आज, १ जून. गोपाळ नीळकंठ दांडेकर उर्फ गोनीदा यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि समर्थ रामदास यांच्याविषयी लिहिलेल्या चरित्रात्मक कादंबऱ्यांचा हा परिचय.
..................................................................................................................................................................
मोगरा फुलला
‘मोगरा फुलला’ ही संत ज्ञानेश्वरांवर लिहिलेली चरित्रात्मक कादंबरी. यातील भाषा तेराव्या शतकाशी जवळीक साधणारी असल्याने तिचे आकलन होण्यास वेळ द्यावा लागतो, साधारणतः ५० पृष्ठे खर्ची घातल्यावर या भाषेचा गोडवा मनात भिनू लागतो. ‘ज्ञानियाच्या राजाची’ मानलेली मावशी कावेरी ही माय रुक्मिणीची सखी आणि स्नेही काका भट्टदेव हे बापा विठ्ठलपंतांपेक्षा वयाने थोर-मित्र, या दोघांच्या स्मरण-प्रसंगातून उमलणारे चरित्र त्यांच्या आई-वडिलांच्या लहानपणापासून ते गृहस्थ, संन्यास, आरूढपतितत्व, देहत्याग असा प्रवास करून ज्ञानेश्वरांच्या संजीवनसमाधीच्या प्रसंगापर्यंत प्रवाहित राहते. हे दोघे आई-वडिलांचे सोबती, म्हणून त्यांना पावलेले रुक्मिणी व विठ्ठलपंत या कादंबरीतून भेटत राहतात. गोनीदांनी माउलींच्या जन्मदात्यांचा प्रवास प्रसाद-प्रतिभेचा विलक्षण आविष्कार घडवत साधला आहे. ‘भूमीचे मार्दव । सांगे कोंभाची लवलव’ याचे प्रत्यक्षच त्यांनी या चार जगावेगळ्या भावंडांची जडणघडण कशी झाली ही पृष्ठभूमी बांधून दिले आहे, अन्यथा एकेका दिव्यापायी खर्ची पडावे असे प्रसंग, पण त्यातून विवेकाने भक्ती-मार्गक्रमण करणारे मात-पिता साकारण्यात जवळजवळ अर्धी पृष्ठे लागली आहेत. या पार्श्वभूमीवर जेव्हा वाचक स्थिरावतो तेव्हा बाळ-ज्ञानबाचे चरित्र उमलू लागते.
पुढे ज्ञानेश्वरांचे मन ‘खळांची व्यंकटी सांडो’ असे का म्हणते, ‘आणिक निर्दाळण कंटकांचे’ किंवा ‘धटासी आणावा धट, उद्धटासी पाहिजे उद्धट’ किंवा ‘तेथे पैजाराचे काम’, असे का म्हणत नाही, उलट त्या विश्वात्मक देवाकडे ‘दुरिताचें तिमिर जावो’ किंवा ‘जो जे वांछील तो ते लाहो’ असा पसाय मागते, त्याचे कारण त्यांच्या आईवडिलांच्या सहृदयतेत आहे. त्यांच्या ठायी ज्ञानेश्वरांच्या ‘विमल चेतसाचे’ बीजारोपण झाले आहे. याची जाणीव ठेवून गोनीदांनी कावेरी व भट्टदेवाकडून केलेली प्रथमपुरुषी निवेदनपद्धती स्वीकारली असावी.
मोजक्या मराठी साहित्यिकांनी निर्माण केलेल्या संत चरित्रात्मक कलाकृती जशा चरित्रविषयाच्या सर्वव्यापकतेमुळे वाचकांनी आनंदाने स्वीकारल्या, तसेच त्या व्यासंगी लेखकांच्या निर्मल अंतःकरणातून अशा विनासायास उतरल्या आहेत, म्हणून सहज स्वीकारार्ह झाल्या, हे निर्विवाद.
लेखकाची भावतरलता वाक्यावाक्यात प्रकटते, ज्ञानेश्वरांच्या जन्माच्यावेळी तर ती ओसंडून वाहते. ‘लेंकरूं काय जन्मलें, जणूं चन्द्रोदय झाला- पूर्ण चन्द्र उदेजला’ किंवा ‘भगवंताची खूण अशी आहे, की ज्याशी त्याचा संग होतो, त्याचा लौकिक भंगतो’, ‘जेथ अनुभूति आपण होवोन साधकाच्या गळां माळ घालते’, किंवा ‘अंतरींची दयाक्षमा बाहेरी परमळो लागली’, या सारखी वाक्ये वाचकाला भावनिविष्ट करतात.
‘गहिनीनाथाचा तो शिष्य निवृत्ती दातार, घाली दंडवता तुम्हा जोडुनिया कर, तुझ्या कृपे ज्यांनी देवा रेडा बोलविला, प्रवरेच्या तटी ग्रंथ ज्ञानेश्वरी केला, ते हे ‘वैष्णवांचे गुरु श्री ज्ञानेश्वर...’ असा गुरुपरंपरेचा उल्लेख संत दासगणूंनी सहज एका भावस्तोत्रात केला आहे. तो गोनीदांनी गद्यरूपात रसाळपणे मांडला आहे. ‘सत्यं ज्ञानमनन्तं नित्यमनाकाशं परमाकाशं’ (श्रीशंकराचार्यांचे स्तोत्र), ‘जटा कटा हसंभ्रम भ्रमन्निलिंपनिर्झरी । विलोलवी चिवल्लरी विराजमानमूर्धनि ।’ (रावणाने केलेली शिवतांडव स्तुती) सारखे अध्येमध्ये डोकावणारे श्लोक लेखकाच्या बहुश्रुततेच्या खुणा प्रकट करतात.
एवढेच नव्हे तर संत ज्ञानेश्वरांच्या चरित्राचा अदमास, त्यांनी बहुधा ‘सार्थ ज्ञानेश्वरी’तील प्रा शंकर वामन दांडेकरांचा दीर्घ प्रस्तावनेतून घेतला असावा एवढे साम्य या दोन स्थळांत आहे, अर्थात ज्ञानेश्वरीचे पूर्ण परिशीलन केल्याशिवाय त्याच्या कर्त्याचा चरित्रकार होणे सोपे नव्हतेच.
पुस्तकाची भाषा जणू ज्ञानेश्वरीला वाट पुसतच जडवली आहे. मध्येच एखादी ओवी डोकावून जाते, मग त्यामागाहून त्याचा आध्यात्मिक संदर्भ, गीतेच्या १८ अध्यायांचे ज्ञानेश्वरी हे निरूपण, ‘ॐ नमो जी आद्या... माझा मऱ्हाटाचि बोलु कवतिकें... येणें वरें ज्ञानदेवो सुखिया जाला...’ वगैरे त्यातीलही नवनीत निवडून केलेले लेखकाचे प्रवाही भाष्य, तदनंतर चांगदेवांची, जनाबाईंची, नामदेवांची भेट, हे प्रसंग. ‘इवलेसें रोप लावियेलें द्वारीं... मोगरा फुलला मोगरा फुलला...’ असे हे ‘कैवल्यदायी चांदणे’ मनातला क्षोभ-नाश करून शीतलता बहाल करते, चकोररूपी वाचकाची भूक शमवते.
शेवटी अनाक्रोश क्षमा ज्या माउलीच्या रूपाने प्रकटली, त्या ज्ञानेशाच्या संजीवन समाधीचा अनुपम्य सोहळा, निवृत्तीनाथ या गुरुठायी नत ‘पदपद्मी ठेवा निरंतर’ म्हणणारे अमृताचा निर्झर झालेले आणि नामयाला आपलेसे करणारे ज्ञानेश्वर, ‘नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ’, या प्रसंगवर्णनात प्रत्येक शब्दातून शब्दातीत पाझरणारा भाव डोळे ओलावत राहतो. प्रत्ययी लेखणीचे सामर्थ्य लेखकाने स्वतः गीतेच्या, ज्ञानेश्वरीच्या, श्री शंकराचार्यांच्या भाष्याच्या परिशीलनातून मिळवलेले, ते सहज प्रकटले आहे त्यांच्या अनुभवातून, ‘अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी’, असे.
..................................................................................................................................................................
तुका आकाशाएवढा
घटनात्मक चरित्र-कथन करणारी ही कादंबरी संताजी तेली जगनाड्यो (डे) या तुकाराम महाराजांच्या बालमित्राच्या तोंडून वदवली आहे. इंग्रजीत या निवेदन प्रकाराला बहुधा ‘third person’ म्हणतात. संतू हा तुकारामबुवांचा बालमित्र, त्याला दिसलेले- सखा तुका, व्यापारी महाजन व संसारी तुकाराम, दुष्काळी लोकांसाठी कळवळणारा तुकशेटी, भंडाऱ्याच्या डोंगरावर एकांतात रमणारा आणि सावळ्याला प्रश्न घालणारा तुकोबा, विठ्ठलाचा प्रसाद पावून अंतरी संतोष पावल्यावर अखंड वेदवाणी बोलणारे निःसंग तुकाराम महाराज या कादंबरीतून भेटत जातात. ‘तुकाराम’ नावाचा जो नवा सिनेमा निघाला आहे, तो बहुतांशी याच चरित्रात्मक कादंबरीवर आधारित आहे. मंबाजी, रामेश्वरभट, सालोमालो यात आपल्याला भेटतात, आणि भेटतात ते तुकारामबुवांच्या कीर्तनाला हजेरी लावणारे शिवाजी राजे!
सामान्य माणसाचा प्रपंच-संघर्ष, आनंद-दुःख चक्र आणि एका असामान्य माणसाचा स्वत्वाचा शोध संतूच्या बोली भाषेतून गोनीदा उलगडत जातात, प्रमाण मराठी वाचनाची सवय जडल्यामुळे सुरुवातीची जवळजवळ २० पृष्ठे बोली भाषेचा ठेका धरण्यासाठी प्रयत्नपूर्वक वाचावी लागतात, पण नंतर जी रसाळ निवेदनाची संततधार सुरू होते, ती वाचकाला चिंब भिजवून सोडते, तुकोबांच्या निर्वाणीच्या वेळेपर्यंत ती वाचकाच्या डोळ्यात अवतरलेली असते. अंतःकरणाचा ठाव घेण्यास लेखकाचे शब्द सफल झालेले असतात, ‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने’, हे त्याने वाचकाच्या मनावर ठसवलेले असते.
अपार दुष्काळ, तृषार्त धरती-वेली, अन्नान्नदशा झालेले प्राणी-माणसे, रुष्ट लक्ष्मी असे चित्र सभोती असताना संत तुकारामांच्या अंतरंगात एक विसावा कायम सोबत होता- सावळ्याचे ध्यान! त्याची अंतःकरणात भरून राहिलेली निळाई त्यांना धीर देत होती. १५ दिवसांच्या स्वमग्न प्रार्थनेनंतर स्वतःलाच स्वतः पूर्ण गवसल्यासारखे ते भक्तीने ओसंडून वाहणाऱ्या अंतःकरणाचे धनी होऊन म्हणतात- ‘आनंदाचे डोही आनंद तरंग I आनंदचि अंग आनंदाचे II’ गोनीदांनी त्यांचे हे हरवलेपण वा गवसलेपण फार तन्मयतेने साकारले आहे.
तुकोबांची जडणघडण ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ या संतांच्या पाऊलावर पाऊल ठेवून झाली होती, अंतःकरणातील भक्तीचा झरा निर्मळ होता, तिथे आकाशाची ‘निळाई’ होती, ‘तदन्तरस्य् सर्वस्य’चा साक्षात्कार झाला होता. तो सर्वांच्या अंतःकरणात असतो, पण ज्यांना तो गवसतो, त्यांची ब्रह्मानंदी टाळी लागते, कोणी संत त्या दिवसाला- ‘खराची दिवस’ म्हणतात, तर कोणी ‘खरीचा दिवस’ म्हणतात. असाच भाव स्वामी वरदानंद भारतींच्या पुढील भावकवितेत आढळतो-
धावली हो पावली हो ही विठाई माउली I
चंदनाने मोगऱ्याची माळ कंठी घातिली IIध्रुII
कस्तुरीने कुंकवासी भाळभागी रेखिले I
सूर्य तेजे चांदण्याने सर्व अंगा माखिले II
दूध गायीचे पिपासा अमृताची भागवी I
उन्मनी जी तूर्यगा ती जागृतीसी जागवी I
खंत ती चिंतावली हो तृप्तता लाचावली II१II
यात मुक्तपणे झाला आहे तो सर्वोत्तम भावाचा आविष्कार, त्याला आपण इंग्रजीत ‘Superlatives’ म्हणतो. पण, भक्तीमार्गात जेव्हा ही स्वत्वाची जाणीव होते, तेव्हाच वापरला जावा असा हा अलंकार आहे, याचा आढळ गीतेच्या १०व्या अध्यायात ‘विभूतियोगा’तही होतो. त्या वेळी ‘I shun superlatives’ म्हणायचे नसते!
..................................................................................................................................................................
दास डोंगरी राहातो
घरी हूडपणा करणारा नारबा, कधी नकळत विचारात गढून ‘चिंता वाहतो विश्वाची’ असे उत्तर आईला देणारा नारायण, घर सोडल्यावर स्वतःच सावरलेले, पण आराध्य रामरायाच्या दर्शनाची आस हृदयी बाळगून नाशकापर्यंत वनातून पायपीट करणारे बालयोगी ‘रामदास’ ते समाज-आत्म ज्ञानातून विचार वैभव प्राप्त करून भारतभर लोक-सज्ञान करण्यासाठी अविरत भ्रमण करणारे ‘समर्थ’ असा प्रवास उलगडणारी ही कादंबरी आहे. ‘वाचणाराने ग्रंथ लेकराप्रमाणे हाताळावा’, या एका वाक्यात सहजपणे मुलांना पुस्तक वापरासंबंधी सूचना काय द्यावी, याविषयी गोनीदांनी विक्षेप ठेवला नाही. कोरून ठेवावीत अशी बरीच वाक्ये या कादंबरीत पेरली आहेत.
गोनीदा वाचकाला नियतीशी दोन हात करणारा नारायण दाखवतात, यात भेटणारे रामदास लेचेपेचे व्यक्तिमत्त्व नव्हे, विचार स्थिर आहेत, रोकठोक आहेत, स्वराज्याच्या तीन राजांना डोळस मार्गदर्शन करणारे वज्र निश्चियी योद्धे आहेत, षड्रिपूंना वाकवणारे समर्थ आहेत.
असामान्य माणसं सामान्यांसाखीच दिसतात, त्यांचे असामान्यत्व त्यांच्या वागण्यातून आणि कृतीतून मात्र जाणवत असते, ज्यांच्या सांगण्यात आणि वागण्यात अंतर नसते त्यांनाच आपण ‘संत’ म्हणतो. पोर वयात घर सोडून गेलेला मुलगा सामान्य असता तर वाहवत जाता, पुरश्चरण कधी न करता, ते त्यांनी केले, प्राप्त परिस्थितीत अधिक योग्य म्हणून राष्ट्रविचार त्यांनी धर्मविचारापेक्षा जवळचा मानला आणि नारायणाचे ‘समर्थ रामदास’ झाले म्हणून असामान्य. सगळ्याच संतांना प्रश्न पडले आहेत आणि त्या प्रश्नांच्या उत्तरार्थ त्यांनी स्वतःचे बौद्धिक जीवन ढवळून काढले आहे आणि आपल्या या उत्तर शोधण्याच्या यज्ञात जनमानस उजळून टाकले आहे. फरक एवढाच की, संतांना पडलेले प्रश्न जगत् कल्याणाचे असतात, भाषा-देश-धर्माच्या उत्थानाचे असतात, त्यात त्यांचा किंचितही स्वार्थ असत नाही.
रामदास स्वामींच्या भाषा सौंदर्याबाबत स्वामी वरदानंद भारतींनी ‘मनोबोधा’त (‘मनाच्या श्लोकां’वरील विवरणात) ‘नातिसंक्षेपविस्तरम्’ असा योग्य शब्द उपयोजिला आहे. समर्थांचे बोल रोकडे आहेत, भाषा सरळ-सोट आहे. ‘महाराष्ट्र सारस्वतकार’ वि. ल. भावे यांनीही समर्थ रामदास आणि तुकाराम महाराज या समकालीनांच्या कर्तृत्वाची तुलना केली आहे, पण समाजधारणेसाठी जे जे ज्या ज्या वेळी योग्य, तेच दोघांनीही केले, त्यांचे कार्य आपल्याला कालसापेक्ष सारख्याच तोडीचे मानले पाहिजे.
समर्थ रामदासांनी खूप भ्रमंती केली, दक्षिणेपासून हिमालयापर्यंत ते जाऊन आले, त्यांनी परचक्र पाहिले, नंतर स्वराज्य अनुभवले, त्यास अनेकांकरवी हातभारही लावला. ‘केल्याने होत आहे रे’, हे ‘प्रयत्नवादा’चे बाळकडू महाराष्ट्राला देणारे ते संत. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी त्यांनी लोकांना आळस झटकून उद्युक्त व्हायचे आवाहन केले, हनुमानाची गावोगाव प्रतिष्ठापना केली, ती ‘बळाची उपासना’ घराघरात दृढ चालावी म्हणून. रामदासांना ‘दे रे हरी पलंगावरी’ असा भक्तही अपेक्षित नाही आणि पलंगावर पुरवणारा देवही, म्हणून त्यांची भाषा सामर्थ्यशाली आहे, रोखठोक आहे, त्यात अजिबात अजिजी नाही, शब्दांना कायम ओज आहे. नुसते ‘भीमरूपी महारुद्रा’ वाचले किंवा त्यांनी लिहिलेली हनुमंताची आरती जरी वाचली- ‘सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी l करी डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनी l’ तरी समर्थांच्या रोखठोक शब्द शक्तीचा प्रत्यय यावा, एवढे हनुमंताचे जिवंत शब्दचित्र त्यांनी साकारले आहे.
मुघलांनी केलेले अत्याचार त्यांना दिसत होते, दूर उत्तराखंडात गेल्यावर पण त्याच्या खुणा आणि घाव त्यांना दिसतच होते, या सर्वांच्या पार्श्वभूमीवर त्यांचे रोखठोक होणे एका तेजस्वी धर्माचरण करणाऱ्या स्वाभिमानी तपःपूतास साजेसेच होते.
रामदास स्वामी भ्रमण करत निघाले, पायी चालले की लोक आणि त्यांच्या जीवन व्यथा आणि कथा कळत जातात, वाहन आले की हे कळणे रोडावत जाते, पुराची पाहणी चिखलात उतरून केली की, लगेच लोकांच्या व्यथा कळतात, तिच हेलिकॉप्टरमधून केली की संवेदना कमी होते. ‘Empathy’ आणि ‘Sympathy’मधील हाच फरक साधूसंतांनी अनुभवला, म्हणून त्यांचे लिखाण शतकांनंतरही प्रत्ययकारी वाटते.
‘शिवकल्याण राजा’, ‘श्रीमंत योगी’, ‘जाणता राजा’, ‘निश्चयाचा महामेरू’, ‘उपभोगशून्य स्वामी’ हे सगळे शिवाजीराजांप्रति समर्थांनी योजिलेले शब्द आहेत, यात ‘उपभोगशून्य स्वामी’ या शब्दाचे मला फार नवल वाटते, अगदी ‘ईशावास्य’ उपनिषदांत ‘तेन त्यक्तेन भुंजीथा:’ (enjoy by relinquishing) असे म्हटले आहे. त्याचा उलगडा भल्याभल्यांना नीट होत नाही, तो एका शब्दांत समर्थांनी करवला आहे. अशा ज्ञानमूर्तींसमोर आपण नम्र न व्हावे तर काय, तसेच ‘आनंदवनभूवनी’ हे प्रकरण. एकूण शहाजी राजांपासून संभाजीराजांपर्यंतचे स्वराज्य ज्यांनी अनुभवले, ते मात्र रामाचा दास म्हणून राहण्यात धन्यता मानत, भिक्षेवर जीवन-व्यापन करत, एवढी निरपेक्ष वृत्ती एषणांवर विजय मिळवल्याशिवाय लाभत नाही. उगाच वाटले म्हणून प्रकटणारे हे शब्द नाहीत, अनुभवातून सुलाखून निघालेले आहेत. जे पाहिले, जाणवले, पोळले, ते अनुभवाच्या तप्त साक्षीतून रामदासांनी उतरवले आहे. असे सौदामिनीच्या तेजाने प्रदीप्त समर्थ रामदास आपल्याला या चित्रातून भेटतात.
रामदास शिवरायांचे मार्गदर्शक नव्हते, अशी ओरड करणारे आहेतच अजून, पण त्यांना समर्थांच्या ‘सम दृष्टी’चा परिचय असण्याचे काहीच कारण नाही, म्हणून आपणही त्यांच्या विषम दृष्टीचा कानोसा न घेतलेला बरा.
उल्लेखी टाळीती।
संदर्भे विटाळीती।
अनुल्लेखी मारिती।
त्यासी भले।।
रामदास स्वामी एकटे, त्यांच्या अंगांगात चैतन्य भरलेले, त्यांना विस्कळीतपणा अमान्य, म्हणून वाचकाने त्यांच्या शब्दसामर्थ्यातून अनुभवावे-
बोलणे प्रत्ययाचे।
लिहिणे प्रत्ययाचे।
वागणे प्रत्ययाचे।
गोमटे असे।।
..................................................................................................................................................................
लेखक जीवन तळेगावकर व्यवस्थापन तज्ज्ञ म्हणून काम करतात.
jeevan.talegaonkar@gmail.com
..................................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment