ऑनलाईन शिक्षण तर अटळ आहे. त्यामुळे जो नवी कौशल्ये आत्मसात करेल, तोच टिकेल.
पडघम - तंत्रनामा
प्रिया काळे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 25 May 2020
  • पडघम तंत्रनामा ऑनलाईन शिक्षण Online education करोना विषाणू Corona virus कोविड-१९ Covid-19 करोना Corona करोना व्हायरस Coronavirus लॉकडाउन Lockdown

करोना व्हायरसचा जगातील इतर देशांसह भारतातही वाढता प्रादुर्भाव पाहता मार्च २०२०च्या मध्यावर शाळा व महाविद्यालये काही काळापुरती बंद ठेवण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला. हा व्हायरस नवीन असून त्यावर कोणतेही औषध वा लस उपलब्ध नाही आणि प्रसार अधिक वेगाने होत असल्याने त्यावर सध्या तरी उपाय एकच - तो म्हणजे सामाजिक अंतर पाळणे असे माध्यमांतर्फे आणि सरकारतर्फे सुचवण्यात आले. बघता बघता म्हणजे २४ मार्च रोजी केंद्र सरकारने ‘लॉकडाउन’ घोषित केला.

सुरुवातीचे काही दिवस घराबाहेर पडू नका वगैरे सूचनांचे पालन करून झाल्यानंतर जेव्हा कोविड-१९ चा प्रसार दिवसेंदिवस वाढू लागला, तेव्हा मात्र हे काहीतरी वेगळे आणि गंभीर प्रकरण आहे आणि पुढचे कित्येक दिवस आपल्याला घरातच थांबावे लागणार आहे, याची सर्वांना जाणीव झाली. आयटी कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याचा सल्ला दिला. त्याचबरोबर ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनीही घरूनच काम करावे अशी व्यवस्था करण्यात आली. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी दिवसाचा काही वेळ जाऊ लागला. कधीही कल्पनाही न केलेले आयुष्य समोर आले. या सगळ्याचा परिणाम शिक्षणक्षेत्रावर न झाला तरच नवल. शिक्षक आणि विद्यार्थी घरात अडकून पडले तरी शिक्षण दिले व घेतले जाऊ शकते आणि तेसुद्धा रोज वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ही कल्पना जोर धरू लागली, आणि बघता बघता अगदी प्राथमिक ते अगदी पदव्युत्तर स्तरावरील अध्ययन व अध्यापन ऑनलाईन पद्धतीने सुरू झाले.

मार्च महिना संपताना लॉकडाउन सुरू झाल्याने ऐन वेळी येऊ घातलेल्या वार्षिक परीक्षांचे काय करायचे, हा एक मोठा प्रश्न शिक्षणक्षेत्रापुढे उभा होता. अगदी दहावीचा भूगोलाचा पेपरही पुढे ढकलण्यात आला. अशा परिस्थितीत बाकीच्या इयत्तांचे काय करायचे हाही प्रश्न उभा राहिला. महाराष्ट्रामध्ये जवळ जवळ महाराष्ट्र राज्य अभ्यास मंडळाच्या २१ हजार शाळा आहेत. याशिवाय केंद्रीय अभ्यास मंडळ तसेच आंतरराष्ट्रीय अभ्यास मंडळाच्या शाळांची संख्याही उल्लेखनीय आहे. या सर्व शाळांमधून लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्या भवितव्याचे काय हा शिक्षक आणि पालकांना पडलेला महत्त्वाचा प्रश्न ऑनलाइन साधनाने तात्पुरता का होईना सोडवला. काही साधनांच्या साहाय्याने मिटिंग्ज आयोजित करून दैनंदिन वर्गाध्यापनाप्रमाणे ऑनलाईन अध्यापन सुरू झाले. परीक्षा होतील तेव्हा होतील, पण लॉकडाउनमुळे मुलांच्या अभ्यासाचे होणारे नुकसान तरी टळले. यामुळे पालक आणि शाळा आश्वस्त झाल्या. अगदी वेळापत्रक लावून शाळेप्रमाणेच शिक्षकांचे अध्यापन सुरू झाले. केवळ यावरच न थांबता विद्यार्थ्यांना सराव करण्यासाठी प्रश्न देणे, वेगवेगळे उपक्रम देणे, त्यांच्या ऑनलाईन परीक्षा घेणे, विविध उपक्रमांद्वारे त्यांचे मूल्यमापन करणे, त्यांना प्रत्याक्षिक देणे, त्या त्या विषयातील तज्ज्ञ बोलावून त्यांचे व्याख्यान आयोजित करणे, या सर्व गोष्टी घडू लागल्या.

