अजूनकाही
श्रीनिवास विनायक कुलकर्णी हे मराठीतील एक सर्वोत्तम ललितलेखक आहेत. त्यांची ‘डोह’, ‘सोन्याचा पिंपळ’, ‘पाण्याचे पंख’ आणि ‘कोरडी भिक्षा’ ही चार ललितलेखांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. ही चारही पुस्तके मराठी ललितलेखनातील मानदंड मानली जातात. नुकतेच त्यांच्या ‘डोह’ या पुस्तकाविषयीचे ‘डोह : एक आकलन’ हे विजया चौधरी यांनी संपादित केलेले पुस्तक मौज प्रकाशन गृहाने प्रकाशित केले आहे. १९६५ साली प्रकाशित झालेल्या ‘डोह’ या पुस्तकाला २०१५ साली ५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने ‘डोह : एक आकलन’ या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे.
‘डोह’, ‘सोन्याचा पिंपळ’ आणि ‘पाण्याचे पंख’ या पुस्तकांबद्दल दुर्गाबाई भागवत यांनी १९८९च्या ललितच्या दिवाळी अंकात लिहिले आहे - “श्रीनिवास कुलकर्णी यांची प्रतिमा त्यांच्या जीवनातल्या अनुभवांच्या नितळपणावर आधारलेली आहे.
- जरा वळुनि पाहता मागुती
कितीक हृदये सदा चरकल्याविना राहती
ही केशवसुतांची उक्ती एकदा वाचल्यावर विसरता येणार नाही अशी; जरब जन्मभर मनामनावर बसवणारी. माणसाला धोक्याचा कंदील दाखवावा तर केशवसुतांनीच. भले भले या चरकण्याच्या अनुभवातून पिळून निघाले आहेत नि हमेशा निघताना मी पाहते आहे. पण अशीही काही व्यक्तिमत्त्वे मी प्रत्यक्ष पाहिली आहेत, की त्यांना चरकावे लागतच नाही. ही पारदर्शक वाटावीत इतकी स्वच्छ माणसे आहेत. ही काही कुणी सुप्रसिद्ध नाहीत हे ओघानेच आले. पण ती सामान्यांच्या जगात आहेत नि ती आहेत म्हणूनच आपल्याला सुख वाटते. श्रीनिवास विनायक कुलकर्णी अशांपैकीच एक आहेत. अंतर्बाह्य एक, लाजवट वृत्तीचे. पक्क्या निश्चयाचे. चिंतन, जीवन नि लेखन एकरूप झालेले. म्हणूनच त्यांच्या लेखनावर लिहिणे सोपे नाही. इतके दिवस मला म्हणूनच काही लिहिता आले नाही. आजही त्यांच्या लेखनप्रपंचाला केवळ स्पर्श करत मी हे लिहिते आहे. गाभ्यापर्यंत पोहोचणे मला अजून जमत नाही; कारण गाभ्याजवळ गेले की, तिथे अनेक अनुभवी आत्म्यांची गर्दी दिसते. तिच्यात हरवून जाते.”
अतिशय तरल, आशयघन आणि चित्रमय शैली ही कुलकर्णी यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या लेखनाचा हा आविष्कार उजागर करण्याचा प्रयत्न २०१३ साली हिमांशू स्मार्त या नाटककाराने कालदर्शिकेच्या माध्यमातून केला होता. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, ग्रीष्म, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन हे बारा महिने, प्रत्येक महिन्याला सुसंगत असा श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या लेखनातील उतारा आणि या दोन्हींचा आशय अजून घन करणारी रिचा वोरा या चित्रकर्तीची पेंटिंग्ज, असा हा अफलातून प्रयोग होता.
त्याविषयीची आपली भूमिका स्पष्ट करताना या कालदर्शिकेच्या प्रकाशकांनी म्हटलं आहे की, “ऋतुमानानुसार बदलत जाणारी निसर्गसृष्टी आणि तिच्याशी असणारे मानवी जीवनाचे संवादी अनुसंधान हा श्रीनिवास विनायक कुलकर्णींच्या लेखनामधला एक प्रबळ धागा आहे. वर्तमानात आपण या सृष्टीपासून विलग झालेलो आहोत. ही कालदर्शिका आपल्याला खिडकीबाहेर पसरलेल्या ऋतुशी जोडून टाकेल आणि त्यातला उतारा ऋतुचा अनुभव अधिकच समृद्ध करेल. प्रत्येक वेळी उतरा ऋतुशी संबंधित असेलच असे नाही, परंतु उताऱ्याची ऊर्जा घेऊन आपण सृष्टीशी, तळठाव घेणारा, आत्मिक सांधा जोडू शकू. आमचा हा प्रयत्न सृष्टीची हाक आणि आपले अंत:करण यांमधला दुवा ठरेल अशी आम्हाला आशा आहे.”
मराठीमधला हा एकमेवाद्वितीय म्हणावा असा प्रयोग होता.
आता ‘सृजनशाळा’ या संस्थेने हाच प्रयोग काहीशा वेगळ्या अंगाने पुन्हा सादर केला आहे. २५ एप्रिल ते २८ मे २०२० या दरम्यान दर तीन दिवसांनी या संस्थेने एक व्हिडिओ आपल्या यु-ट्युब चॅनेलवर प्रकाशित केला आहे. हे व्हिडिओ अभिवाचनाचे आहेत. वेगवेगळ्या १२ कलाकारांनी हे अभिवाचन केले आहे. यातील साहित्य निवडले आहे श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या लेखनातून. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, ग्रीष्म, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन या बारा महिन्यांच्या अनुषंगाने कुलकर्णी यांच्या साहित्यातील लेखनाचे अंश निवडून त्यांचं अभिवाचन करण्याची ही कल्पना ‘कालदर्शिके’च्या कल्पनेसारखीच, किंबहुना त्याहून भन्नाट आहे.
प्रत्येक व्हिडिओच्या सुरुवातीला हिमांशू स्मार्त यांच्या कालदर्शिकेतील पेंटिंग व मजकुराचं पानही दिलं आहे. हे बाराही व्हिडिओ दीड ते अडीच मिनिट एवढ्या कालावधीचे आहेत. कोल्हापूरचे भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र आणि सृजनशाळा यांचा हा कल्पक प्रयोग आवर्जून पाहावा, इतरांशी शेअर करावा असाच आहे. हे अभिवाचन हा समीक्षेचा विषय नाही, तो अनुभवण्याचा आहे.
सध्याच्या लॉकडाउनच्या काळात ‘खिडकी’ हेच आपल्या जगण्याचं, आनंदाचं निधान झालं आहे. खिडकीबाहेर प्रत्येक ऋतुत नवी रूप पांघरणारी सृष्टी नेमकी कशी असते, याचं विलोभनीय दर्शन या व्हिडिओमधून होतं... तेही प्रत्येक मराठी महिन्यानुसार...
प्रत्येक महिन्यानुसारच्या व्हिडिओ लिंक्स पुढीलप्रमाणे -
चैत्र
वैशाख
ज्येष्ठ
आषाढ
श्रावण
भाद्रपद
अश्विन
कार्तिक
मार्गशीर्ष
पौष
माघ
फाल्गुन
..................................................................................................................................................................
‘डोह : एक आकलन’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5179/Doh-Ek-Akalan
..................................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment