अजूनकाही
५ जून २०२०
आजच्या या महासंकटाच्या काळात घडणाऱ्या शोककारक घटनांनी आम्ही लेखक शोकाकुल व उद्विग्न मनाने हे निवेदन देत आहोत. सगळा देशच नव्हे तर सारे जग गेल्या काही महिन्यांपासून नैसर्गिक आपत्तीने ग्रासले गेलेले आहे. अभूतपूर्व अशा साथीच्या रोगाने झालेल्या लाखो लोकांच्या अकाली मृत्यूने आणि सगळीकडे पसरलेल्या आजाराने सारे जग विस्कळीत झालेले आहे. ही केवळ रोगाची साथ नसून हा सामाजिक आणि आर्थिक भूकंपदेखील आहे. यातून झालेला विनाशही विषमतामूलक आहे, हे विसरता कामा नये. मानवी इतिहासातील सगळ्यात दारूण घटना, असेच या काळाचे वर्णन करावे लागेल.
अशा प्रसंगी आम्ही सगळे या महामारीत मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली वाहतो, सगळ्या पीडितांप्रती सहानुभूती व्यक्त करतो, तसेच मानवतेकरता झटणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातल्या सगळ्या डॉक्टरांना, नर्सेसना, शुश्रुषा करणाऱ्यांना, आपली जबाबदारी मागे न हटता पार पाडणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांना, स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन अनेक गरजूंना मदतीचा हात देणाऱ्या सगळ्या नागरिकांना मानवंदना देऊन त्यांच्याप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करतो.
या संकटामुळे करोडो लोक विस्थापित झालेले आहेत. भुकेनं तहानेनं व्याकूळ होऊन बेघर आणि बेरोजगार झालेल्या लाखो लोकांनी आपापल्या घरी पोहोचण्याकरता, आपल्या गावी परतण्याकरता हजारो किलोमीटर पायी प्रवास केला आहे. आम्ही हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. अशी भीषण परिस्थिती एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर कधी मानवजातीवर आलेली नाही. मात्र ही भीषण परिस्थिती नैसर्गिक आपत्ती नव्हती. ही आपत्ती आपण निर्माण केलेली आहे, हे विसरता कामा नये.
या महासंकटामुळे कोट्यवधी लोक बेरोजगार झालेले आहेत. त्यांच्या तोंडचा घास हिरावला गेलेला आहे. संकटात सापडलेल्या आपल्या लोकांवर आपण नीट उपचारदेखील करू शकत नाही अशी परिस्थिती आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात भेदभाव आणि विषमता असलेला समाज आपणच निर्माण केला आहे, हे या संकटाने दाखवून दिलेले आहे. आपण ज्या प्रकारे सोबतच्या माणसांसोबत वागतो तसेच निसर्गासोबतही वागत आहोत हेदेखील यातून दिसून येत आहे.
या दुःखाच्या आणि संकटाच्या प्रसंगी आम्ही लेखक सगळ्यांसोबत आहोत. अशा वेळेस आम्ही हे सुचवत आहोत की –
१. सगळ्यांना निशुल्क उपचार उपलब्ध व्हावेत. देशातल्या सगळ्यात गरीब माणसालाही तेच उपचार मिळावे, जे देशातल्या सगळ्यात श्रीमंत आणि वजनदार माणसाकरता उपलब्ध असतात.
२. सरकारी दवाखान्यांची संख्या आणि दर्जा वाढवण्यात यावा. वैद्यकीय सेवांचे राष्ट्रीयीकरण व्हावे. वैद्यकीय विम्यावर अवलंबून असणे बंद करावे. स्वास्थ्य आणि शिक्षण याकरता सगळ्यात जास्त खर्च करण्यात यावा आणि या सेवा कुठल्याही भेदभावाशिवाय सगळ्यांकरता उपलब्ध असाव्या.
३. रोजगाराचा अधिकार हा मूलभूत अधिकार मानला जावा.
४. प्रत्येकाने आपला घास आजूबाजूच्या लोकांसोबत वाटून खावा.
५. प्रत्यक लेखकाने आपल्याला मिळालेले मानधन तसेच आपल्या उत्पन्नाचा जास्तीत जास्त भाग सहायता निधीस आणि सहायता करणाऱ्या स्वयंसेवी संघटनांना द्यावा.
नामदेव ढसाळांच्या शब्दात सांगायचे झाल्यास अशा प्रसंगी ‘एक तीळ सर्वांनी करंडून खावा’ आणि या संकटातून सगळ्यांना सोबत घेऊन बाहेर निघण्यासाठी जीवापाड प्रयत्न करावे असे आवाहन आम्ही करीत आहोत.
- सुधीर रसाळ, रामदास भटकळ, महेश एलकुंचवार, ना. धों. महानोर, निशिकांत ठकार, रा. रं. बोराडे, वसंत आबाजी डहाके, चंद्रकांत पाटील, रंगनाथ पठारे, सतीश काळसेकर, वसंत दत्तात्रय गुर्जर, प्रभा गणोरकर, अरुण खोपकर, वसंत पाटणकर, दत्ता भगत, प्रेमानंद गज्वी, कौतिकराव ठाले पाटील, मकरंद साठे, राजन गवस, जयंत पवार, लक्ष्मीकांत देशमुख, सतीश तांबे, जयदेव डोळे, सुनील तांबे, अनुराधा पाटील, प्रफुल्ल शिलेदार, प्रवीण बांदेकर, गणेश विसपुते, आसाराम लोमटे, प्रज्ञा दया पवार, रमेश इंगळे उत्रादकर, नीरजा, नीतीन रिंढे, किशोर कदम, रणधीर शिंदे, श्रीधर नांदेडकर, अजय कांडर, अविनाश गायकवाड, संजय आर्वीकर, प्रकाश होळकर, प्रमोद मुनघाटे, दिनकर मनवर, संध्या नरे-पवार, दिलीप धोंडगे, प्रकाश किनगावकर, दिलीप चव्हाण, गोरख थोरात, राजा होळकुंदे, गौतमीपुत्र कांबळे, रामचंद्र काळूंखे, रवी कोरडे, संदीप जगदाळे.
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment