अजूनकाही
‘टिक-टॉक’ या चायनीज कंपनीच्या अॅपवर काही सेकंदांचे व्हिडिओ अपलोड करता येतात. हजारोंच्या संख्येत त्याला व्ह्यूज मिळतात. या प्लॅटफॉर्मवर सध्याच्या करोना महामारीच्या काळात खूप टीका झाली. ‘टिक-टॉक’वरचे निर्बुद्ध, रिकामटेकडे वगैरे. पण सात महिन्यांपूर्वी बीड जिल्ह्यातल्या सत्यभामा सौंदर्यमल या सामाजिक कार्यकर्तीने हा प्लॅटफॉर्म सामाजिक प्रश्न मांडण्यासाठी वापरायला सुरुवात केली. तिला एक लाख सातशेहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्या अकाऊंटवर तिने स्वत:चा मोबाईल नंबर दिला आणि अडचणीत असलेल्यांना सांगितलं की, मला फोन करून तुमच्या तक्रारी कळवा.
‘टिक-टॉक’वर सक्रिय असलेली सत्यभामा ही पुरोगामी चळवळीतील तशी दुर्मीळ कार्यकर्ती आहे, कारण अजूनही फेसबुकचा वापर महाराष्ट्रातल्या सामाजिक वर्तुळात प्रामुख्याने केला जातो. पण जो तरुण वर्ग त्या प्लॅटफॉर्मवर आहे, त्यांच्यापर्यंत विचार आणि काम पोचवण्यासाठी सत्यभामाने हा मार्ग निवडलाय. लॉकडाऊनच्या काळात यू-ट्यूबविरुद्ध टिकटॉक असे विषय ट्रेंड होत असताना सत्यभामाला मात्र विलगीकरण कक्षातले महिलांचे प्रश्न समजले, ते याच अॅपवर अॅक्टिव्ह असल्यामुळे.
महाराष्ट्रात करोना महामारीला थोपवण्यासाठी २६ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झालं. त्यानंतर जसजसा या व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत गेला, तशी परिस्थिती बदलत गेली. सर्वांत आधी पुण्यात आणि त्यानंतर मुंबईत, त्यापाठोपाठ ग्रामीण भागात विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले. परराज्यांतून आलेल्या कामगारांना सरकारी विलगीकरण कक्षांमध्ये ठेवण्यात आलं. माध्यमांचं मुख्य लक्ष हे मुंबई किंवा शहरी भागातील विलगीकरण कक्षातील सोयींकडे होतं. ग्रामीण भागात काय परिस्थिती आहे, याबद्दल फारसं सखोल रिपोर्टिंग होत नव्हतं. त्याचं एक कारण हेसुद्धा होतं की, लोक घाबरलेले होते. त्यातील बहुतेकांकडे स्मार्ट फोन नव्हते. त्यामुळे ते क्वारंटाइन किंवा आयसोलेशनमधले व्हिडिओ रेकॉर्ड करू शकत नव्हते. इतर वेळी जसं घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देतात, तशी भेट देणं आणि व्हिजुअल्स रेकॉर्ड करणं, पत्रकारांना शक्य नव्हतं. त्यामुळे विलगीकरणातील महिलांचे नेमके काय अनुभव होते, यांवर प्रकाश पडत नव्हता. सरकार जी आकडेवारी देतं, माहिती देतं, तो एकच स्त्रोत होता बातमीचा.
मीरा अणभुले ही बीड जिल्ह्यांतली ऊसतोड मजूर. तिचा नवरा राजाभाऊ अणभुले हादेखील ऊसतोड मजूर आहे. उर्वरित वेळात तो रिक्षा चालवतो. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात ऊसतोड मजुरांना एकत्रितपणे परत आणण्यात आलं आणि त्यांना सरकारी विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं. स्त्रिया, पुरुष, मुलं यासाठी खास वेगळी सोय नव्हती. माजलगावमध्ये केसापुरी कॅम्पमध्ये मुलींच्या शासकीय विश्रामगृहात अणभुले यांना इतरांसोबत ठेवलेलं होतं. या इमारतीपासून जवळच गावठी दारूचा एक अड्डा चालत असे. लॉकडाऊनच्या दरम्यान २९ मे रोजी स्थानिक महिलांनी या दारूच्या गुत्तेदारावर कारवाई करावी, म्हणून इंदिरानगर पोलीस स्टेशनला सह्यांचं निवेदनही दिलं होतं. गंमत अशी की पोलिसांनी कारवाई केल्यासारखं दाखवलं, पण प्रत्यक्षात कोणतीच कारवाई झाली नव्हती. दारूचा अड्डा सुरूच होता.
वैजनाथ ढगे हा पुण्यामध्ये एमएचं शिक्षण घेत नोकरी करतो. त्याची बहीण मीरा. सहा भावंडं. आई-वडील मजुरी करतात. मीराचं लग्न ती १५ वर्षांची असताना झालं. तिला तीन मुलं आहेत. नवरा दारू पितो आणि तिला मारतो. हे नेहमीचंच आहे. महिलांनी मार खायचा असतो, त्याविरोधात बोलायचं नाही अशी मीराची मानसिकता आहे. ती सातवी शिकलेय. त्यामुळे स्वत:चे हक्क, कायद्याने दिलेलं संरक्षण याबद्दल तिला फारशी जाणीव नाही. वैजनाथला तिने विलगीकरण कक्षातून फोन केला, तेव्हा त्याला थोडा धक्काच बसला. “दाजी आणि सोबतचे काही लोक भिंतीवरून उड्या मारून जायचे आणि प्लॅस्टिकच्या बाटलीतून दारू घेऊन यायचे. दारू पिऊन बहिणीला तिथंही मारायचे. मी टिक-टॉकच्या अॅपवर सत्यभामाताईंना फॉलो करतो. मी तिकडे हे त्यांना कळवलं. तेव्हा मला ती ओरडली, कशाला हे कोणाला सांगितलंस? या घरच्या गोष्टी असं तिला वाटतं…” वैजनाथने सांगितलं.
एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात हे झालं. २५ तारखेला सत्यभामा त्या क्वारंटाइन सेंटरला गेल्या. तिथे त्यांनी त्या महिलेची भेट घेतली. “नवरा ज्या बाटलीतून दारू भरून आणतो, ती बाटलीसुद्धा तिने मला दाखवली. त्यानंतर तिने मला सांगितलं की, नवरा दारू पिऊन आल्यावर तो मारणार हे माहीत आहे, त्या भीतीने पहिला मार खाल्ल्यावर ती जाऊन बाथरूममध्ये दरवाजा बंद करून बसली, तर तिथे पण तो आला आणि दरवाजावर लाथा मारून दार उघडायला भाग पाडलं आणि मारलं. ताई कसंतरी करून इथं त्याला दारू मिळणार नाही, असं बघा. ही विनंती तिनं मला केली. मी अंतर ठेवून सगळ्यांसोबत बोलत होते,” सत्यभामाने आपला अनुभव सांगितला. त्यानंतर लगेचच याबद्दलचा एक व्हिडिओ सत्यभामाने बनवला आणि टिक-टॉकवर अपलोड केला. त्यांनी या प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आवाहन केलं.
त्यानंतर नऊ दिवसांनी सत्यभामावर केस दाखल करण्यात आली. भारतीय दंड संहिता १८८ अंतर्गत केस होती. ज्यांच्यावर १८८ अंतर्गत केस आहेत त्या सर्वांना पोलीस स्टेशनमध्ये जामीन देऊन सोडलं जात होतं. सत्यभामाच्या घरी पोलीस आले, त्यांना अटक केली आणि घेऊन गेले. सरकार, पोलीस, जिल्हाधिकारी यांची बदनामी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. सत्यभामाचा फोन जप्त करण्यात आला. पण त्या डगमगल्या नाहीत. काही तासांतच त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं आणि तिथं त्यांची जामीनावर सुटका झाली. विलगीकरण कक्षातून महिलांविरोधातल्या हिंसेचा प्रश्न मांडला म्हणून अटक होणारी सत्यभामा राज्यातली पहिली कार्यकर्ती आहे.
सत्यभामा सांगतात की, केवळ केसपर्यंत हे प्रकरण थांबलं नाही. ज्या विलगीकरण कक्षात हा प्रकार घडत होता, तिथे होमगार्डची सुरक्षा होती. जो दारूचा अड्डा चालतो, त्यात कोण भागीदार आहेत हे पोलिसांना माहीत आहेत. “मला अत्यंत अश्लील मॅसेज, कमेंट्स पाठवण्यात आले. हजार पॉवरची गोळी घेऊन तुझ्याकडे आम्ही सगळे येतो. तुझी नवरा लय दारू पितो म्हणून तू दारूबंदीची मागणी करतेस का? वगैरे. त्यांना वाटलं घाणेरडं लिहिलं की, मी घाबरून घरात बसेन, केस टाकली की आवाज बंद होईल. पण मी कमेंट करणाऱ्यांचे स्क्रीनशॉट्स काढून ठेवले आणि होमगार्डमधल्या चार जणांविरोधात एफआयआर दाखल केली,” सत्यभामाने सांगितलं.
महामारीच्या काळात महिलांना पुरुषांसोबतच क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आलं. त्यांच्या स्वच्छतागृहांचा, मासिक पाळीच्या काळात होणाऱ्या त्रासाचा विचार झाला नाही. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात तर कोविड-१९ पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांच्या प्रथम संपर्कातल्यांना तर अक्षरश: कपडे पिशवीत भरायचा अवधी न देता नेण्यात आलं.
उत्तर प्रदेशच्या अयोध्या जिल्ह्यात दोन ठिकाणी क्वारंटाइन आणि आयसोलेन सेंटरमध्ये दारूच्या पार्टीज करून गोंधळ घातल्याचे प्रकार स्थानिक प्रसारमाध्यमांनी उघडकीस आणले. त्यावर नंतर तोंडदेखली कारवाई करण्यात आली. चौधरीपूर गावात सरपंचानेच दारूची पार्टी दिली आणि सोशल डिस्टन्सिंगचा पुरता बोजवारा उडवला. त्यानंतर तिथं झालेल्या भांडणाच्या वेळी महिलांना असुरक्षित वाटलं, पण या दृष्टीने घटनेची कुणी नोंदही घेतली नाही. त्याआधी इताह जिल्ह्यात हॉस्पिटलमध्येच कर्मचाऱ्यांनी बिअरची पार्टी केली. तिथंही दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली, पण प्रत्यक्षात महिलांसोबतचं गैरवर्तन, क्वारंटाइनमध्ये आधीच चिंतेत असलेल्या महिलांमध्ये दारूच्या मुक्त वावरामुळे तयार झालेली असुरक्षितता, याची नोंदही कुठे घेतली गेली नाही.
लॉकडाऊनमध्ये विविध ठिकाणी दारू विक्रीची परवानगी दिल्यानंतर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली का घट, याची तपशीलवार आकडेवारी उपलब्ध झाल्यानंतर अधिक विश्लेषण करता येईल. पण नॅशनल क्राईम ब्युरो दरवर्षी देशांतील गुन्ह्यांची वर्गवारी करून आकडेवारी प्रसिद्ध करतं. यामध्येही दारूच्या व्यसनामुळे किंवा दारू पिऊन महिलांविरुद्ध केलेल्या कोणत्याही गुन्ह्यांची स्वतंत्र आकडेवारी प्रसिद्ध केली जात नाही. प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या अॅडव्होकेट वर्षा देशपांडे म्हणतात, “लॉकडाऊन काळातील क्वारंटाइन सेंटर्समधील महिलांचे हे अनुभव व्यवस्थेपर्यंत पोहोचलेही नाहीत. त्याची दखल घेणं तर दूरची गोष्ट. उलट जे लोक आवाज उठवतात, त्यांच्या आवाजावर मुख्य धारेतील प्रसारमाध्यमं बहिष्कार टाकतात.”
सत्यभामा सौंदर्यमल यांच्या बाबतीतही काहीसं असंच घडलंय. त्यामुळे महाराष्ट्रातील दारूबंदी व्यसनमुक्ती कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी, अविनाश पाटील, वर्षा विद्या विलास, अमोल मडामे, वसुधा सरदार, महेश पवार, पारोमिता गोस्वामी, प्रेमलता सोनुने आणि अन्य यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्रं लिहिलं आणि विनंती केली की, सत्यभामा यांच्यावरची केस सरकारने रद्द करावी.
दारूबंदी कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांच्यावर बीड जिल्ह्यात पोलिसांनी गुन्हा दाखल केला, तो रद्द करावा म्हणून आम्ही कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले आहे. ते असे -
“सत्यभामा सौंदरमल या सामाजिक कार्यकर्त्या बीड जिल्ह्यात दलित, आदिवासी, महिला यांच्या अनेक प्रश्नावर गेले २० वर्षे संघर्ष करत आहेत, दारूबंदी विषयावर ही त्या काम करतात. परंतु अवैध दारू या विषयावर सातत्याने संघर्ष केल्याने जिल्ह्यातील हितसंबंध दुखावलेल्या व्यक्ती त्यांना त्रास देत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून प्रशासनाच्या मदतीने त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्वारंटाईन केलेल्या एका व्यक्तीला परवानगी नसताना दारू पुरवली जात होती. हा गंभीर प्रकार त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनाला आणला व तेथील परिसराचे चित्रीकरण सादर केले. प्रशासनाची अकार्यक्षमता बाहेर आल्यामुळे प्रशासकीय कामात हस्तक्षेप, प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश असे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. वास्तविक त्यांनी रुग्ण असलेल्या कक्षात प्रवेश केला नव्हता. त्या बाहेरील शेडमध्ये उभ्या असलेल्या व्हिडिओमधून स्पष्टपणे दिसत आहेत, परंतु स्थानिक प्रशासनाची अकार्यक्षमता व पेशंटला दारू करण्याचा गंभीर प्रकार उघड झाला म्हणून त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना असे खोट्या गुन्ह्यात अडकवून त्यांचे नीतिधैर्य खच्ची करण्याचा हा प्रकार असल्याने आम्ही सर्वच कार्यकर्ते अस्वस्थ आहोत. आपण यात लक्ष घालावे ही विनंती.”
महिलांना समावून घेणाऱ्या धोरणांच्या आखणीचा अभाव ही कायमच आपल्या व्यवस्थेमधली मोठी कमतरता राहिली आहे. क्वारंटाइन केंद्रात मार खाणाऱ्या मीरा अणभुलेच्या निमित्ताने ती पुन्हा एकदा अधोरेखित झाली.
..................................................................................................................................................................
लेखिका अलका धुपकर ‘मुंबई मिरर’ या इंग्रजी दैनिकात असिस्टंट एडिटर आहेत.
alaka.dhupkar@gmail.co
..................................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment