अजूनकाही
१. भारतातली ५८ टक्के संपत्ती अवघ्या एक टक्का श्रीमंतांच्या खिशांत एकवटली असून आर्थिक विषमतावाढीचे हे द्योतक आहे. जगातली अर्धी संपत्तीही केवळ एक टक्का धनिकांच्या हाती एकवटली आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीआधी ऑक्सफॅमने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार भारतात ५७ अब्जाधीशांच्या हातात २१६ अब्ज डॉलर एवढी संपत्ती असून ही देशातल्या ७० टक्के लोकसंख्येच्या संपत्तीएवढी आहे.
म्हणून तर सरकारने नोटाबंदीचा धाडसी उपाय योजला आहे. आता एकदा सगळा देश कॅशलेस झाला की, सगळ्यांच्या जनधन खात्यांमध्ये ज्याचा त्याचा वाटा येतो की नाही पाहा आपोआप. उगाच नाही दोन हजाराच्या नोटांमध्ये चिप बसवलेली.
…………………………..…………………………..
२. ओशिवरा रेल्वे स्टेशनचं राम मंदिर असं नामकरण केल्यानंतर आता दादर स्टेशनला विठ्ठल मंदिर असं नाव देण्याची मागणी. या स्टेशनला चैत्यभूमी असं नाव देण्याची मागणी याआधीच झालेली आहे.
काही दिवसांनी लोकलमध्ये असा संवाद ऐकू येणार… 'अरे, राम मंदिर से विठ्ठल मंदिर जा रहा था, भाई का फोन आया, तो साई मंदिर उतरना पडा.' 'मी बोल्लो होतो भावड्याला की गणेश मंदिरला उतर, तो गेला अग्यारीला; म्हटलं आता गुरुद्वाराला ट्रेन चेंज करून जैन मंदिरला ये.'
…………………………..…………………………..
३. भारतातला काळा पैसा हा केवळ पाच ते सहा टक्केच रोख रकमेच्या स्वरूपात असल्यामुळे भारतीय रिझर्व्ह बॅंकेचा नेहमीच नोटाबंदीला विरोध राहिला आहे, असं विधान आरबीआयचे माजी डेप्युटी गव्हर्नर के. सी. चक्रवर्ती यांनी केलं आहे.
तुमच्यासारख्या कचखाऊ अधिकाऱ्यांमुळेच देश विकासापासून, स्वच्छ अर्थव्यवस्थेपासून वंचित राहिला होता. नशीब तुम्ही नव्हतात गेल्या वर्षी. अर्थात असतात तरी तुम्हाला विचारलं कोणी असतं म्हणा! आम्ही तर गव्हर्नरलाही हिंग लावून पुसत नाही.
…………………………..…………………………..
४. शांघाय, सिलिकॉन व्हॅली यांना मागे टाकत बंगळुरू शहराने प्रगतीशील शहरांच्या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे. जागतिक आर्थिक मंचाने (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) प्रगतीशील शहरांची नवी यादी जाहीर केली आहे. या यादीत हैदराबाद पाचव्या स्थानावर आहे. ३० प्रगतीशील शहरांत दिल्ली, मुंबई आणि चेन्नईलाही स्थान देण्यात आले आहे.
या कामगिरीबद्दल कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी जनतेचे आभार वगैरे मानले आहेत. प्रचंड वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापनाचा अभाव, प्रदूषित तलाव आणि नुकत्याच घडलेल्या विनयभंगाच्या घटना यामुळे चर्चेत असलेले बंगळुरू पाणी आणि विजेच्या समस्येने ग्रासलेलं आहे. उद्योगस्नेही शहरांच्या यादीत केंद्राने बंगळुरूला तळाचे स्थान दिले आहे. असं असताना हा गौरव कसा झाला असेल? मुळात ही यादी प्रगतीशील शहरांची आहे. त्यात जगातल्या प्रमुख शहरांचा समावेश नाही कारण ती आधीच प्रगत झाली आहेत. आपली शहरं दशकानुदशकं 'प्रगतीशील'च आहेत, प्रगत काही होत नाहीत, ही अभिमानाची गोष्ट आहे का?
…………………………..…………………………..
५. मुंबईत जसे काव काव करणारे कावळे भरपूर आहेत, तसे मुंबई महापालिकेच्या कामकाजावर बोलणारे बरेच जण आहेत. पण देशभरात सर्वात जास्त स्वच्छ आणि पारदर्शक कारभार मुंबई महापालिकेत आहे. : शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे
हे वाक्य ठाकरे यांनी सेना-भाजप युतीचे दिवंगत शिल्पकार गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीला अर्पण केलं असणार, यात शंकाच नाही. 'खोटं बोलावं, पण रेटून बोलावं' ही थोर शिकवण माननीय मुंडे साहेबांनीच दिली होती ना महाराष्ट्राला.
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment