अजूनकाही
संकटाच्या काळात कुणालाही आपलं घर सर्वांत सुरक्षित ठिकाण वाटतं.
मग ते छोटं का असेना,
वस्तीपासून दूर का असेना,
दाट वस्तीत का असेना,
त्याला दुरुस्तीची गरज का असेना.
ती झोपडी का असेना किंवा शेजारी भांडखोर का असेना!
आपलं घर आपलं डेस्टिनेशन असतं!!
म्हणूनच तर मुसळधार पावसात हजारो मुंबईकर आपल्या गाड्या, ट्रेन, बसमधून प्रवासात मध्येच उतरून जीवावर उदार होत आपल्या घराकडे जायला निघतात. एकदा घरी पोहचलो की, ‘हुश्श!’ असा सुटकेचा निःश्वास ते सोडतात.
मुंबईनं काय अनुभवलं नाही? १९९२-९३ची दंगल, २००५चा महापूर, २००८चा दहशतवादी हल्ला. आपत्ती कितीही मोठी असू देत, एकदा घरी पोहोचलो की, सुटलो असं वाटतं. पण मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये दाटीवाटीनं राहणाऱ्या लोकांच्या या समजाला करोनाने पूर्णपणे छेद दिलाय. ज्या घरांत ते लहानाचे मोठे झाले, जी घरं त्यांना कोणत्याही मोठ्या संकटात आजवर आश्वासक वाटली, त्याच घरांचं त्यांना आता भय वाटू लागलंय. तिथं त्यांचा श्वास कोंडू लागलाय. तिथून पळ काढण्यासाठी ते प्रयत्नांची शिकस्त करू लागलेत. त्यांना पळताना पाहून इतरांचीही घालमेल वाढलीय. कधीही न थांबणारी हीच ती झोपडपट्ट्यांमधून ओसंडून वाहणारी खरीखुरी मुंबई करोनाने पहिल्यांदाच थांबवलीय, घाबरवलीय आणि हादरवलीयसुद्धा.
भारतात करोनाची सुरुवात झाली, तेव्हाच सर्वांचं लक्ष मुंबईकडे वळलं, ते इथल्या अतिशय दाट झोपडपट्ट्यांमुळे. धारावीसारख्या झोपडपट्टीत करोना शिरला तर काय, या कल्पनेनेच मनाचा थरकाप उडत होता. पहिले काही दिवस करोनाचे रुग्ण मध्यम अथवा उच्चवर्गीय वस्त्यांमधून येत होते. काही दिवसांनी बातमी आली- वरळी कोळीवाड्याची. आणि पुढील काही दिवसांत धारावीची. तिथं करोना रुग्ण आढळल्यानं प्रशासनाची भंबेरी उडाली. पण ती केवळ सुरुवात होती. हळूहळू मुंबईतील अनेक लहान-मोठ्या झोपडपट्ट्यांना करोनानं आपल्या विळख्यात घेतलं होतं. आता प्रशासनापुढील आव्हान तेवढं सोपं नव्हतं. समस्या खूप जटील बनली होती.
प्रश्न फक्त करोनाचा नव्हता, भुकेचाही होता. एकाच वेळी अनेक अडचणींचा डोंगर प्रशासनापुढे उभा आहे. धान्य वाटप, औषध वाटप, दवाखान्यांबाहेरील मोठी रांग, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता, मजुरांना अन्न, हे आणि असे कैक प्रश्न प्रशासनापुढे उभे ठाकले. पण या झोपडपट्ट्या फक्त समस्यांचं आगार आहेत असं नाही. तर इथं अत्यंत चांगल्या गोष्टीही घडल्या. मुंबई पोलिसांनी अनेक ठिकाणी गरजूंना मोफत फूड पॅकेट्स वाटले. हे फूड पॅकेट्स बनवण्यात अनेक झोपडीधारकांनी पुढाकार घेत मानवतेचं दर्शन घडवलं.
करोना महामारीच्या या संकटाच्या काळात प्रशासन मुंबईकरांच्या मदतीनं परिस्थितीला सामोरं जात आहे. प्रशासनातील - व्यवस्थेतील दोष-उणीवा दररोज समोर येत आहेत. पण हा एकूणच सज्जतेचा भाग आहे. ही सज्जता एका रात्रीत बनवता येत नाही. ती वर्षानुवर्षांच्या आपल्या प्रयत्नांचा, प्राथमिकतेचा भाग असावी लागते.
आज मुंबईची अवस्था काय आहे? इथल्या झोपडपट्ट्यांची अवस्था काय आहे?
मुंबईत थोडेथोडके नव्हे, तर तब्बल ४२ टक्के लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहतात, हे सर्वांनाच माहीत आहे. पण उरलेल्या ५८ टक्क्यांचं काय? तर ते काही आलिशान फ्लॅटमध्ये राहत आहेत असं नाही. किंबहुना त्यातील बहुतांश लोक १२५, १८०, २२५, २७०, ३००, ३२५ आणि जास्तीत जास्त ४०० चौरस फुटांच्या घरात राहतात. अशा घरांमध्ये एकमेकांशी संपर्क टाळणं किंवा होम आयसोलेशन अजिबात शक्य नाही. काही इमारतींची अवस्था तर झोपडपट्ट्यांहून अधिक बिकट आहे. एका मजल्यावर २०-२२ घरं. हवेसाठी व्हेंटीलेशनची सोय नाही, कोंदट वातावरण, चौथ्या मजल्यापर्यंत पायऱ्यांवरून चढणाऱ्या घुशी, अशी बऱ्याच इमारतींची अवस्था झालेली आहे. झोपडपट्टीतले ४२ टक्के आणि या इमारतींमधले अंदाजे ३५ टक्के लोक धरले, तर मुंबईतले किमान ७५ टक्के लोक अत्यंत भयावह वातावरणात जीवन जगत आहेत.
मुंबईतील झोपडपट्ट्यांचीही वर्गवारी करता येऊ शकते. उदा. धारावी, बेहरामपाडा, भारतनगर, कुर्ला, गोवंडी, मानखुर्द, चेंबूर इथल्या झोपडपट्ट्या आणि इतर काही ठिकाणच्या झोपडपट्ट्या यांमध्ये मोठा फरक असतो. मी लहानपणापासून झोपडपट्टीत राहत असूनही, जेव्हा नुकतेच म्हणजे करोनाच्या काळात मला अशाच एका झोपडपट्टीत जावं लागलं, तेव्हा तिथली परिस्थिती पाहून मनाचा थरकाप उडाला.
मी जिथं किमान अर्धा तास उभा होतो, तिथून अगदी १५ पावलांवर सकाळीच एक व्यक्ती करोनानं मरण पावल्याचं कळालं. सुरुवातीला मला काहीच माहीत नसल्यानं शांतपणे मी तिथं उभा होतो. लोकांची ये-जा मोठ्या प्रमाणात चालू होती. असं काही घडलं आहे याचा मागमूसही नव्हता. तेवढ्यात एक चाळीशीतील स्त्री समोर येऊन रडू लागली. तेव्हा कळालं, तिच्या सासूचं सकाळीच करोनानं निधन झालं. काळजाचा थरकाप उडाला. लोकांचा मुक्त संचार पाहून धडकी भरली. या अर्ध्या तासात आपला चुकून कुठे कुठे स्पर्श झाला याचा शोध भेदरलेल्या मनानं सुरू केला. मुळात, मृत्यूचं भय डोक्यावर असताना कुणी असा मुक्त संचार करूच कसा शकतो, असा प्रश्न मनात डोकावला. पण ज्यांचं अख्ख आयुष्यच अभावात आणि संघर्षात गेलंय, त्यांना कदाचित आपल्याएवढं मृत्यूचं भय वाटत नसावं. ज्या ठिकाणी रुग्ण आढळला, तो भागही क्वारंटाईन करण्यात आला नव्हता. यामुळे प्रशासनाचा संतापही आला आणि आपल्या कल्पनेहून आव्हान किती तरी मोठं आहे, याची जाणीवही झाली.
झोपडपट्टी अथवा जुन्या इमारतींत एक रुग्ण सापडल्यावर प्रशासनाला किमान १० लोकांना क्वारंटाईन करावं लागतंय. त्यांच्या राहण्या-जेवणाची आणि चाचण्यांची व्यवस्था करावी लागतेय. झोपडपट्ट्यांमध्ये घरोघरी जाऊन सॅम्पल घ्यावे लागत आहेत. गल्लीबोळ्यांमध्ये जाऊन निर्जंतुकीकरण करावं लागत आहे. पोलिसांना गस्ती घालाव्या लागत आहेत. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या औषधाचं वाटप करावं लागत आहे. याच झोपड्यांमध्ये राहणाऱ्या अशिक्षित मजुरांना राज्याबाहेर पाठवताना मोठी यंत्रणा राबवावी लागत आहे. झोपडपट्ट्या वगळता इतर आव्हानं आहेत ती आहेतच. सरकारपुढे एक अशक्यप्राय काम करण्याचं आव्हान आहे. त्यात खूप त्रुटी राहणारच आहेत. पण या त्रुटी एकत्र येऊन काही प्रमाणात दूर करता येतील, दोषारोप करून नाही.
करोनातून धडा घेऊन भविष्यात आपण झोपडपट्टीमुक्त मुंबईच्या दिशेनं वाटचाल सुरू केली, तरी आपण एक पाऊल पुढे टाकलं असं म्हणता येईल. मुंबईतील या समस्यांसाठी विरोधकही जबाबदार आहेतच. गेली पाच वर्षं ते राज्यात आणि किमान २५ वर्षं महापालिकेत सत्तेत होते. तेव्हा, या पापाचे धनी तेदेखील आहेतच.
फक्त जाता जाता एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, ती अशी की, मी उल्लेख केलेली वस्ती मुस्लिमांची नाही. अशा हिंदूंच्या बऱ्याच वस्त्या मुंबईत आहेत, राजकीय पक्षांनी दुर्लक्षिलेल्या (?); नव्हे, फूट सोल्जरसाठी राखून ठेवलेल्या!!
..................................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment