​​​​​​​मा. प्रधानसेवक, आपले पत्र मिळाले. त्या पत्रास उत्तर पाठवतोय, जमल्यास वेळ काढून वाचा.
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • रेखाचित्र - संजय पवार
  • Wed , 03 June 2020
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar नरेंद्र मोदी Narendra Modi भाजप BJP

माननीय प्रधानसेवक,

भारत सरकार.

सस्नेह नमस्कार!

रविवारच्या एका वर्तमानपत्रातून आपण आम्हा देशवासियांना लिहिलेले पत्र वाचले. आपण ‘स्नेहीजन’ असा शब्दप्रयोग केला आहे. स्नेहाची आपली व्याख्या काय हे माहीत नाही, कारण विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांना जसे आलिंगन आपण देता, तसे आलिंगन आम्हा नागरिकांपैकी कुणास वा अगदी तुमच्या खासदार, मंत्रीमहोदयांनाही देताना कधी दिसले नाही. तरीही आम्ही आपल्या संबोधनातील स्निग्धता समजून घेऊ!

आपण हे जे पत्र लिहिलेय त्याचे निमित्त आहे, आपल्या दुसऱ्या पर्वाचे पहिल्या वर्षपूर्तीचे. त्यात तुम्ही साभिमानाने लिहिले आहे की, ७० वर्षांत प्रथमच एका गैरकाँग्रेसी पक्षाने लागोपाठ दुसऱ्यांदा सत्ता मिळवून टिकवली आहे, जो एक विक्रम आहे. त्याबद्दल सुरुवातीलाच आपले, आपल्या पक्षाचे व आपल्या मित्रपक्षांचेही अभिनंदन करतो.

आता आपण पत्राच्या आशयाकडे वळूया. आपण या पत्रात पहिल्या पाच वर्षांतील कार्याला थोडे बाजूला ठेवलेय आणि या नव्या पर्वातील पहिल्या वर्षातील कामावर अधिक भर दिलाय. वर्षपूर्तीचे निमित्त बघता ते संयुक्तिकही आहे. पण हे वर्ष मागच्या पाच वर्षाच्या खांद्यावर उभे आहे, हे विसरून चालणार नाही. पण काय आहे, आपली कार्यशैली त्या जुन्या लोकप्रिय गाण्यासारखी आहे… जे म्हणते ‘छोडो कल की बातें, कलकी बातें पुरानी, नये दौरसे लिखेंगे मिलकर नयी कहानी!’ (यातलं ‘मिलकर लिखेंगे’ हे आपल्यासाठी फक्त घोषणेपुरतं मर्यादित राहणार, हे आम्ही आता पूर्वानुभवाने जाणतो!)

आपण घोषणा करता, त्यासाठीच्या आर्थिक तरतुदीचे भले मोठे आकडे जाहीर करता, त्याकरता एखादा शानदार कार्यक्रम करता आणि पुढे सरकता! मग कधीतरी प्रचार सभेत वा समारंभात वा ‘मन की बात’मध्ये त्यावर नव्या आकड्यासह बोलता. बास्स. विश्लेषण, आढावा, मूल्यांकन या प्रक्रिया आपण मानत नाही किंवा त्यासाठी तुम्ही स्वत: वा तुमचे सरकार उत्तरदायी आहे, हेही दर्शवत नाही. ज्याला तुम्ही ‘संवाद’ म्हणता तो संवाद नसून ‘संबोधन’ असते. आपण कायम एकतर्फी संबोधन करता. हे पत्रही तसेच एक संबोधन आहे.

करोनामुळे तुम्हाला प्रिय दूरचित्रवाणी पडद्यावर ‘या निमित्ताने’ येणे अनुचित ठरले असते, म्हणून तुम्ही हा पर्याय निवडला. या वेळी पत्र लिहिल्याने पत्रोत्तर द्यावेसे वाटले. आपणाकडून मात्र पत्रोत्तराची अपेक्षा नाही. पण जवळपास २४ तास कार्यरत असणाऱ्या आपण ते नजरेखालून तरी घालावे, ही माफक अपेक्षा.

आता आपण तुमच्या या वर्षीच्या कारकिर्दीचा लेखाजोगा घेऊया. सत्तेवर येताच आपण पहिलं बिल संसदेत आणलं ते तिहेरी तलाक इतिहासजमा करण्याचं. मुस्लीम भगिनींना न्याय देण्याचं हजारो वर्षं प्रलंबित काम आपण केलंत. यात देश म्हणून आपण ७० वर्षांचा कालखंड धरूया. आपल्या विजयी सभेत आपण आधीच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या घोषणेत ‘सबका विश्वास’ हे नवे यमक जोडलेत आणि हा ‘सबका विश्वास’ म्हणजे ‘अल्पसंख्याकांचा विश्वास’ असे आपण अधोरेखितही केले होते.

त्या घोषणेला अनुसरून तिहेरी तलाक बाद करणे हे योग्यच होते. संसदेत विरोधी पक्षांना आपण हे करू शकलो नाही, याची मूककबुली देत या विधेयकाला पाठिंबा देण्यावाचून पर्याय उरला नाही. पण आपण या कायद्यात असा तलाक देणाऱ्या पुरुषास फौजदारी कलमाखाली अटक करण्याची तरतूद केलीय. वास्तविक तलाक हा घटस्फोट या प्रकारात कौटुंबिक न्यायालयात वर्ग होतो. कौटुंबिक न्यायालयात फौजदारी गुन्हा दाखल होत नाही. सबब संपूर्ण देशात घटस्फोट प्रकरणात फौजदारी गुन्ह्याखाली तुरुंगात जाणारा मुस्लीम पुरुष हा एकमेव ठरणार आहे. बहुमताच्या जोरावर आपण या कलमातली दुरुस्तीही धुडकावून लावलीत! म्हणजे मुस्लीम महिलेला न्याय देताना आपण मुस्लीम पुरुषाला गुन्हेगारी कलमात अडकवलेत! याचे सुसंगत स्पष्टीकरण आहे आपल्याकडे?

जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम काढून टाकणे हा आपल्या विचारधारेचा व जनसंघ स्थापनेपासूनचा राजकीय अजेंडा. तो प्रश्नही ७० वर्षे प्रलंबित. यात वाजपेयींची सहा वर्षेही आली. वाजपेयींकडे पूर्ण बहुमत नव्हते आणि समान कार्यक्रमांतर्गत त्यांनी व त्या आघाडीतील इतर पक्षांनी आपले पक्षीय अजेंडे दूर ठेवले होते.

आपल्याला दुसऱ्यांदा पूर्ण बहुमत मिळाल्यावर आपण हे कलम हटवले. पण त्यासाठी नाट्यमय घडामोडी व वेगळी नेपथ्यरचना करून सर्व संसदीय संकेत पायदळी तुडवून बहुमताने तुम्ही ते हटवले. पण ते करताना आपण भारताचे एक राज्यच विसर्जित केले आणि त्याचे विखंडीकरण करून ते केंद्रशासित केले!यासाठीची तुमच्या अमितभाईंच्या शब्दांत सांगायचं तर ‘क्रोनोलॉजी लक्षात घ्या’!

अतिरेकी हल्ल्याची शक्यता वर्तवत आपण अमरधाम यात्रा मधूनच खंडीत करत रात्रीत सर्व यात्रेकरू तिथून हलवलेत! सकाळी १० वाजता संसद सदस्यांना हे विधेयक देऊन १२ वाजेपर्यंत चर्चा व लगेच मतदान असा असंसदीय कार्यक्रम (पुन्हा) बहुमताच्या जोरावर लादलात. आणि हे करताना जम्मू-काश्मीरसह लडाखमध्ये मोबाईल व इंटरनेट सेवा बंद करत काश्मीरमधील सर्व राजकीय विरोधी पक्ष नेत्यांना स्थानबद्ध करत हे तिन्ही भूभाग निर्मनुष्य केलेत. आणि वर या कृतीला काश्मिरी जनतेचा प्रचंड पाठिंबा आहे; आता काश्मिरात उद्योग, पर्यटन वाढेल, देशातले नागरिक आता तिथे स्थावर जंगम मालमत्ता घेऊ शकतील; जम्मू-काश्मीर भारताच्या मुख्य प्रवाहात येईल! असे गुळगुळीत पानावरील रंगीत जाहिरातीसारखे चित्र उभे केलेत.

जर देशवासियांची, स्नेहीजनांची ७० वर्षांची मागणी पूर्ण झाली होती, तर खोऱ्यात, जम्मूत व लडाखमध्ये विजयोत्सव साजरा व्हायला हवा होता. पण आपण तर संचारबंदी लादत संपर्क माध्यमेही बंद केलीत. जी जवळपास पुढचे सहा महिने विखंडीत स्वरूपातच अस्तित्वात होती. विरोधी नेत्यांची स्थानबद्धता ही अशीच दीर्घकालीन ठेवलीत. त्यांना मुक्त करून काही दिवस जात नाहीत, तोवर लॉकडाऊन आला!

मा. प्रधानसेवक, ३७० कलम काढल्यावर किती काश्मिरी पंडित जम्मूत परतलेत? त्यांच्या नावे दिल्ली, मुंबईत सुस्थापित झालेले आणि त्यांच्या नावे गळे काढणारे गेले का तिकडे निदान भेट द्यायला?

किती गुंतवणूकदार पुढे आलेत? किती रिअल इस्टेट, हॉटेल इंडस्ट्रीवाले तिथे जमिनीचे नकाशे मागताहेत? आपले ‘पतंजली’वाले तरी तिथे जाऊन रोजगार निर्माण करतील?

मधूनच आठवलं बघा. अलिकडेच तुम्ही सैन्यदलात तीन वर्षाची अल्पकालीन सेवेची योजना तरुणांसाठी आखली आहे. देशसेवेसाठी तीन वर्षे! काश्मिरी तरुणांना यात का प्राधान्याने भरती करून घेत? बघा विचार करून.

आपण देशाची सत्ता मिळवलीत पण पंजाब, दिल्लीत पराभूत झालात. हरियाणात ती कशीबशी मिळाली. पण महाराष्ट्रात सत्ता तर हातची गेलीच, पण प्रचंड नाचक्की वाट्याला आली. देशातील तुमच्याशी युती करणारा संस्थापक पक्ष शिवसेना तुमच्यापासून अलग होऊन, थेट विरुद्ध दिशेला गेला व सत्तारूढही झाला! हा वार रक्त न काढता खोलवर जखमेसारखा बसला. याचे उट्टे तुम्ही संधी साधून मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ सरकार हटवून काढलेत! ज्योतिरादित्य ही उपलब्धी का अडगळ, हे लवकरच कळेल.

दिल्ली विधानसभा निवडणूक निमित्ताने जातीय, धार्मिक प्रचाराची इतकी हीन पातळी आपल्या पक्षाने गाठली की, पराभवानंतर अमितभाईंना त्याची दखल घेत जरा जास्तच झाले, याची कबुली द्यावी लागली. त्याचा परिपाक दिल्लीने भयंकर दंगल अनुभवली. त्याची धग तुम्हाला जाणवली नसावी, कारण तेव्हा तुम्ही तुमचे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदरातिथ्यात व्यग्र होता. तुम्ही व्यग्र होता व ट्रम्प भारावलेले. त्यामुळे गुजरातेत स्टेडियम उदघाटनासाठी लाखोंची गर्दी जमवून एकमेकांची पाठ थोपटताना आपण दोघांनी करोना महामारीच्या आगमनाची, संक्रमणाची दखलच घेतली नाही. ट्रम्प यांनी तर खिल्ली उडवण्यात धन्यता मानली. या बेफिकिरीचा फटका दोन्ही देशांना ‘जोर का झटका धीरे से’ तसा आरोग्य व अर्थव्यवस्था अशा दोन मोठ्या क्षेत्रांना बसला.

ट्रम्प हे तुमच्यासारखे सुनियोजित व संघ संस्कारात वाढलेले नसल्याने ते पत्रकार परिषदा घेत स्वत:ची सार्वजनिक फटफजिती करून घेत राहिलेत. तुम्ही संघ शिकवणुकीनुसार प्रश्न विचारायचे नाहीत, यावर ठाम राहिलात. प्रश्नोत्तरेच करायची नाहीत, तर मग पत्रकार परिषद वगैरे वेळेचा अपव्यय हे तुम्ही २०१४ पासूनच अधोरेखित केलेत!

या तुमच्या वर्षपूर्तीला करोनाने गालबोट लावले. अन्यथा ‘करोना योद्ध्यां’साठी वाजवलेल्या टाळ्या, थाळ्या, उजळलेले दिवे या वर्षपूर्ततेसाठीच सर्व स्नेहीजनांनी आनंदाने लावले असते. तुम्हीच ते त्यांना देशप्रेमाचे एखादे वचन देऊन करायला लावले असते.

या पत्रातही या गेल्या वर्षातील यशस्वी कार्यक्रमात तुम्ही रामजन्मभूमीचा प्रश्न सुटला असं लिहिलंत. पण तो तर कोर्टाचा निकाल! त्याबद्दलही जे उलटसुलट बोलले, लिहिले जातेय आणि आता जो ट्रस्ट करून मंदिर निर्माणाचे लक्ष्य आहे, ते विनाअडथळा पार पडेल असे वाटते. पार पडलेच तर त्याचे श्रेय नेमके कोण घेईल? कारण उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी सरदार पटेलांपेक्षा उंच राममूर्तीची घोषणा करून ठेवलेलीच आहे. तरीही ते श्रेय तुम्ही घेत असाल तर स्नेहीजन काय म्हणणार?

मात्र करोना नियंत्रणाचे श्रेय घेत आपण जो ‘आत्मनिर्भर’तेचा सल्ला दिलाय, त्या संदर्भात काही प्रश्न विचारावेसे वाटतात.

आपणच म्हणालात की, करोनाच्या पहिल्या सूचनेपासून आम्ही कामाला लागलो. पण पहिली सूचना तर फेब्रुवारीत आली आणि तेव्हा आपण ‘नमस्ते ट्रम्प’साठी काही लाख माणसं जमवण्यात व्यस्त होता. स्वत: तुम्ही व ट्रम्प यांनी गळाभेटी घेतल्या. ट्रम्प गेल्यावर, दिल्ली दंगल संपल्यावर काही राज्यांनी करोना निर्बंध घालायला घेतल्यावर आपण एकदा जनता कर्फ्यू व नंतर थेट टाळेबंदी जाहीर केलीत. ती ही पूर्वसूचना व पूर्वतयारीविना! २०१६ साली जशी नोटबंदी केलीत, तशीच ही टाळेबंदी करून त्या वेळप्रमाणेच या वेळीही शंभर-दीडशे माणसांचा हकनाक बळी घेतलात. याची जबाबदारी कुणावर?

नोटबंदीच्या वेळी म्हणाला होता- ‘मला ५० दिवस द्या!’ जनतेने २०१६ ते २०२० एवढी वर्षे दिली. ना तुम्ही त्याचा लेखाजोखा दिला, ना अर्थ मंत्रालयाने, ना रिझर्व्ह बॅंकेने.

या वेळी तसेच लॉकडाऊन करताना आपण म्हणालात- ‘महाभारताचे युद्ध १८ दिवसांत जिंकले होते. आपण २२ दिवसांत जिंकायचेय. तोवर साथ द्या. लक्ष्मणरेषा पाळा.’ आता ९० दिवस होत येतील. लक्ष्मणरेषा कुणी कुठली पाळायची? तुम्ही संबोधन करून गेलात. पुढे सचिव, मंत्री, परिपत्रके येत-जात राहिली आणि आता तर राज्यांवर निर्णय सोपवत तुम्ही वर्षपूर्तीच्या डिजिटल सोहळ्याच्या तयारीत गुंतलात. त्याची सुरुवात म्हणून हे पत्र लिहिलेत!

प्रधानसेवक, आपण आपल्या आईची खूप काळजी घेता व आदरही करता. त्याचे प्रक्षेपणही करता. ते आम्ही भावनेने ओथंबून पाहतो. पण लॉकडाऊनमध्ये सुटकेसवर मुलाला झोपवून ती सूटकेस पायी ओढत चाललेली माता पाहिलीत की नाहीत?

तशीच भूकेने मृतप्राय माता रेल्वे फलाटावर आणि तिचे निरागस पोर तिला उठवण्याचा प्रयत्न करताना आपण पाहिलेत? या स्नेहीजनांसाठी कष्ट, पीडा वगैरे शब्द आता फोलपट वाटतात. तेवढ्यावर त्यांची वासलात लावू नका. तुमच्या आवडत्या सेव्हन सिस्टर्स, पूर्व भारतावर ७२ तास वादळाचे संकट घोंगावले तर तुम्ही उडनखटोला घेऊन लगेच धावलात. पण गेले महिनाभर देशभर स्थलांतरीत मजूर ज्या हालअपेष्टा सोसताहेत त्यांच्यासाठी आकड्यांचे दाणे पुरेसे नाहीत, प्रधानसेवक!

नौखालीत भर दंगा, जाळपोळीत गांधीजी रस्त्यावर उतरले; नेहरू फाळणी काळात जनक्षोभास सामोरे गेले; इंदिरा गांधी दलित अत्याचारानंतर बेलचीत धडकल्या होत्या. मुंबईत मशिद पडल्यावर जे दंगे झाले, तेव्हा पी. व्ही. नरसिंहराव मुंबईस निघाले, पण संरक्षणमंत्री पवारांनी गुप्तचरांच्या हवाल्याने त्यांना रोखले, पण स्वत: शरद पवार मुंबईच्या रस्त्यावर उतरले. मुंबई दिल्लीत बॉम्बस्फोट झाले, तेव्हा सोनियासह मनमोहनसिंह घटनास्थळी पोहचले.

२०१४ पासून आपण वा आपले मंत्री असे कधी कुठे फिरले? मग ते मॉब लिंचिंग असो की युपी, दिल्लीतल्या दंगली. नोटबंदीत रांगेतले बळी असोत की शेतकरी आत्महत्या की आताची लॉकडाऊनमधील बेहाल जनता. दूरचित्रवाणी पडदा व आकाशवाणी व्यतिरिक्त आपण कुठे दिसलातच नाहीत, प्रधानसेवक.

तुम्ही शेजारील राष्ट्रातील अल्पसंख्य भारतात आणू इच्छिता आणि इथे तुमचे अनेक मुख्यमंत्री याच देशातील नागरिकांना आपल्या राज्यात यायला बंदी घालताहेत. शेजारी राष्ट्रातील अल्पसंख्य हे मजूर आहेत, उद्योगपती आहेत, ठेलेवाले आहेत की कार्पोरेट? कारण त्यांनाही कुठल्यातरी पॅकेजमध्ये बसवावे लागेल ना!

मा. प्रधानसेवकजी, सहा वर्षांत फक्त शब्द नि आकडे दिलेत तुम्ही देशाला. हरित क्रांती, सहकार, अणुविज्ञान, तंत्रज्ञान, संगणक, दळणवळण क्रांती अशा विविध क्षेत्रात मागच्या ७० वर्षांत जी दूरगामी धोरणे आम्हाला मिळाली, तसं एक तरी कुठल्याही क्षेत्रात देऊ शकाल?

जुन्याचे नामांतर करून वा चकचकीत जाहिरातीच्या पलिकडचे ओरिजिनल असे काही देऊ शकाल? बघा प्रयत्न करून. अजून चार वर्षे आहेत.

या देशाने ७० वर्षांत प्रकाशाची लखलखीत वर्षेही पाहिलीत. तुम्ही या ७० वर्षांकडे ‘अंधारयुग’ म्हणून न पाहता प्रेरक म्हणून पाहून, पूर्वग्रह नि अहंकार सोडून विनम्रपणे काही करावं, यासाठी शुभेच्छा देतो. आणि थांबतो.

आपला

७० वर्षे भारतीयत्वाने जगत आलेला भारतीय नागरिक

..................................................................................................................................................................

लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......