अजूनकाही
दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन महिनाही उलटत नाही, तोच एका नव्या राज्यपालांनी त्यांचा आदर्श गिरवायला सुरुवात केली आहे. जंग हे भाजपचे समर्थक असल्याचं म्हटलं जात होतं, पण प्रत्यक्षात तसा पुरावा कुणालाही सादर करता आला नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ऐनकेनप्रकारेण अडचणीत आणणं एवढा एकच उद्योग ते करत होते. हाच प्रकार आता पुडुचेरीच्या नायब-राज्यपाल किरण बेदी करत आहेत. पुडुचेरीमध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि बेदीबाई भाजपच्या दिल्लीच्या पराभूत मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार. त्या निवडणुकीत त्यांनी इतका सपाटून मार खाल्ला होता की, भाजपला त्यांचं पुनर्वसन करण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. त्यामुळे त्यांना वर्षभरापूर्वी पुडुचेरीसारख्या फारशा महत्त्वाच्या नसलेल्या केंद्रशासित प्रदेशाचं नायब-राज्यपाल बनवलं गेलं. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच या राज्यात काँग्रेस सत्तेवर आली. त्यानंतर लगेचच बेदीबाईंची नियुक्ती केली गेली, हा योगायोग नक्कीच म्हणता येणार नाही.
निवडून आल्यापासून पुडुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांचं नाव राष्ट्रीय पातळीवरील वर्तमानपत्रांमध्ये क्वचितच कधी आलं असेल, पण बेदीबाई मात्र या ना त्या कारणानं सतत बातम्यांत झळकत असतात. मागच्या पंधरवड्यात तर त्यांनी थेट मुख्यमंत्र्याचा जीआर रद्द करत असल्याची घोषणा टविटरवरून केली. हा जीआर होता, शासकीय निर्णयांच्या माहितीसाठी सोशल मीडियाचा, विशेषत: व्हॉटसअॅपचा वापर केला जाऊ नये यासाठी. त्यावर ‘जर पुडुचेरीला विकसनशील केंद्रशासित प्रदेश बनायचं असेल तर ते संपर्कमाध्यमात पिछाडीवर राहून चालणार नाही, म्हणून मुख्यमंत्र्यांच्या आदेश रद्द करत आहे’ असं ट्विट बेदीबाईंनी केलं. काही महिन्यांपूर्वी त्यांनी पुडुचेरी स्वच्छ करण्यात राज्य सरकारने मला मदत केली नाही तर मी राजीनामा देईन, अशी धमकी दिली होती.
त्यामुळे त्या राष्ट्रीय पातळीवरील वर्तमानपत्रांमध्ये पुन्हा एकदा झळकल्या. बरं, हे झालं तेव्हा बेदीबाई पुडुचेरीमध्ये नव्हत्या, तर दिल्लीत होत्या. एवढंच नव्हे तर वर्षभराच्या काळात त्या मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांनी अडचणीत आणण्याचे हरप्रकारे प्रयत्न करत आहेत. भाजप सरकारने नियुक्त केलेले अनेक राज्यपाल समांतर सत्ताकेंद्र (उदा. तथागत रॉय, राम नाईक) म्हणून काम करताना किंवा त्या राज्यातील सरकारमध्ये अनावश्यक हस्तक्षेप करताना दिसून येते आहेत. विशेषत: काँग्रेसचे सरकार असलेल्या राज्यांमध्ये हा प्रकार विशेषत्वाने गेल्या दोन-अडीच वर्षांत घडलेला आहे. त्यात आता बेदीबाईंची भर पडली आहे.
खरं तर लोक, मग ते कामगार असोत की मध्यमवर्गीय, ते विकासाला महत्त्व देतात, आयडियॉलॉजीला नाही, या बेदीबाईंच्या भ्रमाचा भोपळा दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत दिल्लीकरांनी फोडला होता. त्या भाजपच्या दिल्ली विधानसभेच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार होत्या. पण त्यांच्या कर्तबगार कामगिरीचा करिश्मा कामाला आला नाही. आयपीएस अधिकारी असताना त्यांनी अतिशय धडाडीनं काम केलं. तिहार तुरुंगाचा कायापालट केला. देशभरात आणि जागतिक पातळीवरही त्यांची दखल घेतली गेली. त्यातून बेदीबाईंनी स्वत:ची प्रतिमा ‘लार्जर दॅन लाइफ’ करून घेतली. आपल्याला नेमून दिलेलं काम चोखपणे करणाऱ्या व्यक्तींचा भारतीय जनमानसात नेहमीच उदोउदो केला जातो. कारण बहुतांश भारतीय आपलं काम चोखपणे न करण्यात वाकबगार असतात! हा इतका सार्वत्रिक अनुभव आहे की, ज्या कामासाठी आपल्याला वेतन मिळतं ते जबाबदारीनं, सचोटीनं करणं हे आपलं कर्तव्य असतं आणि त्यात फुशारकी मारण्यासारखं काहीही नसतं, याचं भान ना संबंधित अधिकाऱ्यांना राहतं, ना त्यांचा उदो उदो करणाऱ्यांना. बेदीबाईंच्या बाबतीत तेच झालं.
परिणामी ‘आपण महाकर्तबगार आहोत’, ‘आपण सर्व काही बदलू शकतो’, या अहंमन्यतेतून बेदीबाईंच्या महत्त्वाकांक्षेला उधाण आलं. त्याला पहिले धुमारे फुटले ते २०११सालच्या अण्णा हजारे यांच्या दिल्लीतील पहिल्या उपोषणापासून. टीम अण्णा तेव्हा एका अवास्तव युटोपियामध्ये वावरत होती. त्यामुळे अपेक्षेनुसार ती फुटली. त्यातून पुढे आलेल्या ‘आप’लाही तो युटोपिया भोवला. म्हणून अरविंद केजरीवाल यांनी निवडणुकीत स्वत:ची प्रतिमा ‘लार्जर दॅन लाइफ’ न करता ती जनसामान्यांच्या हातात हात मिळवणारी राहील याची काळजी घेतली. बेदीबाईंनी नेमकं याच्या उलट केलं. स्वत:च्या महत्त्वाकांक्षेला आवर न घालता आल्यानं ‘आप’मध्ये असतानाच त्या भाजपच्या गळाल्या लागल्या. निष्कलंकता, स्वच्छ चारित्र्य आणि कर्तबगारी या त्यांच्या प्रतिमेच्या जोरावर मोदी-शहा यांनी बेदीबाईंना केजरीवाल यांच्याच विरोधात उभं केलं.
‘आय डेअर’, ‘इटस ऑलवेज पॉसिबल’ म्हणणाऱ्या बेदीबाई आणि अरुण भाटिया, गो.रा.खैरनार, टी.एन.शेषन यांच्यात बरंचसं साम्य आहे. निर्भीड आणि स्वच्छ चारित्र्याच्या व्यक्ती स्वत:च्याच मोहात पडतात आणि आपण जबाबदार नागरिक आहोत हे विसरून जातात. देशातला सर्व भ्रष्टाचार निपटून काढण्याचं उत्तरदायित्व आपल्याकडेच आहे आणि आपणच ते करू शकतो, या चढेल अहंकाराची बाधा त्यांना होते. बेदीबाईंचं नेमकं तेच झालं. शिवाय जबरी महत्त्वाकांक्षा. त्यामुळे त्यांनी कुठलाही विधिनिषेध न बाळगता भाजपची ऑफर स्वीकारली. सामाजिक नीतीमत्तेच्या आणि सार्वजनिक चारित्र्याच्या संकल्पनेत या गोष्टी बसत नाहीत. त्यामुळे दिल्लीकरांनी त्यांनाच स्वीकारलं नाही.
एका क्षेत्रातल्या मर्दुमकीवर दुसऱ्या क्षेत्रातल्या अश्वमेधाच्या घोड्यावर स्वार होता येत नाही, याचा धडा बेदीबाईंना दिल्लीकरांनी शिकवला. पण सपशेल पराभव झाल्यानंतरही त्या केजरीवाल यांनी काय करावं याचे सल्ले देत होत्या. त्यातून त्यांची ‘गिरे तो बी टांग उपर’ ही वृत्ती उघड झाली होती.
आता त्या पुडुचेरीमध्ये समांतर सत्ताकेंद्र चालवण्याचा घटनाबाह्य उद्योग करत आहेत. काँग्रेसवर त्यांचा जुनाच राग आहे. त्याचं उट्टं आता काढू या असा त्यांचा मनसुबा असेल तर तयातून त्यांचीच कर्तबगारी डागाळली जाईल आणि त्या कर्तबगार असल्याने तरी मनाने कोत्या आहेत, हेही आपसूक सिद्ध होईल.
बेदीबाईंनी लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारच्या कारभारात सातत्याने लुडबूड करण्यात आपली प्रतिभा खर्ची करण्यापेक्षा त्या सरकारचा सल्लागार म्हणून काम करणं हे लोकशाहीशी, राज्यघटनेशी जास्त सुसंगत राहील.
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment