‘करोनाकाळा’तले बेलगाम, बेमुर्वत, बेपर्वा आणि बेफिकीर राज्यकर्ते!
पडघम - विदेशनामा
कॉ. भीमराव बनसोड
  • अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि दुसरे ब्राझीलचे अध्यक्ष जायरे बोलसोनारे
  • Tue , 26 May 2020
  • पडघम विदेशनामा डोनाल्ड ट्रम्प Donald Trump जायरे बोलसोनारे Jaire Bolsonaro करोना विषाणू Corona virus कोविड-१९ Covid-19 करोना Corona करोना व्हायरस Coronavirus लॉकडाउन Lockdown

जगातील जवळपास २०० देशांत करोना विषाणूने थैमान घातलेले असले तरी काही देशांतील सत्ताधारी राज्यकर्ते अजिबात गंभीर नाहीत असे दिसते. त्यातील काही तर निरंकुश, उजव्या विचारसरणीचे, नकली राष्ट्रवादाचा बुरखा पांघरलेले आहेत. त्यांच्यातील काहींना तर करोना म्हणजे आपल्या विरोधकांचा काटा काढण्याची एक प्रकारे चालून आलेली संधीच आहे असे वाटते. त्यापैकी एक म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. दुसरे ब्राझीलचे जायरे बोलसोनारे. भारतातील मोदी-शहांचा तिसरा की आणखी कितवा क्रमांक लागेल याचा भारतीय जनतेने विचार करावा.

भारताचे पंतप्रधान प्राचीन ग्रंथांमध्ये विज्ञानाचा शोध घेतात आणि ढगांमध्ये प्राचीन भारतीय रडार शोधतात. करोनावर उपाय म्हणून त्यांचे गोभक्त गोमूत्र पिण्याचा व शेण अंगाला लावण्याचा सल्ला देतात. पंतप्रधान मोदी त्यांना अशा अपप्रचारापासून रोखत नाहीत. उलट जनतेकडून विविध निमित्ताने टाळ्या, थाळ्या वाजवून दिवाबत्ती करून घेतात. पण असे करूनही भारतात दिवसेंदिवस करोनाबाधित व मृतांचे प्रमाण वाढतच आहे. शिवाय त्यांनी अचानक जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे प्रवासी कामगारांचे झालेले हाल आपल्याला ठाऊक आहेतच.

पण त्यांच्यावरही कडी करत त्यांचे जिगरी दोस्त डोनाल्ड ट्रम्प रोज नवनवीन औषधे करोनाग्रस्त रुग्णांवर वापरायला सांगत आहेत आणि स्वतःवरही त्याचे परीक्षण करत आहेत. प्रथम त्यांनी मलेरियासाठी असलेले हायड्रॉक्सीक्लोरोक्विन, नंतर अँटी-व्हायरल रेमडेसवीर, त्यानंतर अल्ट्राव्हायोलेट किरण आणि आता जंतुनाशक औषधं असे विविध उपाय सुचवले आहेत. याबाबत अमेरिकेच्या आरोग्य तज्ज्ञांनी म्हटले आहे की, ट्रम्प यांनी आपल्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेशी खेळ चालवला आहे.

ज्या वेळी कोविड-१९ या करोना विषाणूच्या साथीची चाहूल जगाला, मुख्यत्वेकरून चीनला लागली होती, त्या वेळी त्यांनी त्याच्या धोक्याबाबतचे इशारे काहीसे उशिरा का होईना पण दिले होते. ट्रम्प यांनी सुरुवातीला त्याची अजिबात दखल घेतली नाही. उलट त्यांचे राजकीय विरोधक अशा विषाणूच्या साथीची मुद्दाम अफवा पसरवत आहेत, असा आरोप केला. पण जेव्हा न्यूयॉर्क हे मोठे व्यापारी शहर या साथीचा अड्डा बनले आणि तेथील गरीब आशियाई, आफ्रिकन व त्यातही काळे लोक मोठ्या संख्येने मरू लागले, तेव्हा हा ‘चिनी व्हायरस’ आहे, अशी त्याची  हेटाळणी केली. पण त्यामुळे ही साथ आटोक्यात येण्याऐवजी बाधितांची व मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढतच गेली. सध्याच्या घडीला तेथे सोळा लाख नागरिकांना करोनाची बाधा झाली असून जवळपास एक लाख लोक या मृत्यूमुखी पडले आहेत.

या विषाणूवर सध्या कोणतेच औषधोपचार अथवा लस नसल्यामुळे लॉकडाऊनचाच एकमेव उपाय आहे. पण त्याची अमलबजावणी करण्यात मात्र त्यांनी सुरुवातीला पुष्कळ टाळाटाळ केली. शेवटी विरोधकांचा बराच दबाव वाढल्यानंतर नाईलाजाने त्यांनी काही राज्यातून लॉकडाऊन जाहीर केले. तरीही लॉकडाऊनच्या विरोधात असलेल्या लोकांना निदर्शने करण्यास मात्र त्यांनी प्रोत्साहनच दिले. लॉकडाऊन केल्यामुळे अर्थव्यवस्था बंद पडते आणि असे अर्थचक्र मी बंद पडू देणार नाही, अशा घोषणा त्यांनी वारंवार केल्या आहेत.

या साथीवर उपाय म्हणून सुरुवातीला त्यांनी मलेरियासाठी असलेल्या हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या गोळ्या करोनाबाधितांना देण्याच्या सूचना केल्या. त्यांच्या देशात त्या उपलब्ध नसल्याने भारतातून त्यांनी त्या दम देऊन मागवून घेतल्या. ‘भारताने जर या गोळ्या आम्हाला दिल्या नाहीत तर त्याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतील’ असा दम त्यांनी दिला. सुरुवातीला आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा ‘पुढेमागे त्या गोळ्या आम्हालाच लागतील’ असे म्हणून निर्यात करण्यास कुचराई केली होती. पण ट्रम्प यांनी दम दिल्यानंतर मात्र या गोळ्यांची त्यांनी अमेरिकेत निर्यात केली. या गोळ्यांची शिफारस WHOने अथवा जगातील कोणत्याच डॉक्टरांनी केलेली नव्हती. तरीही त्यांनी करोनाबाधितांना या गोळ्या देण्यास भाग पाडले. पुढील काळात त्याचे दुष्परिणाम दिसून आले. तरीही त्यांनी स्वतः या गोळ्या घेणे सुरू केले व तसे पत्रकार परिषदेत जाहीर केले. त्यांच्या हितचिंतकांनी तसेच WHOनेसुद्धा याचे कोणकोणते दुष्परिणाम होतात, याबाबत त्यांना इशारे दिलेले आहेत. पण त्याचा काहीही परिणाम त्यांच्यावर झालेला नाही.

याबाबत झालेल्या परीक्षणातून असे दिसून आले की, ज्या बाधितांना हाइड्रॉक्सिक्लोरोक्विनच्या गोळ्या दिल्या त्यांचा मृत्युदर १८ टक्के होता, तर ज्यांना फक्त क्लोरोक्विन गोळ्या दिल्या त्यांचा मृत्यु दर १६.४ टक्के आणि ज्यांना या दोन्ही गोळ्या दिल्या नाहीत त्यांच्यातील मृत्युचे प्रमाण फक्त ९ टक्के होते.

या गोळ्यांचा दुष्परिणाम होत आहे, हे तज्ज्ञांनी लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी या करोनाबाधितांना कीटकनाशकांचे इंजेक्शन देण्यात यावे, अशी कल्पना मांडली. पण तेथील डॉक्टरांनी अशा इंजेक्शनमुळे करोना विषाणूचा बंदोबस्त तर होणार नाहीच, पण पेशंट मृत्यूमुखी पडतील असे सांगितल्यावर तो आग्रह त्यांनी मागे घेतला.

या साथीचा प्रादुर्भाव वाढू नये याची सावधगिरी म्हणून सर्वांनी मास्क वापरावे, हे जगमान्य आहे आणि तशा सूचना सर्वत्र दिलेल्या आहेत. पण ट्रम्प यांनी स्वतः मात्र राष्ट्राध्यक्ष असूनही आतापर्यंत कधीच मास्क वापरलेला नाही. व्हेंटिलेटर बनवणाऱ्या तसेच मास्क बनवणाऱ्या कारखान्यालासुद्धा त्यांनी मास्क न लावताच भेटी दिल्या. तेथील कर्मचाऱ्यांनी याबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे. खाजगी व सार्वजनिक जीवनात ते बिनामास्कचेच बिनधास्त वावरत असतात.

यावरून हे सिद्ध होते की, डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकन नागरिकांच्या प्रचंड संख्येने होत असलेल्या मृत्यूबाबत आणि करोनाबाबत अजिबात गंभीर नाहीत. उलट ही साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करायचे सोडून त्यांनी केवळ या विषाणूसाठी चीन जबाबदार असल्याचा एकसारखा धोषा लावलेला आहे.

“चीनच्या प्रयोगशाळेतूनच हा विषाणू आलेला आहे. त्यांनी आम्हाला याची अजिबात कल्पना दिली नाही. त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील, आम्ही त्यांना माफ करणार नाही. त्यांची आमच्या देशात असलेली संपत्ती जप्त करू,” अशा आरोपांचा सपाटाच लावला आहे. शिवाय ‘चीनला मी पुन्हा राष्ट्रपती म्हणून निवडून यावे असे वाटत नाही’ असेही त्यांनी म्हटले आहे. खरं म्हणजे ते राष्ट्रपती व्हावे की होऊ नये याचा निर्णय, त्यांच्या वर्तणुकीवरून अमेरिकन जनताच घेऊ शकणार आहे.

तसेच WHOनेसुद्धा याबाबतची माहिती आम्हाला व जगालाही दिली नाही, WHO चीनचा पिंटू आहे, असेही आरोपच केले आहेत. वर WHOला अमेरिकेकडून दरसाल मिळणारी पन्नास लाख डॉलरची मदतही रोखून धरली आहे. एवढंच नव्हे तर ही मदत कायमची बंद करण्यात येईल असाही दम दिला आहे. संपूर्ण जग करोनाशी मुकाबला करत असतानाच्या काळात WHOची अशी मदत रोखून धरणे कोणाही सुज्ञ राज्यकर्त्यांना शोभणारे नाही. म्हणून जगभरातून त्यांच्या या निर्णयाविरोधात सर्वत्र नाराजी व्यक्त झाली आहे. पण त्याचा त्यांच्यावर तसूभरही परिणाम झालेला नाही.

सुरुवातीला तर त्यांनी दीड-दोन लाख अमेरिकन नागरिक त्यात वारले आणि ही साथ आटोक्यात आली तरी आम्ही बरेच काही मिळवल्यासारखे होईल असे बेजबाबदार वक्तव्य केले होते. इतकेच नव्हे तर इतक्या मोठ्या संख्येने आमच्या देशात करोना रुग्ण आहेत याचा मला अभिमानच आहे, असेही व्यक्तव्य नुकतेच केले आहे. पण नंतर त्याची सफाई देताना सांगितले की, “याचा अर्थ असा आहे की, आम्ही किती मोठ्या संख्येने आमच्या देशात लोकांच्या चाचण्या करत आहोत, हेच यावरून सिद्ध होत आहे व याचा मला अभिमान आहे.”

आता तर त्यांनी या करोनाबाधितांची सर्व भिस्त ईश्वरावर सोपवली आहे. हा आजार पसरू नये म्हणून आवश्यक असलेले फिजिकल डिस्टन्सिंग (शारीरिक अंतर) बाजूला सारून सर्व चर्चेस (प्रार्थनास्थळे) खुली करण्यात यावीत, कारण आता अमेरिकन जनतेला कधी नव्हे एवढी ईश्वराच्या प्रार्थनेची गरज आहे, असे म्हटले आहे.

आपला देश गंभीर संकटात असतानासुद्धा ट्रम्प बिनधास्तपणे कशाचीही फिकीर न करता गोल्फ खेळायला सहजपणाने जाऊ शकतात. याबद्दल त्यांच्यावर तेथे टीका होत असली तरी, ते त्याची फिकीर करत नाहीत. यावरून त्यांची अमेरिकन नागरिकांच्या आरोग्याबाबतची मानसिकता कशी आहे, ते दिसून येते.

ब्राझीलचे राष्ट्रपती जायरे बोलसेनारो हे ट्रम्प यांच्यासारखेच धोरण असलेले दुसरे एक नेते. ते तर करोनाला एक साधा फ्ल्यूचा आजार समजतात. हा आजार पसरू नये म्हणून आवश्यक असलेले फिजिकल डिस्टन्सिंग (शारीरिक अंतर) तर त्यांनी साफ धुडकावून लावले आहे. ते सार्वजनिक ठिकाणी अगदी सहजपणाने आपल्या मित्रमंडळींशी हस्तांदोलन करतात. आपल्या घरी सामूहिक कार्यक्रम आयोजित करतात. लॉकडाऊनविरोधी आंदोलनात ते सक्रियपणे भागीदारी करतात. ब्राझीलमध्ये आतापर्यंत करोनाबाधितांचा आकडा एक लाख पंधरा हजार तर मृतांचा आकडा आठ हजारापर्यंत गेला आहे. याबाबत पत्रकारांनी विचारले असता, “त्याला मी काय करू? मी काही करिष्मा करू शकत नाही,” अशी ते उत्तरे देतात.

बोलसेनारो ट्रम्पप्रमाणेच हाइड्रॉक्सिक्लोरोक्विनच्या गोळ्या करोनाबाधितांना देण्याबद्दल आग्रही होते. त्यांचा हा आग्रह चुकीचा वाटल्यामुळे आतापर्यंत त्यांच्या दोन आरोग्यमंत्र्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. आरोग्य खात्यातील अनेक मोठ्या पदांवरील अधिकाऱ्यांनी आपल्या नोकरीचे राजीनामे दिले आहेत. आता त्यांच्या जागेवर त्यांनी मिलिटरीचे अधिकारी नेमले आहेत. या संपूर्ण काळात त्यांनीही कधी मास्क वापरल्याचे कुणी पाहिलेले नाही.

पुढे चालून जेव्हा केव्हा जगाचा इतिहास लिहिला जाईल, जागतिक साथींच्या आजाराचा इतिहास लिहिला जाईल; तेव्हा नक्कीच आजच्या या बेलगाम, बेमुर्वत, बेपर्वा आणि बेफिकीर राज्यकर्त्यांच्या वर्तणुकीचा एक स्वतंत्र अध्याय लिहिला जाईल.

..................................................................................................................................................................

लेखक कॉ. भीमराव बनसोड मार्क्सवादी कार्यकर्ते आहेत. 

bhimraobansod@gmail.com

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......