अजूनकाही
नीरा राडिया हे नाव आठवतेय? २००८-०९ साली या लॉबिस्टबाईंचा फोन टेलिकॉम खात्याने गुप्तपणे ऐकून संभाषणाच्या काही टेप्स जारी केल्या होत्या. कोणाला मंत्री करायचे, कोणाकरवी कामे होतील वगैरे अनेक विषय त्या संभाषणात होते. तेव्हाची जगप्रसिद्ध पत्रकार बरखा दत्त हिचेसुद्धा संभाषण या भानगडीत आले. आपला प्रभाव वापरून कोण्या पुढाऱ्याची शिफारस मंत्रीपदासाठी करावी, याबाबत बरखाबाई राडियाबाईंशी बोलल्या होत्या. तेव्हा काँग्रेसचे सरकार होते. भाजपने या भानगडीचा पुरेपूर वापर करून आपला जम सत्तेच्या राजकारणात बसवला आणि २०१४ साली सत्ता मिळवली. तेव्हा बरखा दत्त, वीर संघवी, नाविकाकुमार, प्रभु चावला इ. पत्रकारांची संभाषणे ऐकू आली अन त्यांची पत्रकार म्हणून प्रतिष्ठा आटून गेली. कोणी गप्पा मारल्या, तर कोणी काम करण्यासंबंधी राडिया यांच्याशी बोलणे केले होते. संघपरिवाराने बरखा दत्त यांची यथेच्छ बदनामी केली. ते साहजिकही होते. साधारणपणे भाजप-संघविरोधी माध्यमांत बरखा कार्यरत होती.
स्वातंत्र्य, समानता, लोकशाही, न्याय अशा मूल्यांवर श्रद्धा असलेली ही तरुण पत्रकार या प्रकरणापासून बाजूला फेकली गेली. त्यानंतर तिने म्हणजे एनडीटीव्ही सोडल्यानंतर ‘क्विंट’, ‘तिरंगा टीव्ही’ अशा ठिकाणी कामे केली. आता तिने ‘मोजो’ हे युट्यूबवर आपल्या मुलाखतींचे प्रक्षेपण करणारे एक व्यासपीठ तयार केलेय. करानोकाळातील स्थलांतरित श्रमिकांच्या, तसेच या साथीच्या रोगाशी संबंधित सर्वांच्या मुलाखतींचे तिचे चित्रण बघायला मिळते. स्टुडिओबाहेरचे हे तिचे रूप वेधक आणि वैविध्यपूर्ण असले तरी तिला पाहताना राडिया टेप्सची आठवण काही जात नाही. पत्रकाराने दलाली अथवा भडवेगिरी करायची नाही, हा नीतीनियम तिने तोडला. स्वार्थ आणि परार्थ यांसाठी सत्ताधारी, राजकीय पुढारी, नोकरशहा यांचे साहाय्य पत्रकार घेणार नाही, असाही एक नियम आहे. तोही बऱ्याचदा भंगतो. सत्ता पत्रकाराला विकत घेऊन वाकवायला सदैव तयार असते. म्हणून ‘सत्तेपासून चार हात दूर’ हा नियम चांगल्या पत्रकारासाठी अत्यावश्यक.
अशी ही बरखा दत्त दहा-बारा दिवसांपूर्वी मुंबईत नेहरूनगर भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका करोना चाचणी केंद्राचा परिचय मुलाखतींसह करून देताना यूट्युबवर झळकली. खरे तर झळकवली गेली म्हणूया. नागरिक आणि भली माणसे (‘गुड समारिटन्स’ हा तिचा शब्दप्रयोग) कशी लोकहिताची कामे जोखीम घेऊन करत आहेत, अशी सुरुवात करून तिने तिथे निरनिराळ्या जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्यांची मुलाखत घेतली. विकास देशमुख या संघाच्या स्वयंसेवकाने तिला तिथे बोलावून आणल्याचे त्याच्याच मुलाखतीद्वारे तिने स्पष्ट केले. उघड आहे, देशमुखांना, बरखाला कोणा बड्या भाजप नेत्याचा निरोप असल्याखेरीज असे होणार नाही. या परिचयवजा दृकश्राव्य चित्रीकरणात बरखा पत्रकार म्हणून स्वत:हून संघाची कोठेही प्रशंसा करत नाही. दोघांना ती राजकारण व समाजकारण यांच्या संबंधांवर प्रश्न करतेही. उत्तरे अर्थातच चिरपरिचित सेवा, राष्ट्रहित, नि:स्वार्थ वृत्ती अशा शब्दांसह येतात.
