हिंदू देवदेवतांच्या मूर्ती पॅरामिशियमसारख्या मध्य व्हिएतनामच्या ‘द-नांग’ शहरात दिसत राहतात, तेव्हा आश्चर्य वाटतं.
पडघम - सांस्कृतिक
जीवन तळेगावकर
  • व्हिएतनाममधील शिवलिंगाची छायाचित्रे, व्हिएतनामचा नकाशा (लेखातील छायाचित्रे - जीवन तळेगावकर)
  • Tue , 02 June 2020
  • पडघम सांस्कृतिक व्हिएतनाम शिवलिंग

नुकतीच भारतीय पुरातत्त्व खात्याला व्हिएतनाममध्ये उत्खननात ‘शिवलिंग’ सापडल्याची बातमी भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिली आणि हा देश पुन्हा चर्चेत आला. २० वर्षं चाललेल्या आणि जगभर गाजलेल्या ‘व्हिएतनाम वॉर’मुळे आपल्याला हा देश माहीत असतो, पण या संघर्षाआधीपासून उत्तर व्हिएतनाम फ्रेंचांच्या प्रभावाखाली असून कम्युनिस्टांच्या विचारांचा राहिला होता आणि दक्षिण भाग मात्र पाश्चात्य विचारांच्या प्रभावाखाली आला होता. दुसऱ्या महायुद्धात जपानी फौजांनी १९४१-१९४५पर्यंत या दोन्ही भागात विजय मिळवून वर्चस्व गाजवले, पण अमेरिकेने हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकला आणि महायुद्धाची दिशा बदलली. जपानने माघार घेतली, १९४५नंतर व्हिएतनामवरील ताबा सोडला, चीनने तोपर्यंत उत्तरेचा ताबा मिळवला आणि इंग्लंडला दक्षिणेचा ताबा मिळाला, पण महायुद्धाच्या धामधुमीत मित्र राष्ट्र फ्रान्सने या प्रदेशात पुन्हा चंचूप्रवेश केला आणि अंतर्गत संघर्षाला तोंड फुटले. हो चि मिन्ह यांचे उत्तरेतील नेतृत्व रशिया आणि चीनने मान्य केले व त्यांना समाजवादी शक्तींच्या साम्राज्य विस्तारासाठी दक्षिणेतील मित्रराष्ट्रांविरुद्ध लढत ठेवले. त्यांनी आठ वर्षांपर्यंत दक्षिणेतील कम्युनिस्टांना मदत पुरवली आणि पहिलं ‘इंडो-चायना’ युद्ध’ पेटतं ठेवलं. याचा परिपाक म्हणून १९५४ मध्ये ‘जिनेव्हा करार’ घडून आला, उत्तरेला चीन व रशियाचं समर्थन मिळालं आणि दक्षिणेला इंग्लंड व अमेरिकेचं. पण साम्राज्यवादी शक्तींतील शीतयुद्धामुळे हा करार फार काळ टिकला नाही आणि ‘व्हिएतनाम वॉर’ला सुरुवात झाली.

रशिया आणि अमेरिका यांच्यातील ‘डॉमिनो थिअरी’ने पीडित ध्रुवीय संघर्ष इरेस पेटला होता, तेव्हा नेमका हा व्हिएतनामचा विषय ऐरणीवर आला. १९५५ पासून सुरू झालेले शीतयुद्ध १९७५पर्यंत वेगवेळ्या रूपात व्हिएतनाम, लाओस व कंबोडियाच्या भूमीवर पेटत राहिले. त्याला ‘प्रो-कम्युनिस्ट’ आणि ‘साम्यवादविरोधी’ शक्तींची धार होती. हेच ‘द्वितीय इंडो-चायना वॉर’. २० वर्षांचा हा संघर्ष काळ व्हिएतनामी जनतेसाठी अतिशय कठीण व अशाश्वत होता. त्या वेळी त्यांचे नेतृत्व हो चि मिन्ह यांनी उत्तर व्हिएतनाममधील हनॉय (लाल, Red, नदीकाठी वसलेले शहर, आजची राजधानी, राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे) मधून केले. दक्षिण व्हिएतनाममधून वियत-काँगच्या कम्युनिस्ट फौजांनी सुरुवातीला फ्रेंचांविरुद्ध व नंतर अमेरिकेविरुद्ध गनिमी काव्याने युद्ध सुरू ठेवले. शेवटी यात जनतेच्या संघर्षाचा विजय झाला.

या युद्धात अतोनात हानी झाल्यामुळे व स्वदेशातून या अति-सत्तालोलुपत्वाविरुद्ध लोकांचा अंतर्गत विरोध वाढल्यामुळे अमेरिकेने व्हिएतनाममधून माघार घेतली. दक्षिण व उत्तर व्हिएतनामचे विलिनीकरण झाले. यादरम्यान अमेरिकेने लाओसवर दक्षिण व्हिएतनामला जाणारा रसदमार्ग उपलब्ध करून दिल्याबद्दल चिडून जगाच्या इतिहासातील सर्वांत जास्त बॉम्बहल्ले केले. या विजयाचे शिल्पकार खरे दक्षिण व्हिएतनामाचे सामान्य सैनिक होते, पण त्यामागील राजकीय द्रष्टे हो चि मिन्ह होते. म्हणून या भागातील मोठ्या शहराचे नाव ‘सायगॉन’ हे बदलून ‘हो चि मिन्ह’ ठेवण्यात आले. तेच राष्ट्रपिता व नव-व्हिएतनामचे निर्माते. त्यांची कायम अमेरिकेविरुद्धची भूमिका असो, कम्युनिझमचा खांद्यावर घेतलेला झेंडा असो, लोकांच्या उत्थापनाची व राष्ट्र उभारणीची तळमळ असो, या सर्वांतून लोकमानसावर या नेत्याने अधिराज्य गाजवले. म्हणून आजही सर्व राष्ट्रीय व खासगी कार्यालयांमधून त्यांचा विलक्षण प्रभाव भरून राहिला आहे.

१९७५ मध्ये दक्षिण व उत्तर व्हिएतनामच्या विलिनीकरणानंतरही या देशाच्या नशिबी युद्धविराम नव्हता. १९७८मध्ये पॉल पॉटच्या एकाधिकारी ‘खमेर रुज’ला सत्ताच्यूत करण्यासाठी व्हिएतनामने शेजारील कंबोडियावर आक्रमण केले आणि म्हणून १९७९मध्ये चीनने व्हिएतनामवर पुन्हा आक्रमण केले. त्यामुळे दोन कम्युनिस्ट सत्तांमध्ये संघर्ष सुरू झाला, तो आजतागायत. आजही व्हिएतनामच्या समुद्रकिनाऱ्यावर (दक्षिण चिनी किंवा साऊथ चायना सी) अधिपत्य गाजवण्याची चीनची धडपड चालू असते. अमेरिका व रशिया अजूनही येथील एखादे बेट आरमाराचे विश्रांती स्थळ म्हणून लाभावे यासाठी झटत असतात. शीतयुद्ध अंतर्मनात चालू असतेच. आंतरराष्ट्रीय संबंध हे कैक पिढ्यांना व्यापून उरणारे असतात हेच खरे.

चीनची सत्तापिपासा वाढत चालल्यामुळे आताशा व्हिएतनाम त्याच्याशी फटकून वागतो, यात चीनने ऐतिहासिक काळापासून केलेले कायम हल्ले हे कारणही असू शकते.

व्हिएतनामच्या मातीत शेतकऱ्यांचे, कामगारांचे, सैनिकांचे रक्त आहे. इथे कम्युनिझम ओतप्रोत भरून राहिला आहे. विलिनीकरणानंतर आज ४० वर्षांनीसुद्धा एक पक्ष, एक नेता, एक भाषा, एक वाचा हेच चालू आहे. त्यामुळे नव्या पिढीला राजकारणापेक्षा विकासकारणात रस वाटतो आहे. कारण एकच विचारधारा असल्यामुळे राजकारण किंवा शासनाच्या योजना लवकर बदलत नसतात, असाच त्यांचा आजवरचा अनुभव आहे.

तरीही विलिनीकरणानंतर १२ वर्षांतच व्हिएतनामने काही अंशी मुक्त अर्थव्यवस्थेचा अंगीकार केला. म्हणजे फक्त मागील ३० वर्षांपूर्वी या देशांच्या पुनर्बांधणीस खरी सुरुवात झाली आहे. युद्धाच्या सावलीत इथली पिढी वाढली आहे. आज ४० वर्षांच्या वर असणाऱ्या प्रत्येकाने एकार्थी युद्धाचा अनुभव घेतला आहे, होरपळ सोसली आहे. इथे उत्पादक वयोगटातील, १५ ते ६४ वर्षं, लोकसंख्या ७० टक्के आहे आणि ९७ टक्के जनता साक्षर आहे. म्हणून या देशाला ‘उत्पादक-तरुणां’चा देश म्हणायचं. इथं तरुणांवर मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या जातात. त्यांना लष्करी शिक्षण दिलं जातं. ते यासाठी उत्सुक असतातच असं नव्हे, पण शासनाची तशी योजना असते. सर्व क्षेत्रांत तरुण मोठ्या हुद्द्यांवर दिसतात.

व्युहात्मकदृष्ट्या महत्त्वाचे व्यापारउदीम सरकारने आपल्या अधिपत्याखाली ठेवले आहेत. ७० टक्के लोक ‘धर्म म्हणजे अफूची गोळी’ या मार्क्सच्या तत्त्वज्ञानावर वाढलेले असल्यामुळे ‘निधर्मी’ (याचा अर्थ, बाकी धर्मांबद्धल त्यांच्या मनात आदर नाही, असा होत नाही) आहेत. १२ टक्के बौद्ध आहेत. त्यामुळे थोडे ‘पॅगोडा’ दिसतात. फारच कमी ख्रिश्चन, पण हिंदू देवदेवतांच्या मूर्ती हॅनॉय किंवा हो-चि-मिन्हमध्ये कुठेच दिसत नाहीत. त्या जेव्हा पॅरामिशियमसारख्या समुद्रकिनाऱ्याशी झुंजणाऱ्या निमुळत्या मध्य व्हिएतनामच्या ‘द-नांग’ शहरात दिसत राहतात, तेव्हा साहजिक आश्चर्य वाटतं.

हे १५ व्या शतकातील ‘चाम’ (चंपा) साम्राज्याचे जलवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण, बंदर. ‘मोठ्या नदीचे मुख’ किंवा ‘mother river mouth’ या अर्थाने ‘द-नांग’ (Da Nang). ‘हान’ नावाच्या नदीकाठी वसलेले, द-नांग ला, ‘हान’ नदीचे मुख आहे. ती दक्षिण-चिनी समुद्राला इथे मिळते. मुखा जवळच्या या शहरात नदीचे एवढे विस्तीर्ण पात्र पाहून फार आश्चर्य वाटते. द-नांगपासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर ‘हो-यान’ (Hoi An) नावाचे जुने बंदर आहे. १५ ते १७व्या शतकामध्ये हो-यान हेच व्यापाराचे मुख्य केंद्र होते. सारी जलवाहतूक इथूनच होत असे, पण युरोपीय व्यापाऱ्यांनी मोठ्या जहाजांनी बांधणी केली. मग नांगर टाकायला मोठी जागा हवी म्हणून १८व्या शतकाच्या सुरुवातीला ‘द-नांग’च्या विस्तीर्ण किनाऱ्याची निवड केली गेली. यावर सुरुवातीला शतकभर फ्रेंचांनी वर्चस्व गाजवलं.

१९६५ मध्ये अमेरिका-व्हिएतनाम युद्धाच्या काळात अमेरिकेने ‘द-नांग’लाच आरमार ठेवलं होतं. १९७५च्या दक्षिण-उत्तर विलिनीकरणानंतर या मध्यवर्ती ठिकाणाला राष्ट्रीय महत्त्व प्राप्त झालं. My Son, Hue आणि Hoi An या मध्ययुगीन ठिकाणांच्या सांस्कृतिक, सामाजिक व आर्थिक प्रगतीच्या खुणा आजचं ‘द-नांग’ मिरवत आहे. या ऐतिहासिक संदर्भांमुळे आज ‘द-नांग’ पर्यटन केंद्र बनलं आहे.

‘चंपा’ हा भाग निश्चित एकेकाळी हिंदू सत्तेच्या प्रभावाखाली होता. त्यामुळे द-नांगसारख्या जागी हिंदू देवदेवतांच्या व भगवान बुद्धाच्या शिल्पाकृती दिसतात. ‘चोल’ साम्राज्य त्या वेळी भारताच्या दक्षिणेत बलशाली होते आणि त्यांचे दक्षिण-चीनी समुद्रमार्गांवर अधिराज्य होते. तेव्हा ‘द-नांग’ वा ‘हो-यान’चा किनारा त्यांनी व्यापारासाठी आपल्या सत्तेखाली ठेवला असल्यास आश्चर्य नाही.

त्याच्या या सांस्कृतिक खुणा पुरातत्त्व विभागांच्या कामातून पावतीस्वरूपात अधूनमधून दिसत राहतात. एखाद्या राज्यकर्त्यांच्या खुणा या शतकांतून दिसत राहतात. त्या पुसट होत नाहीत. सांस्कृतिक अभिसरण ही खूप वेळ घेणारी प्रक्रिया आहे, हे या निधर्मी राष्ट्रांतही जाणवते.

‘चंपा’ साम्राज्य कंबोडियामधील ‘विष्णू मंदिरा’च्या (अंकोरवाट, Angkor Wat) प्रभावाखाली राहिलं असावं. अजूनही १२व्या शतकातील पुरावे नव्यानं होणाऱ्या उत्खननातून सापडत असतात. सोनेरी खळाळणारा अथांग समुद्रकिनारा, स्वच्छ हवा, मुबलक पाणी या काही नैसर्गिक व रस्ते, पूल, राहण्याच्या सोयी, विमानतळ इत्यादी मानवनिर्मित सुविधांमुळे ‘द-नांग’ला शासन आता ‘एक आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र’ बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे.

‘द-नांग’हून ४० किमी वर Ba Na डोंगररांगा आहेत. १४८७ मीटर उंचीवर युरोपियन (फ्रेंच) पद्धतीच्या वास्तू असलेले हे ठिकाण ‘सिटी इन क्लाऊड’ या नावाने परिचित आहेत. येथील ४४ प्रजातींचा उल्लेख व्हिएतनामच्या ‘रेड बुक’ (नामशेष होणाऱ्या प्रजातींची नोंद ठेवणारं पुस्तक)मध्ये आढळतो. द-नांगचं आणखी वैशिष्ट्य म्हणजे जवळ असणारे ‘मार्बल माऊंटन्स’ आणि मध्ययुगीन बंदर- ‘हो-यान’.

Ngu Nanh Son नावाचे संगमरवरी पहाड द-नांगमध्येच आहेत. त्यांना ‘पंचतत्त्व दाखवणारे डोंगर’ असंही म्हणतात. Kim (धातू), Thau (पाणी), Moc (लाकूड), Hoa (अग्नी) आणि Tho (पृथ्वी), अशी ही पंचतत्त्वं. उंचावर चढून जाण्याची तयारी ठेवावी लागते, फार नाही पण ३००च्या आसपास पायऱ्या आहेत. बाजूला लिफ्ट आहे, हवं असल्यास त्याचं तिकीट काढावं. खाली एक निःशुल्क सार्वजनिक स्वच्छता गृह आहे. इथं आपले बूट, चपला बाहेर सोडून त्यांच्या ठेवलेल्या सपाता घालून आत जावं लागतं. स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून केलेला हा एक चांगला उपक्रम वाटला. या मार्बलच्या डोंगरावर वेगवेगळी संगमरवरी कोरीव शिल्प आहेत. ती हिंदू आणि बौद्ध धर्माच्या प्रभावातून घडलेली दिसतात. आता यातील पुष्कळच कलाकृती द-नांगच्या ‘चंपा’ संस्कृतीवर प्रकाश टाकणाऱ्या संग्रहालयात हलवल्या आहेत.

इथं काही गुहा आहेत. त्यांत प्रवेश करायचा म्हणजे निमुळत्या मार्गानं जाण्याची तयारी ठेवावी लागते. आत प्रवेशताच मोठी गुहा दिसते. उंच पहाड आणि पुढे पुन्हा अरूंद चढण-मार्ग, अगदीच एक माणूस जेमतेम वर पोचू शकेल एवढाच, त्यात पाणी ठिबकत असल्यामुळे पायऱ्या (केवळ आधारापुरत्या) निसरड्या झालेल्या असतात. वरून कपारीतून थोडा सूर्यप्रकाश अधूनमधून डोकावत असतो. मोबाईलचा प्रकाश चालू केला आणि हातात मोबाईल धरला तर कठीण अरुंद मार्गातून वर चढता येत नाही. अगदीच कमी लोक तिथून डोंगरावर चढतात, मात्र मग दम लागून घामानं निथळणाऱ्या शहरी जीवाला दक्षिण चिनी समुद्राचे आणि पूर्ण शहराचे मनोहारी दर्शन घडते. असंख्य बाहू उभारून समुद्र फेसाळताना दिसतो.

या भागात मुबलक प्रमाणात संगमरवर मिळत असल्यानं बरेच कारागीर व शिल्पी दिसतात. या कामाचे मोठे कारखाने पण आहेत. मोठी शिल्पं अवजड आणि महाग असतात. याच डोंगरावर काही ‘पॅगोडा’ आहेत. भगवान बुद्धाच्या मोठ्या मूर्ती आहेत. धम्मपद (धर्मपद) त्रिपिटकांपैकी सूत्त (सूत्र) पिटिकेचा भाग व त्याची आवतरणं फार उद्बोधक वाटली.

‘Mind is their chief; they are all mind-wrought. If with an impure mind a person speaks or acts suffering follows him like the wheel that follows the foot of the ox.’ (Verse 1)

‘All mental phenomena have mind as their forerunner; they have mind as their chief; they are mind-made. If one speaks or acts with a pure mind, happiness follows him like a shadow that never leaves him.’ (2) इत्यादी.

१२ व्या ते १५ व्या शतकातील ‘चंपा’ साम्राज्याच्या अवशेषांचं आणि शिल्पांचं दालन फ्रेंचांनी १९१५ मध्ये बांधलं. इथं माती, पाषाण, धातूंपासून बनवलेल्या जवळजवळ २५०० कलाकृती सांभाळून ठेवल्या आहेत. आता या ला ‘द-नांग म्युझियम’ म्हणतात. हिंदू संस्कृतीच्या प्रभावाखाली सजलेला कलाविष्काराचा पट इथं उलगडत जातो. ६०,००० VND (साधारणतः १ रुपयाला ३३० डाँग मिळतात) तिकीट असलेलं हे कलादालन फार व्यवस्थित जतन केलं आहे.

‘ताओ-इझम’ आणि ‘कन्फ्यूशिअनिझम’चा प्रभाव नाही म्हटलं तरी निधर्मी म्हणवणाऱ्या सामान्य जनतेवर आहे. शिवलिंग, नंदी, विष्णू, लक्ष्मी, दुर्गा, गणपती, दिक्पाल, गरुड, मकर, जातं, यज्ञवेदी, संस्कृत व ब्राह्मी शिलालेख इ. हिंदू आणि अनेक आकर्षक बौद्ध प्रतिमा, अवजार, भांडी इत्यादी ‘विजय’ नावाच्या जागेहून प्राप्त झाल्या. ही जागा आता Bin Dinh प्रांतात येते, पूर्वी ती १४-१५ व्या शतकापर्यंत ‘चंपा’ साम्राज्याचा भाग होती. ‘युनेस्को’ने १९९९मध्ये या जागेला ‘जागतिक सांस्कृतिक वारसा’ म्हणून घोषित केलं. कंबोडियामधील ‘अंकोरवाट’ हे अति प्राचीन व विशाल ‘विष्णू मंदिर’ आहे. याच अवशेषांशी मिळतेजुळते ‘चंपा’ साम्राज्यातील अवशेष आहेत, पण भव्यता त्यामानाने कमी.

आज जरी ‘भारतीय पुरातत्व सर्वेक्षण’ विभागाच्या कामगिरीमुळे ‘चंपा’ साम्राज्य आपल्याला पुन्हा माहीत होत असले तरी जगाच्या पाठीवर दीर्घकाळ चाललेलं युद्ध ज्या भूमीवर लढलं गेलं, त्या भूमीत कठीण काळात या ऐतिहासिक ठिकाणचं उत्खनन आणि त्यात सापडलेल्या हिंदू, बौद्ध मूर्ती यांचं जतन करून त्यावर फ्रेंचांनी केलेलं संशोधन त्यांच्या जिज्ञासू वृत्तीला प्रणाम करावं असंच आहे.

Henri Parmentier यांच्या कामापासून प्रेरणा घेऊन M Delavel आणि M Auclair या दोन फ्रेंचांनी या संग्रहालयाचं काम पाहिलं, घडी बसवली. इथं जुन्या अवशेषांचं डिजिटल ‘थ्री-डी मॅपिंग’ केलं आहे. अतिशय अभ्यासपूर्ण माहितीफलक लावले आहेत. संग्रहालयाची व्यवस्थित माहिती छोट्या पुस्तिकेमधून दिली जाते. My Son, China Dan, Khuong My, Thap Po Nagar, Nhom thap Ho Lai, Thap Po Klong Garai, Thap Po Rome या भागांबद्धल इथं विशेष माहिती मिळते. हिंदू देवदेवतांच्या मूर्तीबद्धल फार अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे. Dang Nang Tho या व्हिएतनामी चित्रकारानं काढलेला Homkar (Omkar) फारच आकर्षक वाटतो. शिवाय आपल्यातील मराठी माणसाला एक संशोधन स्थळ सापडतं- व्हिएतनाममधील आत्ताचे Ninh Thuan व Binh Thuan हे भाग पूर्वीच्या काळी ‘चंपा’ साम्राज्यात ‘पांडुरंग’ (Panduranga) म्हणून ओळखले जात असत. आपला पंढरीचा राजा इथंही सापडतो!

..................................................................................................................................................................

लेखक जीवन तळेगावकर व्यवस्थापन तज्ज्ञ म्हणून काम करतात.

jeevan.talegaonkar@gmail.com

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......