हेमाताईंसारख्या अंगणवाडी कार्यकर्त्यांचा विद्यापीठीय चर्चासत्रात सहभाग नसतो आणि त्या स्त्रीवादाला पुढे नेताहेत हे त्यांना कुणी सांगत नाही.    
पडघम - राज्यकारण
अलका गाडगीळ
  • हेमा पुरव (मध्यभागी)
  • Mon , 01 June 2020
  • पडघम राज्यकारण हेमा पुरव Hema Purav पोषण पखवाडा Poshan Pakhwada महापोषण अभियान Mahaposhan Abhiyan

भारत सरकारचं महत्त्वाकांक्षी ‘महापोषण अभियान’ सप्टेंबर २०१८मध्ये सुरू करण्यात आलं. या मोहीमेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अनेक राज्यांतील अंगणवाडी सेविकांशी थेट संपर्क साधला होता. हा पोषण उपक्रम निरंतर चालू राहावा म्हणून ८ मार्च ते २२ या कालावधीत ‘पोषण पंधरवडा’ देशभर साजरा करण्यात येईल अशी घोषणाही करण्यात आली. गेली तीन वर्षे हा पंधरवडा सातत्याने साजरा करण्यात येतो. पोषक पदार्थांचं प्रदर्शन, शालेय मुलींची हिमोग्लोबिन चाचणी, गर्भवती महिलांची पौष्टिक पदार्थांनी ओटी भरणं, पोषण रॅली असे विविध उपक्रम या पंधरवड्यात राबवण्यात येतात.

पोषण पंधरवडा आणि अशा अनेक उपक्रमांच्या आधारस्तंभ अर्थातच अंगणवाडी कार्यकर्त्या असतात. त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्राची आणि वस्ती वा गावातील ‘आशा वर्कर’ची भरीव साथ असते. गेली अनेक वर्षं पोषणाच्या सर्व जबाबदाऱ्यांसहित मुलांच्या वडिलांशी संवाद साधण्याचं काम अंगणवाडी कार्यकर्त्या करत आहेत. मात्र त्याच्या किती तरी आधी, पालघर जिल्ह्यातील नागरोली अंगणवाडी सेविका हेमा पुरव यांनी हे कार्य धडाडीनं हाती घेतलं होतं. २००० या वर्षांत, म्हणजे २० वर्षांपूर्वी आपल्या सर्व कार्यक्रमांत त्यांनी पुरुषांना सहभागी करून घ्यायला सुरुवात केली.

माता-बाल कार्यक्रमांत पुरुषांना काय भूमिका असणार हा मुद्दा आजही चर्चेत असतो. लिंगाधारित श्रमविभागणी सांगते की घर, घरातील कामं आणि बालसंगोपन ही कामं स्त्रियांचीच. पण या मांडणीला प्रश्न करण्याचं काम अंगणवाडी कार्यकर्त्या करत आहेत.

हेमाताईंनी २० वर्षांपूर्वी गर्भारपण, प्रसूती, बालसंगोपन, पोषण आणि लसीकरण या सर्व ‘माता-बालक’ निगडीत समजल्या जाणाऱ्या कार्यक्रमांत पुरुषांनी उपस्थित राहण्याचा आणि सर्व कामांत त्यांनी जबाबदारी उचलण्याचा आग्रह धरला. त्याचा सातत्याने पाठपुरावा केला. त्यासाठी पुरव यांना अक्षरश: शून्यापासून सुरुवात करावी लागली.

२००० मधली एक घटना. उत्तर प्रदेशातील एका खेड्यातून पालघर जिल्ह्यात स्थलांतर केलेल्या एका कुटुंबातील स्त्री, सविता गरोदर होती आणि अशक्तही. तिची प्रसूती झाली. तिला कमी वजनाची मुलगी झाली. मुलीचं नाव शामली. चार दिवसांची ही तान्ही मुलगी खूप अत्यवस्थ असल्याचं हेमातार्इंना समजलं. त्यांनी शामलीच्या घरचा रस्ता धरला. शामलीचं वजन दोन किलो होतं. तिच्या नाकावर जखम झालेली होती. डोळे चिपकलेले होते, ते उघडतच नव्हते. तिला अर्भकावस्थेत सेप्सिस झाला होता. ही धोक्याची सूचना होती. शामलीला त्वरित उपचार सुरू करायला हवे होते. तिच्या आईलाही सतत झापड येत होती. त्यामुळे तिला डोळे उघडे ठेवणं कठीण जात होतं. शामली आणि तिच्या आईला उपचारांची जरुरी आहे हे स्पष्ट दिसत होतं.

आई आणि मुलीला पालघरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागेल हे समजल्याबरोबर शामलीचे बाबा बनवारीलाल चलबिचल करू लागले. ‘मी काही हॉस्पिटलमध्ये येणार नाही’ ते चढ्या आवाजात बोलले. हेमाताईंनी त्यांना समजुतीच्या गोष्टी सांगून बघितल्या, तरीही ते बधले नाहीत. तेव्हा ताईंनी बनवारीलालना खड्या आवाजात सुनावलं- ‘मी तुम्हाला अ‍ॅम्ब्युलन्समध्ये बसवणार आहे. तुम्ही कसे येत नाही ते मी बघतेच’.

हेमाताईंनी आपलं बोलणं खरं करून दाखवलं. त्या त्यांना म्हणाल्या, “तुमच्या रोजंदारीची चिंता तुम्ही करू नका, मी काहीतरी व्यवस्था लावून देईन. दिवसभर काम करून संध्याकाळी आपल्या मुलीजवळ बसावं लागेल. आई किती वेळ सांभाळणार? बाळाची सगळी जबाबदारी आईवर टाकणं योग्य नाही.” अखेरीस शामलीच्या बाबांनी नमतं घेतलं.

पण शामलीवर पालघरला उपचार होऊ शकणार नाही असं स्पष्ट झालं. तिला नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. तिथे जातानाही शामलीच्या बाबांनी पुन्हा विरोध केला. पण बाबाला मुलीची जबाबदारी उचलावीच लागेल, हे हेमाताईंनी मनोमन ठरवलं होतं आणि त्यांनी ते करून दाखवलं.

नाशिकलाही बनवारीलालना रोजंदारी मिळवून देण्याचं काम हेमाताईंनी केलं. तिथं एक महिनाभर उपचार घेऊन आजारी शामलींचं सुदृढ बाळात रूपांतर झालं. आईचीही तब्येत सुधारली आणि ते कुटुंबं पालघरला परतलं. आता बनवारीलाल सांगतात,  

“मी हटवादी होतो आणि माझ्या मुलीच्या जबाबदाऱ्यांपासून मी दूर पळत होतो. तान्ह बाळ ही आईचीच जबाबदारी असते असं मी मानत होतो. पण आई एकटीच सर्व काम करू शकणार नाही, हे मला हेमाताईंकडून समजलं. मलाच काय इतर अनेक पुरुषांना वाटतं की, ही सारी कामं आईचीच असतात. पण बाळाच्या सर्वांगीण वाढीसाठी बाबानंही जबाबादारी उचलली पाहिजे. शामली जगली नसती, तिला वाचवण्याचं आणि निरोगी आणि सशक्त बनवण्याचं काम हेमाताईंनी केलं. त्या नसत्या तर माझ्या अहंकारापायी शामली दगावली असती हा विचार मला सतत त्रास देतो. पण आता १२ वर्षांची माझी सदृढ मुलगी माझ्या समोर आहे आणि ती खेळांमध्येही चमक दाखवतेय.”

पुरुष सहभागाची गोष्ट इथेच संपत नाही. शामलीच्या आजाराची आणि ती पूर्ण बरी होऊन निरोगी झाल्याची बातमी अनेक वर्तमानपत्रांतून छापून आली होती आणि ती व्हायरलही झाली होती. परदेशातून एका व्यावसासिकाने ही बातमी वाचली आणि त्याने हेमाताईंचा नंबर मिळवला. शामलीच्या उच्च शिक्षणासाठी काही रक्कम बँकेत जमा करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. हेमाताई आणि शामलीचे बाबा यांच्या संयुक्त खात्यात ही रक्कम ठेवण्यात आली.

मात्र बनवारीलालांचा या रकमेवर डोळा होता. ‘निर्मल भारत’ अभियानातंर्गत घरी संडास असणं अनिवार्य करण्यात आलं, तेव्हा त्यांनी पुरव यांना गाठलं आणि बँकेतील रक्कम टॉयलेट बांधण्यासाठी काढावी असं सुचवलं. हेमाताईंच्या सहीशिवाय ते बँकेतील रक्कम काढू शकत नव्हते.

‘‘या योजनेअंतर्गत अनुदान मिळतं ते मी तुम्हाला ग्रामपंचायतीमार्फत मिळवून देईन. बँकेतील रक्कम शामलीची आहे हे लक्षात ठेवा. मी सही करणार नाही. पण योजनेतून स्वच्छतागृह बांधण्यासाठी आर्थिक मदत मिळवून देईन.”

शामलीच्या बाबाचा डाव हेमाताईंनी सफल होऊ दिला नाही. शामलीच्या नावे असलेली बँकेतील रक्कम सुरक्षित राहिली. 

मातृत्व आणि बालपोषण कार्यक्रमांव्यतिरिक्त गावातल्या इतर कामांतही हेमाताई पुढाकार घेतात. त्यांचे नेतृत्व गुण ओळखून ग्रामपंचायतीने त्यांना वेगवेगळ्या प्रकल्पांत सहभागी करून घेतलं आहे. गावातील लोकांना प्रेरित करण्याचं आणि अनेक कामांत त्यांचा सहभाग मिळवण्याचं काम पुरव करतात. त्यांच्या गावात स्वच्छ भारत योजनेअंतर्गत शौचकूप आणि शोषखड्ड्याच्या बांधकामासाठी समस्त गावकऱ्यांनी श्रमदान केलं. ग्रामसभेमध्ये योजनेचा आराखडा बनवणं आणि बांधकामासाठी लोकांना तयार करण्याचं काम हेमाताईंनी केलं. सर्व कामं गावकऱ्यांनी केल्यामुळे निधीची बचतही झाली. 

भारतात ७०-८० दशकांत स्त्री मुक्ती चळवळींनी जोर धरला, पण ही चळवळ शहरी तोंडवळ्याची होती आणि तिची मांडणीही मध्यमवर्गीय प्रश्न आणि समान हक्कांभोवती फिरत होती. गावखेड्यातील स्त्रियांच्या मुद्द्यांना भिडायचं बाकी होतं. हेमाताईंनी काम करायला सुरुवात केली त्या काळात पितृसत्ता आणि मर्दानगीच्या संकल्पनांसंबंधींची चर्चा स्त्री संघटनांच्या आणि विद्यापीठीय वर्तुळात होत राहिली. त्या काळात हेमाताईंसारख्या तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी हा विचार प्रवाह प्रत्यक्ष राबवायला सुरुवात केली होती.

लॉकडाउनच्या या काळात एका बाजूला पुरुष भांडी घासण्यापासून ते जेवण बनवण्यापर्यंत सर्व कामं कशी करतायत याच्या पोस्ट आणि व्हिडिओ व्हायरल होतायत, तर दुसऱ्या बाजूला कौटुंबिक हिंसा आणि मुलांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये वाढ झालीय असे समोर येतेय. या दोघांची सांगड कशी घालायची? लॉकडाऊन नंतरही घरकामातील पुरुषांचा सहभाग टिकून राहील का? भांडी घासणे वगैरेसारख्या क्रिया मूळ श्रमविभागणीला आव्हान देत नसल्यामुळे हे बदल तात्पुरते राहण्याचा संभव अधिक आहे.

हेमाताईंनी अनेक वर्षांपूर्वी लिंगाधारीत श्रमविभागणीला आव्हान देण्याचं काम सुरू केलं. पुरुषांच्या जबाबदाऱ्यांबद्दल लोकांशी थेट संवाद साधणाऱ्या त्यांच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या पथदर्शी कामाचा धांडोळा घेणं अत्यंत जरुरीचं आहे. नेमून दिलेल्या कामाच्या पलीकडील अनेक कामांत काही अंगणवाडी कार्यकर्त्यांनी योगदान दिलं होतं आणि कठीण आव्हानं स्वीकारली होती. समाजाला नवीन विचारांची ओळख त्यांनी करून दिली होती.

अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आणि मुंबई महानगरपालिका क्षेत्रात काम करणाऱ्या आरोग्यसेवकांना कोविड-१९च्या कामात गुंतवलं गेलं आहे. सुरक्षेची सारी निर्दोष साधनं या सगळ्यांकडे नसतानाही गाव/वस्ती पातळीवरील बचाव कार्य आणि शोधकार्यात त्या काम करत आहेत. त्यांच्या कामाची प्रशंसा होते, पण अनेकदा लोकांच्या रोषालाही त्यांना तोंड द्यावं लागतं. काही कार्यकर्त्यांवर हल्लेही झाले आहेत. या महामारीमुळे तळाच्या पातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितेचे मुद्दे प्राधान्याने हाताळणं आवश्यक झालं आहे.

हेमाताईंसारख्या अंगणवाडी कार्यकर्त्यांचा विद्यापीठीय चर्चासत्रात सहभाग नसतो आणि त्यांचं काम स्त्रीवादाला पुढे नेणारं आहे, हे त्यांना सांगायलाही कोणी जात नाही.        

.............................................................................................................................................

लेखिका अलका गाडगीळ युनिसेफसाठी काम करतात.

alkagadgil@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......