दादा फोन हातात घेऊनच उभे राहिले, समोरच्या खिडकीचा पडदा दूर केला, दिवस उजाडू लागला होता.
सदर - वास्तव-अवास्तव
संजय
  • उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी
  • Fri , 05 June 2020
  • सदर वास्तव-अवास्तव स्वातंत्र्यवीर सावरकर Swatantryaveer Savarkar अजित पवार Ajit Pawar भगतसिंग कोश्यारी Bhagat Singh Koshyari

म्हटलं तर वास्तव, म्हटलं तर अवास्तव. म्हटलं तर शक्य, म्हटलं तर अशक्य. म्हटलं तर खरं, म्हटलं तर खोटं. म्हटलं तर कल्पना, म्हटलं तर सत्य. आजच्या कल्पना उद्याचं वास्तव असू शकतात किंवा उद्याचं वास्तव आजच्या कल्पना. अशा अनेक शक्य-अशक्य घटनांचा वेध घेणारं हे नवं-कोरं साप्ताहिक सदर...

..................................................................................................................................................................

सकाळचे साडेपाच वाजले होते. अजितदादांच्या लेखी ती मध्यरात्रच. फोन खणाणला. आगीच्या बंबाची घंटी वाजल्यासारखा दणदणीत आवाज घरात पसरला.

दादांना वाटलं कोणी तरी चुकून गजर लावून ठेवला. काय कटकट आहे असं म्हणत त्यांनी घड्याळावर थापटी मारली. तरी घंटी थांबली नाही. दादांच्या लक्षात आलं की फोन वाजतोय.

दादा जवळ जवळ झोपेतच होते.

फोन टेबलावर होता. दादा अंथरुणातून उठून टेबलाकडं गेले आणि त्यांनी फोन घेतला.

“प्रणाम” पलीकडून.

दादांना हे प्रणाम प्रकरण कळेना. त्यांच्या मस्तकात तिडीक गेली. आधी येवढ्या पहाटे फोन आणि त्यातून प्रणाम.

“काय प्रणामबिणाम लावलंय? कोण बोलतंय?” दादांनी अत्यंत त्रासिक आणि चिडलेल्या स्वरात विचारलं.

“मी भगतसिंग बोलतोय.” पलीकडून.

‘आता हा कोण भगतसिंग? स्वर्गात याला स्वस्थ बसवत नाही काय! कशाला माझी झोपमोड करतोय.’ मनात आलं पण ओठावर आलं नाही.

“अहो भगतसिंग, ही काय फोन करायची वेळ आहे काय? काय झालंय काय? मुंग्यांनी मेरूपर्वत गिळला काय?” अजितदादा फोन आदळणारच होते तेवढ्यात पलीकडचा माणूस म्हणाला, “अहो भगतसिंग म्हणजे भगतसिंग कोश्यारी, माननीय राज्यपाल महोदय.”

अजितदादांच्या मनात आलं - हा स्वतःला माननीय म्हणवून घेतो. काय विनोदी माणूस आहे! अहो माननीय आणि महोदय हे इतरांनी म्हणायचं असतं. या येड्याला हेही कळत नाही… आता या महोदयांना काय हवंय?

दादा सावरले. म्हणाले, “बोला सर. जरा झोपेत होतो. सॉरी. तुमचा आवाज ऐकायची सवय नाहीये, त्यामुळं पटकन ओळखलं नाही. त्या दिवशी तुम्ही मला शपथ दिली होती. तेव्हा दोन शब्द बोलला होतात तेवढंच. त्यानंतर तुम्हाला काय म्हणायचं असतं, ते आम्हाला फडणवीसच सांगत असतात. त्यामुळं तशी तुमची थेट भेट होत नाही. माफ करा. काय सेवा करू?”

दादांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. उद्धवचं सरकार पाडणार आणि पुन्हा आपल्याला सरकार करायला बोलावणार काय? पण आता उपमुख्यमंत्रीपदावर भागणार नाही. थेट मुख्यमंत्रीपद किंवा संयुक्त मुख्यमंत्रीपद. क्षणाच्या हजाराव्या भागात दादांनी निर्णय घेऊन टाकला.

 “अहो आज, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरसाहेबांचा जन्मदिवस.” कोश्यारी.

“ठीक आहे. मी ऑफिसमध्ये पोचल्यावर त्यांना फोन करून त्यांचं अभिनंदन करेन.” दादा. फोन खाली ठेवण्याच्याच बेतात होते.

“अहो मी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बोलतोय. ते समुद्रात उडी मारलेले, तुरुंगात कोलू चालवणारे क्रांतिकारी सावरकर.” कोश्यारी.

“कळलं हो मला. मी ते सर्व वाचलंय. लहानपणी मी त्यांनी काढलेल्या प्रभात फेरीत भाग घेतला होता, ‘वंदे मातरम’ त्यांनीच मला शिकवलं, स्वातंत्र्यलढ्यात जनतेनं भाग घेतला, तो त्यांच्याच सांगण्यावरून, गांधीजींची थोरवी त्यांनीच जनतेला सांगितली. ते बरे आहेत ना? मी बोलेन त्यांच्याशी. त्यांना कशाची जरूर असेल तर सांगा. व्यवस्था करेन.”

“अहो मी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बोलतोय. त्यांच्यासाठी आता काही करायची जरुरी नाही, ते त्या पलिकडं गेले आहेत.” कोश्यारी.

“कळलं हो मला. किती वेळा तेच तेच सांगत आहात. मला त्यांच्याबद्दल अतोनात आदर आहे. फार मोठे आहेत ते. असा माणूस झाला नाही. त्यांचं जे आहे ते त्या ठिकाणी स्वातंत्र्याला असलेलं योगदान जे आहे ते फार मोठं आहे. त्यांना स्वातंत्र्यसैनिक कोट्यातून फ्लॅट हवाय का? त्यांना म्हणावं की अर्ज करा. लगेच सँक्शन करून टाकतो.” दादा.

कोश्यारी गरगरले.

“अहो, स्वातंत्र्यवीरांनी कधी कोणाकडं काही मागितलं नाही. ब्रिटीश सत्तेपुढं त्यांनी कधीही तोंड वेंगाडलं नाही. पण ते जाऊ द्या. तो मुद्दा नाही. त्यांचा आज जन्मदिवस आहे.”

“अहो कोश्यारीसाहेब, मघापासून ही एकच गोष्ट तुम्ही मला सारखी सांगत आहात. मला कळलीय. मी माझ्या सेक्रेटरीला डायरीत लिहायला सांगतो. फोन ठेवू?” दादा.

“अहो मी काय बोलतोय, ते नीट ऐकून घ्या. सावरकरांबद्दल तुम्हा काँग्रेसवाल्यांची वेगळी मतं आहेत ते मला माहीत आहे. पण तो मुद्दा नाही. त्यांचं देशावर प्रेम होतं, देश स्वतंत्र व्हावा यासाठी त्यांनी कठोर तुरुंगवास सोसला हे तर तुम्हालाही मान्य असणार. पण तो मुद्दा नाही. आज त्यांचा जन्मदिवस आहे.” कोश्यारी.

काय कटकट आहे यार, असं दादा स्वतःशीच बोलले.

“त्यांना काय हवंय ते सांगायला ते तयार नाहीत. तुम्ही तरी एकदाचं सांगून टाका आणि विषय संपवा. परवा काकांच्या बोलण्यात काहीतरी विषय होता. काका म्हणत होते की, फडणविसांचंच सरकार केंद्रात असूनही सावरकरांना भारतरत्न दिलेली नाही. भारतरत्न काही आम्ही महाराष्ट्र सरकार देऊ शकत नाही. तुम्हाला शिफारसपत्रं हवंय का? लगेच देतो. पण विषय संपवा.” दादा.

दादांच्या घरातली आणखी एक-दोन माणसं येऊन दादांच्या बाजूला उभी राहिली. ती माणसं बुचकळ्यात.

दादा फोन हातात घेऊनच उभे राहिले, समोरच्या खिडकीचा पडदा दूर केला, दिवस उजाडू लागला होता.

कोश्यारी काकुळतीला आले.

“तुम्हाला मागण्याच कळतात तर मागणी करतो. आज मंत्रालयात जाऊन सावरकरांच्या फोटोला हार घाला.” कोश्यारी.

“हात्तिच्या. येवढी बारीकशी गोष्ट सांगण्यासाठी किती फूटेज खाल्लं तुम्ही राव. फोटो पाठवून द्या. हार घालून टाकू.” दादांनी सुस्कारा टाकला.

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......