अजूनकाही
मिलिंद बोकील हे मराठीतील एक मान्यवर, प्रसिद्ध कथा-कादंबरीकार आहेत, हे मराठी वाचकांना सांगण्याची खरं तर गरज नाही. बोकील समाजशास्त्रज्ञ आहेत, हेही अनेकांना माहीत असतं. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांइतकीच ही ‘साहित्य, भाषा आणि समाज’, ‘समुद्रापारचे समाज’, ‘कातकरी – विकास की विस्थापन?’, ‘जनाचे अनुभव पुसतां’, ‘गांधी, विनोबा आणि जयप्रकाश’, ‘गोष्ट मेंढा गावाची’, ‘कहाणी पाचगावची’ त्यांची पुस्तकंही वाचनीय आहेत.
बोकील साहित्य संमेलनं, विद्यापीठीय चर्चासत्रं अशा ठिकाणीही फारसे दृष्टीला पडत नाहीत. प्रसारमाध्यमांतून आपलं नाव सतत झळकलं पाहिजे, या गोष्टीचा तर बहुधा त्यांना मनस्वी तिटकाराच असावा.
ते आपलं काम आणि लेखन यांत मग्न असतात, मराठी साहित्य-जगताची फारशी पर्वा न करता!!
या पराङमुखतेमुळे बोकील यांचा काही तोटा होत नाही, पण त्यांच्या वाचकांचा होतो. १ मे रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या जन्माला ६० वर्षं झाली. आणि याच दिवशी मिलिंद बोकील यांनाही ६० वर्षं पूर्ण झाली. कारण दोन्हींची जन्मतारीख आहे – १ मे १९६०. लॉकडाउनमुळे महाराष्ट्राची साठी व्हर्च्युअल पद्धतीनं साजरी केली गेली, तशी ती बोकील यांचीही करता आलीच असती, पण दुर्दैवानं तसं होऊ शकलं नाही. मराठी प्रसारमाध्यमांनाही बोकिलांचा बहुधा विसर पडला!
पण एक विशेष उपक्रम इथं नोंदवायला हवा.
कदाचित बोकिलांच्या साठीचं निमित्त साधून ७ ते १६ फेब्रुवारी २०२० दरम्यान पार पडलेल्या यंदाच्या मॅजेस्टिक गप्पांची सुरुवात बोकील यांच्या प्रकट मुलाखतीनं झाली. प्रसिद्ध कवयित्री नीरजा यांनी ही मुलाखत घेतली. साठीच्या उंबरठ्यावरचा हा सिद्धहस्त लेखक काय बोलतो, कसं बोलतो, किती बोलतो, याविषयी या जाणून घ्यायला हवंच.
या मुलाखतीमध्ये बोकील यांनी धर्म, धम्म, त्यांचं माणसांच्या आयुष्यातलं स्थान हे समजावून सांगितलं, तसंच लोकशाही शासनपद्धती, लोकशाही जीवनपद्धती आणि लोकशाही व्यवहारपद्धतीही समजावून सांगितली. ‘आमच्या सरकारवर आमचा अधिकार’ ही घोषणा लोकशाही शासनपद्धतीतल्या नागरिकांची असायला हवी आणि तशी ती असल्यानंतर काय होतं, हेही त्यांनी समजावून सांगितलं. गांधी, विनोबा, जयप्रकाश नारायण हा तर बोकिलांच्या प्रेमाचा, आदराचा आणि अभ्यासाचा विषय. त्याविषयीही ते या मुलाखतीमध्ये बोलले आहेतच.
आणि त्यांच्या कथा-कादंबरीलेखनाबद्दलही.
चला, तर मग हा ‘साठी’चा लेखक ‘आपल्यासाठी’ काय घेऊन आला आहे, ते जाणून घेऊ…
मिलिंद बोकील यांची मुलाखत - पूर्वार्ध
मिलिंद बोकील यांची मुलाखत - उत्तरार्ध
..................................................................................................................................................................
मिलिंद बोकील यांच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/search
..................................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment