अजूनकाही
६ जून हा छ. शिवाजीमहाराजांचा स्वराज्यभिषेक दिन. त्यानिमित्ताने काल ‘अक्षरनामा’वर माजी प्राचार्य डॉ. व्ही. एल. एरंडे यांचा ‘विसाव्या शतकाच्या मध्यात आपल्या राजकीय व्यवस्थेने अंगिकारलेली लोकशाही मूल्यव्यवस्था छ. शिवाजीमहाराजांनी १७व्या शतकातच आपल्या स्वराज्याचा अविभाज्य भाग बनवली होती!’ हा लेख प्रसिद्ध केला आहे. त्याचा प्रतिवाद करणारा हा लेख...
..................................................................................................................................................................
छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तेपण त्यांच्या स्वतःच्या कर्तबगारीवर उभे आहे; त्यांच्या प्रेरणा त्या काळाच्या संदर्भातच आपल्याला पाहायला हव्यात. शिवपूर्वकाळात बहामनी, त्यातून फुटलेल्या मुस्लीम सत्ता, सिद्दी, मुघल तसेच पोर्तुगीज, डच, ब्रिटिश हे (ख्रिश्चन) युरोपियन, तर त्याआधी मौर्य, गुप्त, आंध्र-सातवाहन या हिंदू पण अमराठी राजांनी महाराष्ट्रावर राज्य केले. शिवाजीमहाराजांच्या राज्याभिषेकानंतर ‘मराठी मुलखाचा मराठी राजा’ असे अगदी दुर्मिळ दृश्य प्रत्यक्षात आले. बळकट मध्यवर्ती सरकार आणि राजाच्या (म्हणजे छत्रपतींच्या) हुकुमानुसार कारभार हाकणारे पगारी नोकर अशी राज्यव्यवस्था त्यांना अभिप्रेत होती. राज्याभिषेकानंतर या सत्तेला तत्कालीन समजुतीनुसार मान्यता मिळाली आणि ‘स्वयंशासित स्वतंत्र राज्य’ अस्तित्वात आले. ही राज्यपद्धती अत्यंत शिस्तबद्ध, काटकसरीची व चोख होती. एका लढाईवर आपले राज्य अवलंबून ठेवण्याची आधीच्या राजांची चूक महाराजांनी कधीही केली नाही. या दूरदर्शीपणामुळेच छ. संभाजी व राजाराम महाराजांच्या काळात स्वराज्य टिकून राहिले.
महाराजांना हिंदू-मुसलमान प्रश्नाचा अन्वयार्थ समजला होता आणि तो सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी आयुष्यभर केला. वास्तविक, अरबी आक्रमणानंतर मुस्लीम सत्तांना महाराष्ट्रापर्यंत येऊन स्थिर होण्यासाठी चांगला सहा-सात शतकांचा काळ जावा लागला. आजवरच्या सर्वांत वेगवान आक्रमकांपैकी एक मानल्या गेलेल्या; ज्यांच्या राजकीय-धार्मिक सत्तेने तुफानी वेगाने युरोपात चढाई केली आणि यशस्विता संपादन केली त्यांना महाराष्ट्रापर्यंत येण्यासाठी पुष्कळ काळ वाट पाहावी लागली. अरबांचा वावर किनारपट्टीवर सुरू झाला असला तरी जमिनीवरील सत्तांशी असणारे त्यांचे संबंध पुष्कळसे अराजकीय होते. मुस्लीम सत्ताधीश म्हणून स्थिर झालेल्या बहामनी राज्याला संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्यासाठी जवळपास दीड शतक लागले. याच बहामनी राज्यांशी यशस्वी संघर्ष करणारे विजयनगरचे राज्य त्या काळात निर्माण झाले, हा काही निव्वळ योगायोग नव्हे. विजयनगरच्या राजांची नीती व राजकारण महाराजांनी पुन्हा उचलून धरले.
तोवर मुसलमान या देशात येऊन व त्यांचे स्थिर राज्य स्थापन होऊन अनेक शतके होऊन गेली होती. ते भारतीय समाजाचे कायमचे घटक बनले होते. त्यांच्यापैकी बहुसंख्य वंशाने मूळचे भारतीय होते. या स्थितीत मुसलमान या देशाचे रहिवासी म्हणून नांदणे अपरिहार्य आहे, हे ओळखून महाराजांनी आपले ध्येय आखले. इथला हा निर्माण झालेला प्रश्न मुस्लीम सत्ताधीश आपल्या न्यायाने सोडवू पाहतील तर अखेरीस सर्व प्रजा इस्लाम करणे याच ध्येयाने ते प्रेरित असतील. ज्या वेळी हे ध्येय देशातील मुस्लीम सत्ताधीश सोडतील, तेव्हाच या देशात शांतता व (त्या काळी अपेक्षित असणारी) समानता प्रस्थापित करणे शक्य होणार होते. असा प्रयत्न काही मुस्लीम शासकांनी केला असला तरी त्यांच्यानंतर पुन्हा जुने मढे उकरले जाऊन यांच्या प्रयत्नांवर पाणी पडत असे.
भारतासारख्या देशात राज्य करायचे तर इथल्या कृषिप्रधान व्यवस्था जपणे प्रत्येक राज्यकर्त्याने आपली जबाबदारी मानली. राज्यकर्त्यांच्या धर्माचा यात आपण समजतो तितका वाटा नाही. क्रूर समजला जाणारा अफझलखानसुद्धा आपल्या सुभ्यात हिंदू शेतकऱ्यांना कित्येक प्रकारच्या सवलती (कर्जमाफी, जमीनदान, इत्यादी.) देतो. तसेच त्या काळाप्रमाणे धार्मिक स्वातंत्र्यही प्रदान करतो. याचा अर्थ तो राज्याला ज्यातून कर-उत्पन्न मिळते, त्याकडे दुर्लक्ष करत नसे तर ते वाढवण्यासाठी आपल्या प्रजेला निरनिराळ्या सोयी देई. पण तो शत्रू म्हणून महाराजांच्या राज्यावर चालून येतो, त्या वेळी शत्रूशी केलेले सर्व प्रकारचे व्यवहार शिवाजी आणि अफझलखान यांनी केलेले आपल्याला दिसतात. औरंगजेबाने जिझिया कर धर्माच्या सांगाव्यापेक्षा ढासळणाऱ्या मुघल राजकीय-अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी केल्याचे नवीन अभ्यासावरून समोर येते आहे. समकालीन पुराव्यांमध्ये धर्माचे नाव घेतले जात असले तरी कमकुवत आर्थिक स्थितीकडे आपण कानाडोळा करण्याची गरज नाही.
मुसलमानांची राज्यपद्धत नेहमीच वडील मुलाला राज्य देऊन ते एकसंध ठेवण्याची नव्हती, तर सामर्थ्यवान आणि कार्यक्षम मुलाकडे देण्याची पद्धत होती. मुसलमानांत बहुदा जास्त कार्यक्षम व शूर पुरुष राज्यावर येई, पण हिंदूंमध्ये कारस्थानांचे कार्य मोठे असल्यामुळे बहुदा ज्याच्याबद्दल कोणाला फारसा विरोध नाही असा दुबळा राजाच राज्यावर येई. हिंदू समाजपद्धती व जनमनाची रचना सर्वांच्या सहकार्यावर अवलंबून ठेवलेली दिसेल. याचा सामाजिक परिणाम म्हणजे त्यामुळे समाजाचे दुर्बळ घटकच चिरंजीव होतात आणि सुधारणेची गती मंदावते. हिंदू राज्यसंस्था हिंदू धर्म आणि समाज यावर अधिष्ठित असल्यामुळे या दोघांमध्ये सुधारणा करूनच व्यवस्था कार्यक्षम बनवणे शक्य असते.
बहामनी राज्य व विजयनगरच्या संघर्षात (आणि पुढे मुघल काळातही) मराठी सरदारांची व नोकरदारांची मोठी भूमिका होती. इथे सत्ता चालवायची तर यांचा सहभाग घेतल्याशिवाय अशक्य असल्याचे आक्रमकांच्याही लक्षात आले. मुस्लीम सत्तांना महाराष्ट्रात मराठे सरदार राज्य चालवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी हवेसे होते म्हणून अनेकदा धार्मिक टोकदारपणा बोथट करण्याकडे सत्ताधीशांचा कल होता. मराठी सरदारांनी आपले वेगळे स्थान या राज्यांत निर्माण केले होते आणि दरबारी भांडणाचा तसेच सततच्या लढायांचा फायदा स्वतःला कसा करून घ्यावा हे त्यांना समजू लागले.
शहाजीराजांचे उदाहरण आपल्याला लक्षात घेण्यासारखे आहे. अतीव संघर्षातून राजधानीपासून दूर आपला सुभा किंवा आपले स्थान निर्माण केले. या मांडलिक असलेल्या पण व्यवहारात स्वतंत्र असलेल्या राज्यामुळेच पुढे महाराजांना स्वराज्याची उभारणी सुलभ होईल, अशी तरतूद करून दिली. राज्यकारभाराची सूत्रे आपल्या हाती (हिंदूंच्या) राहतील आणि मुस्लीम राज्यकर्ते नाममात्र होतील, या पुढे ब्रिटिशांनी अठराव्या शतकात यशस्वी केलेल्या नीतीचा या पितापुत्राने सतराव्या शतकात वस्तुपाठ घालून दिला होता.
इतिहासकार त्र्यं. शं. शेजवलकर लिहितात, ‘‘हिंदूंना राखणे, त्यांचा उच्छेद होऊ न देणे, त्यांच्या संस्कृतीचे पुनरुज्जीवन करणे, हेच मराठ्यांचे ऐतिहासिक कार्य होते.’’ महाराजांना मुस्लीम नीतीची पुरेपूर ओळख पटल्यामुळे मुस्लिमांविषयी विद्वेष नसला तरी त्यांनी हिंदूच वरचढ राहून इथे राज्य करतील हीच वर्चस्वाची कल्पना मान्य केली. लगोलग या नीतीचा फैलाव छत्रसालासारख्या राजांमध्ये झाला आणि त्यांनी मुघल सत्तेला न जुमानता स्वतंत्र राज्य उभारण्यास सुरुवात केली. पुढे शीख, आहोम, सतनामी, राजपूत लोकांमध्ये स्वराज्यरक्षणाचे झगडे सुरू झाले. छत्रपतींच्या कार्याचे हेच खरे यश आहे.
सतराव्या शतकात समाज पूर्णतः जातीनिष्ठ आणि धर्मनिष्ठ होता. महाराजांच्या काळात त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा जात पुढे सरसावली आणि तिला ब्राह्मण आणि कायस्थांनी साहाय्य केले. आपापल्या फायद्यासाठी प्रत्येक जात एकमेकांच्या शेजारी उभी राहिली. परिणामी, या तीन जाती मराठेशाहीत पुढे सरसावल्या. व्यवहारात मुसलमानी संस्कृतीचा जोरदार पगडा असल्यामुळे या जातीनिष्ठ समाजाला ते व्यवहार आत्मसात करून घेण्याशिवाय अन्य कोणता मार्ग उपलब्ध नव्हता. महाराजांच्या अंगी हे व्यवहार व मुस्लीम संस्कृती बिंबली असली तरी त्यांचे मन हिंदूच राहिले होते. आज जसे पाश्चात्य संस्कृतीची छाप झटकून व्यवहार करता येणे अशक्य, तीच अवस्था त्या काळी इस्लाम संस्कृतीची होती. महाराजांनी आपले ध्येय हिंदू पद्धतीने ठरवले; पण व्यवहार मात्र तत्कालीन मुस्लीम संस्कृतीप्रमाणे आचरला. मुघल काळात निर्माण होणाऱ्या अस्थिर आणि बिकट परिस्थितीत महाराजांना आपली कर्तबगारी दाखवण्याची अपूर्व संधी मिळाली. त्यांच्या राज्यस्थापनेचे मुख्य श्रेय त्यांच्याच स्फूर्तीला, कल्पनेला व पराक्रमाला देणे इष्ट आहे.
सामान्य जहागीरदाराच्या मुलाने मुघल बादशाहीला आव्हान देणे म्हणजे वेडेपणा मानला गेला असता आणि त्याचा शेवट निश्चित नाश ओढवून घेण्यात झाला असता, असे या देशातील शहाणे मानत होते. परंतु महाराजांनी तो मार्ग स्वीकारला व यशस्वीही करून दाखवला. त्याचप्रमाणे त्यांनी सर्व जुने मोडून नूतन सृष्टी निर्माण केलेली नाही; त्यांना तसे करता येणे शक्यही नव्हते. त्यांच्या कार्याची मर्यादा तत्कालीन व्यवस्थेची व समाजाची प्रचलित चौकट हीच होती. आवश्यक तेवढी उदारता अंगी बाळगून परक्या संस्कृतीमुळे निर्माण झालेले द्वैत कायमचे मोडून काढण्याचा महाराजांचा प्रयत्न होता. सर जदुनाथ सरकारांसारख्या इतिहासकाराने त्यांना ‘हिंदू जमातीने निर्माण केलेला शेवटचा रचनात्मक प्रतिभा असलेला राजा’ असे म्हटले आहे.
इथल्या पूर्वजांनी अजून न विसरल्या गेलेल्या काळात शेकडो लढाया मारल्या, मोठी सैन्ये घेऊन देशाच्या सीमांचे अटीतटीचे सामने खेळले; स्वतंत्र राज्ये चालवली, जमाखर्चाच्या कोट्यवधी रकमांचे व्यवहार हाताळले आणि साम्राज्याचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, असे भारतातील अन्य कोणत्या लोकांना म्हणता येण्यासारखे आहे? शिवाजीमहाराजांच्या कार्यामुळे जगात अन्य कोणाला क्वचितच मिळालेला वारसा महाराष्ट्राला मिळालेला आहे.
उदारमतवाद, सेक्युलर स्टेट आणि लोकशाही व्यवस्था (मूल्ये) युरोपात जन्माला आली आणि ती जगभर पसरली. राजधर्मात काही मूल्ये समान असली तरी महाराजांच्या पाठचा वारसा इथून आलेला नव्हता, तर त्यापाठी भारतीय (मुख्यतः हिंदू) राजकीय व्यवस्थेचा व मूल्यांचा भाग जास्त होता. अर्थात यांत वरवर मूल्ये समान वाटत असली तरी स्वराज्यापाठी असलेले त्यांचे सूत्र अस्सल भारतीय हिंदू होते. त्यामुळे १८व्या-१९व्या शतकात युरोपात तयार झालेली आणि साम्राज्यवादामुळे जगभर पसरलेली मूल्ये शिवाजीमहाराजांवर लादणे हा इतिहासाचा विपर्यास होय.
‘Secularism’ हा शब्दच मुळात १८५०-५१च्या दरम्यान वापरात आला व पुढच्या ५० वर्षांत वेगाने प्रचलित झाला. परंतु, त्याआधी ख्रिश्चन धर्माच्या विरोधातील (अंतर्गत) आंदोलनांची फार मोठी सक्रीय पार्श्वभूमी त्याला आहे. फ्रेंच आणि अमेरिकन क्रांत्या आणि इंग्लंडमधील लोकशाहीची जडणघडण यांतून या तत्त्वाची पायाभरणी व विकास झालेला आहे. राजा राममोहन रॉय यांच्यापासून भारतीय मध्यमवर्गाने स्वातंत्र्य चळवळीत ही मूल्ये रुजवण्यात मोठा हातभार लावला. आणि तीच मूल्ये आणि व्यवस्था स्वतंत्र भारताचा आधार बनली.
छ. शिवाजीमहाराजांचे यात कोणते योगदान आहे? ‘प्रजासुखे सुखं राज्ञः प्रजानां च हिते हितम’ म्हणजे प्रजेच्या सुखात व हितात राजाने आपले सुख आणि हित मानायचे असते, हे मूल्य (किंवा राजधर्म) सार्वकालिक आहे. त्या वेळच्या धुरिणांनीही महाराजांच्या राज्यात भविष्यात आपल्याला ज्या प्रकारचे राज्य हवे, त्यातले पुष्कळ गुण दिसल्यामुळे प्रतीक म्हणून वा आदर्श राज्य म्हणून तशी मांडणी केली. आज आपल्याला तसे करण्याचे काही कारण नाही. अभ्यासक शिवाजीमहाराजांना ‘सेक्युलर’ सोसायटीचा सभासद करून टाकतात किंवा एकदम हिंदुमहासभेचा पुढारी बनवतात, हे अयोग्य असे आपल्या पूर्वसुरींनी बजावले आहे, ते येथे लक्षात घ्यायला हवे.
शेवटी, छ. शिवाजीमहाराजांच्या कार्याला सतराव्या शतकातल्या हिंदू मनाची मर्यादा होती. ही गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे.
..................................................................................................................................................................
(प्रस्तुत लेख मुख्यतः मराठ्यांच्या इतिहासाचे अभिजात भाष्यकार-मीमांसक इतिहासकार त्र्यं. शं. शेजवलकर, इतिहास संशोधक दत्तोपंत आपटे आणि संपादक-इतिहासकार सदाशिव आठवले यांनी केलेली मराठेशाहीची मीमांसा अगदी थोडक्यात कळावी या हेतूने लिहिला आहे.)
संदर्भ -
१) आठवले सदाशिव, शिवाजी व शिवयुग, अजब पुस्तकालय, कोल्हापूर, १९७१. (दु. आ. १९८६).
२) आपटे दत्तोपंत, (संपा. दत्तोपंत आपटे स्मारक मंडळ), दत्तोपंत आपटे लेखसंग्रह, वि. गं. केतकर, (प्रका.), पुणे, १९४५.
३) शेजवलकर त्र्यंबक शंकर, श्रीशिवछत्रपति संकल्पित शिवचरित्राची प्रस्तावना, आराखडा व साधने, मराठा मंदिर प्रकाशन, मुंबई, १९६४.
..................................................................................................................................................................
लेखक पंकज घाटे रत्नागिरीच्या गोगटे - जोगळेकर महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक आहेत.
pankajghate89@gmail.com
..................................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
5KN52OEQD5CZ7Z3IHWL3Y4CJCQ-05@cloudtestlabaccounts.com
Sat , 20 June 2020
text
5KN52OEQD5CZ7Z3IHWL3Y4CJCQ-05@cloudtestlabaccounts.com
Sat , 20 June 2020
text
5KN52OEQD5CZ7Z3IHWL3Y4CJCQ-05@cloudtestlabaccounts.com
Sat , 20 June 2020
text
5KN52OEQD5CZ7Z3IHWL3Y4CJCQ-05@cloudtestlabaccounts.com
Sat , 20 June 2020
text
5KN52OEQD5CZ7Z3IHWL3Y4CJCQ-05@cloudtestlabaccounts.com
Sat , 20 June 2020
text
5KN52OEQD5CZ7Z3IHWL3Y4CJCQ-05@cloudtestlabaccounts.com
Sat , 20 June 2020
text
5KN52OEQD5CZ7Z3IHWL3Y4CJCQ-05@cloudtestlabaccounts.com
Sat , 20 June 2020
text
5KN52OEQD5CZ7Z3IHWL3Y4CJCQ-05@cloudtestlabaccounts.com
Sat , 20 June 2020
text
5KN52OEQD5CZ7Z3IHWL3Y4CJCQ-05@cloudtestlabaccounts.com
Sat , 20 June 2020
text
5KN52OEQD5CZ7Z3IHWL3Y4CJCQ-05@cloudtestlabaccounts.com
Sat , 20 June 2020
text
5KN52OEQD5CZ7Z3IHWL3Y4CJCQ-05@cloudtestlabaccounts.com
Sat , 20 June 2020
text
5KN52OEQD5CZ7Z3IHWL3Y4CJCQ-05@cloudtestlabaccounts.com
Sat , 20 June 2020
text
5KN52OEQD5CZ7Z3IHWL3Y4CJCQ-05@cloudtestlabaccounts.com
Sat , 20 June 2020
text
5KN52OEQD5CZ7Z3IHWL3Y4CJCQ-05@cloudtestlabaccounts.com
Sat , 20 June 2020
text
5KN52OEQD5CZ7Z3IHWL3Y4CJCQ-05@cloudtestlabaccounts.com
Sat , 20 June 2020
text
5KN52OEQD5CZ7Z3IHWL3Y4CJCQ-05@cloudtestlabaccounts.com
Sat , 20 June 2020
text
5KN52OEQD5CZ7Z3IHWL3Y4CJCQ-05@cloudtestlabaccounts.com
Sat , 20 June 2020
text
5KN52OEQD5CZ7Z3IHWL3Y4CJCQ-05@cloudtestlabaccounts.com
Sat , 20 June 2020
text