“…वर्गणीदारांचा अप्रामाणिकपणा घायाळ करणारा आहे” : पुरुषोत्तम पाटील
संकीर्ण - मुलाखत
आशुतोष पाटील
  • पुरुषोत्तम पाटील (३ मार्च १९२८-१७ जानेवारी २०१७) आणि ‘कविता-रती’चे काही अंक
  • Thu , 19 January 2017
  • खानदेशचे श्रीपु कविता-रती Kavitarati पुरुषोत्तम पाटील Purushottam Patil बा. भ. बोरकर B.B. borkar पोएट बोरकर Poet Borkar

काव्य, काव्यविचार, काव्यसमीक्षा व कविविमर्श यांनाच केवळ वाहिलेल्या ‘कविता-रती’ या द्वैमासिकाचे संस्थापक-संपादक व कवी पुरुषोत्तम पाटील यांचं १७ जानेवारी रोजी वयाच्या ८९व्या वर्षी निधन झालं. मराठी साहित्यविश्वात ‘पुपाजी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या व्रतस्थ संपादकाला ‘खानदेशचे श्रीपु’ असंही सार्थ अभिमानानं म्हटलं जायचं. ३० नोव्हेंबर १९८५ रोजी त्यांनी ‘पोएट बोरकर’ अर्थात बा.भ.बोरकर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षाचं औचित्य साधून ‘कविता-रती’ हे द्वैमासिक सुरू केलं. गेली तीस वर्षं ते जवळपास अव्याहतपणे सुरू आहे. अलीकडे या मासिकाची धुरा त्यांनी प्रा. आशुतोष पाटील यांच्यावर सोपवली होती. त्यांनीच पुपाजी यांची ‘‘कविता-रती’सूची (नोव्हेंबर १९८५ ते डिसेंबर २०१२)’ या पुस्तकासाठी घेतलेल्या प्रदीर्घ मुलाखतीचा संपादित अंश. पुरुषोत्तम पाटील यांच्या प्रस्तुत मुलाखतीत एका वाङ्मयीन नियतकालिकाच्या संपादकांचं व्यक्तित्व, त्यांची झालेली जडणघडण, ‘कविता-रती’चं संपादकीय धोरण व त्याचं वेगळेपण, वाङ्मयविषयक दृष्टिकोन व त्याची अर्थपूर्णता, तसंच वाङ्मयीन नियतकालिकांचं जीवितकार्य व त्यांची स्थितिगती यावर प्रामुख्याने भर दिलेला आहे.

--------------------------------------------------------------------

आशुतोष :  पाटील सर, एक कवी म्हणून आणि वाङ्मयीन नियतकालिकांचे संपादक म्हणून आपली वाटचाल जाणून घेताना सगळ्यात आधी आपल्या बालपणाविषयी जाणून घ्यायला आवडेल. आपलं बालपण कसं गेलं? बालपणीच वाङ्मयाचे काही संस्कार आपल्यावर होत गेले का?

पुरुषोत्तम : माझं बालपण खानदेशातल्या खेड्यात गेलं. वडील प्राथमिक शिक्षक असल्याने त्यांच्या सारख्या बदल्या होत. त्यामुळे फाफोरे, ढेकू (ता. अमळनेर) या गावांमध्ये बालपण गेलं. आई-वडिलांचा पहिला मुलगा असल्याने माझे खूप लाड झाले होते. माझा स्वभावही हट्टी होता. शिक्षणासाठी मी मामाच्या गावाला- बहादरपूरला (ता. पारोळा) आलो. गणितापेक्षा भाषाविषय शाळेत असल्यापासूनच आवडायचा. वडील स्वत: शिक्षक असल्याने त्यांनी माझ्याकडून अभ्यास करून घेतला. मला आठवतं, दु. आ. तिवारींचे काही पोवाडे त्यांनी माझ्याकडून पाठ करून घेतले होते. काव्याशी झालेली माझी ही सुरुवातीची ओळख. बहादरपूरमधूनच मराठी फायनलची-सातवीची परीक्षा मी उत्तीर्ण झालो. त्यानंतरच्या शिक्षणासाठी अमळनेरला आलो. इंटपर्यंतचा अमळनेरमधील काळ माझ्या वाङ्मयीन घडणीच्या दृष्टीने महत्त्वाचा वाटतो. प्रताप हायस्कूल व कॉलेजचं ग्रंथालय, व्हिक्टोरिया पीस मेमोरिअल लायब्ररी (आताचं साने गुरुजी वाचनालय) अशी ग्रंथभांडारं मला उपलब्ध झाल्यामुळे आपोआपच वाचनाची गोडी लागली. खरं तर मला चित्रकलेची खूप आवड होती. पण वाचनाच्या प्रचंड नादामुळे ती मागे पडली. मॅट्रिकनंतर कॉलेजला गेलो. तिथंही वाचनाला पोषक वातावरण होतं. आर.के.कुलकर्णी, म.वि.फाटक असे मराठीचे उत्तम शिक्षक लाभले. माझं मराठी चांगलं व्हायला मदत झाली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्राज्ञ परीक्षेत मी महाराष्ट्रात पहिला आलो, आपटे पुरस्कारही मिळाला. असा सगळा पायाभरणीचा काळ होता.

आशुतोष : इथून पुढे आपल्या आयुष्यात खूप मोठा बदल झाला. उच्च शिक्षणासाठी आपण पुण्याला गेला.

पुरुषोत्तम : हो, इंटरनंतर, १९४९ साली मी पुण्याला फर्गसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पण त्यावेळी शिक्षणापेक्षा एक मोठं वाङ्मयीन केंद्र म्हणून पुण्याविषयीचं आकर्षण मनात होतं. मोठ-मोठे साहित्यिक तिथं असतात हे माहीत होतं. त्यामुळे पुण्यात आल्यावर सुरुवातीला हाल झाले तरी चिकटून राहिलो. फर्गसनच्या ‘साहित्य-सहकार’चा आल्याबरोबरच चिटणीस म्हणून निवडून आलो. आठ-पंधरा दिवसांनी ‘साहित्य-सहकार’च्या सभा होत. त्यात वाङ्मयीन कृतींची चर्चा होत असे. प्रा. रा.श्री.जोगांचं मार्गदर्शन मिळत असे. व.दि.कुळकर्णी, अशोक केळकर, सरिता पदकी (त्यावेळच्या शांता कुलकर्णी), शरच्चंद्र चिरमुले, स.शि.भावे असे सहअध्यायी लाभले. त्यातही व.दि.कुळकर्णींशी निकटा स्नेह जुळला. यातूनच पुण्यातल्या वाङ्मयीन घडामोडींशी जोडला गेलो.

त्या काळात पुण्यातील वाङ्मयीन वातावरण उत्साहपूर्ण होतं. त्याचा माझ्या वाङ्मयीन बांधणीवर फार मोठा परिणाम झाला. त्याच सुमारास ‘सत्यकथा’त, ‘मौज’ दिवाळी अंकात माझ्या कविता प्रसिद्ध होऊ लागल्या. पुण्यातल्या साहित्यिक वर्तुळात हळूहळू मानमान्यता मिळू लागली. पण वाङ्मयीन गोष्टीत जास्त गुंतत गेल्याने अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं. व.दि., प्र.शं.जोशी व मी – आम्ही तिघांनी ड्रॉप घेतला आणि परीक्षेला बसलोच नाही. गाडी रूळावरून जी खाली उतरली ती रूळावर यायला बराच वेळ लागला. त्याचं कारण असं की, प्रत्येकाच्या आयुष्यात त्यावेळी महत्त्वाचं असं काहीतरी खदखदत होतं…ड्रॉप तर घेतला, पण घरी तोंड कसं दाखवायचं म्हणून इथंच काहीतरी नोकरी पत्करावी, परीक्षेला बसावं आणि नंतर घरी जावं असं ठरवलं. असा विचार करून एक दिवस कवी बा.भ. बोरकरांकडे गेलो. त्याआधीच एक नवोदित कवी म्हणून माझा परिचय बोरकरांना झालेला होताच. माझं हस्ताक्षर त्यांनी पाहिलं आणि पहिल्या भेटीतच त्यांचा लेखनिक म्हणून, सेक्रेटरी म्हणून मला घेतलं. त्यांच्या कुटुंबात- अगोदरच पाचसहा जणांचं कुटुंब- माझी भर पडली. बोरकरांचा पगार फार नव्हता. पण त्यांनी माझी अडचण समजून घेतली. मग बोरकरांकडे, त्यांच्या सहवासात १९४८ ते१९५२ पर्यंत साडेतीन-चार वर्षं घालवली. ती माझ्यासाठी फार महत्त्वाची ठरली. काव्याच्या दृष्टीने व जीवनाच्या दृष्टीनेही. त्या तरुण वयात निराशेचे झटके येण्याचे प्रसंग खूप यायचे. बोरकर त्यांच्या पद्धतीने समजावणी घालत असत. एक जीवनवादी, आशावादी दृष्टिकोन तयार झाला. पुढे आयुष्यात अनंत संकटं आली, काही संकटांखाली तर सहज चुराडा झाला असता, तरीही त्या संकटांना तोंड देता आलं. कारण बोरकरांनी जी जीवनदृष्टी दिली ती फार महत्त्वाची होती. त्याच काळात मंगेश पाडगावकर आणि इतरही कविमंडळी बोरकरांकडे येत असत. काव्याच्या मैफली झडत. ते भारावलेलं वातावरण होतं.

आशुतोष : याचा अर्थ आपली शैक्षणिक प्रगती जरी त्या काळात खुंटली असली तरी बोरकरांच्या सहवासामुळे कवितेचे संस्कार आपल्यावर घडत गेले.

पुरुषोत्तम : हो, हो, अगदी खरंय. बोरकर स्वत:चा उल्लेख नेहमी ‘पोएट बोरकर’ असा करत. कवी आणि कवितेची प्रतिष्ठा त्यांनी आयुष्यभर जपली. काव्याच्या अर्थपूर्ण सौंदर्याचा उत्कट अनुभव त्यांनी रसिकांना दिला. त्यामुळे त्यांचा सहवास माझ्या काव्यविषयक दृष्टीची बांधणी करण्यासाठी निश्चित उपकारक ठरला.

आशुतोष : पण मग आपलं शिक्षणाचं गाडं रुळावर कसं आणि कधी आलं?

पुरुषोत्तम : ते रूळावर यायला जरा वेळच लागला. मधल्या काळात माझा मित्र काशिनाथ पोतदार याच्या आग्रहामुळे मुंबईत ‘नवशक्ती’मध्ये उपसंपादक (साल १९५३) म्हणून गेलो. प्रभाकर पाध्ये संपादक होते. परंतु माझ्या निर्मितीक्षम प्रतिभेला वाव देणारं वातावरण वर्तमानपत्रात नव्हतं. इंग्रजी मजकूर घ्यायचा आणि त्याचं मराठीत भाषांतर करायचं. दुसरीकडे आईचे घरून सारखे निरोप – ‘तू आता काही मुंबईला थांबू नको, ताबडतोब घरी निघून ये. खानदेशातच नोकरी बघ. हाक मारली तर येता आलं पाहिजे अशा ठिकाणी नोकरी कर.’ आईवर माझा जीव. त्यामुळे ‘नवशक्ती’ची नोकरी सोडून मी खानदेशात परत आलो आणि बहादरपूरला हायस्कूलमध्ये उपशिक्षकाची नोकरी स्वीकारली. तोपर्यंत बी.ए.कुठं झालो होतो! आठ दिवस काढून बी.ए.ची परीक्षा दिली. सेकंड क्लास मिळाला. हायस्कूलमधील शिक्षकाची नोकरी टिकवायची तर बी.टी. करणं आवश्यक होतं. म्हणून मग कोल्हापूरच्या बी.टी. कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. हॉस्टेलला राहू लागलो. १९५६-५७चा काळ. तिथंच रणजित देसाई आणि शंकर पाटील यांच्याशी मैत्री झाली. विजया राजाध्यक्ष (त्यावेळच्या विजया आपटे) तिथंच होत्या. असा सगळा ‘सत्यकथा’च्या लेखक-कवींचा चांगला ग्रूप जमला होता. आम्ही एकत्र बसून ‘सत्यकथा’च्या अंकाची चर्चा करत असू. त्यातून आलेल्या कविता वाचत असू. मला अजूनही आठवतं – एका अंकात विंदांची ‘त्रिवेणी’ ही कविता प्रसिद्ध झाली होती. ती वाचायची आग्रहाची फर्माइस सगळे मला करत असत. अशा तऱ्हेने ते दिवस गेले. त्यानंतर १९५८ साली पुणे विद्यापीठाची एम.ए.ची पदवी मिळवली. १९५९ ते १९६१ या काळात जळगाव जिल्ह्यातील चिंचोली, हातेड या गावांतील शाळांमध्ये मुख्याध्यापक म्हणून नोकरी केली. त्यानंतर १९६१ साली धुळे येथील श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या महाविद्यालयात मराठी विषयाच्या प्राध्यापकाची नोकरी मिळाली. १९८८ साली निवृत्त झालो. मधल्या १९७४-७६ या काळात संस्थेच्या दोंडाईचा येथील नव्या महाविद्यालयाचं प्राचार्यपददेखील सांभाळलं. प्राध्यापकाची नोकरी करताना ह.श्री. शेणोलीकर, भालचंद्र नेमाडे, कमल देसाई अशी लेखक मंडळी सहकारी म्हणून लाभली. त्यांच्याशी स्नेह जुळला.

आशुतोष : ‘कविता-रती’ हे केवळ काव्याला आणि काव्यसमीक्षेला वाहिलेलं नियतकालिक सुरू करावं असं आपणास का वाटलं?

पुरुषोत्तम : सर्वसामान्य माणसाचा स्वभाव असतो की, मुळातून ज्या गोष्टीवर माणसाचं प्रेम असतं, त्या गोष्टीसाठी माणूस वाटेल त्या खस्ता खायला तयार होतो. काव्याबद्दल मला अतिशय प्रेम आहे. म्हणून काव्यासाठी खस्ता खाण्याचा प्रसंग आला तरीदेखील माघार घ्यायची नाही असं मी ठरवलं होतं. ‘कविता-रती’च्या निर्मितीमागे ही माझ्यातल्या काव्यप्रेमाची शक्ती होती. दुसरी गोष्ट, हे एक प्रकारचं मोठं साहस होतं. अशा तऱ्हेच्या नियतकालिकाचं संपादन करणं म्हणजे चांगली कविता देणं, नवीन उभारीच्या कवींच्या काव्याला उत्तेजन देणं, तसंच काव्यावरची, काव्यग्रंथांवरची खोलवर जाणारी समीक्षा मिळवणं या गोष्टी आव्हानात्मक होत्या. तरीसुद्धा ते पेलण्याचं मी ठरवलं. एक कारण असू शकतं की, थोडाफार चांगला कवी असल्यामुळे काव्याची बऱ्यापैकी समज मला आहे असं मला वाटतं. त्याला अनुभवाचंही पाठबळ होतं. जवळजवळ २८ वर्षं महाविद्यालयात अध्यापनाचं काम केलं. त्यामुळे चांगलं काव्य कोणतं, याबद्दलची थोडीफार समज आलेली होती, तिचाही आधार होता की, आपण नियतकालिक चालवू शकू.

आशुतोष : मला वाटतं की, ‘अनुष्टुभ’च्या संपादनाचा अनुभवदेखील ‘कविता-रती’ सुरू करताना आपणाला आत्मविश्वास देणारा ठरला असावा. ‘अनुष्टुभ’च्या संपादनाचा आपला अनुभव काय? आणि त्या अनुभवाचा आपल्या संपादक म्हणून जडणघडणीत काही योगदान आहे काय?

पुरुषोत्तम : ‘अनुष्टुभ’मुळे मलाच माझ्यातील संपादन कौशल्याचा साक्षात्कार झाला आणि असंख्य लेखक-कवी व समीक्षकांशी जोडला गेलो. १९७७ साली रमेश वरखेडे यांच्या संपादनाखाली ‘अनुष्टुभ’चे सुरुवातीचे तीन अंक निघाले आणि जानेवारी १९७८च्या अंकापासून संपादकपद माझ्याकडे आलं. पु.शि.रेगे, प्रभाकर पाध्ये, नरहर कुरुंदकर हे त्यावेळी ‘अनुष्टुभ’चे अधिदेशक होते. त्यांच्या चिकित्सक देखरेखीखाली माझं संपादनकार्य सुरू झालं. मनमाडला प्राचार्य म.सु.पाटलांच्या बंगल्यावर साप्ताहिक, पाक्षिक बैठका होत. ‘अनुष्टुभ’च्या पुढच्या अंकासंबंधीचा आराखडा, काही वाङ्मयीन प्रश्न, कोणत्या लेखक-कवींना विनंती करायची त्याची यादी- अशा खूप गोष्टींवर चर्चा होत असे. वेळेचं भान नसे. मी ‘अनुष्टुभ’च्या दप्तराची भली थोरली पिशवी सांभाळत धुळ्याला परते. ‘अनुष्टुभ’ प्रतिष्ठानची नोंदणी झाली होती. संपादनाबरोबर कार्यवाहपदाची जबाबदारीही माझ्यावर सोपवली गेली होती. साहित्यिकांशी पत्रव्यवहार, प्रत्यक्ष छपाईचं काम, प्रूफं तपासणं, अंक पोस्टानं रवाना करणं अशी अनेक कामं करत होतो. ‘अनुष्टुभ’चा पायाभरणीचा काळ होता. अंकांना चांगलं रूप प्राप्त होत होतं. अनेक नामवंत लेखक-कवींचं साहित्य विनामोबदला मिळत होतं. गंगाधर पाटलांचं ‘रेखेची वाहाणी’ हे सदर आणि द.ग.गोडसे यांची ‘लोकाविष्कारासंबंधी’ ही लेखमाला हे साहित्य खूप गाजलं. भासत सासणे यांच्यासारख्या प्रतिभाशाली नवोदितांच्या लेखनाला आवर्जून स्थान देण्यात येई. या काळातील कळसाध्याय ज्याला म्हणता येईल तो म्हणजे ‘अनुष्टुभ’चा पु.शि.रेगे विशेषांक. रेगेंच्या निधनानंतर प्रकाशित झालेला हा विशेषांक त्यांच्या साहित्याचा सर्वांगीण, सखोल परामर्श घेणारा आहे. ‘अनुष्टुभ’च्या प्रारंभीच्या साडेपाच वर्षांच्या कालखंडात आपण संपादक होतो, हे भाग्य मोठं होतं. त्या कामापासून आपण दुरावलो याची व्याकूळताही तेवढीच मोठी होती.

आशुतोष : वाङ्मयीन नियतकालिकाच्या संपादनाचा एक मौलिक अनुभव घेऊन आपण ‘कविता-रतीकडे वळलात. पण एक स्वतंत्र आणि विशिष्ट वाङ्मयप्रकाराला वाहिलेलं नियकालिक सुरू करताना आपल्या मनात नेमकं काय होतं?

पुरुषोत्तम : केवळ काव्याला वाहिलेलं एखादं नियतकालिक काढलं तर, हा विचार मनात एकसारखा येऊ लागला होता. सर्व साहित्यप्रकारांना वाव असलेलं चांगलं दर्जेदार नियतकालिक काढणंदेखील कठीण असतं, याचा इतिहास डोळ्यासमोर होता. ‘सत्यकथा’, ‘उगवाई’सारख्या नियतकालिकांनी माना टाकलेल्या, साहित्यसंस्थांची म्हणून जी नियतकालिकं प्रसिद्ध होत तीही नीट चालत नव्हती, ती अनियमितपणे निघत. अपवाद ‘अनुष्टुभ’ व ‘अस्मितादर्श’ यांचा. अशा स्थितीत एकाच साहित्यप्रकाराला वाहिलेलं नियतकालिक चालवणं किती अवघड याची कल्पना होती. पण असा जिद्दीचा एक प्रयोग फार पूर्वी आपल्या खानदेशातूनच झाला होता. त्याचं स्मरणं झालं आणि मनाला उभारी आली.

१८८७ साली जळगावहून नारायण नरहर फडणीस यांनी केवळ काव्यालाच वाहिलेलं ‘काव्यरत्नावली’ हे मासिक सुरू केलं होतं. ते त्यांनी एकट्यानं तीन तपांहून अधिक काळ चालवलं. त्यानंतर कितीतरी वर्षं असा भरघोस प्रयत्न मराठी नियतकालिकांच्या क्षेत्रात झालाच नाही. एका शतकानंतर का होईना तसं नियतकालिक सुरू व्हावं असं सारखं वाटे. अन्य नियकालिकांचा ढाचा काहीसा ठरून गेल्यासारखा – दोन-तीन कथा, एखाद-दुसरा ललित निबंध, वैचारिक लेखन, प्रवासवर्णन, आठ-दहा कविता, पुस्तक परीक्षणं इत्यादी. समर्थ संपादक असला तर या सर्व गोष्टींना न्याय मिळततोही, पण एखाद्या विशिष्ट वाङ्मयप्रकाराचं व्यवस्थित संगोपन व विकास यासाठी त्यातून पुरेसा वाव मिळत नाही. म्हणून विशेषीकरणाच्या दिशेनं वाटचाल करणं आवश्यक वाटे. ‘कविता-रती’ सुरू करण्यामागे ही भूमिका होती. या विशेषीकरणाचे चार पदर होते – काव्य, काव्यविचार, काव्यसमीक्षा आणि कविविमर्श. यांच्या संदर्भातील सामग्री अंकातून देता यावी, हे मनात होतं.

आशुतोष : ‘कविता-रती’च्या संपादकीय धोरणाविषयी काय सांगाल? कविता हा कोणत्याही काळात मोठ्या प्रमाणात लिहिला जाणारा वाङ्मयप्रकार आहे. त्यामुळे काव्यविषयक नियतकालिक चालवताना कवितेसंबंधी एक निश्चित धोरण ठरवणं आवश्यक आहे. एक संपादक  म्हणून आपण त्याबद्दल काय सांगाल?

पुरुषोत्तम : ‘कविता-रती’चं संपादकीय धोरण निश्चित करताना दोन मार्ग माझ्यासमोर होते. एक होता, मिळतील तशाच कविता छापत राहायच्या आणि काव्यसमीक्षात्मक लेखनही मिळेल तसंच छापत राहायचं किंवा अत्यंत उच्च दर्जाची कविता – ज्याला ‘ए’ प्लस म्हणता येईल अशी कविता आणि उच्च दर्जाची काव्यसमीक्षा प्रसिद्ध करायची असा दुसरा मार्ग होता. अतिशय चांगली जी कविता आहे तिची निवड करता येत होती. गेल्या वीस-वाबीस वर्षांच्या काळात तशा चांगल्या कविता-मान्यवरांच्या व नवोदितांच्याही ‘कविता-रती’मधून आल्या आहेत. पण त्याबरोबर अगदी अगदी नवोदितांचा जो वर्ग आहे त्याच्याकडेही विशेष लक्ष देण्याची गरज आहे असं मला वाटत होतं. नवोदित कवींचे जर ‘अ’, ‘ब’, ‘क’ असे तीन वर्ग मानले तर ‘क’ वर्गामधल्या कवींच्या ‘कविता-रती’ने कधीच छपल्या नाहीत. मधला ‘ब’ वर्ग बराच मोठा ४०-५० टक्के कवींचा वर्ग असतो. या वर्गातल्या कवींच्या कवितांचं मी बारकाईनं निरीक्षण केलं. त्या काळजीपूर्वक वाचून मला असं जाणवलं की, त्यातल्या काही कवींच्या कवितांमध्ये काहीतरी स्फुल्लिंग आहे, काहीतरी चमक आहे. त्याला उत्तेजन दिलं पाहिजे. ते दिलं तर पुढे चांगली कविता निर्माण होऊ शकेल असा मनोमन विश्वास वाटत होता. तो काही अंशी पुढे खराही ठरला. अशा रीतीनं ‘कविता-रती’ने हे जे सीमारेषेवर – पहिल्या वर्गात जाऊ न शकणारे कवी आहेत, त्यांच्या विशेषांकडे लक्ष गेलं नाही तर ती उपेक्षा त्यांच्या विकासाला मारक ठरते, ते बाजूला पडतात - तसं होऊ दिलं नाही. इंद्रजित भालेराव, संतोष पवार अशा नवीन नवीन कविमंडळीची सुरुवातीची कविता याच भूमिकेतून आवर्जून छापली. दुसरी एक गोष्ट माझ्या लक्षात होती, केवळ एका उच्चभ्रूपणाचा आग्रह धरणाऱ्या, साहित्यातील दर्जाबद्दल आग्रही असणाऱ्या मंडळींना अजूनही हे लक्षात येत नाही की, आज जे मराठीतील मान्यवर कवी आहेत त्यांच्या सुरुवातीच्या काळातील कविता खुद्द त्या कवींनाही सामान्य वाटतात.

मधल्या वर्गाकडे काळजीपूर्वक बघितलं पाहिजे. म्हणून मी त्यांच्या कविता वाचतो. त्याच्यातले गुणविशेष लक्षात घेतो. दोष असले तर त्या कवीला कळवतो की, हे असं असं आहे, त्यामुळे कविता उणावते. प्रामाणिकपणे कवितेबद्दल कळवतो. त्यालाही ते पटतं आणि त्यात सुधारणाही होते. असा हा माझा मार्ग आहे – अशा तऱ्हेचा मध्यममार्ग ‘कविता-रती’ला अधिक पसंत पडतो. वर्गातली बाकीची मुलं सर्वसाधारण उंचीची असतात. एखादाच मुलगा दहा फूट उंचीचा असतो. तेवढ्यावरून त्या वर्गाची उंची मोजता येत नाही. साहित्याच्या किंवा काव्याच्या उंचीचंही तसंच आहे. तुम्हाला काव्याच्या क्षेत्राचं एक सर्वसाधारण चित्र लक्षात घ्यायचं असेल तर तुम्हाला इतरांकडेही पाहावं लागेल.

आशुतोष : काव्यसमीक्षात्मक लेखन हे ‘कविता-रती’चं दुसरं महत्त्वाचं अंग आहे. ते सदृढ व्हावं यासाठी कोणते प्रयत्न केले?

पुरुषोत्तम : मुळात चांगली कविता मिळणं जितकं कठीण, तितकंच चांगलं काव्य समीक्षात्मक लेखन मिळणंही कठीण आहे. त्यामुळे ते मिळवण्यासाठी सातत्याने आणि जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागले. कवितालेखन करत असताना किंवा प्राध्यापकाची नोकरी करताना वाङ्मयक्षेत्रातली निरनिराळी जी नामवंत मंडळी आहेत, त्या सगळ्यांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध निरनिराळ्या कारणांनी प्रस्थापित झाले होते. त्यापैकी काही तर जिवलग स्नेही होते. तेव्हा या सगळ्या मंडळींचं लेखन साहाय्य ‘कविता-रती’च्या वाटचालीत फार मोठ्या प्रमाणात व अतिशय उत्साहानं मिळालं. पण अशा नामवंतांकडून मिळणारं काव्यसमीक्षात्मक लेखन विशिष्ट प्रसंगीच, म्हणजे विशेषांकासाठी किंवा दिवाळी अंकासाठी मिळतं, एरवी चांगलं समीक्षात्मक लेखन मिळवणं ही मोठी अडचणीची बाब ठरते.

‘कविता-रती’ला किचकट, दुर्बोध काव्यसमीक्षा नको याचा अर्थ ती बाळबोध, वृत्तपत्रीय असावी असंही नाही. अलीकडे वर्तमानपत्रांच्या किंवा काही साप्ताहिकांमधून जी समीक्षा प्रसिद्ध होते, तिथं त्या काव्याग्रंथाला न्याय दिला जातो असं नव्हे. ती वरवरची समीक्षा असते. सक्षम समीक्षक मराठीमध्ये फार थोडे आहेत. अशा परिस्थितीतही काही चांगलं समीक्षात्मक लेखन ‘कविता-रती’नं दिलेलं आहे. जुन्या-जाणत्या समीक्षकांसोबत काही नव्या समीक्षकांकडून असं लेखन मिळवून छापलं आहे. अनेक चांगल्या, उत्तम दर्जाच्या कवितासंग्रहांची विस्तारानं आलोचनात्मक परीक्षणं दिली आहेत. मध्यम दर्जाच्या संग्रहांचा परिचय करून दिला आहे. कवितेचा अंतर्बाह्य उलगडा करून देणारी कवितांची मर्मग्रहणं हा ‘कविता-रती’चा खास विभाग मानावा लागेल. आणि कवींवरील विशेषांकांचं कविविमर्श म्हणून असलेलं संदर्भमूल्यही महत्त्वाचं आहे.

आशुतोष : ‘कविता-रती’मधून आलेली कविता आणि काव्यसमीक्षात्मक लेखन यांना आपण मराठी कवितेच्या किंवा काव्यसमीक्षेच्या कोणत्या प्रवाहात किंवा वर्गात बसवाल?

पुरुषोत्तम : तुमचा हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. कारण आपल्याकडं कवितेचं-साहित्याचं वर्गीकरण करण्याची एक पद्धत आहे. ही प्रेमकविता, ही सामाजिक, ती अस्तित्ववादी, असे कप्पे करून कवितेचा विचार केला जातो आणि त्याप्रमाणे आपण त्या कविता लिहिणाऱ्या कवीवंर शिक्के मारत असतो. अस्तित्ववादी वा वास्तवादी कविताच श्रेष्ठ, रोमँटिक कविता कनिष्ठ असा विचार करणं ठीक नाही. ‘कविता-रती’तील कविता व काव्यसमीक्षा या दोहोंकडे बघता ही शिक्के मारण्याची, वर्गीकरणाची वृत्ती त्यातून तुम्हाला जाणवणार नाही. कविता कोणत्या शिक्क्याची आहे हे महत्त्वाचं नाही, तर ‘कवितापण’ कितपत शाबूत आहे, या कसोटीवर उतरलेल्या कविताच ‘कविता-रतीतून आलेल्या आहेत. कवितेची समीक्षा ही किती बहुविध असू शकते याचा प्रत्यय ‘कविता-रती’मधील काव्यसमीक्षा देते. तिथं कोणताही एक वर्ग प्रभावी नाही. ‘कविता-रती’ने नेहमीच काव्यन्मुख कवितेच्या ‘कवितापणा’वर लक्ष केंद्रित करणारी भूमिका घेतली आहे.

आशुतोष : मराठीतील अनेक नियतकालिकांना वर्गणीदारांचं पुरेसं पाठबळ मिळालं नाही. म्हणून त्यांचा अवतार अल्पावधीतच आटोपला हा इतिहास आहे. आपलाही अनुभव याबाबतीत फारसा चांगला नाही, हे वेळोवेळी आपण लिहिलेल्या संपादकीयांवरून लक्षात येतं.

पुरुषोत्तम : तुमचं म्हणणं बरोबर आहे. कोणत्याही नियतकालिकाचा मुख्य आधार म्हणजे वर्गणीदार. कै. पु.शि.रेगे यांनी आपल्या ‘छंद’मधील एका संपादकीयात “साहित्याचा जमाखर्च हा शेवटी ते वाचणाऱ्यांनीच भागवला पाहिजे” अशी शुद्ध नैतिक भूमिका मांडली होती. मला हा आदर्श खूपच भावला होता. पण प्रत्यक्षात प्रचंड भ्रमनिरास झाला. ‘कविता-रती’चे वर्गणीदार सुमारे ९००-१००० च्या आसपास. त्यातील साधारणपणे निम्मे वर्गणीदार नियमितपणे वर्गणी पाठवणारे, परंतु उर्वरित वर्गणीदारांचा अप्रामाणिकपणा घायाळ करणारा आहे. तरीदेखील साहित्यक्षेत्रातील सज्जनशक्तीच्या पाठबळावर काम सुरू आहे.

आशुतोष : अनंत अडचणी असल्या तरी ‘कविता-रती’ गेल्या दोन दशकांपासून आपण चालवत आहात. मराठी कविता आणि काव्यसमीक्षा या दोन्ही दृष्टींनी एक ऐतिहासिक कामगिरी आपण पार पाडली आहे. या वाटचालीकडे आज पाहताना आपल्याला काय वाटतं?

पुरुषोत्तम : विविध आशयाची व अभिव्यक्तीची चांगली कविता, तसंच चांगलं काव्यसमीक्षात्मक लेखन ‘कविता-रती’तून देता आलं याचं समाधान निश्चितच आहे. काही कवींपर्यंत ‘कविता-रती’ पोहचू शकलं नाही, काही कवींचा पाठपुरावा करूनही त्यांच्या कविता मिळू शकल्या नाहीत. अनेक कवी-काव्यसमीक्षक यांचा स्वतंत्रपणे विचार करायचा राहून गेला. अपुऱ्या साधनशक्तीमुळे बऱ्याचदा मर्यादा पडल्या. पण सगळ्यात मोठी खंत आहे, काव्यसंग्रहांची परीक्षणं जशी आणि जेवढी यायला हवी होती, तेवढी देता आली नाहीत ही! नव्याने प्रकाशित होणाऱ्या संग्रहांपैकी चांगल्या संग्रहांची दखल सातत्यानं व आवर्जून घेतली पाहिजे. पण सक्षम परीक्षणकर्त्यांच्या अनास्थेमुळे ते बऱ्याचदा शक्य झालं नाही. त्या दिशेनं अद्यापही ‘कविता-रती’ प्रयत्नशील आहे.

.................................................................................................................................................................

मुलाखतकार प्रा. आशुतोष पाटील ‘कवि-तारती’चे संपादक आहेत.

pashutosh30@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......