अजूनकाही
महाराष्ट्र प्रदेश भाजप हा देशातला एकमेव विरोधी पक्ष असेल की, सत्ता गेल्याने जागतिक महामारीतही त्याला निव्वळ राजकारण करण्याची वारंवार उबळ येतेय.
दिल्ली, राजस्थान, पंजाब, प. बंगाल, छत्तीसगढ इथेही भाजप विरोधी पक्षातच आहे. पण करोना काळात तिथे महाराष्ट्र भाजपसारखे आकांडतांडव चालू नाहीए. मध्य प्रदेशमध्ये जे घडवून आणलं, ते महाराष्ट्रात घडवता आले नाही वा येत नाही या विफलतेतून महाराष्ट्र भाजप, त्यातूनही देवेंद्र फडणवीसांचे जे काही चाललेय, ते राजकारणही म्हणता येणार नाही, इतक्या हलक्या दर्जाचे आहे. त्यात वासरात शिंग मोडून राज्यपालही सामील झाल्याने आजोबा पोरात पोर होऊन पोरखेळ खेळताहेत का नातवंडे आजोबांचा घोडा करून दुडकी चाल खेळताहेत हेच समजेनासे झालेय.
‘ट’ला ‘ट’ लावून यमक जुळणी करत घोषणा देणे वा कार्यक्रम देणे यात भाजपला बहुधा रामदास आठवलेंशी स्पर्धा केल्याचे समाधान मिळत असेल. अर्थात जिथे प्रधानसेवकच ‘ट्वेंटी ट्वेंटी में ट्वेंटी लाख करोड का पेकेज’ असा शब्दच्छल करत असतील तर मग बाकीचे शिपाईगडी त्याचीच री ओढणार!
विद्यमान महाराष्ट्र सरकार विरोधात केंद्र सरकार, राज्यपाल व फडणवीस-पाटील संधी मिळेल तिथे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करताहेत. केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल खरे तर महाराष्ट्राचे प्रतिनिधी, पण ते आणि त्यांचे खाते या साथीच्या संक्रमण काळातही जी खलित्यांची लढाई खेळताहेत, ते निव्वळ वेळकाढूपणा, अडवणूक व महाराष्ट्र शासन कसं अकार्यक्षम आहे, हे दाखवण्यासाठीचा रडीचा डाव म्हणता येईल. राज्यांना विश्वासात न घेता मोदी सरकारने लादलेला लॉकडाऊन आणि आता चौथे पर्व संपताना ट्विटरसारख्या माध्यमांतून केंद्रीय रेल्वे व विमान वाहतूक खाते परस्पर निर्णय घेताहेत काय, मागेही घेताहेत काय नि पुन्हा सुरूही करताहेत काय...
हे म्हणजे ‘तुमच्या अंगणाचे आम्ही रणांगण करून दाखवतोच’ अशा दर्पातून सारे चाललेय.
या सगळ्याला राज्यातूनही पाठींबा मिळावा म्हणून राज्यात ‘माझे अंगण, माझे रणांगण’ नावाचा तमाशा करून झाला.
आता खरे तर विधानपरिषद निवडणूक तिकीट वाटपावरून एकनाथ खडसेंनीच पक्षाच्या अंगणाचं रणांगण करून आठवडाभर माध्यमांत भरपूर खणाखणी करून घेतली आणि ‘माझे अंगण, माझे रणांगण’ची सुरुवात करून दिली होती. खडसे रणांगणात खणखणाट करत होते, तेव्हा अंगणातच पंकजा मुंढे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे वगैरे सावध पवित्रे घेऊन बसले होते. शेवटी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील अंगणातून रणांगणात उतरले आणि त्यांनी खडसेंची खतावणीच वाचून दाखवली. मग खडसेनींही दादांना ‘आम्ही पक्ष वाढवला, तेव्हा तुम्ही अभाविपत होता. तुम्हाला काय माहीत इतिहास?’ असं अशा स्वरात सांगितलं जसं एखाद्या नटसम्राटाने कुणा एकाला गाल कुरवाळून सांगावं- ‘बेटा, तेव्हा तू बालनाट्यात पडदे धरत होतास!’
‘माझे अंगण, माझे रणांगण’ हे सध्याच्या भाजपला राज्य व राष्ट्रीय स्तरावरही चपखल बसणारं आहे!
आता चंद्रकांतदादा पाटील काय वा देवेंद्र फडणवीस काय, दिल्लीच्या मर्जीने इथे दांडपट्टा खेळताहेत. अमित शहांच्या सासुरवाडीचा माणूस एकदम नंबर दोन होऊन बसतो, राज्याच्या राजकारणात व जुने मोहरे उचलून फेकले जातात.
आता या अंगण, रणांगणची पुढची गंमत पहा. अभाविपतून भाजपात सक्रिय झालेले दादा स्वत:साठी मतदारसंघ कुठला निवडतात तर प्रा. मेधा कुलकर्णी यांचा कोथरूड! राजकारणात चांगली, सुशिक्षित, सुविद्य माणसं हवीत म्हणून प्रा. मेधा कुलकर्णी यांच्यासारख्या स्त्री कार्यकर्त्या नगरसेवक पदापासून राबतात, पुढे कार्यक्षम आमदार होतात. आता दुसरी टर्म सहज गाठताना दादा टपकतात आणि पक्षादेश म्हणून प्रा. मेधा कुलकर्णी घरी बसतात. विधानपरिषदेचं चाटण तेव्हा लावून झालेलं असतंच. पण चाटणच ते! ते काही पूर्ण औषध नव्हे! तर तेव्हापासूनच प्रा. मेधा कुलकर्णी दादांना म्हणताहेत ‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है?’ म्हणजे त्यांच्यासाठी त्यांचे अंगण, त्यांच्यासाठी कधीचेच रणांगण होऊन बसलेय!
ताजी बातमी : कुणा खासदारपुत्रांनी औरंगाबादेत आपल्याच पक्षाच्या संभाव्य प्रतिस्पर्ध्याच्या अंगणात जाऊन त्याचे रणांगण करत झटापटही केली!
हा राज्यस्तरीय अंगण, रणांगण खेळ कमी पडत असेल तर राज्य भाजपने फडणवीस-पाटील यांच्यासह गुजरात गाठावे!
तिथे करोनाचा आकडा महाराष्ट्राशी स्पर्धा करतानाच दस्तुरखुद्द मुख्यमंत्री माननीय रूपानी यांच्या कृपेने त्यांचे कुणी उद्योजक मित्र यांनी व्हेंटीलेटरच्या नावाखाली काहीतरी दुसरेच खपवत भरपूर मलिदा कमवत वर रुग्णांच्या जीवाशी खेळ केलाय!
‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ असा गुजरात मॉडेलचा डंका पिटत भाजप २०१४ आणि १९ मध्येही पूर्ण बहुमताने सत्तेत आली. त्यानंतर खूप घोषणा, खूप जाहिराती, खूप आकडे यांची आतषबाजी परवाच्या वीस लाख करोडच्या पॅकेजपर्यंत चालूच ठेवण्यात आलीय. पाच ट्रिलियन इकॉनॉमीचं एक महास्वप्नही पेरण्यात आलं होतं. पण मागच्याच आठवड्यात रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरनी फुगा फोडत पुढच्या आर्थिक वर्षात जीडीपी तळात राहणार व अर्थव्यवस्था उचक्या देणार असं सांगून टाकलेय आज. करोनाच्या आड लपायला सरकारला खूप जागा मिळणार आहे, पण नोटबंदी, घाईतली जीएसटी यांच्या सावल्या खूप काळ पाठलाग करत राहणार. हे सर्व म्हणजे माझे अंगण, माझे रणांगण झाल्याची चिन्हे नाहीत?
कशाकशाशी लढायचं आता सर्वसामान्यांनी? भक्तांची अंधश्रद्धा थांबायचं नाव घेत नाही. साधी गोष्ट पहा, महाराष्ट्र सरकारला मदत करण्याऐवजी प्रदेश भाजप पीएम केअर फंडासाठी अंग मोडून कामाला लागतो? इतका अप्पलपोटी विचार एखाद्या राष्ट्रीय पक्षाची प्रादेशिक मंडळी करू शकतात? म्हणजे पुन्हा आपलेच अंगण, रणांगण करून आपल्याच प्रदेशाला नामोहरम करायचं. मतं मागताना मात्रं पानभर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा वापरायची आणि सत्तेतून मिळालेलं धन मात्र दिल्ली दरबारी जमा करायचं!
या दुटप्पी नीतीने भाजपला काय नैतिक अधिकार राहतो, विद्यमान सरकारच्या नावाने अंगण, रणांगण यमकाच्या पाट्या छातीवर मिरवण्याचा वा काळे झेंडे दाखवण्याचा?
आता तर माजी मिसेस मुख्यमंत्रीण बाईंनाही कंठ फुटलाय! त्याही ट्विटूट्विटू करू लागल्यात. अहो तुमचे हे परमनंट नव्हते झाले सीएम पोस्टवर! खडसे जसं दादांना म्हणालेत तुमचा अनुभव काय? तसा या माजी मिसेस सीएमनाही कुणीतरी आरसा दाखवायला हवा. सत्ता व सीएम पद म्हणजे काही बॅंक खाते नव्हे, एका आदेशाने दुसऱ्या बॅंकेत वर्ग करायला. तसा अॅक्सेस नसतो बाई!
थोडक्यात ताई, माई, आक्का, आजी, माजी मिसेस, दादा, भाऊ यांच्यासह पोरंटोरं घेऊन सत्तेचं वंगण संपल्याने जे रिंगण तुटलं, त्यातून गणंग झालेल्या भणंगांची फौज विवादीत ढाचा पाडायला जावी, त्या त्वेषाने सरकार पाडायला निघाली आहे.
पहाटेचे प्रताप अंगाशी येऊनही धडा न शिकलेल्यांना कोण समजवणार?
फडण‘वीस’, वीसवीस संपेल. वीसचोवीस उजाडेल तोवर, वीस जणांच्या कोअर टीमसह अंगणातच भातुकलीचं रणांगण आखा.
..................................................................................................................................................................
लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.
writingwala@gmail.com
..................................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment