यशवंतराव चव्हाणांच्या या मुलाखतींचा लिप्यंतरित मजकूर एका समर्पित आणि कार्यक्षम नेत्याचा दुर्दैवी ‘राजकीय अंत’ अधोरेखित करतो!
ग्रंथनामा - झलक
गोविंद तळवलकर
  • ‘भारत : समाज आणि राजकारण - यशवंतराव चव्हाण यांचे प्रकट चिंतन’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Tue , 09 June 2020
  • ग्रंथनामा झलक भारत : समाज आणि राजकारण ‌Bharat - Samaj aani Rajkaran यशवंतराव चव्हाण Yashwantrao Chavan गोविंद तळवलकर Govind Talwalkar

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रा. जयंत लेले यांनी वेळोवेळी घेतलेल्या मुलाखतींचे भारत : समाज आणि राजकारण - यशवंतराव चव्हाण यांचे प्रकट चिंतन’ हे पुस्तक नुकतेच रोहन प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाचे संपादन प्रा. प्रकाश पवार यांनी केले असून मराठी अनुवाद माधवी कामत यांनी केला आहे. या पुस्तकाला ज्येष्ठ संपादक गोविंद तळवलकर यांनी लिहिलेले प्रास्ताविक...

..................................................................................................................................................................

राजकारण म्हणजे ‘आर्ट ऑफ पॉसिबल’. (राजकारणाचा संबंध योग्य काय वा सर्वोत्तम काय याच्याशी नसून तुम्ही प्रत्यक्षात काय घडवून आणू शकता याच्याशी आहे). महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री (कै.) श्री. यशवंतराव चव्हाण यांनी हे तत्त्व केवळ जाणले नव्हते, तर कौशल्याने आचरणात आणले होते. डॉ. जयंत लेले यांनी काही वर्षांच्या अवधीत रेकॉर्ड केलेल्या अनेक मुलाखतींवरून हे स्पष्टपणे दिसून येते. अथक प्रयासांनी या मुलाखतींचे लिप्यंतरण करण्यात आले आहे. आता त्या यथायोग्य संपादित करून पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्यात येत आहेत.

सत्तरच्या दशकात मी डॉ. लेले यांना भेटलो होतो आणि तेव्हा आम्ही सामान्यत: भारतीय राजकारण आणि विशेषत: चव्हाणांची कामगिरी याबद्दलची आमची मते एकमेकांना सांगितली होती. त्यानंतर माझा त्यांच्याशी असलेला संपर्क तुटला. परंतु आठ-दहा वर्षांपूर्वी जेव्हा मी डॉ. लेले यांना परत भेटलो, तेव्हा त्यांनी रेकॉर्ड केलेल्या मुलाखतींचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला. जेव्हा २०१२ हे चव्हाणांचे जन्मशताब्दी वर्ष जवळ येऊ लागले, तेव्हा चव्हाण प्रतिष्ठानने त्यांचे चित्रात्मक चरित्र प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. शरद पवार यांनी मला त्याची प्रस्तावना लिहिण्यास सांगितले. त्याऐवजी मी चव्हाणांचे मराठी व इंग्रजीत चरित्र लिहून या सर्व छायाचित्रांचा त्यात अंतर्भाव केला. चव्हाण यांची जन्मशताब्दी साजरी करण्याच्या निमित्ताने २०१२ साली मराठी पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

डॉ. लेले यांनी मोठ्या संख्येने रेकॉर्ड केलेल्या मुलाखतींतून काही वस्तुस्थिती आणि घटनांवर प्रकाश टाकण्यास मदत होऊ शकते, या विचाराने मी डॉ. लेले यांना लिप्यंतरित केलेला मजकूर मला देण्याची विनंती केली आणि त्यांनीदेखील अतिशय उदारपणे संपादित न केलेली लिप्यंतरित मजकुराची आठशे पाने मला पाठवून दिली. मी चव्हाण यांच्याशी वेळोवेळी संवाद साधत असल्यामुळे मुलाखतीतील काही मजकूर मला यापूर्वीच माहीत होता. तरीही या मुलाखतींमुळे नोंदीचे अतिरिक्त संदर्भ मिळाले. जरी चव्हाणांनी राजकारण हे ‘आर्ट ऑफ पॉसिबल’ म्हणून अंगीकारले असले तरी त्यांनी हे तत्त्व कृती टाळण्यासाठी वापरले नाही असे दिसून येते. त्यांचे आयुष्य कृतींनी भरलेले असले तरी त्याचबरोबर हाराकिरीच्या दिशेने जाणारी कृती करणे व्यर्थ आहे आणि त्याचा परिणाम मूळ हेतू असफल होण्यामध्ये होतो, याची जाणीव त्यांना होती.

महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या स्वातंत्र्याच्या चळवळीत त्यांनी स्वत:ला मनापासून झोकून दिले. चव्हाणांच्या सुदैवाने कारावासादरम्यान त्यांना काही विद्वान उत्तुंग व्यक्तिमत्त्वांचा सहवास लाभला, ज्यांच्या विचारांनी त्यांचे उदबोधन झाले.

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या लिखाणाने ते अतिशय प्रभावित झाले होते. नेहरूंप्रमाणे तेही तत्कालीन प्रबळ समाजवादी कल्पनांच्या प्रभावाखाली आले असल्यामुळे ते स्वत:ला महात्मा गांधींचे अनुयायी मानत होते, असे ठामपणे सांगता येत नाही. कारण गांधींचा अहिंसेबाबतचा आग्रह तत्कालीन राजकीय परिस्थितीमध्ये उपयुक्त असला तरी तो जीवनाचे ध्येय म्हणून व्यवहार्य नाही, असे चव्हाण यांचे मत होते.

पंडित नेहरू आणि चव्हाण दोघेही तत्त्वाग्रही नव्हते, हे लक्षात घेतले पाहिजे. तसेच ते दोघे जरी सामाजिक आणि आर्थिक न्यायाबाबत उत्सुक असले तरी काँग्रेस पक्षाची जपणूक करणे आणि तो बळकट करणे याला त्यांनी प्राधान्य दिले. सर्वसाधारणपणे पक्षाचा कल जमिनीच्या सामूहिकीकरणाच्या विरोधात आहे, हे माहीत असल्याने जरी नेहरूंच्या पुढाकाराने पक्षाने ठराव केला असला तरी त्यांनी त्याच्या अंमलबजावणीसाठी आग्रह धरला नाही.

जरी मुंबई राजधानी असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवर चव्हाणांचा ठाम विश्वास असला तरी त्यांनी द्विभाषिक राज्याची तडजोड स्वीकारली. कोणत्याही राज्याने - मग ते भाषावार असो वा नसो - स्वत:चा भारतीय संदर्भ कधीही गमावू नये असे त्यांना नेहमीच वाटत असे. चव्हाणांनी द्विभाषिक राज्य कार्यक्षमतेने चालवले आणि त्याबद्दल सर्व थरांतून त्यांची प्रशंसा करण्यात आली. द्विभाषिक राज्य जर चालू राहिले तर भविष्यात ही परिस्थिती काँग्रेसला हानिकारक ठरू शकते, किंबहुना काँग्रेसच्या हातून राज्य जाऊही शकते, अशा मताला तोपर्यंत नेहरू, तत्कालीन गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत आणि त्यांचे काही वरिष्ठ सहकारी आले होते, हे लक्षणीय आहे.

नव्या महाराष्ट्र राज्याबद्दल लोकांच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या होत्या. कारण चव्हाण मुख्यमंत्री होते. तथापि, देशाला चिनी आक्रमणाला सामोरे जावे लागत होते. संरक्षण खाते चुकीच्या पद्धतीने हाताळण्यात आल्यामुळे तत्कालीन संरक्षणमंत्री श्री. व्ही.के. कृष्ण मेनन यांना राजीनामा द्यावा लागला होता आणि पंतप्रधान नेहरूंनी चव्हाणांना संरक्षण खाते सांभाळण्यासाठी पाचारण केले. मेनन यांनी या गोष्टीचा स्वीकार मनापासून केला नाही. बिजू पटनाईक आणि कृष्णम्माचारीदेखील या पदासाठी इच्छुक होते. ‘महाराष्ट्रात परत जा’ असे चव्हाणांना सांगण्यापर्यंत पटनाईक यांची मजल गेली होती. नेहरूंचा चव्हाणांवर संपूर्ण विश्वास असला तरी त्यांना पटनाईक यांच्याबद्दल विशेष ममत्व होते आणि ‘हस्तक्षेप करू नका’ असे त्यांनी बिजू पटनाईक यांना सांगितले नाही.

यामुळे चमत्कारिक वातावरण निर्माण झाले आणि एक खाते दोन मंत्री चालवू शकत नसल्याने ते त्यांच्या पदावर पाणी सोडतील आणि महाराष्ट्रात ढवळाढवळ करणार नाहीत, असे पत्र नेहरूंना पाठवणे चव्हाणांना भाग पडले. नेहरूंनी तात्काळ चव्हाणांना असा निर्णय घेण्यापासून परावृत्त केले. त्याच वेळी पटनाईक यांनी त्यांच्या अमेरिकेच्या भेटीदरम्यान केलेल्या बेजबाबदार वक्तव्याने स्वत:साठी खड्डा खणून ठेवला.

कृष्ण मेनन यांनी लष्करातील वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांचे मनोबल काहीही कारण नसताना खच्ची केल्याचे चव्हाणांना दिसून आले. डॉ. लेले यांनी घेतलेल्या मुलाखतींतील मजकूर या सर्व घटनांवर पुरेसा प्रकाश टाकतो. चीनकडून पराभव पत्करावा लागल्यावर भारत सरकारने ले.जन. हेंडरसन-ब्रूक यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची स्थापना केली होती. त्या समितीने सादर केलेल्या अहवालाचा सखोल अभ्यास करून त्याचा यथायोग्य सारांश चव्हाणांनी संसदेपुढे मांडला होता. संसदेत चव्हाणांनी या अहवालासंबंधी केलेले भाषण उत्कृष्ट वक्तृत्वाचा नमुना होता. त्यामुळे लोकसभा प्रभावित होऊन चव्हाणांच्या नावाचा गाजावाजा झाला. नेहरूंना चीनच्या युद्धाचा मानसिक आणि भावनिक धक्का बसला. त्यांना पक्षाघाताचा सौम्य झटका आला आणि २७ मे १९६४ रोजी त्यांचे निधन झाले.

चव्हाणांकडे संरक्षण खाते असतानाच पाकिस्तानने आक्रमक पवित्रा घेतला होता, ज्याची परिणती युद्धात झाली होती. लेले यांच्या लिप्यंतरित मजकुरामध्ये या युद्धाचे तपशील दिलेले आहेत. ज्यातून असे लक्षात येते की, आपण पाकिस्तानला पराभूत केले नव्हते, पण आपल्या तुलनेत पाकिस्तानची कामगिरी खराब होती. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने लालबहादूर शास्त्री यांचे निधन झाले आणि श्रीमती इंदिरा गांधींनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. काँग्रेसच्या पहिल्या फळीतील ज्या वरिष्ठ नेत्यांनी श्रीमती गांधींना पंतप्रधानपदी बसवण्यासाठी पुढाकार घेतला होता, त्यांचे गांधींबरोबर मतभेद होऊ लागले. श्रीमती गांधींचा कार्यकाळ, चव्हाणांची भूमिका आणि विविध प्रसंगांबाबतची त्यांची प्रतिक्रिया या संदर्भातील महत्त्वाची माहिती डॉ. लेले यांनी चव्हाणांकडून मिळवली आहे.

चव्हाण तसेच काँग्रेसच्या इतर अनेक नेत्यांनी श्रीमती गांधींना पाठिंबा दिला ही गोष्ट चमत्कारिक आणि उपरोधिक आहे. कारण त्यांना असे वाटले की, श्रीमती गांधींचे प्रतिस्पर्धी श्री. मोरारजी देसाई संघटनेत फूट पाडतील आणि पक्षाची दोन शकले होतील. मात्र शेवटी काँग्रेसची शकले होण्याला श्रीमती गांधीच कारणीभूत झाल्या. पक्षाच्या विभाजनास कारणीभूत ठरलेल्या घटना तसेच काँग्रेसने राष्ट्रपतीपदाचा उमेदवार म्हणून कोणाची निवड करावी, याबाबत श्रीमती गांधींनी त्यांचे मत वारंवार कसे बदलले या संदर्भातील चव्हाणांच्या मुलाखती वाचणे हे अतिशय उपयुक्त आहे.

‘नेहरूंनंतर कोण’ हा विषय केवळ भारतीयच नव्हे, तर विदेशी वर्तमानपत्रांतूनही मोठ्या प्रमाणात चर्चिला गेला. त्या पदासाठी चव्हाण एक उमेदवार होते. तथापि, ते त्यांच्या चाहत्यांच्या दबावाला बळी पडले नाहीत. श्रीमती गांधी जर स्पर्धेत उतरल्या नसत्या तर त्यांना निवडून येण्याची चांगली संधी होती, हे त्यांनी डॉ. लेले यांना स्पष्टपणे सांगितले. यातून त्यांचे पाय जमिनीवर होते हे दिसून येते. १९७२पर्यंत श्रीमती गांधी सर्वोच्च नेता बनल्या होत्या. परंतु त्यांची सर्वसमावेशकतेची जाणीव लोपली होती आणि सर्व सत्ता त्यांनी आपल्या हाती एकवटली होती, ज्यात त्यांना त्यांच्या मुलाची - संजयची मदत होती. त्यांनी घटनेच्या मुख्य तरतुदी निलंबित करून आणीबाणी जाहीर केली.

चव्हाणांच्या मुलाखतींचा लिप्यंतरित मजकूर एका समर्पित आणि कार्यक्षम नेत्याचा दुर्दैवी ‘राजकीय अंत’ अधोरेखित करतो. त्या काळात चव्हाणांच्या हातून काँग्रेसमधील दोर निसटले होते आणि त्याचबरोबर ते विरोधी पक्षातही जाऊ शकत नव्हते. अशी शोकांतिका जरी रंगभूमीवर अथवा रुपेरी पडद्यावर गाजली, तरी प्रत्यक्ष जीवनात ती दु:खद बाब असते.

भारत : समाज आणि राजकारण - यशवंतराव चव्हाण यांचे प्रकट चिंतन 

संवादक : डॉ. प्रा. जयंत लेले

संपादक : डॉ. प्रकाश पवार, अनुवादक : माधवी ग.रा. कामत

प्रकाशक - रोहन प्रकाशन, पुणे​

पाने : ५१२, मूल्य : ६०० रुपये.

..................................................................................................................................................................

‘भारत : समाज आणि राजकारण - यशवंतराव चव्हाण यांचे प्रकट चिंतन’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5202/Bharat---Samaj-ani-Rajkaran

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......