अजूनकाही
माजी न्यायमूर्ती बी. एन. उर्फ बलभीमराव नरसिंहराव देशमुख यांचं २८ मे २०२०च्या मध्यरात्री दीर्घ आजारानं निधन झालं. १९ जानेवारी १९३५मध्ये तुळजापूर तालुक्यात एका छोट्या खेड्यात जन्मलेल्या देशमुख यांनी तब्बल सहा दशकं महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात व्यतित केली. १९६३मध्ये बॅरिस्टर पदवी घेऊन भारतात परतल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात आपल्या वकिली व्यवसायाला सुरुवात केली. तेव्हापासून परवापर्यंत त्यांनी आपलं आयुष्य बहुजन समाजाच्या कल्याणासाठी आचार-विचारांच्या पातळीवर सार्थकी लावलं.
समाजवादी विचारसरणीच्या पर्यावरणात जन्म घेतलेले देशमुख शेकापचे माजी राज्यसभा सदस्य भाई नरसिंहराव यांचे चिरंजीव आणि मराठवाड्यातील शेकापचे ज्येष्ठ नेते भाई उद्धवराव पाटील यांचे भाचे होते. लहानपणापासूनच देशमुख यांच्यावर शेकापच्या विचारसरणीचे, पर्यायाने समाजवादी विचारांचे संस्कार झाले. ते आयुष्यभर त्या विचारांशीच बांधील राहिले.
मागील अर्धशतकात महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात अनेक बदल झाले. पक्षीय राजकारणात देखील अनेक चढउतार झाले. यशवंतराव चव्हाणांनी ‘बेरजेचे राजकारण’ व ‘बहुजनवाद’ या गोंडस नावाखाली शेकापमध्ये फूट पाडून त्यांना काँग्रेसवासी बनवले. मात्र अशाही परिस्थितीत भाई उद्धवराव पाटील व नरसिंहराव देशमुख आयुष्यभर पक्षाशी एकनिष्ठ राहिले. याच संस्कारात वाढलेल्या देशमुख यांनीदेखील शेकाप व समाजवादी विचारधारेशी कधीही प्रतारणा केली नाही.
एक प्रसिद्ध वकील, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, सर्वोच्च न्यायालयाचे वकील अशा अनेक पदांवर त्यांनी काम केलं. खरं पाहता तो काळ पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा यांसाठी अत्यंत अनुकूल होता, मात्र या क्षेत्रातही देशमुख यांनी आपली बहुजनवादी वैचारिक ठेवण शाबूत ठेवत सर्वसामान्य शेतकरी, मजूर कष्टकरी यांच्या कल्याणासाठी आपली हयात खर्ची घातली.
न्यायमूर्ती असतानादेखील सर्वसामान्य पीडितांना न्याय देण्यासाठी आपल्या पदाचा वापर केला. आपली जन्मभूमी मराठवाडा आहे याचा अभिमान बाळगून औरंगाबादला उच्च न्यायालयाचे खंडपीठ होताच त्यांनी मुंबई सोडली आणि औरंगाबादला वकिली व्यवसाय सुरू केला. तत्पूर्वी औरंगाबादला मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं म्हणून सतत प्रयत्नांची पराकाष्ठा केली. १९८२मध्ये जेव्हा खंडपीठ झालं, तेव्हा देशमुख विधानपरिषदेचे सदस्य होते.
या सभागृहातदेखील त्यांनी १९७८-१९८४ या काळात अनेक प्रश्नांवर सरकारला धारेवर धरलं. प्रचंड व्यासंग, समाजवादी बाणा आणि सर्वसामान्य समाजाबद्दल टोकाची तळमळ ही स्वभावगुणवैशिष्ट्यं त्यांच्या ठायी असल्यामुळे सभागृहातदेखील प्रचंड दबदबा त्यांनी निर्माण केला. वकिली व्यवसाय निष्ठेनं सांभाळत शेकापचेदेखील तनमनधनानं ते काम करत.
१९८६मध्ये सर्वप्रथम मुंबई उच्च न्यायालयात सह-न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि १९८७मध्ये ते कायम न्यायाधीश म्हणून नियुक्त झाले. पुढे तब्बल एक दशक त्यांनी न्यायदानाचं नि:पक्षपातीपणे काम केलं. एक निर्भीड न्यायाधीश म्हणून त्यांना ओळखलं जात असे. अनेक प्रसंगी कुणाचाही मुलाहिजा न ठेवता त्यांनी निर्णय दिले. समाजवादी तत्त्वज्ञानापासून ते कधीही विचलित झाले नाहीत.
१९९७मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर काही काळ त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वकिली केली. तिथंही महाराष्ट्रीय जनतेच्या न्यायासाठी सतत झगडले. वयाची ७५ वर्षं पूर्ण केल्यानंतर त्यांनी वकिली व्यवसायातून निवृत्ती स्वीकारली आणि औरंगाबादला स्थायिक झाले. नंतरच्या काळात जनता विकास परिषदेत सक्रिय राहून काम केलं. मराठवाड्यातील असमतोल, पाणीप्रश्न, विकासाचे प्रश्न हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय होते. अगदी वयाची ८३ वर्षं त्यांनी सतत समाजाची सेवा करण्यात व्यतीत केली. मागील दोन वर्षांपासून ते आजारी होते. वृद्धापकाळानं त्यांचं निधन झालं, हे खरं असलं तरी एक सच्चा समाजवादी-सत्यशोधक आपण गमावला. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
.............................................................................................................................................
लेखक व्ही. एल. एरंडे माजी प्राचार्य व राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत.
vlyerande@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment