काल प्रधान मास्तर उर्फ ग. प्र. प्रधान यांचा दहावा स्मृतिदिन होता. २९ मे २०१० रोजी त्यांचं पुण्यात वयाच्या ८८व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त हा विशेष लेख…
..................................................................................................................................................................
१.
प्रधान मास्तर म्हणजेच मूर्तिमंत चैतन्य, चारित्र्यसंपन्नता आणि नीतिमत्ताही. खरं तर मास्तर चारित्र्यसंपन्न आणि नीतिसंपन्न होते, हे सांगण्यासाठी वेगळ्या शब्दांची आणि विशेषणांची गरज नाही, त्यासाठी त्यांचं नावच पुरेसं आहे. शिक्षक, लेखक, कार्यकर्ता, आमदार, ‘साधना’चे संपादक अशा अनेक विशेषणांनी त्यांची ओळख सांगता येईल, पण मास्तर खऱ्या अर्थानं ‘समाजशिक्षक’ होते आणि तीच त्यांची खरी ओळख होती. मास्तरांनी ‘समाजशिक्षक’ म्हणून केलेलं काम हे त्यांचं मोठं योगदान आहे. शिक्षक, लेखक, कार्यकर्ता, आमदार, ‘साधना’चे संपादक या प्रत्येक ठिकाणी ते ‘समाजशिक्षक’ म्हणूनच वावरले.
मास्तर मूलत: साहित्याचे विद्यार्थी. त्यांचं साहित्यावर मनापासून प्रेम होतं. त्यांनी सलग २० वर्षं फर्ग्युसन महाविद्यालयात इंग्रजी साहित्य शिकवलं. शेक्यपिअरवर हा त्यांच्या विशेष आवडीचा विषय होता. टॉलस्टॉयही त्यांना तितकाच आवडत असे. शेवटच्या काळात मास्तरांनी टॉलस्टॉयला लिहिलेली पत्रं वाचल्यावर त्यांनी टॉलस्टॉय केवळ वाचला नव्हता, तर जगलाही होता याची प्रचिती आली.
सर्वसाधारणपणे समाजवाद्यांना पापभिरू, नेभळट, बावळट आणि अकाली पोक्त अशी विशेषणं काहीशा कुत्सितपणे वापरली जातात. त्यात अगदीच तथ्य नसतं असं नाही. पण उदारमतवाद, लोकशाही, स्वातंत्र्य ही मूल्यं प्रधान मास्तरांच्या पिढीतल्या सगळ्याच समाजवादी मंडळींनी पुरेपूर जगली हेही तितकंच खरं. प्रधान मास्तरांचा उदारमतवाद तर अहर्निश होता. याची कितीतरी उदाहरणं देता येतील. उदा. कुणी कितीही टीका केली तरी प्रधान मास्तरांना राग येत नसे. आला तरी फार काळ टिकत नसे. दुसरं उदाहरण म्हणजे मास्तरांवर गोखले, रानडे, म. शिंदे यांचा प्रभाव होता, पण त्यांनी लो. टिळकांचं चरित्रही मोठ्या प्रेमानं, ममत्वानं आणि आदरानं लिहिलं आहे.
१९५६ साली गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य टिळक यांची जन्मशताब्दी होती. त्यानिमित्तानं साहित्य अकादमीने प्रधान मास्तरांवर आगरकरांचा लेखसंग्रह संपादित करण्याची जबाबदारी सोपवली. ती त्यांनी कुशलतेनं पार पाडली आणि अच्युत भागवत यांच्यासह लोकमान्य टिळकांचं इंग्रजीत चरित्रही लिहिलं.
सहानुभूती आणि संवेदनशीलता याचा मास्तर अखंड झरा होते. विषय खुलवून सांगण्याची त्यांच्याकडे हातोटी होती. वागण्या-बोलण्यात नम्रता, साधेपणा हे तर बहुतेक समाजवाद्यांचे सदगुण असतातच. मास्तरही त्याला अपवाद नव्हते.
मास्तर ‘लकाकत्या काळजाचे लेखक’ होते. म्हणजे समाजातल्या कुठल्या ना कुठल्या प्रश्नानं अस्वस्थ होऊन लिहिणं हा त्यांचा स्वभावधर्मच होता. त्यांची पिढी कर्तृत्वाच्या बाबतीतही तशी नशीबवानच होती. देशासाठी त्याग, तुरुंगवास, आंदोलनं… सगळं काही त्यांनी केलं. ते ऐश्वर्य फारसं मिरवलं नाही, पण त्याविषयी सार्थ अभिमानानं लेखन केलं.
‘अमूक अमूक माणसाच्या व्यक्तिमत्त्वाला सच्च्या चारित्र्याचा सुगंध येतो’, असा वाक्यप्रयोग मास्तरांच्या पिढीतल्या अनेकांच्या बाबतीत वापरता येईल. पण मास्तरांइतका बहुधा तो कुणालाच काटेकोर मापाचा होणार नाही.
मास्तरांच्या मनाची निर्मळता ते चालताना त्यांच्या शरीरावर झळकत असे. याचा अर्थ ती ते मिरवत असा नाही, तर पाहणाऱ्याला ती ‘पाहता’ येत असे, असा आहे. हा माणूस ‘सच्च्या चारित्र्या’चा असणार आणि हा मनानंही निर्मळ असणार, हे मास्तरांकडे पाहूनच जाणवायचं.
म्हणूनच २० वर्षं प्राध्यापकी करून ते कधी ‘अहंमन्य’ झाले नाहीत आणि १८ वर्षं विधानपरिषदेचा आमदार राहूनही कधी ‘अट्टल राजकारणी’ झाले नाहीत... ते नेहमीचे प्रधान मास्तरच राहिले. प्राध्यापकी जशी त्यांनी मन लावून केली, तशी आमदारकीही. संसदीय शिष्टाचारांचं पालन करून सरकारला धारेवर धरताना त्यांच्याकडून कधीही असभ्य आणि संसदीय परंपरेला तिलांजली देणारं वर्तन घडलं नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
२००२ साली ‘महाराष्ट्र फाउंडेशन’चा ‘जीवन गौरव पुरस्कार’ मास्तरांना जाहीर झाला. त्याच्या सोहळ्यात एक गंमत झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते डॉ. भालचंद्र नेमाडे. कादंबरीकार, समीक्षक, कवी नेमाडे हे प्रधान मास्तरांचे फर्ग्युसनमध्ये सलग चार वर्षं विद्यार्थी होते, त्यामुळे त्यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना मास्तरांना मनस्वी आनंद झाला. असाच आनंद आदल्या वर्षी नेमाडे यांनाही झाला होता. कारण २००१चा ‘महाराष्ट्र फाउंडेशन’चा ‘जीवन गौरव पुरस्कार’ नेमाडे यांना जाहीर झाला होता आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते प्रधान मास्तर!
या पुरस्कारानंतर मास्तरांनी यापुढे आपण कुठलाही पुरस्कार-सन्मान-सत्कार स्वीकारणार नाही, कुठेही व्याख्यानाला जाणार नाही, असं जाहीर करून टाकलं आणि ते पाळलंही. त्यानंतर त्यांनी केवळ लेखन, वाचनच केलं.
मास्तरांनी लेखनही भरपूर केलं. विशेषत: शेवटच्या सात-आठ वर्षांत तर खूपच. सदाशिव पेठेतल्या घरातून हडपसरच्या ‘साने गुरुजी रुग्णालया’त गेल्यावर त्यांच्या लेखनाला आणखीनच बहर आला. शिवाय त्यांचा लेखनाचा झपाटाही मोठा विलक्षण होता. त्यामुळे शेवटच्या सात-आठ वर्षांत त्यांनी पंधरा-सोळा पुस्तकं लिहिली.
२.
‘आठा उत्तरांची कहाणी’च्या वेळचा प्रसंग. या पुस्तकाचं लेखन पूर्ण करून त्यांनी ते एका तरुण मित्राला वाचायला दिलं होतं. ते वाचून तो त्यांना म्हणाला, ‘मजा येत नाही वाचताना.’ त्यावर मास्तर शांतपणे त्याला म्हणाले, ‘या वयात माझ्याकडून आणखी काय अपेक्षा करणार?’ एका अर्थानं ते खरंच होतं. माझ्या मित्राचा त्यांना एवढ्या स्पष्टपणे सांगण्याचा हेतू एवढाच होता की, ‘साता उत्तरांची कहाणी’ वाचताना जी मजा येते, ती ‘आठा उत्तरांची कहाणी’ वाचताना येत नाही.’
‘साता उत्तरांची कहाणी’ हे मास्तरांचं काहीसं दुर्लक्षित पण अतिशय महत्त्वाचं पुस्तक. ते २ ऑक्टोबर १९८१ रोजी मौज प्रकाशन गृहाकडून प्रकाशित झालं. या पुस्तकाची पहिली आवृत्ती संपायला मात्र सात वर्षं लागली आणि दुसरी आवृत्ती संपायला तर सतरा-अठरा वर्षं. सध्या या पुस्तकाची तिसरी आवृत्ती बाजारात उपलब्ध आहे. मास्तरांचं हे पुस्तक फारसं वाचकप्रिय ठरलं नसलं, तरी ते त्यांचं सर्वांत उत्तम पुस्तक आहे.
‘साता उत्तरांची कहाणी’ हे पुस्तक १९४० ते १९८० या काळातल्या देशातल्या राजकीय घडामोडींचा ललित अंगानं घेतलेला आढावा आहे. हा कालखंड देशातला सर्वाधिक धामधुमीचा, ध्ये-आकांक्षांनी भारलेला कालखंड. या कालखंडात देशात खूप घडामोडी घडल्या. त्याविषयी प्रास्ताविकात मास्तरांनी म्हटलं आहे – “या कालखंडातील सर्व साधनांची जुळणी करून वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून तपशिलाची चूक होऊ न देता इतिहास लिहिणे हे मोठे काम आहे. हे पुस्तक लिहिताना तो उद्देश नव्हता. या कालखंडातील विविध चळवळीत सहभागी होताना वेगवेगळ्या कार्यकर्त्यांच्या मनात जी आंदोलने झाली त्यांचे चित्रण करण्याचा या पुस्तकात मी प्रयत्न केला आहे.. (वा. म. जोशी यांनी) ‘रागिणी’ या कादंबरीत ज्याप्रमाणे काव्य-शास्त्र-विनोद आणला आहे, त्याप्रमाणे राजकारणातील विविध विचार व समस्या यांची चर्चा करावी असे मला वाटले. मात्र माझं हे पुस्तक ही रूढार्थाने कादंबरी नाही. राजकीय घटनांच्या विस्तीर्ण व बदलत्या पटाची पार्श्वभूमी घेऊन विचारांचे व भावनांचे चित्रण करणे हा या पुस्तकाचा उद्देश आहे.”
प्रत्येक विचारसरणीची एक व्यक्तिरेखा आणि त्यांना जोडणारा निवेदक अशी या पुस्तकाची मांडणी आहे. समाजवादी (खानोलकर ), साम्यवादी (वैद्य), रॉयवादी (एम. आर.), पत्री सरकार (देशमुख), आंबेडकरवादी (खैरमोडे), हिंदुत्ववादी (जोशी) आणि गांधीवादी (सामंत) अशा या सात विचारसरणी आणि त्यांचं प्रतिनिधित्व करणारी पात्रं. या मित्रांना आपल्याला पटलेला वा भावलेला विचार घेऊन आपण आधुनिक भारत घडवू शकतो, असा आत्मश्विास असतो. आधुनिक भारत घडवण्याची ही त्यांची सात उत्तरं म्हणजे, ‘साता उत्तरांची कहाणी.’
या परस्परविरोधी विचारसरणींचे लोक प्रधान मास्तरांचे चांगले मित्र होते. आणि निदान त्या काळी तरी या विचारसरणींच्या लोकांमध्ये इतरांच्या विचारांबद्दल आदरही होता; भले त्यांची मतं पटत नसली तरी. या प्रत्येक विचारसरणीच्या दोन-दोन तीन-तीन लोकांशी प्रधान मास्तरांनी चर्चा केली. पुस्तकाचा खर्डा त्यांना दाखवला. त्यांच्याकडून ‘हेच तुमचं म्हणणे आहे ना, हेच तुमचे युक्तिवाद आहेत ना’ असं वदवून घेतलं आणि मगच पुस्तक फायनल केलं. त्यामुळे या पाचही विचारसरणींची या पुस्तकातून चांगल्या प्रकारे ओळख होते. त्यांची सामर्थ्यं समजतात, तसेच त्यांच्या मर्यादांचीही ओळख होते. या प्रवाहांची चांगल्या प्रकारे ओळख झाल्याशिवाय भारतीय राजकारण समजून घेता येत नाही.
मराठीत राजकीय कादंबऱ्या लिहिल्या गेल्या आहेत, पण अशा पद्धतीचं पुस्तक मात्र हेच एकमेव म्हणावं लागेल. त्यामुळे प्रत्येक मराठी तरुणानं हे पुस्तक वाचायला हवं. ज्यांना राजकीय विचारप्रणाल्या समजून घ्यायच्या आहेत, त्यांच्यासाठी तर हे पुस्तक ‘मस्ट’ आहे. खरं तर हा स्वतंत्र सात पुस्तकांचा ऐवज आहे. पण मास्तरांनी तो अवघ्या पाचशे पानांत, एकाच पुस्तकात मांडून दाखवला. तोही अतिशय साध्या, सोप्या भाषेत.
एरवी वैचारिक चर्चा हा तसा काहीसा रुक्ष आणि बोजड विषय. पण मास्तरांनी त्याची मांडणी ललित अंगाने करत पत्रं, आठवणी, गप्पा, फ्लॅशबॅक आणि चरित्र अशी करत तो सुबोध करून टाकला आहे. त्यामुळे पुस्तक एकदा हातात घेतलं की, वाचून होईपर्यंत खाली ठेववत नाही. प्रश्न विचारण्यातून शहाणपण कळतं, तर उत्तरातून हुशारी कळते, असं म्हणतात. तो समसमा योग या पुस्तकाच्या पानोपानी विखुरला आहे.
आपल्या विचारांशी सहमत नसणाऱ्यांचंही म्हणणं कसं समजून घ्यावं आणि प्रतिवाद कायम ठेवूनही त्यांच्याशी कशी चांगल्या प्रकारे मैत्री करता येऊ शकते, याचं मूर्तिमंत उदाहरण स्वत: प्रधान मास्तरच होते. हे पुस्तक त्या अर्थानंही त्यांच्या कलात्मकतेचा सर्वोच्च आविष्कार मानता येईल.
भारतीय राजकारणाची आणि समाजकारणाची जातकुळीच त्यांनी या पुस्तकात उलगडून दाखवली आहे. एकोणिसाव्या शतकाबद्दल असं म्हटलं जातं की, ते मूलगामी परिवर्तनाचं शतक होतं. त्यामुळे आजची कुठलीही समस्या घ्या, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, कलासाहित्य-संस्कृती, त्याचा ऊहापोह आणि त्याची उत्तरंही एकोणिसाव्या शतकात सापडतात. या शतकाकडे गेल्याशिवाय आजच्या कुठल्याच प्रश्नाची उकल होऊ शकत नाही.
‘साता उत्तरांची कहाणी’तील सात विचारप्रवाह याच शतकात उदयाला आले. त्यांच्या बहराचा काळ (रॉयवाद वगळता) विसाव्या शतकातला होता. तो नेमका काय आणि कसा होता हे मास्तरांच्या या पुस्तकात वाचायला मिळतं. म्हणूनच त्याचं महत्त्व मोठं आहे. आता रॉयवादी माणूस महाराष्ट्रात शोधूनही सापडणार नाही, पण एकेकाळी या ‘इझम्स’ने महाराष्ट्रातील अनेकांना कसं आकर्षित केलं होतं, रॉयवाद नेमका काय होता हेही या पुस्तकातून समजतं. या सर्व कारणांमुळे प्रधान मास्तरांचे हे पुस्तक कालातीत आहे.
मास्तरांनी लिहिलेलं कुठलं पुस्तक पन्नास-साठ वर्षांनीही शिल्लक राहील, तर ते ‘साता उत्तरांची कहाणी’!
३.
२००३ सालची गोष्ट. पश्चिम महाराष्ट्रातल्या एका सार्वजनिक वाचनालयानं त्यांच्या विशेष महोत्सवानिमित्तानं एक स्मरणिका काढायचं ठरवलं. त्यासाठी त्यांना प्रधान मास्तरांचा ‘माझं वाचन’ या विषयावर लेख हवा होता. पण सरांनी आदल्याच वर्षी सार्वजनिक उपक्रमांमधून स्वेच्छानिवृत्ती जाहीर केली होती आणि वयाची ऐंशी पार केली होती. त्यामुळे त्यांच्याशी थेट बोलणं त्यांना संकोचाचं वाटत होतं. त्यामुळे त्यांनी मध्यस्थी करायला सांगितली. प्रस्तुत लेखक काहीसा चाचरत साधना कार्यालयात गेला आणि मास्तरांना भेटून त्याने ग्रंथालयाची इच्छा बोलून दाखवली. ग्रंथालयाचं नाव ऐकताच मास्तरांचे डोळे चमकले. त्यांनी तात्काळ होकार दिला. कारण पाचवीनंतर मास्तरांचे वडील त्यांना घेऊन ज्या ग्रंथालयात गेले होते, तेच हे ग्रंथालय होतं. तेव्हा त्यांनी वाचलेल्या ‘गड आला पण सिंह गेला’ (ह. ना. आपटे), ‘सावळ्या तांडेल’ (नाथ माधव) आणि ‘सुखाचा मूलमंत्र’ (ना. ह. आपटे) या तीन पुस्तकांच्या आणि त्या ग्रंथालयाच्या आठवणी सांगितल्या. वेळेत स्वत:च्या हातानं लेख लिहून दिला. तेव्हा त्यांच्या ध्येयनिष्ठेचा आणखी एक पुरावा पाहायला मिळाला.
पुढच्याच वर्षी मास्तरांचं ‘माझी वाटचाल’ हे आत्मकथन प्रकाशित झालं. त्यात त्यांनी आपल्या कौटुंबिक जीवनापेक्षा राजकीय जीवनावर जास्त भर दिला आहे. मास्तरांचं सत्शील आयुष्य ज्यांना जाणून घ्यायचं आहे, त्यांच्यासाठी हे आत्मकथन नक्कीच वाचनीय आहे. त्याचा सूरही नम्रतेचाच आहे. त्यात त्यांनी ‘उपसंहार’ या शेवटच्या प्रकरणात सुरुवातीला लिहिलं आहे, “आयुष्याची ८२ वर्षे सरत आली. व्यायाम न करताही कसला आजार झाला नाही. शरीराचा, मनाचा उत्साह कायम राहिला. कारण ज्यात वाटला तेच आजवर केले.” हे आत्मकथन प्रकाशित झाल्यानंतर जवळपास सहा वर्षांनी मास्तरांचं निधन झालं. तेव्हाही त्यांना कुठलाही आजार नव्हता. त्यांनी मरणोत्तर नेत्रदान व देहदान केलं.
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत - वेध मोदी पर्वातल्या राजकीय घडामोडींचा”
हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...
पूर्वनोंदणी करण्यासासाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
फार वर्षांपूर्वी म्हणजे १९५७मध्ये मराठीतील एक थोर लेखक श्री. म. माटे यांचं निधन झालं. त्यांच्याविषयी लिहिताना भीमराव कुलकर्णी यांनी लेखाच्या शेवटी दोन वाक्यं लिहिली आहेत - “नुकतेच मी कॅन्सरविषयक एका पुस्तकात वाचले की, दीर्घ मनस्तापाची परिणती ही कित्येक वेळा कॅन्सरमध्ये होते. माटेमास्तर कॅन्सरने गेले!” माटेमास्तरांचे मनस्ताप प्रकरण हे स्वतंत्र लेखाचा विषय आहे, त्यामुळे त्याच्या खोलात जायला नको. पण कुठल्याही व्यक्तीच्या वाट्याला आलेल्या दीर्घ मनस्तापाची परिणती कुठल्या तरी गंभीर आजारात होते, हे नक्की. प्रधान मास्तरांच्या वाट्याला कुठलाही दीर्घ मनस्ताप आला नाही, त्यामुळे त्यांची प्रकृती शेवटपर्यंत तशी निरोगी राहिली. व्यायाम न करताही ते टुणटुणीत राहू शकले, आनंदी राहू शकले जवळपास शेवटपर्यंत. हे उदाहरणार्थ थोर वगैरे म्हणावं असंच.
विनयशीलता तर बहुधा त्यांच्याकडे जन्मजातच होती. म्हणूनच ते याच प्रकरणात पुढे लिहितात - “जे करावेसे वाटते ते करायला मिळाले हे माझे भाग्य. मात्र माझी धडपड, मी ज्यात काम करीत होतो त्या चळवळी अनेकदा अयशस्वी झाल्या, तेव्हा मला फार वाईट वाटले. समाजवादी चळवळीची वाताहत झाली, अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांचे जीवन उदध्वस्त होऊन ते निराश झाले याचे मला तीव्र दु:ख होते.” असं प्रामाणिकपणे सांगणं हे धाडसाचं काम आहे. ते मास्तरांकडे होतं.
मास्तरांनी इतरांच्या पुस्तकांना लिहिलेल्या प्रस्तावनांच्या संग्रहाला ‘मला उमजलेले’ असं अन्वर्थक शीर्षक दिलं आहे. आपल्याला उमजलेलं, समजलेलं इतरांना सांगणं, हा मास्तरांचा स्वभावधर्म होता. तो त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत निभावला.
आपलं राहतं दुमजली घर मास्तरांनी साधना ट्रस्टला दिलं, पण त्याची साधी वाच्यताही केली नाही. महिना-दोन महिन्यांनी मास्तरांच्या घरावरची पाटी बदलली गेल्यावर ते दै. ‘सकाळ’च्या संतोष शेणई यांच्या लक्षात आलं आणि मग त्याची ‘बातमी’ झाली!
अशी प्रसिद्धीपराङमुखता, कर्तव्यपरायणता, नम्रता, साधेपणा आणि सत्शील वृत्ती आजकालच्या प्राध्यापकांमध्येही राहिलेली नाही आणि राजकारण्यांमध्ये तर नाहीच नाही!
.............................................................................................................................................
लेखक राम जगताप ‘अक्षरनामा’चे संपादक आहेत.
editor@aksharnama.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Ashwini Funde
Sat , 30 May 2020
अतिशय छान लेख.....
Bhagyashree Bhagwat
Sat , 30 May 2020
निव्वळ निव्वळ अप्रतिम!!!