती व संगीताचेही अभ्यासक आहेत.
sushrut.vaidya@gmail.com
..................................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Dattahari Honrao
Thu , 11 June 2020
अप्रतिम मांडणी केल्याबद्दल विशेष अभिनंदन! लेख अतिशय आवडला परिपूर्ण विषय मांडणी कशी करावी.तटस्थपणे समक्य मांडणी कशाला म्हणतात हे हा वाचल्यानंतर समजते.समुद्राच्या लाटा थांबल्यावर स्नान करतो म्हणणाऱ्या आळशी माणसाची संख्या अधिक आहे.ते नवीन तंत्रज्ञान शिकण्यास असमर्थ असल्यामुळे विरोध करतात. तुम्ही म्हटल्याप्रमाणे शाळेत मुलांना पुस्तकी ज्ञानापेक्षा सामाजिक शिक्षण अधिक मिळते.समवयस्क मित्र मैत्रिणी सोबत ते खूप काही शिकतात. या काळात ऑनलाईन शिक्षण योग्य असले तरी त्यांचा हा दुष्परिणाम आहे.पण ऑनलाईन शिक्षण चित्रपटातील ऍक्टर प्रमाणे आहे.सुरुवात आणि शेवट विचार पूर्वक तयारी करून करावा लागतो हे खरं आहे.पण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘अद्ययावत व्हा!’ या सूचनेप्रमाणे स्वत:ला अद्ययावत बनवत राहणे आणि गांधीजींच्या ‘कर के देखो’ या सूचनेप्रमाणे नवनवीन गोष्टींना घाबरून न जाता, आणि मुख्य म्हणजे अपयशाला न घाबरता, सतत प्रयोग आणि प्रयत्न करत राहणे, ते करता-करताच शिकणे, व शेवटी त्या नवीन गोष्टींवर प्रभुत्व संपादित करणे - हाच बदलाला तोंड देण्याचा योग्य मार्ग आहे. हे वास्तव सत्य चिंतन हृदयाला स्पर्श करून जातं.पुनश्च: अभिनंदन .. आपला लेखणीस सलाम!