आता गंमत पाहा. या बरखाची ती कशी आयुष्यभर संघाची टीकाकार असूनही ‘रेड झोन’मधील एका भागातील संघाचे केंद्र तिच्या प्रशंसेस पात्र ठरलेय अशी पुस्ती जोडणारी एक दृकश्राव्य पट्टीका सर्वत्र फिरू लागली. ती माझ्याकडेही आली. ‘बघा, संघावर टीका करता पण संघ सेवा कशी करतो तेही पाहा!’ असा टोमणा मारत! संघावर टीका करणारे ते संघद्वेष्टे असा संघवाल्यांचा भयंकर अपप्रचार असतो. स्युडो सेक्युलर, सिक्युलर, लेफ्टिस्ट, लिबटार्ड, अर्बन नक्सल असे काय काय त्या टीकाकारांना म्हटले जाते. बरखा मात्र तेवढ्यापुरती द्वेष्टी राहिली नाही.
केविन कार्टरचे जगप्रसिद्ध छायाचित्र
दुसरी गंमत बघा. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी मेच्या अखेरीस सर्वोच्च न्यायालयात मोदी सरकारची बाजू मांडताना स्थलांतरित श्रमिकांचे चित्रीकरण करणाऱ्या तमाम पत्रकारांना ‘व्हल्चर्स’ म्हणजे गिधाडे संबोधले. थेट त्या संघवाल्यांप्रमाणेच. बरखा दत्तने ‘मोजो’चा आरंभच या श्रमिकांच्या मुलाखतींनी केलाय. ती त्यांच्यासमवेत चाले व त्यांची दु:खे टिपून घेई. याचा अर्थ बरखाबाईसुद्धा गिधाडवर्गात जाऊन बसल्या! संघवाल्यांचा दुटप्पीपणा, ढोंगीपणा हा की, तुषार मेहता यांच्या वर्णनावर टाळ्या वाजवायच्या अन बरखा दत्तने संघाच्या एका केंद्राचा परिचय करून दिला की, ती कशी चांगलीय, प्रशंसकय असे म्हणायचे. शिवाय तिची राडिया टेप्स वेळची निंदाही विसरायची. पुढे बरखा श्रमिकांच्याही मुलाखती घेतेच. म्हणजे गिधाडवृत्ती ती सोडतच नाहीय! आपण एक शंका अशीही घेऊ की, बरखा आता एका नव्या प्रकारात व प्रकल्पात उतरलीय. त्यामुळे तिला टीआरपी कसा वाढवायचा हे पक्के माहीत असल्याने तिने बरोबर संघाचे एक केंद्र प्रकाशात आणून आपले प्रेक्षक वाढवले. पूर्वीच्या बदनामीचे तिला आता काय? तिचाही स्वार्थ होताच.
बरखाने संघावर कधी, केवढी टीका केली हे न सांगता तिचा संघाबद्दलचा दृष्टीकोन बदलला, असे मानणे योग्य होईल काय? या ‘मोजो’नंतर समजा तिने परत संघावर टीका केली, तर ती दृकश्राव्य पट्टीका प्रसारित केली जाईल काय? बरखा पुन्हा बदनाम केली जाईल काय? संघासारख्या टीकेला मुळीच भीक न घालणाऱ्या संघटनेला बरखाच्या प्रशस्तीच्या प्रमाणपत्राची गरज का म्हणून पडावी? करोना उगवला जानेवारी महिन्यात. संघाचे नेहरूनगर केंद्र सुरू झाले, मेच्या शेवटच्या आठवड्यात. मग अशा वेळी कोणी काही म्हटले तर ते संघद्वेष्टे, राष्ट्रद्रोही! संघाने वेळेवर संकट ओळखले नाही, त्याबद्दल कोणी ना काही बोलणार, ना कोणी आत्मपरीक्षण करणार! एकीकडे प्रसिद्धीची गरज नाही, आमचे राष्ट्रकार्य चालूच असते असे म्हणायचे आणि बरखाला बोलावून प्रचार करवून घ्यायचा, याला काय म्हणावे? संघ आपल्या भूमिकांवर ठाम असतो, निर्धाराने पक्का असतो, तर अशा कौतुकाचा पट्ट्या अन गौरवाच्या गप्पा यांकडे लक्ष दिले नाही पाहिजे. रवीश कुमार, पुण्यप्रसून वाजपेयी, विनोद दुआ, अभिसार शर्मा या ‘गिधाडां’एवढीच बरखाही ‘धर्म’ विसरलेली नाहीय.
ही ‘गिधाडां’ची उपमा मेहता यांनी कोठून मिळवली ते पाहू. १९९३ साली आफ्रिकेतील सुदान देशात खूप मोठा दुष्काळ पडला. तिथे छायाचित्र घेण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा व्यावसायिक छायाचित्रकार केविन कार्टर (१९६०-१९९४) गेला. एक बालक उपाशी पोटी ग्लानी येऊन बसले असून त्याच्या मागे एक गिधाड ते कधी मरेल त्याची वाट पाहत उभे आहे असे त्याचे छायाचित्र. त्याला पुलित्झर पुरस्कारही मिळाला. कार्टरने त्या गिधाडाला पळवून लावले होते, पण तो त्या बालकाला काही मदत करू शकला नाही, कारण रोगराईमुळे कार्टरला संसर्गाचा धोका असल्याचा इशारा देण्यात आला होता. कार्टर थोड्याच वेळात विमानाने मायदेशी परतला. या प्रसंगावरून भारतात व्हॉटसअॅपवर एक भावनिक पण खोटा संदेश पसरवला (कोण असेल पसरवणारा?) गेला की, त्या छायाचित्रात दोन गिधाडे होती. एक खरे, दुसरे कॅमेऱ्यामागे. या टीकेने व्यथित होऊन कार्टरने आत्महत्या केली वगैरे.
यातील सत्य असे की, ते बालक धडपडत युनोच्या सुरक्षा केंद्रात पोचले. बचावले. पुढे अनेक वर्षांनी वेगळ्या आजाराने ते मरण पावले. कार्टर याने कर्ज, बेकारी, पोलीस हिंसाचार, मुलाचा खर्च, मित्रवियोग या कारणांनी दीड वर्षाने जीव दिला. त्या छायाचित्रामुळे त्याला नैराश्य आले नव्हते. भारतात प्रधानसेवकांनी नेहमीच्या पद्धतीप्रमाणे लहरी राजासारखा अवघा चार तासांचा अवधी देऊन लॉकडाउन जाहीर केला आणि कोट्यवधी लोकांची अशी फजिती केली की बस्स! असे लाखो फजित व पराजित श्रमिक शहरे सोडून गावी परतू लागतानाची छायाचित्रे आणि चित्रीकरणे त्या कार्टरसारखी गणली जाऊ लागली. का, तर असा भावनिक फटका मारला की, कॅमेरे व तोंडे बंद पडतील यासाठी. पण झाले उलटेच. श्रमिकांची प्रचंड पीडा जगजाहीर (होय, कित्येक आंतरराष्ट्रीय वार्ताहरांनीही त्यांची दुर्दशा जगाला दाखवली!) होताच मोदी सरकार व संघपरिवार हलू लागला. गिधाडांनी असे टोचे मारले म्हणून सरकारे खडबडून उठली व देखभाल करू लागली. मेहता यांनी व्हॉटसअॅपवरील अपप्रचार सर्वोच्च न्यायालयाला ऐकवला हे धाडस खासच. तसे ते परिचयाचेही झालेय. अंगावर थुंकून पळून जाणारी खोडकर मुले सापडली तर मारही खाऊ या तयारीची असतात. पण आपला आनंद ती अशी इतरांची दुर्गती करून मिळवतात. ठिकाय. चालू द्या.
..................................................................................................................................................................
लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.
djaidev1957@gmail.com
..................................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Hemant Karnik
Thu , 04 June 2020
१. इथे दोन स्वयंसेवक आहेत. संघाने २ लाख स्वयंसेवक काम करत असल्याचा दावा केला आहे. त्यांचे एरवीचे खोटे दावे लक्षात घेता इथे त्यांनी किती शून्यं वाढवली असावीत? पाचही वाढीव असण्याची शक्यता नाकारता येत नाही. २. डॉक्टरांना न मिळणारे संरक्षक कपडे यांना कुठून मिळाले? दोन लाख मिळवल्याचा दावा संघ करतो की स्वयंसेवक विना संरक्षण काम करत असल्याचा? तसे काम करणारे दाखवणार का? ३. स्वतःच्या लंगड्या नैतिकतेची जाणीव असल्यामुळे संघाला सतत तिऱ्हाईत मान्यतेची आकांक्षा असते. यात काही नवीन नाही.