एका काळ्या व्यक्तीला गोऱ्या पोलिसाने ज्या अमानुषपणे मारले, त्यावरून गेले काही दिवस अमेरिकेत मोर्च, आंदोलने सुरू आहेत. त्यांची तीव्रता इतकी आहे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आपल्या कुटुंबासह बंकरचा आश्रय घ्यावा लागला. ५२ वर्षांपूर्वी अमेरिकेत वंशवादाचा बळी ठरलेल्या डॉ. मार्टिन ल्युथर किंग यांच्या प्रेरणादायी लढ्याची यानिमित्ताने अनेकांना आठवण झाली असेल. म्हणून ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. मार्टिन ल्युथर किंग : भारतातील अस्पृश्यता आणि अमेरिकेतील वर्णभेद’ या पुस्तकातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश. ज्येष्ठ पत्रकार कामिल पारखे यांनी लिहिलेले हे पुस्तक सुगावा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे.
..................................................................................................................................................................
रेव्ह. मार्टिन लुथर किंग (ज्युनिअर) यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेच्या माँटगोमरी शहरातील सिटी बसबाहतुकीत काळ्या वर्णाच्या प्रवाश्यांना गौरवर्णीय प्रवाश्यांच्या बरोबरीने बसता यावे, या मागणीसाठी तेथील काळ्या लोकांनी या बसवाहतुकीवर तब्बल ३८१ दिवस बहिष्कार घातला. कामावर, शाळेत किंवा इतर कामासाठी जाण्यासाठी स्वत:चे कुठलेही साधन नसताना, खूप हालअपेष्टा सहन करत अनेक दिवस हा बहिष्कार चालू ठेवला. आपल्या न्याय्य मागणीसाठी एका समाजघटकातील सर्व वयोगटांतील व्यक्तींनी संघटितरित्या, अहिंसेच्या मार्गाने आणि हेटाळणी व चिथावणीस तोंड देत हा लढा चालू ठेवला.
वर्णभेदाच्या प्रथेविरुद्ध संघटितरित्या निषेध नोंदवत असतानाच रेव्ह. किंग आणि इतर कृष्णवर्णीय नेत्यांनी या अन्याय्य व्यवस्थेबाबत अमेरिकेच्या न्यायसंस्थेचाही कौल मागितला होता. या लढ्याचे उद्दिष्ट साध्य झाल्यानंतर म्हणजे अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ही भेदभावाची वर्तवणूक बेकायदेशीर ठरवल्यानंतरच या संघर्षाची इतिश्री झाली.
हा लढा मानवी हक्कांसाठीच्या संघर्षाच्या इतिहासातील एक अतिशय महत्त्वाचे पान आहे. अशा प्रकारचा लढा मानवी संस्कृतीच्या इतिहासात इतरत्र कुठेही झालेला नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली नाशिक येथील काळा राम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा, यासाठी महाराष्ट्रातील अस्पृश्य समाजाच्या अनेक लोकांनी या मंदिरासमोर अनेक वर्षे सत्याग्रह केला. सहा वर्षे चाललेल्या या लढ्याचे माँटगोमरीतील बहिष्काराशी अनेक बाबतींत साम्य आहे.
अस्पृश्य हे हिंदू समाजाचेच एक घटक होते, काळा राम हे या दलितांचेही प्रमुख दैवत होते. डॉ. आंबेडकरांनी हा मंदिर प्रवेशाचा मुद्दा अस्पृश्यांना हिंदू धर्मात दिली जाणारी अन्यायकारक वागणूक प्रकर्षाने मांडण्यासाठी एक ‘टेस्ट केस’ म्हणून लढवला होता, असे दिसते. या प्रकरणात बाबासाहेबांनी आपले इप्सित साध्य केले असे म्हणावे लागेल.