महाविद्यालयीन स्तरांवर कोविड-१९बद्दल जाणीव जागृती करण्याच्या संशोधन मोहिमा हाती घेतल्या जाऊ लागल्या विविध महाविद्यालयांनी कोविड-१९बद्दल अभियान सुरू करून प्रश्नावल्या तयार करून त्या सोशल नेटवर्किंग साईट्सवरून पाठवणे सुरू केले. यामध्ये विशिष्ट विषयाचे सामान्य ज्ञान तपासण्यापासून ते अगदी नेट-सेटच्या परीक्षांमधील तयारीपर्यंतचे प्रश्न तयार झाले.

या सगळ्या प्रकारांनी खरोखरच अध्ययन प्रक्रिया घडली का आणि अध्यापनावर, अध्यापकांवर याचा काय परिणाम झाला, या संशोधन करण्यासारख्या गोष्टी आहेत. मात्र तरीही हे सर्व प्रकार म्हणजे ऑनलाईन शिक्षणाची पायाभरणी होय.

ऑनलाईन शिक्षण हे रोजच्या शिक्षणापेक्षा खूप वेगळे आहे. आपल्याकडे काही पातळ्यांवर आणि काही प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर शिक्षणामध्ये केला जाऊ लागला आहे. याआधी २.० आणि ४.० तंत्रज्ञान विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र सध्याच्या परिस्थितीत १०० टक्के ऑनलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसते आहे. काहीएक अपवाद वगळता बहुतांश शाळा-महाविद्यालयांनी आपला बराचसा अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धती वापरून पूर्ण करून घेतल्याचे समोर आले आहे. अर्थात असे असले तरी हा अभ्यासक्रम सर्वच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे, असे म्हणता येणार नाही.

असे असले तरी शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञांनी यापुढील शिक्षण हे प्रामुख्याने ऑनलाईन शिक्षण किंबहुना डिजिटल शिक्षण असेल असे भाकीत केले आहे. लॉकडाउनचा काळ यासाठी पथदर्शी अभ्यासाचा काळ होता असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. या पथदर्शी अभ्यासातून डिजिटल शिक्षणाच्या प्रवासातील काहीएक वास्तव आपल्यापर्यंत आलेले आहे आणि त्या वास्तवातून आपल्याला डिजिटल शिक्षणाबाबतच्या अपेक्षांपर्यंत जायचे आहे हे निश्चित.

ऑनलाईन राहून अध्यापन करणे, त्यासाठी विशिष्ट तयारी करणे, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर समजून घेणे, नवनवीन प्रकारची अॅप्लिकेशन्स माहीत करून घेणे, त्यांचा सराव करणे, त्यातील तांत्रिक बाबींचा सखोल अभ्यास करून त्यातील अडचणींवर मात करणे, विद्यार्थ्यांना त्याचे प्रशिक्षण देणे, त्याद्वारे अध्ययन कसे सुलभ होईल, याचे मार्गदर्शन करणे अशा अनेक बाबी ज्या दैनंदिन वर्गाध्यानामध्ये गरजेच्या नसतात, त्या शिक्षकाला कराव्या लागू लागल्या.

याचबरोबर इंटरनेट कनेक्शन व्यवस्थित असेल तर पूर्ण तासिका अध्यापन सुरळीतपणे करता येते. नाहीतर इंटरनेट परत परत जोडावे लागते, त्यातही विद्यार्थ्यांपर्यंत आपला आवाज पोहोचतो आहे का, आपण त्यांना दिसत आहोत का, आपण पुरवत असलेले साहित्य त्यांना उपलब्ध होते आहे का, त्यांच्या काही समस्या आहेत का, त्या समस्यांचे समाधानकारक उत्तर आपण योग्य वेळेत देऊ शकतो का, विद्यार्थी पूर्ण वेळ लक्ष देऊन अध्ययन करतो का, महत्त्वाचे मुद्दे समजावत असताना तो समोर आहे का, यांसारख्या तांत्रिक गोष्टींमुळे प्रत्यक्ष अध्यापनातील रुची निघून जाते आणि अध्यापन कंटाळवाणे किंवा निरस होते.

त्याशिवाय विषयज्ञान अद्ययावत असण्यासोबतच ऑनलाईन राहून अगदी सहजतेने तंत्रे हाताळता येणे गरजेचे ठरले. यातील बहुतांश अॅप्लिकेशन्समध्ये विद्यार्थी शिक्षकाला प्रत्यक्ष दिसत नाही. तरीही तो समोर आहे असे समजून त्याला अध्यपनाचे  कार्य  (सेशन) सुरू ठेवावे लागते. हा प्रयत्न यशस्वी ठरतो  की, नाही हे कळण्यासाठी त्यावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे. पण तात्पुरत्या स्वरूपात शिक्षकांच्या ऑनलाईन अध्यापनाबाबतच्या सर्वेक्षणामधून काही बाबी समोर आल्या आहेत. त्यांची चर्चा करून त्यावर उपाययोजना राबवल्याशिवाय भविष्यातील ऑनलाईन शिक्षण यशस्वी ठरू शकणार नाही.

मुळात भारतासारख्या देशात ऑनलाईन पद्धतीने अध्ययन अध्यापन केले जाऊ शकते का? त्यासाठी आपले शिक्षक तसेच विद्यार्थी तयार आहेत का? त्यासाठी लागणारी अद्ययावत साधनसामग्री आपल्याकडे आहे का? त्यासाठी आपला अभ्यासक्रम सक्षम आहे का? विद्यार्थ्यांचे योग्य मूल्यमापन करण्याची सुविधा आहे का? असे अनेक प्रश्न आहेत.

पाश्चात्य आणि प्रगत देशांमध्ये ऑनलाईन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दूर-शिक्षण ही संकल्पना चांगली रुजली आहे. त्यासाठी लागणारी साधनसामग्री, भौतिक सुविधा, ऑनलाईन अध्यापनाची तंत्रे, प्रशिक्षित शिक्षक आणि विद्यार्थी या सर्वच बाबतीत हे देश आघाडीवर आहेत. ऑनलाईन शिक्षण पद्धतीला सामोरे जाताना यातील प्रत्येक घटकावर सखोल विचार होणे आणि त्यातील समस्या दूर करणे, हे एक मोठे आव्हान भारतीय शिक्षण पद्धतीसमोर आहे.

माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या सर्वेक्षणामधून ऑनलाईन शिक्षण देण्यात शिक्षकाची भूमिका नेमकी कशी असावी आणि त्यामध्ये कोणत्या अडचणी येतात, या गोष्टी समोर आल्या आहेत. वर उल्लेख केल्याप्रमाणे ऑनलाईन शिक्षणात शिक्षकाला ऑनलाईन असण्याचे सतत दडपण असल्याचे जाणवते. फार कमी शिक्षक अतिशय आत्मविश्वासाने डिजिटल शिक्षण देताना दिसतात. प्रत्यक्ष विद्यार्थ्यांसमोर असताना शिक्षकास त्यांचे थेट प्रत्याभरण मिळत असल्यामुळे शिक्षक अधिक आत्मविश्वासाने वावरू शकतो. समोर असलेल्या विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून त्यानुसार अध्यापन पद्धती निवडणे, विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणारे उपक्रम निवडणे, अध्ययनास उपयुक्त ठरणारी साधने वापराने, अधिक समृद्ध करणारे अनुभव देणे, सातत्यपूर्ण, सर्वांगीण आणि सर्वंकष मूल्यमापन करण्यासाठीची तंत्रे निवडणे, योग्य तेथे नैदानिक कसोट्यांचा अवलंब करणे यासारख्या अनेक गोष्टी तो एका वेळी लीलया करत असतो. शिक्षकाला नेमके काय काम असते हे यावरून सहज कळण्यासारखे आहे. याव्यतिरिक्त शाळेतील बाकीच्या जबाबदाऱ्याही त्याला पार पाडाव्या लागतात.

ऑनलाईन शिक्षणाद्वारे वरील सर्वच बाबतीत बंधने येतात. मुळात सर्वच शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञान वापरता येते असे नाही. ज्यांना तंत्रज्ञानाची नावड आहे, अशांच्या बाबतीत ऑनलाईन शिक्षण हे न पेलणारे आव्हान आहे. यामुळे शिक्षकाला चांगले आणि अद्ययावत ज्ञान असणे पुरेसे नसून तंत्रज्ञानाची सर्वांगीण माहिती असणे आणि त्यावर प्रभुत्व मिळवता येणे गरजेचे ठरत आहे. दुसरीकडे विद्यार्थ्यांचे वय, त्यांची आवड, त्यांचे पूर्वज्ञान, त्यांची अध्ययन करण्याची तयारी, त्यांच्या क्षमता, त्यांचा बौद्धिक विकास या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या ठरतात. ऑनलाईन अध्ययनात या सर्वच बाबींकडे लक्ष पुरवून त्याला अनुसरून अध्ययन अनुभूती देणे, हे खरोखर आव्हान आहे.

त्यातही पूर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवी आणि पदव्युत्तर या प्रत्येक स्तरावरील विषय, त्यातील प्रात्यक्षिक कार्य, त्यातून होणार शारीरिक, बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक, भावनिक विकास ऑनलाईन शिक्षाणातून साधता येणार आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तो जर साधता येणार नसेल तर आपण त्यासाठी कोणकोणते मार्ग अवलंबणार आहोत, याची तयारी आत्तापासून करणे गरजेचे आहे.

याशिवाय ऑनलाईन पद्धतीने व्यवसाय शिक्षण देण्यासाठी योग्य ती कार्यनीती आपल्याकडे  आहे का आणि नसेल तर ती करण्याची आपली तयारी आहे का, याही गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे.

थोडक्यात ऑनलाईन पद्धतीचे फायदे आणि दूरगामी तोटे लक्षात घेऊनच आपल्याला ही पद्धती राबवावी लागेल. नुकत्याच झालेल्या एका पाहणीतून १२ वर्षांखालील वयाच्या बहुतांश मुलांना सतत ऑनलाईन राहिल्यामुळे आणि तंत्रज्ञानाचा अति वापर केल्यामुळे डोळ्यांचे विकार झाल्याचे आढळून आले आहे. सतत बसून बसून पाठीचा मणका, मान, हात, डोके यांविषयीच्या आजारांच्या तक्रारीही वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. शाळेत असताना मुक्तपणे बागडण्याचे स्वातंत्र्य ऑनलाईन पद्धतीत हिरावले जाते. मुलांचे बालपण हिरावून घेणारी शिक्षण पद्धती अवलंबणे आपल्या हिताचे नाही.

याचबरोबर येत्या काळात विद्यार्थ्यांच्या वर्तनविषयक समस्या अधिक वाढणार आहेत आणि  त्या दूर करण्यासाठी त्यांना समुपदेशनाची गरज भासणार आहे. इतके दिवस शाळेमध्येच समुपदेशनाचे कार्य पार पाडले जायचे. समुपदेशक हा शिक्षकच असायचा. मात्र नवनवीन आव्हाने पेलताना शिक्षकालाही समुपदेशनाची गरज भासू शकते, याचाही विचार करणे नवीन शिक्षण पद्धतीत अनिवार्य आहे.

यानंतरचा मुद्दा आहे तो तंत्रज्ञान आणि साधने उपलब्ध असण्याचा. आजही भारतातील अनेक खेड्यांमध्ये वीज पोहोचलेली नाही. काही खेड्यामध्ये तसेच शहरांमध्ये १० तासांइतके भारनियमन केले जाते. मोबाइलला नेटवर्क मिळत नाही. त्यातूनही शिक्षणासाठी मोबाईल विकत घेणे किंवा घरामध्ये एकच मोबाइल आणि दोन-तीन मुले असतील तर त्यांना त्याचा शिक्षणात उपयोग होणार नाही, उलट इंटरनेटचा खर्च वाढतो म्हणून पालकांवर आर्थिक भर पडेल.

अशा परिस्थितीत ऑनलाईन शिक्षणाचे धोरण राबवावे लागल्यास खेड्यांमधील शिक्षण गळतीच्या समस्येने वेधून जाईल. एकीकडे पट नोंदणीसाठी शिक्षक आपल्या जीवाची बाजी लावून लढत असताना भविष्यात विशिष्ट वर्गातील मुले शिक्षणाकडे कायमची पाठ फिरवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे मुलींची गळती याही बाबतीत उल्लेखनीय असेल. विद्यार्थी जर शाळेपर्यंत येऊ शकत नसेल तर शाळेने त्याच्यापर्यंत जावे, हा विचार जगवायचा असेल तर वरील सर्व बाबींचा पुनर्विचार करून त्यावर उपाय योजना करणे गरजेचे आहे. 

यापुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सध्याचा अभ्यासक्रम हा दैनंदिन वर्गाध्यापनासाठी पूरक आहे. ऑनलाईन अध्यापनासाठी अभ्यासक्रमाची पुनर्बांधणी करणे आवश्यक ठरेल. ऑनलाईन पद्धतीस पूरक अध्ययन अनुभवांचा समावेश त्यामध्ये करावा लागेल. त्यासाठीचे यथायोग्य प्रशिक्षण शिक्षक तसेच विद्यार्थ्यांना द्यावे लागेल. त्यासाठी अध्यापन साहित्य\इ-कन्टेन्ट तयार करावा लागेल. मूल्यमापनासाठी नवनवीन तंत्रे, साधने वापरावी लागतील. त्यांचा सराव करावा लागेल. अर्थात फक्त एवढे करूनही भागणार नाहीच.

यातून आणखीही काही समस्या निर्माण होऊ शकतात. ३१ मेनंतर लॉकडाउन संपून शाळा सुरू झाल्या तरी कोविड-१९च्या दडपणामुळे ९० टक्के पालक आपल्या मुलांना पहिले सहा महिने तरी शाळेत पाठवण्यास तयार नाहीत. तरीही शाळा सुरू राहणारच. आत्ताप्रमाणेच सर्व शाळा शिक्षकांकडून ऑनलाईन पद्धतीने अभ्यासक्रम पूर्ण करून घेतीलच. काम दुप्पटीने वाढलेय, पण पगार नाही अशा द्विधा मन:स्थितीत सध्याचे शिक्षक आहेत. जगभरात अनेकांच्या नोकऱ्या जात असल्यामुळे नोकरी टिकवण्याचे भय एकीकडे, तर आर्थिक संकट दुसरीकडे, अशा कात्रीत सापडलेला शिक्षक गुणवत्तापूर्ण शिक्षण खरोखर  देऊ शकेल का, हाही प्रश्नच आहे.

सरकार आधीपासूनच शिक्षणाच्या बाबतीत उदासीन आहे. त्यामुळे कोविड-१९ नंतरच्या शिक्षण पद्धतीला सामोरे जाताना शिक्षक, विद्यार्थी, शाळा, शालेय व्यवस्थापनाची भूमिका, अभ्यासक्रम, अध्यापन साहित्य, मूल्यमापन, तंत्रज्ञान या सर्वांचा मेळ बसवून, त्यांचा विचार करून, काही आव्हाने गृहीत धरून आधीच उपाययोजना करणे आवश्यक ठरणार आहे.

ऑनलाईन शिक्षण तर अटळ आहे. अशा परिस्थितीत जो कौशल्ये आत्मसात करेल, तोच टिकेल. त्यामुळे शिक्षक असो वा विद्यार्थी काळाबरोबर चालण्यासाठी नवी कौशल्ये आत्मसात करणे आणि ती कालानुरूप अद्ययावत करत जाणे, हे येत्या काळात तरून राहण्यासाठीचे महत्त्वाचे हत्यार आहे.

..................................................................................................................................................................

लेखिका प्रिया काळे एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे येथे सहाय्यक प्राध्यापक आहेत.

kaprish226@gmail.com

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Dattahari Honrao

Thu , 11 June 2020

अप्रतिम मांडणी केल्याबद्दल विशेष अभिनंदन! लेख अतिशय आवडला. ऑनलाईन शिक्षण पद्धती तर अटळ आहे.त्यामुळे जो अपडेट आहे तोच टिकेल हे सत्य आहे.त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘अद्ययावत व्हा!’ या सूचनेप्रमाणे स्वत:ला अद्ययावत बनवत राहणे आणि गांधीजींच्या ‘कर के देखो’ या सूचनेप्रमाणे नवनवीन गोष्टींना घाबरून न जाता, आणि मुख्य म्हणजे अपयशाला न घाबरता, सतत प्रयोग आणि प्रयत्न करत राहणे, ते करता-करताच शिकणे, व शेवटी त्या नवीन गोष्टींवर प्रभुत्व संपादित करणे - हाच बदलाला तोंड देण्याचा योग्य मार्ग आहे.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......