ईदच्या दिवशी काय घडले! तुकोबांचे मशिदीत कीर्तन झाले!!
पडघम - सांस्कृतिक
श्रीनिवास हेमाडे
  • तुकाराम महाराजांचे चित्र तुकाराम डॉट कॉम या संकेतस्थळावरून साभार
  • Mon , 25 May 2020
  • पडघम सांस्कृतिक ईद Eid ईद मुबारक Eid Mubarak तुकाराम Tukaram

आज ईद. त्यानिमित्त संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा एक अभंग आणि त्याची हकीकत सांगणारा हा विशेष लेख... 

..................................................................................................................................................................

१.

तुकोबांना ईश्वराचे कोणतेही रूप, त्याचा कोणताही आविष्कार मान्यच होता. हे लक्षात घेतले तर एका अपूर्व विलक्षण ईदच्या दिवशी काय घडले असावे आणि कसे घडले असावे, याचा एक अंदाज बांधता येतो. 

तुकोबा पुण्यातून दिंडी घेऊन जात होते. जाताना एका चौकात जोराचा पाउस सुरू झाला. एकच तारांबळ उडाली. दिंडीतील साऱ्या वारकरी भक्तांनी इकडेतिकडे आडोसा शोधला. सारे जण वेगवेगळ्या गटांनी उभे राहिले. परंतु तुकोबाराय मात्र पावसातच भिजत होते...

त्या चौकात एका बाजूला मशीद होती, तर एका बाजूला मंदिर होते.

तुकोबा मंदिराकडे येतील, या भीतीने मंदिराच्या ब्राह्मण भटजीनी लगेच दरवाजे बंद करून टाकले.

लांबून मशिदीतील मुसलमान हे पाहत होते. त्यांच्यात कुजबुज अन चर्चा सुरू झाली...

“अरे, वो देखो तुकाराम महाराज भिग रहे है.”

“सुना है, वो बहुत ही बडे संत है”

“सच है, बहोत बडा बंदा है.”

“मगर वो भिग रहा है, उसके लोग भी भिग रहे है... क्या करे...!

“या अल्ला...! उनको बचना चाहिये...”  

अशी काहीशी चर्चा असावी. 

मग तुकोबांना मशिदीत बोलावण्याचा निर्णय झाला...

“जाव रे कोई तो... बुलाव उन्हे अंदर... बाकी के लोगोंको भी बुलावो...!”

आणि मग काय...

त्या मुसलमानांनी तुकोबांना अतिशय आदरपूर्वक आत नेले. 

सगळी दिंडी मशिदीत गेली. सारे वारकरी आत आले.

तुकोबांना, वारकरी मंडळींना कोरडे कपडेही देण्यात आले.

२.

रात्रीची कीर्तनाची वेळ झाली.

इस्लाम मूर्तीपूजा न मानणारा आणि तुकोबा तर विठुरायाच्या दर्शनाचे भुकेले.... तेच साऱ्या वारकरी मंडळींचे.

आता, मूर्तीपूजा न मानणाऱ्या मशिदीत तुकोबा काय बोलतील आणि कसे काय भजन-कीर्तन करतील,
याची प्रत्येकाला उत्कंठा लागली.

तुकोबा किर्तनाला उभे राहिले...

वागीश्वरी अवतीर्ण झाली....

“अल्ला देवे अल्ला दिलावे अल्ला दारु अल्ला खिलावे।
अल्ला बगर नहीं कोय अल्ला करे सोहि होय ॥१॥

मर्द होये वो खडा फीर नामर्दकुं नहीं धीर ।
आपने दिलकुं करना खुसी तीन दामकी क्या खुमासी ॥२॥

सब रसों का किया मार । भजनगोली एक हि सार ।

इमान तो सब ही सखा । थोडी तो भी लेकर ज्या ॥३॥

जिन्हो पास नीत सोये । वोहि बसकर तिरोवे ।
सांतो पांचो मार चलावे । उतार सो पीछे खावे ॥४॥

सब ज्वानी निकल जावे। पीछे गधडा मटी खावे ।
गांवढाळ सो क्या लेवे । हगवनी भरी नहि धोवे ॥५॥

मेरी दारु जिन्हें खाया । दिदार दरगां सोहि पाया ।
तल्हे मुंढी घाल जावे । बिगारी सोवे क्या लेवे ॥६॥

बजारका बुझे भाव। वो हि पुसता आवे ठाव ।
फुकट बाटु कहे तुका । लेवे सोहि लें हिसखा ॥७॥

अर्थ काय? तर...

तुकोबा म्हणतात,

अल्ला देवे अल्ला दिलावे अल्ला दारु अल्ला खिलावे। अल्ला बगर नही कोय अल्ला करे सोहि होय ॥१॥

“रे माणसा, अल्लाच देतो, अल्लाच देववतो. अल्लाच दवादारू पाजतो आणि खाऊही घालतो. अल्लाशिवाय जगात कोणीही नाही. अल्ला करेल तेच होते, असे सतत म्हणतोस ना? मग आता काय सांगतो ते ऐक!”

मर्द होये वो खडा फीर नामर्दकुं नहीं धीर । आपने दिलकुं करना खुसी तीन दामकी क्या खुमासी ॥ २ // 

“अरे, ह्या दारूने तुला धड उभेही रहाता येत नाही. जो मर्द असतो तोच ताठ उभा रहातो, हे विसरलास काय? नामर्दाला ते जमत नाही हे तुला ठाऊक नाही काय?  केवळ दिल खुश व्हावे म्हणून नशा करून हा तीन पैशाचा काय तमाशा लावलायसं तू?”

सब रसोंका किया मार । भजनगोली एक हि सार । इमान तो सब ही सखा । थोडी तो भी लेकर ज्या ॥३॥

“अरे भल्या माणसा, तुला रसपानच करायचे आहे ना? मग सर्व रसांचा रस, रससार असे हरीभजन तू कर... तुझ्या अंतरात्म्यात थोडेसे जरी इमान शिल्लक असेल तर माझ्या मित्रा, थोडेसे तरी भजन करून बघ!”

जिन्हो पास नीत सोये । वोहि बसकर तिरोवे । सांतो पांचो मार चलावे । उतार सो पीछे खावे ॥४॥

“जवानीने मदमस्त झाला आहेस तू, भ्रमिष्टा बनला आहेस, पण लक्षात ठेव, ज्याने नीतीला झोपविले, आणि अनीतीने वागत राहिला, त्याला कर्माचे फळ, त्याच्या पापाचे फळ चुकलेले नाही. त्याला सारे काही भोगावेच लागते. जवानीत करशील मस्ती, अन उतारवयात पाठीमागून लाथा खाशील!”

सब ज्वानी निकल जावे। पीछे गधडा मटी खावे । गांवढाळ सो क्या लेवे । हगवनी भरी नहि धोवे ॥५॥

“अरे मूर्ख...! ही सारी जवानी निघून जाईल आणि मग गधड्या माती खाशील! अरे गावंढळ माणसा, म्हातारपणी तुझी हगवण धुवायलाही कुणी भेटाचये नाही रे.... अशी अवस्था होईल ह्या दारूपायी!”

मेरी दारु जिन्हें खाया । दिदार दरगां सोहि पाया । तल्हे मुंढी घाल जावे । बिगारी सोवे क्या लेवे ॥६॥

“ये, भाबड्या जीवा, ये... माझी हरीभजनाची दारू जो पिईल, ती ईश्वर भक्तीची नशा चाखेल तोच दर्ग्याचा खरा दीदार होईल. तोच खरा ईश्वराच्या जवळ जाईल. तोच ईश्वराच्या प्रेमाला पात्र राहील.... जगाच्या वासनेची दारू पिऊन खाली मुंडी घालून किती चालत राहाशील रे? अरे, बिगारी कामगार जर झोपून राहिला तर तो छदाम तरी कमावेल का?”

बजारका बुझे भाव। वो हि पुसता आवे ठाव । फुकट बाटु कहे तुका । लेवे सोहि लें हिसखा ॥७॥

“पण तेच तू करतो आहेस, अशाने बाजार बुडेल. तुला कोणी विचारणार नाही. तू काहीच प्रयत्न नाही केलेस तर तुला देव काय फुकटात भेटणार आहे काय?”

३.

हेच तुकोबा थेट रोकड्या भाषेत क्षेपकाच्या एका अभंगात सांगतात...

वृद्धपणी आली जरा । शरीर कापे थरथरा  

आयुष्य गेले हे कळेना । स्मरा वेगे पंढरी राणा  //

दात दाढा पडल्या ओस । हनुवटी भेटे नाकास  

हात, पाय, राहिले कान । नेत्रे पाझरे हाले मान //

अंगकांती परतली / चिरगुटा ऐसी झाली

आड पडे जिव्हा लोटे / शब्द न ये मुखावाटे //

लांब लोंबताती अंड / भराभरा वाजे गांड

तुका म्हणे आता तरी / स्मरा वेगी हरी हरी //  

भारतात एकही बहुजन संत, महात्मे, साधु, वैष्णव मुसलमानांच्या विरोधात नव्हते. त्या साऱ्यांना माहीत होते ईश्वर एकच आहे, आणि सर्व धर्मही मुलतः एकच आहेत. त्यांना माहीत होते की, मुसलमान आपलेच बांधव आहेत...

तुकोबा आणि विठुराय यांचे नाते अद्वैताचे आहे. त्या दोघांमध्ये सकृतदर्शनी फरक करता येत असला आणि त्यांना अलग करता येत असले तरी दोघेही आध्यात्मिकदृष्ट्या फरक करता येण्याजोगे आणि अलग करता येण्याजोगे नाहीत, ते दोघेही एकच आहेत. गांधीजीही हेच सांगतात – “ईश्वर अल्ला तेरो नाम... सबको सन्मती दे भगवान....”

हे तुकोबांच्या सर्व भाषिक साहित्य निर्मितीतून ते प्रतीत होते, जाणवत राहते.

वैदिक हिंदु तत्त्वज्ञानातील अद्वैत वेदान्ताच्या मते, ब्रह्म हेच एकमेव तत्त्व आहे, अन्य काही नाही. हा एकतत्त्ववाद आहे. आणि इस्लामी तत्त्वज्ञानानुसार केवळ अल्लाह हेच एकमेव तत्त्व आहे. या अर्थाने हिंदू-इस्लाम एकतत्त्ववादी धर्म आहेत, हे त्यांच्यातील मूलभूत तात्त्विक नाते आहे. ते सुफी संप्रदायाने हिंदू-मुसलमान अद्वैतातून अवतरीत केले.   

समग्र अभंग रचनेत तुकाराम महाराजांनी हिंदीत एकूण ६२ रचना केल्या आहेत. तुकारामडॉटकॉम या संकेतस्थळावर ‘तुकारामजी की हिन्दी रचनाँए’ या नावाने त्या दिल्या आहेत. अल्लाहविषयक अभंग त्यातच समाविष्ट आहेत. तेथे हिंदीतील सर्व अभंगांचे त्यातील प्रत्येक अभंगांच्या प्रकृतिनुसार वेगवेगळ्या नावांनी वर्गीकरण केले आहे. मुंढा, डोई फोडा, मलंग, वैद्यगोळी, साख्या, अशी नावे आहेत. या मुसलमानी अभंगात मुंढा ३, दरवेस अभंग १, डोईफोडा अभंग १, मलंग अभंग १, वैद्यगोळी अभंग १. 

माझ्या खासगी गाथा प्रतीत (संपादक कै. ह. भ. प. विष्णु नरसिंह जोग) हिंदी अभंगांची उत्तराधि पदे, दोहरे आणि मुसलमानी अभंग अशी वर्गवारी दिली आहे. उत्तराधि पदे, दोहरे ही राम-कृष्ण यांच्याविषयी हिंदीत रचलेले अभंग आहेत तर ‘मुसलमानी अभंग’ हे अल्लाहसाठी रचलेले अभंग आहेत.

..................................................................................................................................................................

संदर्भ 

१. श्रीतुकारामाची गाथा, भाग १ ला व २ रा, संपादक : कै. ह. भ. प. विष्णु नरसिंह जोग, प्रकाशक : केशव भिकाजी ढवळे, गिरगांव –मुंबई, आषाढ शके १८४९, सन १९२७, किंमत अडीच रुपये, पान क्रमांक २७९ ते २८१. खासगी प्रत : श्री. ओंकार नारायण हेमाडे, खरेदी दिनांक : ०८ जानेवारी १९६८. 

२. http://tukaram.com/hindi/tukaramji_hindi.asp

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास हेमाडे संगमनेर महाविद्यालय, संगमनेर इथं तत्त्वज्ञान विभागप्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक आहेत.

shriniwas.sh@gmail.com

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Abhay jagtap

Tue , 26 May 2020

या कथेला काही आधार आहे का ? मशिदीमध्ये वाद्य , संगीत त्याकाळी चालत होते का ? - अभय जगताप


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......