काळा राम मंदिरप्रवेश प्रकरणात अस्पृश्यांना यश मिळाले नाही. या सत्याग्रहातून काहीही साध्य होणार नाही, अशी डॉ. आंबेडकरांची खात्री पटली होती. त्यामुळे १९३५ साली त्यांनी हा सत्याग्रह बंद करण्याचा निर्णय घेतला. शांततामय मार्गाने मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करूनही स्पृश्य लोकांनी प्रसंगी दडपशाही करून अस्पृश्यांचे प्रयत्न हाणून पाडले होते. मुळात या मंदिरात प्रवेश करून अस्पृश्यांना सामाजिक वा आत्मिकदृष्ट्या फार मोठा लाभ होणार नव्हता, हे उघडच होते. मात्र या प्रकरणातून समस्त सवर्णांचा अस्पृश्यांविषयीचा दृष्टीकोन काय होता हे दिसून आले. ज्या वेळी अस्पृश्य लोकांचे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रतिनिधी काळा राम मंदिराच्या दारापाशी अनेक दिवस बसून या मंदिराचे दरवाजे आपल्यासाठी कधी उघडतील याची वाट पाहत होते, त्या वेळी हिंदू समाजातील सामाजिक वा धार्मिक पुढाऱ्यांनी या अस्पृश्यांच्या मागणीस पाठिंबा दिला नाही. किंबहुना या प्रकरणाने त्या वेळी हिंदू समाजातील तथाकथित अनेक पुढाऱ्यांचे तात्त्विक वस्त्रहरण केले.
या प्रकरणानंतरच डॉ. आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडण्याचा विचार सुरू केला असे दिसते. यानंतरच १९३३ साली नाशिक जिल्ह्यातीलच येवला येथे त्यांनी ‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही’ अशी घोषणा केली.
मॉटगोमरी बस बहिष्कारानंतर रेव्ह. किंग यांचे नेतृत्व अमेरिकन जनतेसमोर आले. काळा राम मंदिर प्रकरणाआधीच डॉ. आंबेडकर अस्पृश्यांचे नेते म्हणून पुढे आले होते. या प्रकरणात अस्पृश्यांचे नेते म्हणून त्यांना सरकारदरबारी मान्यता मिळाली. त्याशिवाय महात्मा गांधींनाही नाखुशीने का होईना पण त्यांची ही ओळख स्वीकारावी लागली. त्याआधी केवळ काँग्रेस पक्षच अस्पृश्यांचे नेतृत्व करतो आणि काँग्रेसचे प्रतिनिधित्व आपण करत असल्याने केवळ आपल्यालाचा अस्पृश्यांच्या वतीने बोलण्याचा अधिकार आहे, असे गांधीजी ब्रिटिश सरकारला सुनावत असत. गांधीजींचा या भ्रमाचा भोपळा नंतर ‘पुणे करारा’च्या वेळी पुरता फुटला.
डॉ. आंबेडकर आणि रेव्ह. किंग यांच्या वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्यात अनेक साम्यस्थळे आहेत. हे दोघेही महान नेते बहुसंख्य समाजाने वाळीत टाकलेल्या आणि किमान सुविधा नाकारलेल्या समाजातील कुटुंबांत जन्माला आले. या दोन्ही नेत्यांच्या समाजातील लोकांना प्रतिष्ठेने जीवन जगण्याचा हक्क नाकारला गेला होता. त्यांच्या समाजातील मुलांना दररोजचे जेवण, राहण्यासाठी निवारा आणि शिक्षण मिळेलच अशी खात्री नसायची. मात्र या दोन्ही नेत्यांच्या बालपणी त्यांच्या समाजातील कुटुंबांच्या तुलनेने त्यांच्या पालकांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती बरी होती. डॉ. आंबेडकरांचे वडील रामजी हिंदुस्थानातील ब्रिटिश सैन्यात सुभेदार होते, तर किंग यांचे वडील मार्टिन लुथर किंग (सिनियर) हे ख्रिस्ती धर्माच्या बॅप्टिस्ट पंथाचे धर्मगुरू होते, पदवीपर्यंत शिक्षण त्यांनी मिळवले होते. वडील सैन्यात असले तरी सातारा आणि इतर शहरांत शिक्षण घेताना लहान वयाच्या भीमाने अस्पृश्यतेच्या प्रथेचे चटके अनुभवले होते. वडिलांमुळे त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती थोडीबहुत बरी असली तरी त्यामुळे या कुटुंबाला स्पृश्य समाजाकडून दिल्या जाणाऱ्या वागणुकीत काही बदल झाला नव्हता.
लहान मार्टिनची स्थिती बालवयातील भीमासारखीच होती. पृथ्वीतलावरील मानवजातीचे विविध वंशांचे, विविध भाषा बोलणारे आणि वेगवेगळ्या रंगांचे लोक एकाच परमेश्वराची लेकरे आहेत, असे शिकवणाऱ्या ख्रिस्ती धर्माचे मार्टिनचे वडील ख्रिस्ती धर्मगुरू होते. मानवजातीत उच्च-नीच असे कोण नाही, सर्व लोकांनी एकमेकांशी बंधुभावाच्या नात्याने वागायला हवे हा ख्रिस्ताचा संदेश ते दर रविवारी चर्चमध्ये आपल्या प्रवचनात सांगत असत. हा संदेश चर्चमध्ये येणारे सर्व काळे भाविक लोक भक्तीने ऐकून घेत असत. मात्र या काळ्यांना आणि त्यांच्या काळ्या धर्मगुरूंनादेखील अमेरिकेतील ख्रिस्ती धर्माचेच गोरे लोक तुच्छतेची वागणूक देत असत. काळ्यांच्या चर्चमध्ये धर्मगुरूसुद्धा काळेच असत आणि तेथे गोऱ्या वर्णाचे भाविक फिरकतसुद्धा नसत. त्याचप्रमाणे गोऱ्यांच्या चर्चमध्ये काळ्यांना प्रवेश नसे.
महाडचे चवदार तळे अस्पृश्यांनाही खुले व्हावे यासाठी आणि त्यानंतर नाशिकच्या काळा राम मंदिरांत अस्पृश्यांना प्रवेश मिळावा, यासाठी झालेल्या संघर्षामुळे दलितांचा सर्वाधिक पाठिंबा असणारे नेते डॉ. आंबेडकर हेच आहेत हे सिद्ध झाले. महाडच्या तळ्याचे पाणी अस्पृश्यांनी चाखले तर काय साधले जाणार होते? किंवा काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळाला, त्यांनाही त्या मंदिरातील दैवताचे दर्शन घेता आले, पूजा करता आली म्हणजे महाराष्ट्रातील किंवा हिंदुस्थानातील अस्पृश्यांच्या सामाजिक वा आर्थिक परिस्थितीत फार परिवर्तन होईल, अशी काही डॉ. आंबेडकरांची समजूत नव्हती.
महाडच्या तळ्याचा आणि काळा राम मंदिरात प्रवेशाचा प्रश्न हे दोन्ही संघर्ष डॉ. आंबेडकरांनी एक टेस्ट केस म्हणून लढवले. हिंदुस्थानातील अस्पृश्यांना कशा प्रकारची हीन दर्जाची वागणूक दिली जाते, त्यांचे समाजातील स्थान काय आहे, हे अधोरेखित करण्यासाठी त्यांनी या दोन्ही प्रकरणांचा पुरेपूर वापर केला. त्यातून त्यांचे इप्सित साध्य झाले असे म्हणता येईल. या दोन्ही आंदोलनांआधीच बाबासाहेबांचे सामाजिक आणि राजकीय नेतृत्व बहरले होते.
अमेरिकेतील माँटगोमरी बस बहिष्कार संघर्षातून रेव्ह. किंग यांचे नेतृत्व पहिल्यांदाच जगासमोर आले. त्याआधी बॅप्टिस्ट पंथाचा एक तरुण धर्मगुरू आणि एक प्रभावी वक्ता किंवा प्रवचनकार अशा मर्यादित स्वरूपात त्यांच्या चर्चचे भाविक लोक आणि इतर काही किंग यांना ओळखत होते.
रोझा पार्क या काळ्या महिलेने माँटगोमरी शहरातील बसमध्ये गोऱ्या प्रवाशासाठी आपले आसन खाली करून देण्यास नकार दिला, तेव्हा सतत अपमानस्पद वागणूक सहन करणारे काळे लोक तिच्या समर्थनासाठी एकत्र आले. वर्णभेदास विरोध करण्यासाठी पहिल्याच वेळी काळे लोक संघर्षाची भूमिका घ्यायला पुढे आले होते. हा संघर्ष अचानक सुरू झाला होता. अशा वेळी प्रभावी वक्तृत्वाची देणगी लाभलेला हा तरुण या लढ्याचे यशस्वीरित्या नेतृत्व करू शकेल, असे माँटगोमरी शहरातील काळ्या लोकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या लोकांना वाटले.
रेव्ह. किंग यांची गाठ घेऊन या बसमधील वर्णभेदासंदर्भात माँटगोमरी येथील चर्चमध्ये होणाऱ्या सभेत बोलण्याचे त्यांनी किंग यांना निमंत्रण दिले. किंग यांनी ते निमंत्रण स्वीकारले. पुढे वर्षभर चालू राहिलेल्या लढ्याचेही त्यांनी नेतृत्व केले. एक वर्षांनंतर बसमध्ये काळ्या प्रवाश्यांना गोऱ्या प्रवाश्यांप्रमाणे समानतेची वागणूक मिळण्याचा हक्क आहे, असे अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आणि या लढ्याची यशस्वी सांगाता झाली.
अमेरिकेतील काळ्यांच्या हक्कांसाठी दीर्घकाळ चालणारा लढा या माँटगोमरी बसबहिष्कार प्रकरणाने सुरू केला. या लढ्याने काळ्या लोकांना बसमध्ये समानतेचा दर्जा दिलाच, त्याचप्रमाणे समानतेच्या हक्कांसाठी लढणारा नेता म्हणून पुढे जागतिक स्तरावर मान्यता मिळवणारा एक नेताही या लढ्यातूनच उदयास आला.
म. गांधी यांच्या अहिंसात्मक चळवळीचा आणि त्यांच्या सत्याग्रह या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अत्यंत शक्तीमान अस्त्राचा रेव्ह. किंग यांच्यावर मोठा प्रभाव पडला होता. हे खुद्द त्यांनीच मान्य केले आहे. गांधीजींचे हे ऋण मान्य करणाऱ्या किंग यांनी आपली पत्नी कॉरेटा यांच्यासह १९५९ साली भारताला भेट दिली होती. त्या वेळी डॉ. आंबेडकरांचे निर्वाण होऊन केवळ तीन वर्षे झाली होती. वर्णभेदाविरुद्ध लढा देणाऱ्या रेव्ह. किंग यांना तशाच प्रकारच्या सामाजिक विषमतेविरुद्ध म्हणजे अस्पृश्यतेविरुद्ध यशस्वी लढा लढणाऱ्या डॉ. आंबेडकरांविषयी फारसा परिचय नव्हता असे दिसते. अन्यथा महात्मा गांधी यांच्यापेक्षाही रेव्ह. किंग यांना डॉ. आंबेडकर हेच अधिक जवळचे वाटले असते.
डॉ. आंबेडकर आणि किंग या दोघांचाही लढा मानवजातीच्या समानतेसाठी होता. स्वत:स श्रेष्ठ म्हणवून घेतल्या समाजघटकांनी इतर समाजघटकांना वाळीत टाकल्यामुळे या उपेक्षित घटकांतील लोकांना काय वेदना भागाव्या लागतात, याचा या दोन्ही महान नेत्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला होता. डॉ. आंबेडकर आणि रेव्ह. किंग यांनी दोन वेगळ्या देशांत विषमतेविरुद्ध संघर्ष केला. या दोन्ही देशांतील अंतर हजारो किलोमीटर दूर होते, तरी या दोन्ही नेत्यांचा प्रवास मानवजातीत समता स्थापन करण्यासाठी समांतर दिशेने चालू होता.
स्वातंत्र्यपूर्व काळातील हिंदुस्थानातील अस्पृश्यांची सामाजिक स्थिती आणि त्या काळातील अमेरिकेतील कृष्णवर्णियांची स्थिती यामध्ये खूप साम्य आहे. त्यामुळेच येथील दलित चळवळीला निग्रो लोकांनी आपल्या हक्कांसाठी चालवलेल्या लढ्याचे आणि निग्रो लोकांच्या विद्रोही साहित्याचे अप्रूप वाटले. रेव्ह. किंग यांचे चरित्र वाचताना हिंदुस्थानात डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेल्या महाडच्या चवदार तळ्याच्या आणि नाशिकच्या काळ्या राममंदिराच्या प्रवेशलढ्यांचे स्मरण होते. हे दोन्हीही संघर्ष शांततामय मार्गानेच लढवण्यात आले होते.
अस्पृश्येतेविषयी आणि जातीपोटजातींनी निर्माण केलेल्या सामाजिक विषमतेविषयी आपल्याकडे बरेच लिखाण झाले आहे. मात्र अमेरिकेसारख्या प्रगत देशात अगदी अलीकडच्या काळापर्यंत म्हणजे त्या देशाने चंद्रावर माणूस पाठवण्याची तयारी केली, तोपर्यंत तेथे काळ्या लोकांना बसमध्ये गोऱ्या लोकांच्या रांगेत बसण्याची, बगीच्यांत किंवा चित्रपटगृहांत बसण्याची आणि मतदान करण्यास कायद्याने बंदी होती, हे वाचून धक्काच बसतो. त्याआधी दीडदशक भारताने स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच अस्पृश्यतेच्या प्रथेवर कायद्याने बंदी घातली आणि समानतेचे तत्त्व लागू केले, हे विशेष.
डॉ. आंबेडकरांनी सामाजिक विषमतेविरुद्ध चालवलेल्या लढ्याची किंग यांना यांची कल्पना नसावी वा या लढ्याचे महत्त्व त्यांच्या लक्षात आले नसावे, हेसुद्धा साहजिकच आहे. याचे कारण म्हणजे हिंदुस्थानातील परकीय ब्रिटिश सत्तेविरुद्ध चाललेल्या लढ्यास जगाचे जितके लक्ष गेले, तितके या देशातील गावकुसातील आणि गावकुसाबाहेरच्या लोकांमधील विषमतेविरुद्ध चाललेल्या संघर्षाकडे जागतिक पातळीवर फार चर्चा झाली नाही. किंबहुना हिंदुस्थानात हजारो वर्षांपासून चालत आलेल्या जातीनिष्ठ सामाजिक विषमतेविरुद्ध दीर्घकाळ लढा करून आणि नंतर राज्यघटनेद्वारे ही सामाजिक विषमता कायद्याने दूर करणाऱ्या डॉ. आंबेडकरांची ‘आधुनिक मनू’ ही प्रतिमा तोपर्यंत प्रकर्षाने जगासमोर आलीच नव्हती.
हिंदुस्थानात अनेक शतकांपासून चालत असलेली अस्पृश्यता आणि जागतिक पातळीवर अनेक देशांत काळ्या लोकांना दिली जाणारी वंशभेदाची वागणूक या दोन्ही बाबींना एकाच पारड्यात टाकता येणार नाही, असे अनेकदा म्हटले जाते. तरीदेखील अस्पृश्यता आणि काळ्यांना त्यांच्या वर्णामुळे दिली जाणारी वागणूक यांत गुणात्मक काहीही फरक नाही, हे वास्तव मान्य करायलाच हवे. त्यामुळेच अस्पृश्यतेविरुद्धच्या लढ्यात एकांडे शिलेदार असूनही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या डॉ. आंबेडकरांना समानतेसाठी लढणारे नेते म्हणून जागतिक पातळीवर महत्त्वाचे स्थान आहे.
डॉ. आंबेडकर आणि रेव्ह. किंग यांना मर्यादित अर्थाने समकालीन म्हणावे लागेल. मर्यादित या अर्थाने की, ज्या वेळेस बाबासाहेबांचे राजकीय आणि सामाजिक नेतृत्व अगदी बहरास आले होते, त्यावेळी म्हणजे १९२९ साली किंग यांचा जन्म झाला. ज्या वेळी डॉ. आंबेडकर अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी आपल्या देशातील स्वकियांविरुद्ध लढत होते, त्या वेळी तरुण रेव्ह. किंग अमेरिकेत शाळा-कॉलेजात शिकत होते, धर्मगुरू होण्याचे प्रशिक्षण घेत होते. या काळात डॉ. आंबेडकरांच्या कार्याची माहिती त्यांच्यापर्यंत जाण्याची शक्यता कमीच होती. ज्या वेळी रेव्ह. किंग यांनी वर्णभेदाविरुद्धच्या लढ्याची सुरुवात केली, त्याच दरम्यान डॉ. आंबेडकरांचे निधन झाले होते.
डॉ. आंबेडकर आणि रेव्ह. किंग या दोन्ही नेत्यांना त्यांच्या समाजबांधवांचे अतूट प्रेम लाभले. रेव्ह. किंग यांना केवळ ३९ वर्षांचे आयुष्य लाभले. सार्वजनिक जीवनाची त्यांची कारकीर्द त्यापैकी केवळ १४ वर्षे इतकीच होती. माँटगोमरी बस बहिष्कार प्रकरण, वर्णवादींच्या चिथावणीस न जुमानता आपला संघर्ष शांततामय राखण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न, वॉशिंग्टन येथे मानवी हक्कांसाठी त्यांनी भरवलेला महामेळावा आणि त्या सभेत त्यांनी केलेले ‘आर हॅव्ह अ ड्रीम’ या शीर्षकाचे चिरंतर मूल्य असलेले प्रभावी भाषण आणि वयाच्या ३४व्या वर्षी त्यांना देण्यात आलेला शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार या रेव्ह. किंग यांच्या जीवनातील काही ठळक घटना. एका माथेफिरूने १९६८ साली गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. अवकाशात अचानक एखादा धूमकेतू अवतरावा, आपल्या प्रकाशाने त्याने सर्वांचे लक्ष वेधून घ्यावे आणि नंतर काही दिवसांतच तो धूमकेतू अथांग तारांगणात नाहीसा व्हावा, असेच रेव्ह. किंग यांचे आयुष्य होते.
६६ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या डॉ. आंबेडकरांनी मात्र पाच दशकांहून अधिक काळ सार्वजनिक, राजकीय आणि इतर क्षेत्रांत कार्य केले. स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार या नात्याने संपूर्ण मानवजातीचे एक कलंक असलेल्या अस्पृश्यता कायद्याने कायमची नाहीशी करण्यास त्यांनी फार मोलाची कामगिरी पार पाडली. त्यांच्या कामगिरीमुळे डॉ. आंबेडकर आणि किंग हे दोघेही नेते केवळ त्यांच्या समाजबांधवांचेच नेते राहिले नाहीत. मानवी हक्कांसाठी संघर्ष देणारे नेते म्हणून जागतिक पातळीवर त्यांना महत्त्वाचे स्थान आहे.
रेव्ह. किंग आणि डॉ. आंबेडकर या दोघांमधील आणखी एक साम्यस्थळ म्हणजे हे दोन्ही सामाजिक नेते उपेक्षितांचे अनभिषिक्त राजे असले तरी हे नेते निवडणुकीच्या आखाड्याच्या राजकारणात तसे चमकले नाही. रेव्ह. किंग यांनी तर अमेरिकेच्या राजकारणात सिनेटर वा इतर कुठल्याही राजकीय पदासाठी एकही निवडणूक लढवली नाही. त्या काळात अमेरिकेत काळ्यांना अगदी मतदार म्हणून नोंदणी व्हावी यासाठीसुद्धा संघर्ष करावा लागत असे. त्यामुळे रेव्ह. किंग यांनी अमेरिकेच्या राजकारणात प्रवेश करण्यासाठी सिनेटर म्हणून निवडणूक लढवावी, असा विचारही त्यांनी केला नसावा असे वाटत नाही. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून डॉ. आंबेडकरांनी दलितांचे एक आघाडीचे नेते म्हणून कार्य केले. दलितांच्या हृदयात त्यांच्याइतके आदराचे स्थान इतर कुणाही नेत्यास त्या काळी वा नंतरही कधी मिळाले नाही. मात्र स्वातंत्र्यानंतर प्रथमच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मुंबईच्या मतदारसंघात त्यांचा काँग्रेसच्या एका उमेदवाराने पराभव केला (?). त्यामुळे काँग्रेसने त्यांना बंगालमधून निवडून आणले आणि संसदेत ते असतील याची काळजी घेतली.
..................................................................................................................................................................
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ मार्टिन ल्युथर किंग : भारतातील अस्पृश्यता आणि अमेरिकेतील वर्णभेद’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4706/Dr.-Babasaheb-Ambedkar-ani-Dr.-Martin-Luther-King
..................................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment