‘करोना व्हायरस’च्या महामारीला वेसण घालणारे ‘केरळ मॉडेल’ नेमके आहे तरी कसे!
संकीर्ण - मुलाखत
डॉ. अरुण गद्रे
  • केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन, आरोग्यमंत्री के. के. शैलजा आणि डॉ. अमर फेटल
  • Wed , 27 May 2020
  • संकीर्ण मुलाखत पिनरई विजयन के. के. शैलजा Pinarayi Vijayan K. K. Shailaja डॉ. अमर फेटल Amar Fettle केरळ मॉडेल Kerala Model करोना विषाणू Corona virus कोविड-१९ Covid-19 करोना Corona करोना व्हायरस Coronavirus लॉकडाउन Lockdown

भारतात पहिला करोना रुग्ण सापडला तो केरळ राज्यात. कारण केरळमधून वैद्यकीय शिक्षणासाठी चीनला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. आज केरळची काय अवस्था आहे? या राज्याने करोनाशी यशस्वी मुकाबला करून या ‘जागतिक महामारी’च्या साथीला आटोक्यात ठेवले आहे. त्यांचा हा प्रयोग ‘केरळ मॉडेल’ म्हणून वाखाणला जात आहे. जगभरात त्याचे कौतुक होत आहे. हे मॉडेल राबवणाऱ्या केरळच्या वैद्यकीय टीमपैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे डॉ. अमर फेटल. त्यांची प्रसिद्ध लेखक व डॉक्टर अरुण गद्रे यांनी ‘विचारवेध’साठी सविस्तर मुलाखत घेतली. त्या मुलाखतीचा हा संपादित अंश…

..................................................................................................................................................................

डॉ. अरुण गद्रे – कोविड-१९ विरोधातला तुमचा लढा कधीपासून सुरू झाला?

डॉ. अमर फेटल - आम्हाला १७-१८ जानेवारी दरम्यान चीनमध्ये कोविड-१९मुळे लोक आजारी पडत असल्याचे समजले. केरळचा चीनशी जवळचा संबंध आहे. कारण केरळमधून अनेक विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी चीनला जातात. त्यामुळे आम्ही ताबडतोब आरोग्य खात्याबरोबर बैठक घेतली आणि चीनमधून आपले विद्यार्थी परत येतील तेव्हा काय करायचे, याविषयीच्या विचाराला सुरुवात केली. आमची कंट्रोल रूम कामाला लागली. केरळमध्ये कंट्रोल रूम व्यवस्था आधीपासूनच अस्तित्वात आहे. साथीच्या आजारांचा मुकाबला करण्यासाठी केरळने ती उभारलेली आहे.

गद्रे - म्हणजे WHOने (जागतिक आरोग्य संघटना) कोविड-१९ला ‘जागतिक महामारी’ जाहीर करण्यापूर्वीच तुम्ही सावध झाला होता?

फेटल - अगदी बरोबर! आम्ही आमची संपूर्ण आरोग्य यंत्रणा कामाला लावली. कोविड-१९च्या लक्षणांवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. विशेषत: तापाच्या रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवले. त्यानंतर आम्हाला केंद्र सरकारकडून सावधानतेचा इशारा मिळाला. मग आम्ही WHO आणि इतर वैद्यकीय संघटनांच्या वेबसाईटसवरून माहिती घेत राहिलो. त्या आधारे आम्ही या आजाराशी कसा लढा द्यायचा, याची गाईडलाईन तयार केली. ती आम्ही २६ जानेवारी रोजी जाहीर केली.

गद्रे – WHOने तपासण्या करण्यावर भर दिला होता, तुमच्या गाईडलाइनमध्ये त्यापेक्षा वेगळे काय आहे?

फेटल - WHOने तपासणीचा सल्ला फार नंतर दिला. त्याच्या अगोदरच आम्ही आमची गाईडलाईन जाहीर केली होती. आम्ही सर्वप्रथम विमानतळांवर सावधानतेचा इशारा दिला. प्रत्येक विमानतळावर एक वैद्यकीय टीम सज्ज केली. प्रवाशांवर नीट पाळत ठेवली. रुग्णांसाठी विशेष रुग्णालयांपर्यंतची प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली. राज्यातल्या ज्या चार जिल्ह्यांमध्ये विमानतळ आहेत, तेथे अद्ययावत असे क्वारंटाईन कक्ष उभारले. तेथे पीपीई किट वेळीच उपलब्ध केल्या. हे सारे आम्ही बऱ्याच आधीपासून सुरू केले. सागरी वाहतुकीबाबतही आम्ही दक्ष झालो. सगळ्या बंदरांवर यंत्रणा सज्ज केल्या. त्याचबरोबर आम्ही आमची कंट्रोल रूम अद्ययावत केली. वेगवेगळ्या टीम या कंट्रोल रूमसोबत काम करू लागल्या. पाळत ठेवणे, माहिती गोळा करणे, तपासण्या करणे, प्रसारमाध्यमांना योग्य ती माहिती देणे, सोशल मीडिया योग्य प्रकारे हाताळणे, पायाभूत सुविधा उभारणे, मनुष्यबळाची उभारणी करणे, त्यांना प्रशिक्षित करणे असे एकूण १८ विभाग कार्यरत केले. मुख्य कंट्रोल रूमसोबत प्रत्येक जिल्ह्यात त्यांची त्यांची कंट्रोल रूम सुरू केली. आमच्या आरोग्य विभागाचे मुख्य सचिव डॉ. राजन खोब्रागडे यांनी अत्यंत मेहनतीने आणि उत्साहाने हे सगळे काम हाती घेतले. आमच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी या कामात स्वतःला झोकून दिले. त्या रोज कंट्रोल रूममध्ये येऊन बसत. प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीवर त्यांचे बारीक लक्ष होते. आमच्यासोबत एक अकॅडमी कमिटीसुद्धा होती. ती हा आजार भविष्यात किती आणि कसा पसरेल याचा अंदाज बांधत होती. आणि त्याप्रमाणे आम्ही तयारी करायला लागलो. त्यानुसार आम्ही वेगवेगळ्या गाईडलाईन्स तयार केल्या.

गद्रे - हे सारे म्हणजे एखाद्या मिलिट्री ऑपरेशनसारखे आहे. सुरुवातीच्या काळातील काही अनुभव सांगू शकाल का? मी असे ऐकले आहे की, एक वेळ तुम्ही एक लाख ४० हजार रुग्णांना क्वारंटाईन कक्षामध्ये ठेवले होते. सरकारच्या बाजूने तुम्ही पूर्ण तयारी केली होती, पण शेवटी दुसरी बाजू लोकांची होती. त्यांचा प्रतिसाद कसा होता? त्यांना तुम्ही कशा प्रकारे समजावून सांगितले?

फेटल - ३० जानेवारी २०२० रोजी मी माझ्या मुलीच्या बाळंतपणासाठी दुसऱ्या जिल्ह्यात गेलो होतो. तिथे असताना मला फोन आला की, एका चीनवरून परतलेल्या विद्यार्थ्याला करोनाची लागण झाली आहे. हा भारतातला पहिला करोनारुग्ण होता. मग त्या विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना समजावून सांगण्यापासून सगळ्या गोष्टी आमच्या टीमने केल्या. ज्या त्रिशूर जिल्ह्यात हा रुग्ण आढळला, तिथे डॉक्टर रीना होत्या, त्यांनी त्या विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना समजावून सांगून त्याला ताब्यात घेतले आणि क्वारंटाईन केले. त्या रात्री चार मंत्री त्या विद्यार्थ्याला पाहण्यासाठी आले. तेव्हा झालेल्या मिटिंगला मी हजर नव्हतो, पण दुसऱ्या दिवशी सकाळी मी टीममध्ये सामील झालो. त्या रात्री सुरू झालेल्या बैठका दुसऱ्या दिवशी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सातत्याने सुरू होत्या. संपूर्ण देशातच एक प्रकारची भीती निर्माण झाली होती. प्रसारमाध्यमांमध्येसुद्धा आम्ही काय करतो याची प्रचंड उत्सुकता होती. तेव्हा सरकारने प्रसारमाध्यमांसमोर या विषयाची माहिती देण्यासाठी माझ्यावर जबाबदारी सोपवली. तेव्हापासून मी दोन फोन वापरत आहे. त्या काळात जेवढे फोन आले, तेवढे सगळे फोन मी उचलले. एकही फोन नाकारला नाही. त्याच वेळी आम्ही टीव्हीवरून काय करतो आहोत, हे सर्वांना सांगत होतो. अत्यंत पारदर्शक व्यवहारामुळे लोकांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला. केरळमध्ये ‘दिशा’ नावाची एक हेल्पलाइन गेली काही वर्षं सुरू आहे. निपाह व्हायरस आणि पूर आला, तेव्हा या हेल्पलाइनने महत्त्वाचे काम केले होते. या वेळीसुद्धा ही हेल्पलाइन कामाला आली. तिची क्षमता वाढवण्यात आली आणि प्रत्येकाला करोनाविषयी जी माहिती हवी त्यासाठी या हेल्पलाइनचा नंबर देण्यात आला. काही मूलभूत माहिती तिथला माणूस देत असे आणि अधिकची माहिती हवी असेल तर विशेषज्ञांना फोन जोडून देई. लाखो लोकांनी या हेल्पलाईनवरून माहिती घेतली. त्यामुळे लोकांना थेट डॉक्टरांकडून फोनवर माहिती मिळू लागली.

गद्रे - या कालावधीत मोठ्या प्रमाणावर लोकांचे प्रशिक्षण करावे लागले असेल; आशा वर्कर, नर्स, डॉक्टर या सगळ्यांनाच प्रशिक्षण देण्याची गरज पडली असेल... अल्पावधीत हे सारे कसे साध्य केले?

फेटल - दोन-तीन आठवड्यांत आम्ही एकूण आठ लाख ५० हजार लोकांना प्रशिक्षित केले. हे सारे आम्ही मीडिया कॉन्फरन्सिंगद्वारे केले. वेगवेगळ्या गटांसाठी वेगवेगळ्या मीडिया कॉन्फरन्स आयोजित केल्या. नर्स, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी यांच्यासोबत इतर विभागातील कर्मचाऱ्यांचेही प्रशिक्षण केले. ऑनलाईन माहिती देण्यासाठी एक यूट्यूब चॅनेल सुरू केले.

गद्रे - क्वारंटाईनला लोकांनी विरोध केला? तुम्ही त्या वेळी कशा प्रकारे परिस्थिती हाताळली?

फेटल - अनेकदा लोकांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. ते बाईकवरून बाहेर पडत होते. मग आम्ही स्थानिकांच्या मदतीने दक्षता टीम तयार केल्या. सुरुवातीचे रुग्ण हे चीनमधून आलेले विद्यार्थीच होते. त्यातले काही जण हिंसक झाले होते. त्यानंतर इतर देशांतून येणाऱ्यांची संख्या वाढू लागली. मग आम्ही विमानतळावर लोकांना सविस्तर माहिती देऊन सेंटरमध्ये आणू लागलो. त्यासाठी आम्ही रूट मॅप तयार करायला सुरुवात केली. म्हणजे पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या माणसांची त्याच्याकडून माहिती घेऊन केलेली तारीख, वेळ, माणूस यांची यादी. ती आम्ही सर्वांसाठी माध्यमांमधून प्रसिद्ध करायला सुरुवात केली. त्यामुळे लोकांमध्ये जी प्रचंड भीती निर्माण झाली होती, ती काही प्रमाणात कमी झाली. रुग्ण कुठे कुठे गेला हे नेमके लोकांना कळू लागले. त्यातून त्याच्या संपर्कात आलेले लोक स्वतःची काळजी घेऊ लागले. परिणामी जे लाखोंच्या संख्येने लोक भीतीखाली गेले होते, त्यांची संख्या हजारांवर आली. त्याचा परिणाम लगेच दिसून यायला लागला. हेल्पलाइनला येणाऱ्या फोनची संख्याही कमी झाली.

गद्रे - शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांचा प्रतिसाद आणि सहकार्य यात फरक जाणवला? तुम्ही त्याचा कसा सामना केला?

फेटल - आमचे बहुतांश राज्य छोट्या छोट्या शहरांनी बनले आहे. इथं शहर आणि ग्रामीण असा फारसा फरक नाही. त्यातूनही ज्याला ग्रामीण भाग म्हणावे तिथूनही आम्हाला सुरुवातीपासून चांगला प्रतिसाद मिळाला. अर्थात याचे श्रेय आमच्या स्थानिक वैद्यकीय पथकांना दिले पाहिजे. ग्रामीण भागात या पथकांतील सदस्यांच्या थेट ओळखी होत्या. त्याचा उपयोग झाला.

गद्रे - तुमच्याकडे मुंबईप्रमाणे झोपडपट्टी आहे?

फेटल - आमच्याकडे अगदी धारावीसारखी नाही, पण काही ठिकाणी झोपडपट्टी आहे. अर्थात तिथल्या लोकांना आम्ही ‘स्थलांतरीत’ न म्हणता ‘पाहुणे कामगार’ म्हणतो. तिथे विविध भाषिक लोक असल्याने आम्ही त्यांच्यासाठी सहा भाषांमध्ये काम सुरू केले. त्यांना सर्व प्रकारची मदत देऊ केली. त्यामुळे त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला. देशभर लॉकडाऊन जाहीर होण्याच्या दोन दिवस आधीपासून आम्ही केरळमध्ये कर्फ्यू लावला होता.

गद्रे - या काळात तंत्रज्ञानाचा काही नावीन्यपूर्ण वापर केला?

फेटल - अनेकदा असे होत होते की, काही लोक माहिती देत नव्हते. काही लोक चुकीचीही माहिती देत होते. अशा वेळेला आम्ही सायबर सेलसोबत फोन मॅपिंग करून खात्री करून घेत असू. त्यामुळे आमचे श्रम कमी होत आणि नेमकी माहिती समोर येई. या मॅपिंगसाठी आम्ही सीसीटीव्ही फुटेजचा वापर केला.

गद्रे - तुम्ही क्वारंटाईन यंत्रणा कशी उभी केली?

फेटल - आमचे पायाभूत सुविधांचे खाते पी.डब्ल्यू.डी. आणि पंचायत यांच्या मदतीने कामाला लागले. लॉकडाऊन जाहीर झाल्यावर राज्यातील वस्तीगृहे, मोठ्या इमारती आणि रिकामी हॉटेले यांच्याशी बोलणी करून ती ताब्यात घेतली. तिथे सेंटर्स उभारली. ज्यांना करोनाची लक्षणे आहेत, अशांना आम्ही करोना केअर सेंटरला पाठवत होतो, ज्यांना लक्षणे नाहीत त्यांना होम क्वारंटाईन करत होतो. हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्यांना आम्ही फ्री वायफाय पुरवले होते. २४ तास मानसिक आधार देणारी हेल्पलाइन उपलब्ध करून दिली होती. दिशा ही दोन हजार समुपदेशकांची हेल्पलाइन त्यासाठी काम करत होती. होम क्वारंटाईन केलेल्यांसाठीसुद्धा काही नियम घालून दिले होते. ‘जनमैत्री पोलीस’ नावाने एक गट त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचे काम करत होता.

गद्रे - या मोहिमेमध्ये तुम्ही स्वयंसेवकांची मदत घेतली. ते कसे मिळवले? त्यांच्याकडून कसे काम करून घेतले?

फेटल - केरळमध्ये गेली काही वर्षं दर पावसाळ्यात लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू यांच्या साथी येतात. त्यासाठी आम्ही जनजागृती मोहीम राबवतो. या मोहिमेत जन आरोग्यसेवक काम करतात. ते आशा वर्कर आणि आरोग्य पथकासोबत काम करतात. सर्व गल्ली-मोहल्ल्यांत, गावागावांत असे जन आरोग्यसेवक आहेत. ते आमच्या हाताशी होते. त्याशिवाय आम्ही वेबसाइटवरून स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी लोकांना आवाहन केले. त्याला ४३ हजार जणांनी प्रतिसाद दिला. आम्ही नागरिकांना आवाहन केले होते की, तुम्हाला एखादा करोना रुग्ण आढळल्यास त्याच्या मदतीला जा, त्याच्या कुटुंबियांना आधार द्या, रुग्णाला क्वारंटाईन कक्षात जाण्यासाठी आवाहन करा. मागच्यांची काळजी घ्या. टेलिव्हिजन आणि मुद्रित अशा दोन्ही माध्यमांनी यासाठी मोठी मदत केली. मी स्वतः त्यासाठी कितीतरी वेळ दिला. शिवाय मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री रोज सायंकाळी एक तास जनतेबरोबर संवाद साधत. मुख्यमंत्र्यांच्या या संवादाला सर्वाधिक टीआरपी होता. लोक इतर सर्व गोष्टी सोडून त्यांना ऐकत असत.

गद्रे - करोना व्हायरससोबत कसे जगावे याबाबत काय सांगाल?

फेटल - मी असा सल्ला देण्याइतका विशेषज्ञ नाही. मात्र एवढे नक्की सांगू शकेन की, या व्हायरसला कमी लेखू नका. तो बाहेर प्रत्येक ठिकाणी आहे याची जाणीव ठेवा. मास्क वापरा. फार महागडे मास्क लावण्याची गरज नाही, साधा कापडाचा मास्क वापरा. कोठेही बाहेर जाऊन आला की, प्रथम आपले हात साबणाने धुवा. कामावरून आल्यावर आंघोळ करून मगच इतर लोकांना भेटा. बाहेर जाल तेव्हा सुरक्षित अंतर पाळा. वयोवृद्धांची काळजी घ्या. मुलांना स्वच्छतेचे धडे द्या. रस्त्यावर थुंकणे टाळा. केरळमध्ये रस्त्यावर थुंकणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. डॉक्टर आणि संशोधक हेच तज्ज्ञ असतात, हे लक्षात ठेवा. कोणीही सांगितलेल्या कुठल्याही माहितीवर उगाच विश्वास ठेवू नका. सोशल मीडियावर येणाऱ्या कोणत्याही गोष्टीने भारावून जाऊ नका. सरकारने सांगितलेल्या नियमांचे पालन करा. एक-दोघांनी जरी नियमांचे उल्लंघन केले तरी काही हजार लोकांचा जीव धोक्यात येतो, हे लक्षात ठेवा. नियमांचे उल्लंघन करणाऱ्याला समज द्या. त्याने ऐकले नाही तर रागवा, पण कायदा हातात घेऊ नका. संबंधित विभागाला कळवून त्यांना त्यांचे काम करू द्या. वैद्यकीय विभागात काम करणाऱ्यांशी आदराने वागा. त्यांना बहिष्कृत करू नका. पोलिसांचा आदर करा. आपली तब्येत चांगली ठेवा. ९० टक्के करोना माइल्ड म्हणजे कमी त्रासदायक असतो. आहारात तांदळाची पेज घ्या. गुळण्या करायची सवय लावा. तुळशीचा रस, हळदीचे पाणी अशा गोष्टींचा वापर सुरू करा. फळे, फळभाज्या, पालेभाज्या, आवळा, पपया यांचा रोजच्या जेवणात समावेश करा. पुरेशी झोप घ्या. सारखे सारखे करोनाचे आकडे पाहत राहू नका. अमेरिकेत किती रुग्ण आहेत, याच्याशी आपल्याला फारसे काही देणेघेणे नाही. आपण काय करायचे हे महत्त्वाचे आहे. आपल्या कुटुंबाची, आपला मित्रपरिवार, नातेवाईक यांची आणि आपल्या परिसरात सेवेत असलेल्यांची काळजी घेणे एवढेच आपले काम आहे. ते नीट करणे हे संपूर्ण राज्याची, देशाची आणि जगाचीही काळजी घेण्यासारखेच आहे!

..................................................................................................................................................................

डॉ. अमर फेटल यांची मूळ इंग्रजी मुलाखत...

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......